देवपूजेपूर्वीची सिद्धता (तयारी)

व्यक्तीला नित्य ईश्वरोपासना घडावी, यासाठी धर्माने घालून दिलेली एक सोपी आचारपद्धत म्हणजे नित्यनेमाने व्यक्ती करत असलेली ‘देवपूजा’. देवपूजेमुळे पूजकाच्या मनात भक्तीभावाचे केंद्र निर्माण होते, देवतेची कृपादृष्टी होते, घरातील वातावरण सात्त्विक बनते, तसेच भावी पिढीवर धार्मिकतेचा संस्कार होण्यासही साहाय्य होते.

कोणतीही धार्मिक कृती योग्य पद्धतीने शास्त्र जाणून केली, तरच व्यक्तीला योग्य फलप्राप्ती होते़ त्यासाठी धार्मिक कृतींमागील शास्त्र जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. देवपूजा करण्यामागील शास्त्र जाणून घेऊन पूजा केल्यास देवाप्रती श्रद्धा निश्चित निर्माण होते.

देवपूजेपूर्वीची सिद्धता हा देवपूजेचा पाया आहे. देवपूजेपूर्वीच्या सिद्धतेमुळे पूजकाची शुद्धी तर होतेच, शिवाय तो पूजेतून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करण्यास समर्थ बनतो; म्हणूनच देवपूजेची पूर्व सिद्धता अत्यावश्यक आहे. देवपूजेची पंचकर्मे, ही सिद्धता करण्याचे महत्त्व, लाभ आणि देवपूजेपूर्वीच्या सिद्धतेच्या प्रत्यक्ष कृती यांविषयी थोडक्यात माहिती या लेखातून जाणून घेऊया.

१. देवपूजेसंबंधीची पंचकर्मे

पद्मपुराणात देवपूजेसंबंधी पुढील पाच कर्मे सांगितली आहेत.

अ. अभिगमन

देवघराची स्वच्छता करणे आणि देवावरचे निर्माल्य काढणे

आ. उपादान

पूजासाहित्य सिद्ध (तयार) करणे

इ. योग

उपास्यदेवतेचे सतत चिंतन (नामजप) करणे

ई. स्वाध्याय

देवतेच्या मंत्रातील अर्थाकडे लक्ष देऊन मंत्रजप करणे आणि स्तोत्रपठण करणे

उ. इज्या

देवतेची यथासांग पूजा करणे

पूजेसाठी पुरुषाने धोतर-उपरणे आणि स्त्रीने नऊवारी साडी परिधान करणे यांसारखी वैयक्तिक सिद्धता पूजकाच्या दृष्टीने, तसेच पूजेसाठी पूजासाहित्याचे तबक सिद्ध करणे या दोन्ही गोष्टी देवपूजेच्या सिद्धतेतच येतात.

 

२. देवपूजेची सिद्धता (तयारी)

अ. देवपूजेच्या सिद्धतेचा (तयारीचा) अर्थ

‘पूजारूपी उपासना करण्यासाठी स्थूलदृष्ट्या आणि सूक्ष्मदृष्ट्या चैतन्य ग्रहण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना ‘देवपूजेची सिद्धता’ असे म्हणतात.

आ. देवपूजेच्या सिद्धतेचे महत्त्व

पूजा करणार्‍या पूजकात पूजेच्या माध्यमातून निर्माण होणारे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता निर्माण व्हावी; म्हणून देवपूजेच्या पूर्वसिद्धतेसारख्या सगुणातून निर्गुणाकडे घेऊन जाणार्‍या कृतीच्या परंपरा हिंदु धर्मात सांगितल्या आहेत. या परंपरांचे काटेकोरपणे पालन केल्यास कर्मरूप सगुण कृतीच्या माध्यमातूनही पूजकाची वाटचाल निर्गुणाच्या दिशेने होण्यास प्रारंभ होतो.

 

३. देवपूजेची सिद्धता (तयारी) केल्यामुळे होणारे लाभ

अ. देवपूजेची सिद्धता करत असतांना त्या व्यक्तीची साधना होत असल्यामुळे ती व्यक्ती अधिक प्रमाणात ईश्वरी चैतन्य ग्रहण करू शकते.

. पूजेची पूर्वसिद्धता करत असतांना पूजेपूर्वीच भावनिर्मितीस आरंभ होतो होतो. त्यामुळे प्रत्यक्ष पूजा करतांना ती अधिक भावपूर्ण होते.

इ. पूजेची पूर्वसिद्धता करतांना पूजकाच्या देहाची सात्त्विकता वृद्धींगत होण्यास प्रारंभ होतो.

 

४. देवपूजेच्या सिद्धतेचा (तयारीचा) क्रम

. पूजकाची स्वतःची सिद्धता

आ. स्थळाची शुद्धी

इ. उपकरणांची शुद्धी

. पूजेपूर्वी करावयाची अन्य सिद्धता, उदा. निर्माल्यविसर्जन, देशकाल उच्चार, संकल्प इत्यादी.

उ. देवपूजेच्या सिद्धतेचा विशिष्ट क्रम असण्याचे कारण : अशा प्रकारची देवपूजेची पूर्वसिद्धता पूजकाची वृत्ती अधिक प्रमाणात

अंतर्मुख करते आणि त्याला निर्गुणातील ईश्वरी चैतन्य ग्रहण करणे शक्य होते.

 

५. देवपूजेपूर्वीच्या सिद्धतेच्या प्रत्यक्ष कृती

पूजेपूर्वीच्या सिद्धतेत पुढील कृतींचा अंतर्भाव असतो.

अ. स्तोत्रपठण किंवा नामजप करणे

. पूजास्थळाची आणि उपकरणांची शुद्धी करणे

इ. रांगोळी काढणे

ई. शंखनाद करणे

उ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे

ऊ. आचमन करणे

ए. निर्माल्यविसर्जन

ऐ. प्राणायाम, देशकाल उच्चार, संकल्प आणि न्यास करणे

. कलश, शंख, घंटा आणि दीप यांची पूजा करणे

औ. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वतःची शुद्धी करणे

अं. देवतांच्या मूर्ती आणि चित्रे स्वच्छ करणे

देवपूजेची वरीलप्रमाणे सिद्धता पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष देवपूजेला आरंभ करायचा असतो. देवपूजा ही कर्मकांडाच्या स्तराची नित्यनेमाने करावयाची उपासना आहे. देवपूजेमुळे भावजागृती होऊन काही प्रमाणात देवतेचे तत्त्व ग्रहण होते; थोडक्यात आपण तेवढा वेळ ईश्वराच्या जवळ जातो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवपूजेपूर्वीची तयारी’, निर्माल्यविसर्जन, देशकाल उच्चार, संकल्प इत्यादी.

Leave a Comment