चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !

Article also available in :

 

१. ‘चिकनगुनिया’ व्याधीचे स्वरूप त्रासदायक; पण त्यातून बरे होण्याची निश्चिती !

‘काही वर्षांपूर्वी ‘चिकनगुनिया’ या व्याधीने महाराष्ट्रात थैमान घातले होते. ‘चिकनगुनिया’ सामान्यतः घरात एकाच वेळी सगळ्यांना होतो. सगळे व्याधीग्रस्त झाल्याने कुणीच कुणासाठी काही करू शकत नाही. यात होणार्‍या संधीवेदना या तीव्र आणि दीर्घकाळ छळणार्‍या असल्याने व्याधीतून लगेच सुटका होत नाही. एकूणच या व्याधीचे स्वरूप इतके त्रासदायक आहे की, याचा एक रुग्ण नुसता बघितला, तरी आपल्याला त्याचा धसका बसतो.

‘चिकनगुनिया’ हा शब्द मुळात साहिली भाषेतील आहे. पूर्वी ही व्याधी माकडांना होत असे. ‘एडीस इजिप्टी’ नावाच्या डासाची मादी या व्याधीचा प्रसार करते. तिच्या चाव्यातून ‘अरबो व्हायरस’ नावाचे विषाणू मानवी शरिरात प्रवेश करतात. एकदा त्यांनी शरिरात प्रवेश केला की, त्यांची संख्या वाढून आजार व्यक्त होण्याचा काळ ५ ते ८ दिवस इतका असतो.

चिकनगुनिया पसरवणारा डास

 

२. ‘चिकनगुनिया’ची लक्षणे

२ अ. ताप

कधी लो ग्रेड (९९ ते १०१ ‘फॅरनहाईट’), तर कधी हाय ग्रेड (१०१ ते १०३ ‘फॅरनहाईट’) या प्रमाणात ताप येतो. ताप अधिकाधिक २-३ दिवस टिकतो; परंतु थोड्या थोड्या दिवसांनी तो पुन्हा येऊ शकतो.

२ आ. थंडी

जोरात थंडी वाजून मग ताप येतो. अधिक पांघरूणे घेऊनही तो न्यून होत नाही.

२ इ. डोकेदुखी

डोके जड होऊन दुखू लागते.

२ ई. मळमळ किंवा उलटी

ही लक्षणे काही जणांमध्येच आढळतात.

२ उ. संधीशूल

हे लक्षण अतिशय तीव्र असते. एका वेळी बरेच सांधे सुजतात आणि दुखतात. ‘सांध्यात विंचू चावल्यासारख्या वेदना होतात’, असे काही रुग्ण सांगतात. रुग्णाला कूस पालटणेही अशक्य होते. तो स्वतःचे कुठलेच काम करू शकत नाही. अगदी बोटांचे सांधेही असहकार पुकारतात. या वेदना हळूहळू अल्प होतात. त्या वेदना बरे होण्यास ४ मास ते २ वर्षे इतका कालावधी लागतो. काही रुग्णांमध्ये थंडी, पाऊस आणि आहारातील पालट यांमुळे वेदना पुन्हा पुन्हा डोके वर काढतात. काहींचा संधीशूल अगदी वैरभावाने ठाण मांडून बसतो.

२ ऊ. पुरळ

संपूर्ण त्वचेवर कुठेही बारीक पुरळ येतात. त्यांना खाज किंवा आग होणे, ही लक्षणे असतात. ३ ते ४ दिवसांनी पुरळ बसून तेथील त्वचा निघू लागते.

२ ए. अशक्तपणा

अशक्तपणा एक आठवडाभर तरी टिकतो. जीवघेणा अशक्तपणा, हे व्याधीचे आणखी एक लक्षण होय.

काही रुग्णांमध्ये ही सगळी लक्षणे तीव्र स्वरूपात दिसतात, तर काहींमध्ये ठराविकच लक्षणे दिसतात. काही जणांमध्ये लक्षणांचे स्वरूप त्यामानाने सौम्य असते. ताप आणि सांधेदुखी मात्र सगळ्यांमध्ये असते.

हे चिकनगुनियाचे पुस्तकात केलेले वर्णन आहे. त्याची लक्षणे इतकी स्पष्ट आणि तीव्र असतात की, अगदी प्रारंभीच आजाराचे निदान करणे सहज शक्य असते. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’मध्ये रक्तपरीक्षणात चिकनगुनियाच्या विषाणूचे ‘आर्.एन्.ए.’ (रायबोन्यूक्लिइक ॲसिड – मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल) पडताळता येतात; मात्र तो विषाणू ७ व्या दिवशी रक्तात आढळू शकतो.

