प.पू. डॉक्टरांच्या ग्रंथातील ज्ञानामुळे साधना करणारे जीव निर्माण होणे !

प.पू. डॉक्टरांच्या ग्रंथांचे ज्ञान
संकेतस्थळांवर प्रकाशित केल्याने हिंदु धर्माविषयी वैश्विक स्तरावर आदर निर्माण होऊन साधना करणारे जीव निर्माण होणे !

प.पू. डॉ. जयंत आठवले H.H. Dr. Jayant Athavale

प.पू. डॉ. जयंत आठवले

 

१. संकेतस्थळांवरील ज्ञान म्हणजे हिंदु राष्ट्राच्या पहाटेची लालीमा

‘अमावास्येच्या रात्रीनंतर हळूहळू पहाट होते. त्या वेळेस सूर्याची पुसटशी लालीमा असते. ती लालीमा म्हणजे सूर्योदयाचा संकेत असतो. तसेच अंधःकाराच्या समाप्तीचा संकेत असतो. त्या लालीमेच्या उदयानेच सृष्टीत परिवर्तन होण्यास आरंभ होतो. तसेच कळ्यांचे फुलांत रूपांतर होण्यास आणि सृष्टीसाठी आवश्यक अशी उष्णता पसरण्यास आरंभ होतो. हळूहळू सूर्य प्रगटतो. सर्वत्र प्रकाश होतो आणि अंधःकार सावलीच्या रूपात असतो. सृष्टीत नवा दिवस उदयाला येतो.

ज्या प्रकारे सूर्योदयाच्या पूर्वी लालीमाचा संकेत असतो, त्याच प्रकारे संकेतस्थळावरील ज्ञान हे पूर्ण विश्वात हिंदु धर्मरूपी सूर्याच्या उदयाचा आणि हिंदु राष्ट्रस्वरूपी नव्या इतिहासाचा आरंभ होण्याचा संकेत आहे.’ (सकाळी १०.४०)

 

२. धर्मज्ञानाचे महत्त्व

‘सुगंध नसलेले पुष्प, तीक्ष्णता नसलेले शस्त्र, क्षमा नसलेले वीर आणि लज्जा नसलेली स्त्री यांची जी स्थिती होते, तीच स्थिती धर्मज्ञान नसलेली क्रांती, चळवळ आणि राष्ट्र यांची होते. सुगंध नसलेले पुष्प कोणत्याही कामी येत नाही, म्हणजेच त्याचे जीवन व्यर्थ होते, तीक्ष्णता नसलेले शस्त्र शत्रूची हानी करत नाही, क्षमत्व नसलेला वीर स्वकियांची हानी करतो आणि लज्जा नसलेल्या स्त्रीचा कोणीच सन्मान करत नाही.

 

२ अ. संकेतस्थळावरील माहिती

धर्मज्ञान मनुष्याला मनुष्यत्व, विरांना वीरत्व आणि स्त्रीला स्त्रीत्व देते. ज्ञानातूनच योग्य-अयोग्य ठरते. ज्या प्रकारे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या धर्मप्रसारामुळे भारतीय समाजाची स्वधर्मविषयक चेतना जागृत झाली त्याच प्रकारे संकेतस्थळावरील ज्ञान हे विविध जिवांद्वारे केल्या जाणार्‍या हिंदु राष्ट्रासाठीचा उगम ठरेल.’ (सकाळी ११.०५)

‘धर्मज्ञान मनुष्याला मनुष्यत्व, विरांना वीरत्व आणि स्त्रीला स्त्रीत्व देते.’ – धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, पौष शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (१.१.२०१२, सकाळी ११.०५))

 

३. आपत्काळात संकेतस्थळावरील ज्ञानाचे महत्त्व

‘ज्या प्रकारे डोळे निकामी झाल्यावर अंधःकारात मनुष्याला स्पर्श हेच डोळे असतात, त्याच प्रकारे आपत्काळातील कठीण परिस्थितीत विवेक आणि श्रद्धा न्यून झाल्यावर स्मृतीत असलेले हे ज्ञानच जिवाला धर्मातील माधुर्याचा बोध करवून अनुभूती प्रदान करील. त्यामुळे जिवाला आपत्काळाला तोंड देणे शक्य होईल.’ (सकाळी ११.२०)

 

४. विश्वालाही हिंदु धर्मातील ज्ञान, कृती आणि आचरण यांचा आदर करावाच लागेल

‘सूर्याच्या तेजापुढे दिव्याच्या ज्योतीचे अस्तित्व नसते, सागरापुढे नाल्याचे अस्तित्व नसते, त्याच प्रकारे संकेतस्थळावरून प्रसारित होणार्‍या हिंदु धर्मातील ज्ञानरूपी सूर्यासमोर पाश्चात्त्यांनी लावलेला त्यांच्या विचारांच्या तेलाने जळणारा दिवा काही कामाचा नसेल.

