तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचे सनातनला आशीर्वाद

तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांना सनातनचे ग्रंथ दाखवतांना सनातनचे साधक श्री. सत्यकाम कणगलेकर आणि त्यांचे मार्गदर्शन घेतांना सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ अन् इतर साधक. (११.३.२०१५)

वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे आणि
गणपतीचे 
उपासक असलेले प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचा परिचय

तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी वर्ष १९६१ पासून त्यांचे गुरु प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करायला आरंभ केला. वर्ष १९८९ मध्ये प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांनी देहत्याग केला. प.पू. रामभाऊ गोस्वामी गणपतीची उपासना करतात. वर्ष १९७२ पासून केवळ पोहे आणि दूध एवढाच त्यांचा आहार होता. ते वर्ष १९७५ पासून दिवसभरात अत्यल्प (काही थेंब) पाणी ग्रहण करतात. वर्ष १९७७ पासून त्यांनी आहाराचे प्रमाण अल्प केले असून सध्या दिवसभरात केवळ १ केळे आणि एक कपभर दूध एवढाच दोन वेळी आहार घेतात. रात्री ते केवळ ३ घंटेच झोपतात. वर्ष १९७९ पासून त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून संन्यासी जीवन स्वीकारले. वर्ष १९८३ पासून त्यांचा आगीच्या संपर्कात रहाण्याच्या कालावधीत लक्षणीय वाढ झाली. प.पू. रामभाऊ गोस्वामी करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण यज्ञामुळे ते सुप्रसिद्ध आहेत. सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी ते यज्ञ करत आहेत. त्यांच्या गुरूंनी दिलेल्या ३२ अक्षरी गुरुमंत्रामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे.

१. प.पू. रामभाऊ गोस्वामी करत असलेल्या यज्ञाविषयीची माहिती

प्राप्त माहितीनुसार प.पू. रामभाऊ गोस्वामी सर्वप्रथम स्नान करून ध्यान लावतात. त्यानंतर प्राणायाम करून विधीद्वारे श्री गणपतीची उपासना करतात. त्यानंतर पेटलेल्या यज्ञकुंडामधे भात, श्रीफळ, ऊस आणि अनेक किलो तुपाची आहुती देतात. हे सर्व करतांना ते ध्यानावस्थेत जातात. त्याच स्थितीत ते धगधगत्या यज्ञकुंडात जाऊन प्रत्येक वेळी १० मिनिटांपर्यंत पहुडतात. त्या वेळी त्यांच्या अंगावर केवळ एक शाल असते.

प.पू. रामभाऊ गोस्वामी यज्ञातून बाहेर येतात, तेव्हा त्यांनी पांघरलेल्या शालीसहित काहीही जळलेले नसते. त्यांच्या साधनेमुळे त्यांच्या देहाभोवती निर्माण झालेल्या तेजोवलयामुळे ते सुरक्षित असतात. आगीपासून संरक्षण होण्यासाठी शालीवर काही प्रक्रिया केली आहे का ?, याचे परीक्षण केले असता तसे काही केले नसल्याचे निष्पन्न झाले.

२. जगात शांतता नांदावी आणि सर्वांचे कल्याण व्हावे,
यांसाठी यज्ञात स्वतःची आहुती देणारे प.पू. रामभाऊ गोस्वामी !

प.पू. रामभाऊ गोस्वामी अत्यंत विनम्र असून ते करत असलेल्या यज्ञाच्या संदर्भातील कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर देण्यास ते सदैव सिद्ध असतात. जगात शांतता नांदावी आणि सर्वांचे कल्याण व्हावे, यांसाठी स्वतःची आहुती देत असल्याचे प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी सांगितले. खरेतर या उदात्त कार्यात प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हातभार लावायला हवा; मात्र प.पू. रामभाऊ गोस्वामी त्यासाठी कटीबद्ध आहेत. ऑस्टिन, टेक्सास येथील चेतासंस्थेच्या रोगांवर उपचार करणारे तज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) डॉ. इ.एफ्. ब्लॉक यांच्या मते ध्यानसाधनेमुळे त्यांच्या देहाभोवती निर्माण झालेल्या तेजोवलयामुळे त्यांचे आगीपासून रक्षण होत आहे.

३. प्राणाचे नियमन व्यवस्थित असल्यास
कोणताही 
रोग होत नाही, असे प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी सांगणे

आरोग्य आणि रोग यासंदर्भात प.पू. रामभाऊ गोस्वामी म्हणतात, देहाला शक्ती पुरवणारा प्राण हाच आमच्या अस्तित्वाचे रहस्य आहे. प्राणाचे नियमन व्यवस्थित असल्यास कोणताही रोग होत नाही. प्राणाचे असंतुलन हेच सर्व रोगांचे मूळ कारण आहे. प.पू. रामभाऊ गोस्वामी यांना आहाराचा संपूर्ण त्याग करून स्वतःचे वजन आणखी न्यून करायचे आहे, जेणेकरून यज्ञाच्या वेळी स्वतःचे जड शरीर ते अधांतरी ठेवू शकतील.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’