 

३. उपचार

ताप घालवणारी आणि वेदनाशामक औषधे घेतली, तरी ती किती काळ घ्यावी लागतील, याचा भरवसा नसतो. काही वेळा आठवड्याने किंवा मासाने परत ताप येतो. सांधेदुखी आणि स्तब्धता तर कधीकधी २ वर्षे पाठ सोडत नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला, तर या ज्वराच्या प्रकारात अग्निमांद्य (भूक आणि पचनशक्ती यांचा र्‍हास), वातदोषाच्या कामात बिघाड, रसवहस्रोतासाच्या कामात बिघाड (आहारापासून सिद्ध झालेला पहिला शरीर घटक म्हणजे रसधातू होय. त्याचे शरीरभर वहन करणारे स्रोत – ‘चॅनेल’ म्हणजे रसवह स्रोत), रक्तात बिघाड, अस्थी (हाडे) आणि सांधे यांमध्ये बिघाड झालेला असतो. शास्त्रातील ‘आमवात’ या व्याधीत वर्णन केल्यासारखी; परंतु त्याहून तीव्र वेगाने घडलेली ही परिस्थिती आहे. तिचा प्रतिकार करायचा असेल, तर दोन पद्धतींनी विचार करायला हवा.

३ अ. प्रतिबंध

पहिले सूत्र प्रतिबंधाचे ! चिकनगुनिया डासांपासून होत असल्याने आपल्या परिसरात डासांच्या वाढीस अनुकूल ठरणारे वातावरण कटाक्षाने टाळले पाहिजे. या संबंधात महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत वेळोवेळी सूचना देतात अन् फवारणीही करतात. तरीही डासांचा प्रादुर्भाव होत असेल, तर घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवणे आणि रात्री मच्छरदाणीचा वापर करणे, हे उपाय हुशारीचे ठरतात. आजार झालाच, तर प्रारंभी तातडीने करायचे उपचार म्हणजे जवळच्या वैद्यांकडून ताप आणि संधीशूल यांसाठी औषध आणावे. वैद्यांकडे जाता येत नसेल आणि जाणारे दुसरे कुणी नसेल, तर प्राथमिक उपचार म्हणून ‘महासुदर्शन काढा’ आणि ‘दशमूलारिष्ट’ ४-४ चमचे घ्यावे. त्यात थोडे पाणी घालावे. वैद्यांकडे जाण्याची क्षमता येईपर्यंतच हा उपचार करावा.

३ आ. भूक लागेल तितकाच हलका आहार घ्यावा. भूक नसल्यास लंघन करावे अथवा भाजलेल्या तांदळाची पेज किंवा मुगाचे सूप किंवा कढण असा हलका आहार घ्यावा.

दिवसातून ३ वेळा गरम पाण्याच्या पिशवीचा किंवा तव्यावर फडके ठेवून वाळूच्या पुरचुंडीचा शेक घ्यावा.

३ इ. नागरमोथा, सुंठ, चंदन, वाळा, सारिवा आणि पित्तपापडा या औषधांनी सिद्ध केलेले (ही औषधे घालून उकळलेले) पाणी प्यावे.

३ ई. लाह्या, डाळींचे कढण, भाजलेल्या तांदळाची खिचडी आणि ज्वारीची ताजी भाकरी असा हलका आहार घ्यावा. चवीला थोडी मिरपूड वापरावी.

३ उ. गरम कपडे वापरावेत.

३ ऊ. सांध्यांना शक्यतो काही औषध लावू नये; कारण त्यातून पुरळ वाढण्याची शक्यता असते.

३ ए. स्नान, दिवसा झोप, काम आणि पंखा हे टाळून पूर्ण विश्रांती घ्यावी. (अर्थात् ही व्याधी सक्तीची विश्रांती देणारी आहे.)

३ ऐ. रात्री जागरण करू नये.

 

४. आयुर्वेदामुळे चिकनगुनियाचे परिणाम नष्ट होऊन वेदनारहित आयुष्य जगण्याची संधी मिळणे

ताप आणि पुरळ गेल्यानंतर व्याधीची दीर्घकालीन चिकित्सा चालू होते. त्यात विशेषतः सांधेदुखीवरील उपचार करावे लागतात. अशा वेळी येथेही आपल्या साहाय्याला आयुर्वेदशास्त्र येते. चिकनगुनियाच्या काही रुग्णांना प्रारंभी विरेचन किंवा बस्ती असे पंचकर्मातील काही उपचार करून पहावे लागतात. ते अर्थात्च वैद्यांच्या देखरेखीखाली करायचे असतात. ते करून घेतांना वैद्यांचे सल्ले तंतोतंत पाळणे महत्त्वाचे आहे. ताप गेल्यावरही दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. प्रत्येक रुग्णानुसार ही औषधे पालटतात; म्हणून आपल्या मनाने औषधे घेऊ नयेत. घरातील एका माणसाला दिलेली किंवा लिहून दिलेली औषधे दुसर्‍याने वापरू नयेत. आहाराचे पथ्य-अपथ्य सांभाळावे लागते. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो. व्याधीने सांध्यांमध्ये केलेले बिघाड याच उपक्रमांनी बरे होऊ शकतात. त्यामुळे रुग्णाला वेदनारहित आयुष्य जगण्याची संधी मिळते.

‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : ‘साप्ताहिक विवेक’)

Leave a Comment