नटराज

शिवाचे ‘नटराज’ हे रूप सर्वांनाच, विशेषत: कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. शिवाच्या या रूपाविषयी सविस्तर माहिती या लेखात पाहूया.

नटराज

नटराज

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधी अवस्था आणि दुसरी म्हणजे तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. समाधी अवस्था, म्हणजे निर्गुण अवस्था आणि नृत्यावस्था म्हणजे सगुण अवस्था. ‘एखादी निश्‍चित घटना अथवा विषय अभिव्यक्‍त करण्यासाठी जे अंगचालन केले जाते, त्याला ‘नटन अथवा नाट्य’ अशी संज्ञा आहे. हे नटन जो करतो तो नट होय. नटराज या रूपात शिवाने नाट्यकला प्रवर्तित केली, अशी पारंपरिक धारणा आहे. शिव हा आद्यनट आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला नटराज हे बिरुद लागले आहे. ‘ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाला आहे. तो जसा नर्तक आहे, तसाच त्याचा साक्षीही आहे. जेव्हा त्याचे नृत्य चालू होते, तेव्हा त्या नृत्याच्या झंकाराने सर्व विश्‍वव्यापाराला गती मिळते आणि जेव्हा त्याचे नृत्य विराम पावते, तेव्हा हे चराचर विश्‍व आपल्यात सामावून घेऊन तो एकटाच आत्मानंदात निमग्न होऊन रहातो’, अशी नटराज कल्पनेमागची भूमिका आहे. थोडक्यात नटराज हे ईश्‍वराच्या सकल क्रियाकलापाचे प्रतीरूप आहे. नटराजाचे नृत्य हे सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव (मायेचे आवरण) आणि अनुग्रह (मायेतून बाहेर पडण्यासाठी कृपा) या पाच ईश्‍वरी क्रियांचे द्योतक मानले जाते.

२. तांडवनृत्य आणि त्याचे सात प्रकार

ज्या नृत्याच्या वेळी शरिरातील भुवनांचा, म्हणजे प्रत्येक पेशीचा, नाद शिवकारक असतो, त्याला ‘तांडवनृत्य’ म्हणतात. हे पुरुषनृत्य असून मुद्रांकित असते, उदा. ज्ञानमुद्रा – अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना चिकटविणे. यामुळे गुरु आणि शुक्र उंचवटे जोडले जातात, म्हणजे पुरुष अन् स्त्री जोडले जातात.

 

२ अ. तांडवनृत्य

‘संगीतरत्‍नाकरात तांडवनृत्याची उत्पत्ती दिलेली आहे, ती अशी –

 

प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्रयुक्‍तं ततो हरः ।

तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय न्यदीदिशत् ।।

लास्यमस्याग्रतः प्रीत्या पार्वत्या समदीदिशत् ।

बुद्ध्वाऽथ ताण्डवं तण्डोः मत्र्येभ्यो मुनयोऽवदन् ।।

– संगीतरत्‍नाकर, अध्याय ७, श्‍लोक ५, ६

 

अर्थ : नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धत नृत्य आठवून ते आपल्या गणांतील अग्रणी असलेल्या तंडूकरवी भरतमुनीला दाखविले. तसेच लास्य हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करून दाखविले. लास्य हे स्त्रीनृत्य असून यात हात मोकळे असतात. तंडूने करून दाखविले ते तांडव, असे जाणून भरतादी मुनींनी ते नृत्य मानवांना शिकविले.

