आचारधर्म

‘आचारधर्म’ म्हटला की, योग्य आचार-विचारांचे पालन, कर्तव्यकर्मे आणि धर्माचरणाच्या कृती, इतकेच बहुतेकांच्या डोळ्यांसमोर येते. आचारधर्माचा इतकाच संकुचित अर्थ कोणी घेऊ नये. आचारधर्म म्हणजे नेमके काय आणि त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, यांविषयीची माहिती प्रस्तुत लेखात पाहू.

 

१. आचार म्हणजे काय ?

अ. आचरण करण्यास उद्युक्त करणारा विचार म्हणजे आचार

सकाळी झोपेतून उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृती (आचरण) कशी करायची, याचा एक मूलभूत आणि चैतन्यनिर्मितीच्या बळावर घातलेला पाया, हा हिंदूंची आदर्श अन् आध्यात्मिक जीवन जगण्याची उत्कृष्ट शैली दाखवणारा कृतीशील सिद्धांत आहे. त्यालाच ‘आचार’ असे संबोधले आहे.

आ. वेद आणि स्मृती यांनुसार आचार

‘शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या चार वर्णांना श्रुती (वेद) अन् स्मृती यांनी जी पुरुषार्थरूप शाश्वत कर्तव्ये सांगितली आहेत, ती म्हणजेच ‘आचार’ होत.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

इ. सदाचार म्हणजे शिष्ट लोकांनी धर्मबुद्धीने आणि निःस्वार्थीपणे पाळलेला आचार

‘ज्यांना वेदांचे यथार्थ ज्ञान असते, जे निरहंकारी, निर्मत्सरी अन् स्थिर असतात, तसेच दंभ, दर्प, लोभ, मोह, मद आणि क्रोध हे ज्यांनी जिंकलेले आहेत, ते शिष्ट होत’, असे बौधायनस्मृतीत सांगितले आहे (१०५). शिष्ट हे वेदांमध्ये प्रत्यक्ष न सांगितलेल्या गोष्टीचेही अनुमान करू शकतात. शिष्टांमुळेच आपल्याला वेदांचे प्रत्यक्ष ज्ञान होत असते. हे शिष्ट लोक धर्मबुद्धीने आणि निःस्वार्थपणे जो आचार पाळतात, तो ‘सदाचार’ होय.’

ई. परंपरेने चालत आलेले आणि श्रुतीस्मृतींना विरोध नसलेले
आचार हे ‘सदाचार’ म्हणून पाळण्याचा सर्व धर्मशास्त्रकारांचा उपदेश असणे

‘जनपदधर्म (विशिष्ट व्यक्तींचा समूह करत असलेले आचरण), ग्रामधर्म, कुलधर्म इत्यादी सदाचारात गणले जातात. ‘काही आचार श्रुतीस्मृतीप्रतिपादित नसले, तरी विवाहादी संस्कारांच्या प्रसंगी त्यांचे पालन करावे’, असे सांगितले आहे, उदा. विवाहातील कंकणबंधनाचा विधी. हा विधी श्रुतीस्मृतीप्रतिपादित नसला, तरीही तो एक सदाचार असल्यामुळे त्याचा विवाहाच्या विधीत समावेश केलेला आहे. ‘ज्या देशात जे आचार परंपरेने चालत आलेले असतात आणि ज्यांचा श्रुतीस्मृतींना विरोध नसतो, असे आचार हे सदाचार म्हणून पाळले जावेत’, असा सर्व धर्मशास्त्रकारांचा उपदेश आहे.’

 

२. आचारधर्म म्हणजे काय ?

अ. ‘आचारधर्म’ म्हणजे जीवनाचे आध्यात्मिकरण !

‘ईश्वराच्या चरणांपर्यंत नेण्यास साहाय्य करणारी जीवनातील प्रत्येकच कृती, म्हणजे ‘आचरण’ आणि ते शिकवणारा धर्म, म्हणजे ‘आचारधर्म’, अशी आचारधर्माची व्यापक अर्थाने व्याख्या करता येईल. थोडक्यात ‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण करणे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय; म्हणूनच आचारधर्माच्या पालनाने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने लवकर वाटचाल होण्यास साहाय्य होते. केर काढतांना आतून बाहेरच्या, म्हणजे दाराच्या दिशेने काढणे; पुरुषांनी शर्ट-पँट याऐवजी अंगरखा-पायजमा आणि स्त्रियांनी सलवार-कुडता याऐवजी साडी परिधान करणे; स्त्रियांनी वेणी किंवा आंबाडा घालणे यांसारख्या अनेक गोष्टी आचारधर्मात येतात.

