‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ तृतीय दिवस

डॉ. अमित थडानी यांच्या ‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण

विद्याधीराज सभागृह, १८ जून (वार्ता.) – मागील काही वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील झालेल्या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपाखाली फसवून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. हे षड्यंत्र उघड करणारे ‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ हे डॉ. अमित थडानी लिखित पुस्तकाचे प्रकाशन वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आले.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते. अमित थडानी हे मुंबई येथे रहाणारे असून सुप्रसिद्ध शल्यचिकिस्तक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या खटल्यांतील १० सहस्र पानांची आरोपपत्रे, न्यायालयीन निर्णय, सरकारी कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास करून डॉ. अमित थडानी यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे.

नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे षड्यंत्र ! – डॉ. अमित थडानी, शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक

रामनाथ देवस्थान – सनातन संस्था लोकांना संघटित करते. त्यामुळे तिला नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणांमध्ये खरे मारेकरी शोधण्याचा प्रयत्न न करता अन्वेषण करण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये कुठेही ठोस पुरावे मिळाले नसून केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी प्रयत्न झाला आहे. तत्कालीन सरकारने देशात ‘हिंदुत्वनिष्ठ हे आतंकवादी आहेत’, हे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) उभे करण्यासाठी या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यामुळे पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे एक मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते, असे ठोस प्रतिपादन शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक डॉ. अमित थडानी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ते बोलत होते.

नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागील षड्यंत्र उघड करणारे ‘रॅशनालिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक डॉ. अमित थडानी यांनी लिहिले आहे.

डॉ. अमित थडानी

 

‘रॅशनालिस्ट मर्डर्स’चे सत्य’ याविषयावरील चर्चासत्रात बोलतांना डॉ. अमित थडानी म्हणाले –

१. आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी सर्वप्रथम ठाणे येथील रंगायतन प्रकरणात सनातन संस्थेवर आरोप लावले होते. ते सर्व आरोप न्यायालयात नाकारण्यात आले आणि सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. तेव्हा या निवाड्याला वरच्या न्यायालयामध्ये आव्हान देण्याचे तात्कालीन सरकारला धाडस झाले नाही. हे सर्व हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात येत आहे.

२. याहूनही धक्कादायक म्हणजे अन्वेषण यंत्रणेने दाभोलकर प्रकरणामध्ये हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक केली गेली. त्यांना ४० दिवसांहून अधिक काळ कारावासात ठेवण्यात आले. उद्या सरकारच्या विरोधात न्यायालयीन खटला लढल्या जाणार्‍या अधिवक्त्यांनाही अटक करण्यात येणार का ? प्रशांत भूषण यांसारखे अधिवक्ते गुन्हेगारांचे खटले लढतात; म्हणून त्यांनाही अटक करणार आहे का ?

३. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या सर्वांच्या हत्या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये सतत आरोपी पालटण्यात आले. प्रत्येक वेळी संशयित आरोपींचे निरनिराळे रेखाचित्रे काढण्यात आली. यात अन्वेषण संस्थांनी कुठेही खर्‍या मारेकर्‍यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच कुठेही खर्‍या मारेकर्‍यापर्यंत जाणारे पुरावे मिळाले नाहीत. केवळ हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणे, हेच अन्वेषण संस्थांचे ध्येय होते.

४. गौरी लंकेश प्रकरणात शीरस्त्राण घातलेल्या संशयितांचे रेखाचित्र काढण्यात आले. घटनेच्या वेळी त्या भागात वीजही नव्हती. मग ‘त्यांचे रेखाचित्र कसे बनवण्यात आले ?’, हे एक आश्‍चर्य आहे. गौरी लंकेश प्रकरणामध्ये विविध राज्यांतील १८ जणांना अटक करण्यात आली. त्यात १५ जणांच्या जबाबावर बळजोरीने त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. अन्य तिघांचे तर विनास्वाक्षरी जबाब प्रविष्ट करण्यात आले. यावरून त्यात अन्वेषण यंत्रणांना अपेक्षित असा मजकूर नसेल कशावरून ?

५. डॉ. दाभोलकर प्रकरणामध्ये प्रारंभी २ आरोपींना पकण्यात आले; पण ते हिदुंत्वनिष्ठ नव्हते; म्हणून त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांना पकडण्यात आले. या प्रकरणात आधी आरोपी पकडून नंतर अन्वेषण करण्यात आले.

६. आरोपींनी म्हणे ज्या शस्त्राने हत्या केली, त्या शस्त्राचे तुकडे खाडीमध्ये फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले. कालांतराने ६ कोटी रुपये व्यय करून ते समुद्रातून काढण्यात आले. तुकडे करून समुद्रात फेकलेले शस्त्र शाबूत अवस्थेत कसे मिळाले ? यावरून अन्वेषण यंत्रणांचे अन्वेषण संशयास्पद असल्याचे लक्षात येते. हे सर्व एक कथानक रचण्यासाठीच केले गेले होते.

७. नाक, कान, घसा तज्ञ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना दाभोलकर प्रकरणात अटक करण्यात आली. त्यासाठी ५ वर्षांपूर्वीचा एक ‘इमेल’ शोधण्यात आला. नंतर त्यांना पानसरे प्रकरणात गोवण्यात आले. ते अद्यापही कारावासात आहेत. एका दूरभाषवरून समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. कालांतराने त्यांना सोडण्यात आले. यावरून कोणत्याही लोकांच्या विरोधात ठोस आरोप नसतांनाही त्यांना लक्ष्य करण्यात आले. हा सर्व केवळ ‘नॅरेटिव्ह’ चालवण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Comment