आपत्कालात वाईट शक्तींच्या त्रासाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्रासावर मात करण्याचा उपाय

Article also available in :

पू. (सौ.) अंजली गाडगीळ

१. साधकांनो, आपत्कालात त्रास अल्प होत आहे ना, याकडे अधिक लक्ष न देता त्रासातही आपली साधना होत आहे ना, याकडे अधिक लक्ष द्या, म्हणजे निराशा येणार नाही !

बरेच साधक आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांना बसतात. सध्या आपत्काल चालू असल्याने त्रास पूर्णतः गेला असे होणार नाही; परंतु त्रासातही आपले अनुसंधान टिकून आहे का, याकडे अधिक लक्ष दिले, तर त्रासातही साधना होईल आणि देवाला अपेक्षित अशी प्रगतीही होईल.

२. सेवा करणे हाच एक आध्यात्मिक उपाय आहे, असे समजून साधना करण्यास प्राधान्य द्यावे !

आपत्कालात सेवा करण्यासच आधी प्राधान्य द्यायला हवे. सत्सेवा हाच त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आहे, असे समजून आपल्याला झेपेल ती सेवा करावी. सेवेत मन गुंतल्याने त्रासाकडे अधिक लक्ष न जाता त्रास कधी अल्प झाला, हेच कळत नाही आणि सेवा झाल्याने मनही आनंदी रहाते.

३. त्रास पुष्कळच वाढला असेल, तर उपाय करण्यासच प्राधान्य द्यावे !

सेवा करणे झेपत नसेल आणि त्रास पुष्कळच वाढला असेल, तरच आध्यात्मिक उपायांना बसावे. आपत्काल चालू असल्याने त्रास लगेचच अल्प झाला पाहिजे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. यामुळे निराशा आल्याने त्रासात अधिकच भर पडते.

४. मनाची सकारात्मकता वाढवणे आवश्यक असणे

वाईट शक्तींचा त्रास झाला, तरी आपल्याला देवाचे साहाय्यही तेवढेच लाभत आहे, या विचाराकडे अधिक लक्ष द्यावे. यामुळे मन सकारात्मक होते. मनाची सकारात्मकता हीच आपली खरी शक्ती आहे. ही शक्ती वाढवणे आवश्यक आहे.

५. स्वतःच्या आध्यात्मिक त्रासाला एकदा का गोंजारायची सवय लागली की, संघर्ष करण्याकडे लक्ष अल्प आणि स्वतःच्या त्रासाचे महत्त्व वाढवण्याकडे लक्ष अधिक, असे समीकरण बनल्याने आपण देवापासून लांब जात असणे

मला आध्यात्मिक त्रास आहे ना, त्यामुळे अधिक सेवा करणे जमत नाही, या विचाराची ढाल बनवून आपणच आपल्या आध्यात्मिक प्रगती होण्याच्या मार्गात अडथळा बनत आहोत, हे ध्यानी घ्यावे. आता कशानेच त्रास अल्प होत नाही, तर त्वरित उपाय करण्याकडेच अधिक लक्ष द्यावे. स्वतःच्या आध्यात्मिक त्रासाला एकदा का गोंजारायची सवय लागली की, संघर्ष करण्याकडे लक्ष अल्प आणि स्वतःच्या त्रासाचे महत्त्व वाढवण्याकडे लक्ष अधिक, असे समीकरण बनल्याने आपण देवापासून लांब जातो. परिणामी आध्यात्मिक प्रगतीपासूनही दूर रहातो.

६. मनाच्या नकारात्मक धारणेमुळे देवापेक्षा त्रास देणारी वाईट शक्तीच मोठी बनणे !

मनाच्या नकारात्मक धारणेमुळे आपण देवापेक्षा त्रास देणार्‍या वाईट शक्तीलाच एकप्रकारे मोठे बनवतो. आध्यात्मिक त्रासाला मोठे बनवण्यापेक्षा देव आपल्याला त्रासातही साहाय्य करत आहे, याकडे लक्ष देऊन देवाच्या चरणी कृतज्ञ राहिले असता आपत्कालातही साधना होईल. नाहीतर त्रासाला गोंजारण्यातच आयुष्य निघून जाईल. तेव्हा वेळीच सावध व्हा !

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बंगळुरू, कर्नाटक. (१६.१२.२०१५, सकाळी १०.४०)

 

साधकांचा सेवा आणि त्रास यांसंदर्भातील योग्य दृष्टीकोन

१. अयोग्य दृष्टीकोन : बरे वाटल्यावर सेवा करीन.

२. योग्य दृष्टीकोन : बरे वाटण्यासाठी सेवा करीन.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.१२.२०१५)