मातृकापूजन

अनुक्रमणिका

१. उद्देश
२. पूजाविधी
३. नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक ऊर्फ वृद्धीश्राद्ध)
४. आचार्यवरण


१. उद्देश

अ. मंगलकार्यात विघ्ने येऊ नयेत; म्हणून कार्यारंभी श्री गणपतिपूजनासह मातृकापूजन करण्याची रूढी आहे. ‘मातृका’ हा देवींचा एक प्रकार आहे. या सत्तावीस आहेत. (पहिला पाठभेद : १६ मातृका असून त्यांची नावे आहेत – गौरी, पद्मा, शची, मेधा, सावित्री, विजया, जया, देवसेना, स्वधा, स्वाहा, माता, लोकमाता, धृति, पुष्टी, तुष्टी आणि यजमानाची कुलदेवता. दुसरा पाठभेद : वरील १६ + ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी, चामुण्डा + विकल्पाने श्री गणपति, दुर्गा, क्षेत्रपाल आणि वास्तोष्पति. (काही ठिकाणी सुपारी ठेवून गौरीच्या आधी विनायकाचे आवाहन करतात.)

आ. मातृकापूजन हा विधी नांदीश्राद्धाचे एक अंग आहे; म्हणून हा विधी नांदीश्राद्धासह करतात.

 

२. पूजाविधी

तांदळाच्या सत्तावीस लहान लहान राशी करून त्यांवर प्रत्येकी एक, याप्रमाणे सुपार्‍या ठेवाव्या. नेहमीप्रमाणे पूजा करून शेवटी उदक सोडावे.

 

३. नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक ऊर्फ वृद्धीश्राद्ध)

३ अ. उद्देश

प्रत्येक मंगलकार्यारंभी विघ्ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.

३ आ. पूर्वसिद्धता

नांदीश्राद्धात (वृद्धीश्राद्धात) दर्भ न घेता दूर्वा घेतात; पण यज्ञादी कर्मांगभूत हे श्राद्ध असेल, तर मूळरहित, अर्थात शेंड्याचे दर्भ घेतात किंवा दूर्वा आणि दर्भ मिळून घेतात. ज्या देवतेची पूजा असते, तिची पवित्रके आकर्षित करू शकणार्‍या वस्तू त्या देवतेच्या पूजेसाठी वापरतात.

३ इ. विधी

दोन ताम्हणे समोर ठेवावीत. उजवीकडील ताम्हण देवासाठी आणि डावीकडील ताम्हण पितरांसाठी असते. दोन्ही ताम्हणांत ‘पाद्य’ या उपचारासाठी पाणी, आसन आणि गंधादी सर्व उपचार यांसाठी गंध, फूल आणि पाणी एकत्रित आणि भोजनासाठी दक्षिणा सोडावी. यातील प्रत्येक कृती मंत्रपूर्वक करावी. तसेच नांदीश्राद्धाचे फल प्राप्त व्हावे, यासाठी एकेक नाणे दोन्ही ताम्हणांत सोडावे. दक्षिणेकडील पैसा दक्षिणेकडील पितृलोकातील पितरांना आणि त्या दिशेकडून येणार्‍या त्रासदायक शक्तींना, त्यांनी त्रास देऊ नये; म्हणून अर्पण केलेला असतो. उत्तरेकडील पैसा शुभकारक देवतांना अर्पण केलेला असतो.

 

४. आचार्यवरण

सोळा संस्कारांपैकी कोणताही संस्कार करतांना यजमान-यजमानीण / संस्कार्य व्यक्ती यांनीच विधी करावयाचे असतात. मंत्र म्हणण्यासाठी पुरोहित असतात. उपनयन आणि विवाह या संस्कारांत केवळ ग्रहयज्ञाच्या वेळी आचार्यवरण करतात. बाकीचा संस्कार यजमान-यजमानीण / संस्कार्य व्यक्ती यांनीच करावयाचा असतो, तसेच भुवनेश्वरीशांतीच्या वेळी आचार्यवरण करतात.

४ अ. उद्देश

कोणतेही कर्म करण्यासाठी आचार्याचा (पुरोहिताचा) स्वीकार करणे

४ आ. साहित्य

पांढर्‍या मोहर्‍या, पंचगव्य (गायीचे मूत्र, शेण, दूध, दही आणि तूप आणि दर्भाचे पाणी)

४ इ. विधी

मंत्र म्हणून आचार्यांच्या उजव्या उताण्या हातावर यजमान आपला उजवा पालथा हात ठेवतात आणि ‘पुरोहितपण स्वीकारावे’, असे विनवतात. (या वेळी काही ठिकाणी आचार्यांना सुपारी देतात. ही एक लौकिक प्रथा आहे.) त्यावर आचार्य ‘हो’ म्हणतात. त्यानंतर यजमान आचार्यांची प्रार्थना करतात.

४ ई. साहित्यप्रोक्षण

दूर्वांनी / दर्भाने, पंचगव्याने पूजासाहित्याचे आणि भूमीचे प्रोक्षण करावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’

Leave a Comment