कोल्‍हापूर येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ !

शिबिरात बिंदूदाबन उपचार पद्धतीविषयी सांगतांना डॉ. दीपक जोशी (मध्यभागी उभे) समवेत शिबिरार्थी

कोल्‍हापूर – आपत्‍काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्‍ध होतीलच असे नाही, असे विविध संतांनी सांगितले आहे. अशा आपत्‍काळात रुग्‍णाच्‍या वेदना आणि आजार अल्‍प करण्‍यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्‍यक आहे, यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्‍यात आले. याचा लाभ सनातनचे साधक शिबिरार्थी आणि काही रुग्‍ण यांनी घेतला.

सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्‍णाला कसे बरे करू शकतो हे शिकवले. या वेळी वात-पित्त-कफ, मणक्‍याचे आजार, गुडघ्‍याचे आजार, पोटाचे विकार, असे विविध आजार असणार्‍या साधक रुग्‍णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. शिबिरात डॉ. दीपक जोशी यांनी उपाशीपोटी रुग्‍णांची पडताळणी कशी करावी ? बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्‍येक बिंदूचे कार्य, मणक्‍याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्‍यून करावा ? या विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरात प्रतिदिन ४ घंटे प्रात्‍यक्षिक आणि सराव घेण्‍यात आला. शेवटच्‍या दिवशी सर्वांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

बिंदूदाबनानंतर रुग्‍णांना झालेला लाभ

१. सुलोचना पाटील – गेल्‍या १ वर्षांपासून गुडघादुखीने त्रस्‍त होत्‍या. उपचारासाठी येतांना त्‍या गुडघ्‍याची पट्टी (नी पॅड) घालून आल्‍या होत्‍या. उपचारानंतर त्‍यांचा त्रास पुष्‍कळच अल्‍प झाला होता.

२. सौ. सुनिता वेर्णेकर – या प्रचंड पाठदुखी, मानदुखी, पोटाचे विकार यांनी त्रस्‍त होत्‍या. उपचारानंतर त्‍यांच्‍या वेदना अल्‍प होऊन त्‍यांना हलकेपणा जाणवू लागला, तसेच तोंडवळ्‍यावर असणारा ताण निघून गेला.

३. सौ. पूजा सातपुते – मणक्‍याचे उपचार केल्‍यावर पाठदुखीचा त्रास अल्‍प झाला.

विशेष

या शिबिरात सनातन संस्‍थेच्‍या संत डॉ. पू. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली. वयाच्‍या ८१ व्‍या वर्षी ३ दिवस शिबिरामध्‍ये पूर्णवेळ उपस्‍थित राहून त्‍यांनी ही उपचारपद्धती शिकून घेतली आणि सर्वांसमवेत सराव केला. यातून शिबिरार्थींनाही प्रेरणा मिळाली.

Leave a Comment