बलहीन असलेल्याला जगण्यासाठी बलवानाचा, शिष्याला ज्ञानासाठी गुरूंचा आणि प्रेमासाठी पुरुषाला पत्नीचा आदर करावाच लागतो. त्याच प्रकारे विश्वालाही हिंदु धर्मातील ज्ञान, कृती आणि आचरण यांचा आदर करावाच लागणार आहे.’

– धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, पौष शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (१.१.२०१२, सकाळी ११.४०))

 

५. संकेतस्थळांवरील ज्ञानाची वैशिष्ट्ये आणि त्यामुळे जिवांना होणारे विविध लाभ

५ अ. ज्ञान वाचणार्‍यांना अनुभूती येणे

‘ज्या प्रकारे चंदनासमवेत ठेवलेल्या वस्तूलाही त्याचा गंध येतो, त्या प्रकारे परात्पर गुरूंच्या संकल्पाने सिद्ध असल्याने हे ज्ञान वाचणार्‍या जिवाला विविध प्रकारच्या अनुभूती येतील.

 

५ आ. जिज्ञासू आणि साधक ज्ञानाकडे आकृष्ट होणे

ज्या प्रकारे गुळाकडे मुंग्या आपोआप येतात, त्या प्रकारे या ज्ञानाकडेही जिज्ञासू आणि साधनेत अडकलेले जीवही आपोआपच आकृष्ट होतील.

 

५ इ. व्यष्टी साधनेत अडकलेल्या जिवांची समष्टी साधना चालू होणे

ईश्वराच्या प्रत्येक कृतीमागे एक नव्हे, तर अनेक जिवांच्या उन्नतीचा विचार असतो, याचा प्रत्यय या लीलेतून सगळ्यांनाच येईल. संकेतस्थळावर या ज्ञानाचे प्रक्षेपण चालू झाल्यावर व्यष्टी साधनेत अडकलेले अनेक जीव अनुभूती येऊन समष्टी साधना करण्यास आरंभ करतील.

 

५ ई. या संकेतस्थळामुळे इतर संकेतस्थळांमुळे वाढलेले जिवाचे
रज-तम आणि त्याचे मन अन् बुद्धी यांवरील काळ्या शक्तीचे आवरण न्यून होणे

संकेतस्थळ ही मूलतः राजसिक संकल्पना आहे. तसेच सध्याच्या काळात वाईट शक्तीच या माध्यमातून जिवांवर आक्रमण करत आहेत. या ज्ञानातील चैतन्यामुळे हे संकेतस्थळ वाचणार्‍या जिवाचे अन्य विविध संकेतस्थळांमुळे वाढलेले रज-तम आणि त्याचे मन अन् बुद्धी यांवरील काळ्या शक्तीचे आवरण न्यून होऊन त्याची साधना होण्यास साहाय्य होईल.

 

५ उ. सर्व जिवांसाठी ईश्वराने आरंभ केलेला सत्संग

या ज्ञानाच्या माध्यमातून विविध देश, भाषा आणि प्रकृती असलेले जीव एकत्रित येऊन अनुभूती, स्वतःचा विचार या माध्यमांतून त्यांचा प्रत्यक्ष सत्संगच घडेल. तसेच त्यांची सत्संगातून हळूहळू सेवेकडे वाटचाल होईल.’ (दुपारी २.२०)

 

६. प.पू. डॉक्टरांनी ज्ञानात चैतन्य घातल्याने ज्ञानाद्वारे कार्य होणे

ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाढलेले स्वादहीन पदार्थ खाणे जड जाते, कटू वचन बोलणार्‍या सुंदर स्त्रीविषयी प्रेम वाटत नाही, त्याच प्रकारे सुंदर शब्दांनी गुंफलेले ज्ञानही जिज्ञासूंच्या मनातील शंका दूर करण्यास असमर्थ असते. शब्दांना नव्हे, तर त्यांतील चैतन्याला महत्त्व आहे. यामुळे या ज्ञानात चैतन्य असल्याने ज्ञान वरील सांगितलेले कार्य करण्यास समर्थ आहे.’ (१.१.२०१२, दुपारी २.५०)

(वरील ज्ञानावरून ज्ञान घेणार्‍या साधकांची मर्यादा लक्षात येते. – श्री. निषाद देशमुख, भोपाळ)

 

७. वरील ज्ञानदानासाठी सर्वांनीच प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !

‘एवढा लाभ करून देणारी आणि चैतन्य पुरवणारी ही प्रक्रिया प.पू. डॉक्टरांमुळेच साधकांना आणि सर्व समाजाला लाभलेली असल्याने सर्वांनीच त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.’

– धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, पौष शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (१.१.२०१२, दुपारी ३.१५))

Leave a Comment