दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन

श्री क्षेत्र बांगर येथील ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

उज्जैन (मध्यप्रदेश) : दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे राष्ट्र आणि धर्मजागृती यांविषयी मार्गदर्शनपर फ्लेक्स आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !
– पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज)

बांगर (देवास) येथील दत्तपादुका मंदिर श्रीक्षेत्रात साधकांकडून प्रथमच फ्लेक्स आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला ५ सहस्राहून अधिक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील संत पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी उपाख्य छोटे काका महाराज यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केल्यावर सांगितले, समाजाला ज्ञान देण्याचे भगवान श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे. या वेळी त्यांनी साधकांना आशीर्वादही दिले.

क्षणचित्रे

१. मंदिरात येणारे अनेक दर्शनार्थी त्यांच्या मुलांना वाढदिवस केक कापून आणि मेणबत्ती विझवून नाही, तर तिथीनुसार साजरा करण्यासंदर्भातील फ्लेक्स समजावून सांगत होते.

२. अनेक जिज्ञासूंनी फ्लेक्सवर दर्शवण्यात आलेल्या धर्मशास्त्रानुसार मंदिरात दर्शन घेण्याची कृती केली.

इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंची भेट

इंदूर येथील राजेंद्र मार्गावरील दत्त मंदिरामध्ये तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचा जवळपास ३ सहस्र जिज्ञासूंनी लाभ घेतला.

क्षणचित्रे 

१. दत्त मंदिराचे मुख्य संचालक पू. गुरुजी कोर्‍हाणे महाराज यांनी स्वत: ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि जिज्ञासूंना ग्रंथ खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या बरोबरच त्यांनी सनातन संस्थेचे श्री दत्त यांची शास्त्रीय माहिती असलेले फ्लेक्स मंदिरात लावण्याची सिद्धता दर्शवली.

२. महाराष्ट्राचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. अजित कडकडे यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.