समाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवणारे समर्थ धर्मशास्त्र !

१८ व्या शतकात ब्रिटिशांनी धर्मसंस्थेवरच आघात केला. प्रस्थापित समाजव्यवस्था उद्ध्वस्त करण्याकरता सर्वस्वाची बाजी लावली. ब्रिटिशांनी कुटीलतेने आपला कार्यभाग उरकला. समग्र समाजाचे नियमन करणारा धर्म, त्या स्मृती, आता केवळ धार्मिक विधी-विधाने आणि संस्कार यांचा शास्त्रार्थ देण्याइतके मर्यादित झाले. मृतप्राय अवस्थेतले हे धर्मशास्त्र आम्हाला ठाऊक आहे. सहस्रशः वर्षांपासून राजसत्ता पाठीशी असतांना वा नसतांनाही समाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवण्यात धर्मशास्त्र केवढे समर्थ ठरले !

आपल्या पूर्ववैभवानिशी नांदणारा तो स्वयंमेव मृगेंद्र घनदाट अरण्यातच आढळेल. तो का सर्कशीच्या पिंजर्‍यात आढळेल? आज तुम्ही पहात आहात तो सर्कशीच्या पिंजर्‍यातला सिंह ! धर्मशास्त्रकारांची सामाजिक बांधिलकी !

 

१. इस्लामी राजवटीपूर्वी राजसत्ता हिंदु धर्माला पूरक असणे तर इस्लामी राजवटीत राजसत्ता हिंदु धर्म विरोधी होणे

श्रुति, स्मृति, पुराणोक्त अशी हिंदु धर्माची परंपरा आहे. प्रत्येक स्मृतीवर एकापेक्षा अधिक भाष्ये आहेत. भाष्यकारांनी परंपरा अखंड राखली. त्यांनी केलेले अर्थ स्मृतीच्या बरोबरीने प्रमाण मानले गेले. याज्ञवल्क्य स्मृतीवरची अष्टार्क टीका ही काश्मिरातही मान्य आहे. देवगिरीचा राजा, अमात्य हेमाद्री तोच हेमाडपंत, याने स्मृतीवर भाष्य लिहिलेले नाही; पण चतुर्वर्ग चिंतामणि हा धर्मशास्त्रविषयक विचारांचे संकलन असलेला ग्रंथ केला. तो भारतभर मान्यता पावला आहे. पराशर माधवीय हा माधवाचार्यांचा पराशरस्मृतीवरचा विख्यात टीकाग्रंथ ! विजयनगरच्या हिंदु साम्राज्य स्थापनेची प्रेरणा हरिहर आणि बुक्क यांना देणारे हेच ते माधवाचार्य. पुढे ते संन्यासी झाले. शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या गादीवर ते होते. तेच विद्यारण्य स्वामी. श्रुति, स्मृति, पुराणे यांवर अधिष्ठित धर्माच्या पाठीशी राजसत्ता होती. राजसत्तेची मान्यता (Sanction) होती. इस्लामी राजवटीत त्यात फारकत झाली आणि प्रजा अन् राजा यांचे धर्म भिन्न नव्हे, तर विरोधी झाले.

 

२. स्वधर्माचे रक्षण कसे करायचे ?

अ. मुसलमानी राजवटीतही समाजाची स्वधर्मनिष्ठा
त्या त्या काळच्या 
समाज नेतृत्वाने प्रखरपणे पेटती ठेवणे

मुसलमानी राजवट असतांनाही आमची प्राचीन समाजव्यवस्था जशीच्या तशी टिकवायची. धर्म आणि समाज यांच्या अस्तित्वालाच सुरूंग लागला होता. धर्मरक्षणाकरता आता शासन वा राजदंड धावून येणार नव्हते. समाजपुरुषालाच हे कार्य करायचे होते. शक्तीशाली, प्रभावी, सर्वंकष व्यक्तिमत्वांची नितांत आवश्यकता होती, तसे ते प्राप्त होत गेले. सत्त्वपरीक्षेत समाज उतरला. काही पडझड झाली; पण त्यामुळे फारसे बिघडले नाही. समाजाची स्वधर्मनिष्ठा त्या त्या काळच्या समाज नेतृत्वाने प्रखरपणे पेटती ठेवली.