आ. ‘आचारधर्म, म्हणजेच कर्मबंधनयोग. यालाच ‘कर्मयोग’ असे म्हणतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१०.२००७, रात्री ८.३३)

विवरण : ‘कर्मयोग’ म्हणजे ‘कर्माच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करून घेण्याचा मार्ग’. कायिक, वाचिक वा मानसिक, असा कोणताही आचार, हे कर्मच आहे आणि त्या आचाराच्या पालनाने व्यक्तीचा प्रवास ईश्वरप्राप्तीच्या दिशेने होऊ लागतो. या अर्थी आचारधर्माला ‘कर्मयोग’ असे संबोधले आहे.

इ. ‘ज्या वेळी ईश्वराच्या चरणांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार्‍या अंतःस्थ तळमळीने आचरण होऊ लागते, त्या वेळी तो ‘आचारधर्म’ बनतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

 

३. ‘आचारधर्म’ हा साधनेचा पाया !

आपल्या धार्मिक जीवनाची जडणघडण आचारधर्मावर अवलंबून असते. धर्माचरणाचा उद्देश साधना करणे आणि साधनेचा हेतू ‘ईश्वरप्राप्ती’ हा असतो. धर्माचरण आणि साधना करण्याची मनाची प्रवृत्ती सत्त्वगुणावर अवलंबून असते. सर्वसाधारण व्यक्ती रजोगुणी आणि तमोगुणी असल्याने ती लगेच साधनेकडे वळत नाही. नियमित आणि चोवीस घंटे आचारधर्माच्या पालनाने व्यक्तीची सात्त्विकता हळूहळू वाढू लागल्याने पुढे ती साधनेकडे वळते अन् साधना करण्याचा पायाही आपोआप निर्माण होतो.

 

४. आचारधर्मामुळे व्यावहारिक आणि राष्ट्रीय जीवनही उन्नत होते !

आचारांच्या पालनामुळे केवळ आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो असे नाही, तर व्यक्तीचे व्यावहारिक जीवनही उन्नत होण्यास साहाय्य होते, उदा. ‘सत्याने वागावे’, या आचाराच्या पालनाने व्यक्तीला खोटे बोलण्याचे पाप लागत नाही, तसेच नैतिकता आणि सुसंस्कृतपणा या गुणांचा विकासही तिच्यात होतो. आचारांच्या पालनामुळे मनाला शिस्त लागायला आरंभ होतो आणि शिस्तबद्धता हा गुण आदर्श जीवनपद्धतीचा एक महत्त्वाचा घटक आहे.

आचार हे हिंदूंच्या श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रमुख सूत्र आहे. विविध उपासनापंथ आणि संप्रदाय यांमधील हिंदूंच्या धर्माचरणाच्या पद्धती भिन्न असल्या, तरी सदाचार किंवा शिष्टाचार हे धर्माचे एक प्रमाण मानले गेले असल्यामुळे धर्माच्या या सामायिक सूत्राने हिंदू एकमेकांना बांधले गेले आहेत. हिंदूंच्या धार्मिक एकजुटीवर हिंदूंची एकसंधता अवलंबून आहे. एकसंधतेवर समाजाची उन्नती आणि पर्यायाने राष्ट्राचाही उत्कर्ष अवलंबून आहे. यावरून आचारधर्माचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते.

 

५. आचारधर्माची निर्मिती

‘प्रजापतीने `कर्म’ आणि `तप’ यांच्या साहाय्याने ही सृष्टी आणि चातुर्वर्ण्य निर्माण केले. चातुर्वण्र्यापासून अनुलोम, विलोम, संकर आणि संकीर्ण या जाती निर्माण झाल्या. त्यांच्या अंतर्गत असणारी कुटुंबे निर्माण झाली. त्यानंतर सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्यादी सामान्यधर्म; वर्णधर्म; आश्रमधर्म; राजधर्म; जातीधर्म; कुलधर्म; देशधर्म; आपद्धर्म इत्यादी निर्माण झाले. त्यासह आचारधर्मही प्रस्थापित झाला.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आचारधर्माचे प्रास्ताविक’

Leave a Comment