 

२ आ. तांडवनृत्याचे सात प्रकार

१. आनंदतांडव

२. संध्यातांडव (प्रदोषनृत्य)

३. कालिकातांडव

४. त्रिपुरतांडव

५. गौरीतांडव

६. संहारतांडव

७. उमातांडव

 

या सात प्रकारांपैकी संध्यातांडवाचे वर्णन शिवप्रदोष (म्हणजे प्रदोष) स्तोत्रात आले आहे, ते असे – त्रैलोक्यजननी गौरी हिला रत्‍नखचित सिंहासनावर बसवून शिव संध्यासमयी हे नृत्य करू लागतो. जेव्हा शिव नृत्यासाठी सिद्ध होतो, त्या वेळी सरस्वती वीणा वाजविते, इंद्र बासरीतून स्वर छेडतो, ब्रह्मा ताल देतो, लक्ष्मी गाणे गाते, श्रीविष्णु मृदंग वाजवितो आणि सर्व देवदेवता भोवती उभ्या राहून हा नृत्यदर्शनाचा सोहळा अनुभवतात. या नृत्यात शिवाचे स्वरूप द्विभुज असते आणि त्याच्या पायांखाली दैत्य चिरडला जात असल्याचे दृश्य नसते.

 

वरील सात प्रकारांपैकी गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यांत शिव हा भैरव अथवा वीरभद्र या स्वरूपात असतो, त्याच्यासह उमा अथवा गौरी असते आणि तो जळत्या चितांनी युक्‍त अशा स्मशानभूमीत भूतगणांच्या साथीने ही भयानक नृत्ये करतो.

 

नटराजाच्या सात्त्विक नृत्यप्रकारांत संध्यानृत्याप्रमाणेच नादान्तनृत्यही अत्यंत प्रसिद्ध आहे. चिदंबरम् येथील जगप्रसिद्ध नटराजमूर्ती याच नृत्याच्या पवित्र्यात आहे. शैव आणि शाक्‍त संप्रदायाचे लोक या नृत्यांना विशिष्ट तत्त्वांची प्रतीके मानतात. त्यांच्या मते अशा संहारक उग्र नृत्यांच्या वेळी शिव केवळ जगताचा प्रलय घडवून थांबत नाही, तर तो जिवांचे बंधही नष्ट करतो. जिथे जिवांचा अहंकार भस्मसात होतो, अशा अवस्थेचे प्रतीक म्हणजे स्मशानभूमी होय; म्हणून तिथे हे नृत्य केले जाते. शिव तांडवनृत्य करीत असतांना त्याला साथ देण्यासाठी देव आणि असुर सारखेच उत्सुक असतात.’

३. तांडवनृत्याच्या विविध मुद्रांत किती अर्थ असतो,
हे आनंदतांडव नृत्याच्या एका मुद्रेच्या संदर्भात येथे दिलेल्या उदाहरणावरून लक्षात येईल.

अर्थ

१. ‘कानांतील विभिन्न कुंडले अर्धनारीश्‍वर
२. मागच्या उजव्या हातातील डमरू नाद आणि शब्दब्रह्माची उत्पत्ती
३. मागच्या डाव्या हातातील अग्नी चराचराची शुद्धी
४. पुढचा उजवा हात भक्‍तांना अभय
५. पुढचा डावा हात जीवांच्या मुक्‍तीसाठी वर उचललेल्या पायाकडे संकेत करत आहे.
६. उजव्या पायाखाली मोडलेला ‘अपस्मार’ अथवा ‘मुयलक’ नावाचा दैत्य अविज्ञा किंवा अज्ञान यांचा नाश
७. भोवतालचे चक्र मायाचक्र
८. चक्राला लावलेला हात आणि पाय मायेला पवित्र करत आहे.
९. चक्राला फुटलेल्या ज्वालांकुरांतून तेजस्वीपणे बाहेर पडणारी पाच स्फुल्लिंगे सूक्ष्म-पंचतत्त्वे’

४. लास्य आणि तांडव नृत्य

लास्यनृत्य

तांडवनृत्य

१. नर्तक स्त्री पुरुष
२. मुद्रा पदन्यासाशी संबंधित आहे. मुद्रा होणे आवश्यक आहे.
३. अभिनय

(टीप १)

आहे नाही

टीप १ – अभिनय : हा शब्द ‘अभि ± नय’ असा बनला आहे. ‘अभि’ म्हणजे व्यवस्थित, अखंड आणि ‘नी – नय्’ म्हणजे भावना. अभिनयापासून तेज निर्माण होते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राला ‘पाचवा वेद’, असे म्हणतात.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव भाग १’

Leave a Comment