आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग २)

Article also available in :

‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील काही संज्ञांचे अर्थ

स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत, उदा.

भगवतो नारायणस्य साक्षान्महापुरुषस्य स्थविष्ठं रूपम् आत्ममायागुणमयम् अनुवर्णितम् आदृतः पठति शृणोति श्रावयति स उपगेयं भगवतः परमात्मनः अग्राह्यम् अपि श्रद्धाभकि्तविशुद्धबुदि्धः वेद । – श्रीमद्भागवत, स्कंध ५, अध्याय २६, सूत्र ३८

अर्थ : भगवंताचे उपनिषदांत वर्णन केलेले निर्गुण स्वरूप हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे. असे असले, तरी जो त्याच्या स्थूल रूपाचे वर्णन वाचतो, ऐकतो किंवा ऐकवतो, त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्ती यांमुळे शुद्ध होते आणि त्याला त्या सूक्ष्म रूपाचेही ज्ञान होते वा अनुभूती येते.

साधना केल्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होत असल्यामुळे त्यांनाही सूक्ष्म रूपाचे ज्ञान होते वा सूक्ष्माशी संबंधित अनुभूती येतात. एकूणच धर्मग्रंथांत वर्णिलेल्या वचनांच्या सत्यतेची प्रचीती सनातनचे साधक घेत आहेत. सनातनच्या संकेतस्थळावर काही ठिकाणी ‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील संज्ञा वापरल्या आहेत. त्यांची स्पष्टीकरणे पुढीलप्रमाणे आहेत.

 

१. सूक्ष्म-जगत्

जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

२. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे
इत्यादी (पंचसूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे)

काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

३. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र

काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.

४. सूक्ष्म-परीक्षण

एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

५. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग

काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.

 

‘वाईट शक्तींचा साधकांना होणारा त्रास’ या संज्ञेचा अर्थ

वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. साधना केल्याने साधकाकडे चांगल्या शक्ती आकृष्ट होतात. साधनेमुळे वातावरणातील चांगल्या शक्तीचे आधिक्यही वाढते आणि वाईट शक्तींची शक्ती घटते. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या साधनेत विघ्ने आणतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत.’ (टीप १) त्यापैकी एक मंत्र पुढे दिला आहे.

स्तुवानमग्न आ वह यातुधानं किमीदिनम् ।

त्वं हि देव वनि्दतो हन्ता दस्योर्बभूविथ ।। – अथर्ववेद, कांड १, सूक्त ७, खंड १

अर्थ : सर्वांमध्ये जठराग्नीच्या रूपात रहाणार्‍या, वीज इत्यादी रूपांत सर्व जग व्यापणार्‍या आणि यज्ञामध्ये अग्रणी असणार्‍या हे अग्ने, आम्ही ज्या देवतांची स्तुती करत आहोत, त्यांच्यापर्यंत तू हा हविर्भाग पोहोचव. आम्ही दिलेल्या हविर्भागाची प्रशंसा करणार्‍या देवतांना आमच्या जवळ आण आणि आम्हाला मारण्याची इच्छा करत गुप्त रूपाने (सूक्ष्म रूपाने) फिरणार्‍या किमीदिन्ला (दुष्ट पिशाचांचा एक प्रकार) आमच्यापासून दूर ने; कारण हे दान इत्यादी गुणांनी युक्त अशा देवा, आम्ही वंदन केल्यावर तू उपक्षय (घात) करणार्‍या यातुधान (राक्षस) इत्यादींचा संहार करतोस; म्हणून तू याला (या राक्षसाला) तुझ्याजवळ बोलव. किंवा हे स्तूयमान अग्ने, प्रतिकार करण्यासाठी (प्रतिशोध घेण्यासाठी) तू या राक्षसाचा या पुरुषामध्ये आवेश कर.

तात्पर्य, वाईट शक्ती साधना करणार्‍यांना त्रास देतात आणि या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. संकेतस्थळावरील लेखांमध्ये आणि अन्य साहित्यामध्ये काही ठिकाणी ‘वाईट शक्ती’ किंवा ‘आध्यात्मिक त्रास’ हे शब्द वापरले आहेत. ते या विषयाला अनुसरूनच आहेत.

टीप १ – संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १, प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, सचिवालय, मुंबई – ४०००३२, आवृत्ती १ (१९७६), पृष्ठ १९४)

 

आध्यात्मिक त्रास

याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

 

‘काळी शक्ती’ या संज्ञेचा अर्थ

‘काळी शक्ती, तसेच त्रासदायक/मायावी/अनिष्ट शक्ती’ यांसारखे सर्व शब्द धर्मग्रंथांत (उदा. श्रीमद्भगवद्गीतेत) वर्णिलेल्या ‘तम’ किंवा‘तमोगुण’ या अर्थाने, तर ‘काळे आवरण, तसेच काळ्या लहरी/स्पंदने/कण’ यांसारखे शब्द ‘तमोगुणाचे आवरण, तसेच तमोगुणी लहरी/ स्पंदने/कण’ या अर्थाने वापरण्यात आले आहेत. ‘तम’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘काळोख’ असा आहे. काळोख काळा असल्यामुळे ‘तम’ अथवा ‘तमोगुण’ काळा असल्याचे वर्णिले, तसेच चितारले आहे.

वाचकांनी त्यांना या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण अथवा अन्य साहित्य वाचतांना एखादी आध्यात्मिक संज्ञा लक्षात आली नसल्यास त्याविषयी कृपया संकेतस्थळाला कळवावे. त्या संज्ञा आम्ही संकेतस्थळावर आणखी सुस्पष्टपणे मांडू.

 

‘मांत्रिक’ या शब्दाचा अर्थ

मांत्रिक म्हणजे एक बलाढ्य आसूरी शक्ती.

Leave a Comment