आ. धर्मशास्त्रकारांनी घालून दिलेल्या न्यायव्यवस्थेवर
समाजाची नितांत निष्ठा असणे

गोरे पाय या देशाला लागले आणि त्यांनी आमची स्वधर्मनिष्ठाच तोडून फोडून टाकली. ब्रिटिशांनी स्वधर्मनिष्ठेचे सूत्र ओळखले आणि तेच तोडून टाकण्याची शिकस्त केली. त्यात यश मिळाले. ब्रिटिशांची राजसत्ता हिंदु धर्माला प्रतिकूल, तरी देखील धर्मशास्त्रकारांनी घालून दिलेल्या न्यायव्यवस्थेवर समाजाची नितांत निष्ठा कायम होती. ती दूर कशी करायची ? गोर्‍यांच्या चिंतेचा तो विषय होता. त्याविना त्यांना भारतात अबाधित राज्य चालवणे शक्य नव्हते.

इ. या देशातील परंपरागत कायद्याचे ज्ञान इथल्या सामान्य लोकांना अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचा अहवाल ब्रिटीश साहेबाने इंग्लंडला पाठवणे

पेशव्यांचे राज्य ब्रिटिशांनी जिंकले आणि मग ब्रिटीश कायदा लागू केला. एलिफीस्टन साहेबाने इथल्या न्यायव्यवस्थेचा अहवाल पाठवला (इ.स.१८२७), त्यात तो म्हणतो, या देशातील परंपरागत कायद्याचे ज्ञान इथल्या सामान्य लोकांना अपेक्षेपेक्षा अधिक आहे, असे माझ्या निदर्शनास आले आहे. पंचायतीच्या द्वारे होणार्‍या न्यायनिवाड्यात सशास्त्रता आणि एकसूत्रता असते, याची त्यांना जाणीव असते. ही जाणीव समाजाच्या अगदी खालच्या थरांत खोलवर रुजलेली आहे, याचे आश्‍चर्य वाटते; कारण या वर्गाचा आतापर्यंत राज्यकर्त्यांशी कधीच संबंध आला नाही. बहुतेक राजवटीत या वर्गाची उपेक्षा झाली आहे, तरीही ही जाणीव त्यांच्यात असावी हे विशेष ! न्यायसंस्थेत इतरांच्या समवेत या खालच्या वर्गानेही भाग घेतलेला असल्याने ही जागरूकता त्यांच्या ठिकाणी असावी; म्हणून स्थानिक न्यायसंस्थेवर येणारे आक्षेप चुकीचे ठरतात.

(महाराष्ट्रातील न्यायदान पद्धती भा. इ. संशोधन मंडळ, वृत्त १९३७)

ई. वैभवकाळात आणि संकटांच्या धगधगणार्‍या आगीत धर्मशास्त्रकारांनीच समाजव्यवस्था सुसंघटित राखणे

समाजाच्या लोकव्यवहाराचे नियमन आणि समाजसंस्थेचे व्यवस्थापन धर्मशास्त्राने केले आहे. स्मृतिकार ते कार्य करतात. स्वधर्मीय राजे असतांना, त्या काळात त्यांनी राजसभेला सुद्धा अंकुश लावला आहे. धर्मशास्त्रांनी धर्मनिर्णय देणार्‍या संस्था स्वायत्त होत्या. वैभवकाळात आणि संकटांच्या धगधगणार्‍या आगीत धर्मशास्त्रकारांनीच समाजव्यवस्था सुसंघटित राखली. केवढे अद्भूत कार्य आहे हे !

संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१५