गुरुकृपायोगात सांगितलेल्या अष्टांग साधनेतील घटकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेत महत्त्व !

१. अष्टांग साधनेतील घटकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेत महत्त्व !

वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. साधना व्यष्टी असो वा समष्टी, तिच्यासाठी अष्टांग साधनेतील घटक महत्त्वाचे आहेत.

२. व्यष्टी वा समष्टी साधना करतांना स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. सनातनचे बरेच साधक समष्टी साधना करतात. बहुतांशी साधक समष्टी साधनेच्या अंतर्गत ‘सेवा’ या घटकालाच सर्वाधिक प्राधान्य देतात आणि स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याला दुय्यम प्राधान्य देतात. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवतांना साधकांच्या मनाचा संघर्ष होतो; त्यामुळेही साधकांना ती कंटाळवाणी वाटते. औषध कडू असले, तरी आरोग्यासाठी ते घ्यावेच लागते. त्याप्रमाणे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आवडो किंवा न आवडो, साधकांनी तिला प्राधान्य देणे आवश्यक आहे, हे लक्षात येते.

३. पूर्वी गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत सत्संग, सत्सेवा, भाव आणि त्याग या घटकांचे महत्त्व जास्त होते. आता त्या घटकांचे महत्त्व अल्प होऊन स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन या घटकांचे महत्त्व अधिक झाले आहे. काळानुसार साधनेतील घटकांचे प्रमाण कसे पालटते, त्याचे हे उदाहरण आहे. स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधकाचे मन दूषित होते. त्यामुळे साधकाने कितीही सेवा, त्याग आदी केला, तरी त्याला साधनेमुळे जेवढा चैतन्याचा लाभ व्हायला हवा, तेवढा होत नाही. परिणामी अशा साधकाची प्रगती भरभर होत नाही. काही साधकांच्या स्वभावदोषांमुळे समष्टीची हानी झाल्यामुळे अशा साधकांची साधनेत अधोगती होते. सध्या वाईट शक्तींचा प्रकोप अधिक आहे. साधकांच्या दूषित मनाचा अपलाभ करून घेऊन वाईट शक्तींना साधकांना त्रास देणे सोपे होते. या सर्व कारणांमुळे काळानुसार ‘स्वभावदोष-निर्मूलन’ आणि ‘अहं-निर्मूलन’ या घटकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

४. सनातनच्या कित्येक साधकांना ‘आश्रमात राहून साधना करता येत नाही’ याची किंवा ‘अडचणींमुळे समष्टी सेवेत सहभागी होता येत नाही’ याची खंत वाटते. अशा साधकांनी खंत बाळगू नये; कारण सत्संग आणि सत्सेवा या घटकांचे महत्त्व एकूण साधनेत केवळ १६ टक्केच आहे. त्यामुळे त्यांनी ‘घरी राहूनही साधना होऊ शकते आणि चांगली प्रगती करता येऊ शकते’, याविषयी श्रद्धा ठेवावी. सनातनच्या कित्येक साधकांनी घरी राहून साधना करून  ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी साध्य केली आहे.

५. साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍यांनी ‘सर्व साधकांना स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवता येण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो ना’, हे पहावे आणि ‘त्यांच्याकडून ती व्यवस्थितपणे राबवली जात आहे ना’, याचाही मध्ये मध्ये आढावा घ्यावा.’

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, गोवा.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

 

२. युगांनुसार सर्वसाधारण व्यक्तीची
आध्यात्मिक
पातळी आणि तिच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण 

table

वरील तक्त्यावरून सध्याच्या कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे का महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१२.२०१५)

 

३. व्यष्टी आणि समष्टी साधना

३ अ. काळमहिम्याप्रमाणे व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना महत्त्वाची

काळमहिम्याप्रमाणे कलियुगात समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व आहे.

३ आ. दोन्ही साधना परस्परपूरक

व्यष्टी साधना करणार्‍यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी समष्टी साधना करणे आवश्यक असते, तर व्यष्टी साधनेच्या पायावर समष्टी साधना उभी रहात असल्याने समष्टी साधना करणार्‍यांनी व्यष्टी साधना करणे आवश्यक असते.

३ इ. गुरुकृपा सतत हवी

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करत रहाणे आवश्यक असते.

३ ई. ज्ञानोत्तर कार्य

ज्ञानोत्तर भक्ती करतात, तसेच ज्ञानोत्तर कार्य करता आले पाहिजे. आमचे गुरु संत भक्तराज महाराज म्हणायचे, ‘‘साक्षीभाव म्हणजे शेवट समजू नका. त्याच्यापुढे जाता आले पाहिजे. ‘दिसेल ते कर्तव्य’, हे नेहमी लक्षात ठेवा.’’ ९० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे ‘आता उरलो उपकारापुरता’, म्हणजे समाजपुरुषासाठी आवश्यक असेल ते करत शिष्य (आता तो ‘परात्पर गुरु’ झालेला असतो.) जीवन जगतो. अशा प्रकारच्या साधनेने गुरुकृपेचा ओघ शिष्याकडे अखंड येत रहातो आणि तो मोक्षाला जातो.

 

४. समष्टी भाव वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करत आहे, तसेच ईश्वराचे कार्यही माझेच आहे, या प्रकारचा भाव आणि त्यातून ईश्वरेच्छेने घडणाऱ्या कृतीला ‘समष्टी भाव’ म्हणतात. ‘सर्व जीव ईश्वराजवळ जावेत’, असा भाव म्हणजे समष्टी भाव. साधनेमध्ये समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. समष्टी साधना करण्यासाठी समष्टी भाव येण्यासाठी करावयाचे प्रयत्न पुढे दिले आहेत.

१. व्यष्टी साधना परिपूर्ण करणे

२. ‘व्यष्टी साधना होण्यासाठी समष्टीत जाऊन सेवा करतो’, हा भाव ठेवणे

३. ‘समष्टी भाव वाढवणे हा ईश्वरप्राप्तीचा घटक आहे’, हा भाव ठेवून प्रत्येक कृती करणे

४. स्वतः प्रत्येक क्षणाचा साधनेसाठी वापर करून तसा इतरांनाही करायला लावणे

५. सातत्याने इतरांचा विचार करणे

६. इतरांकडून झालेल्या चुका स्वत:च्या समजून त्या सुधारण्याचा आणि इतरांमध्ये ईश्वरी गुण आणण्याचा प्रयत्न करणे

– श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा पूर्वाश्रमीच्या कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ७.७.२००५)

संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – भावजागृतीसाठी साधना खंड १