ईश्‍वराची भक्ती केली, तर तो संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करील, याची निश्‍चिती बाळगा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दिवशी सावंतवाडी, देवगड, कुडाळ आणि कणकवली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ‘ईश्‍वराची भक्ती केली, तर ईश्‍वर संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करेल, याची निश्‍चिती बाळगा !’, असे प्रतिपादन करण्यासह उपस्थितांना साधनेसाठी दिशादर्शन करणारे मार्गदर्शन सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. या मार्गदर्शनाचा लाभ २५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘इंद्रियजन्य सुख म्हणजे आनंद नव्हे ! चांगले गाणे ऐकणे, मनपसंत पक्वान्न खाणे, पर्यटनस्थळी जाणे यातून तेवढ्या वेळापुरते सुख मिळते. संसार सुख-दुःखाचे मिश्रण आहे. बर्‍याच वेळा आपण त्या सुखालाच आनंद समजत असतो; पण तसे नाही. आनंद हा सुखदुःखाच्या पलीकडे असतो. आनंद ही एक दैवी अनुभूती आहे. आनंदप्राप्ती हेच आपल्या जीवनाचे मूलभूत ध्येय आहे. सर्वोच्च आणि सातत्याने टिकणारे सुख म्हणजे आनंद ! हा आनंद कसा मिळवायचा हे आपल्याला व्यवहारात कुठेही शिकवले जात नाही. आनंद कसा मिळवायचा, हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ! आपण भाग्यवान आहोत की, भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी आहे. जगभरातून लोक मनःशांतीसाठी भारतात येतात.’’

अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने हा विषय आपण बुद्धीने समजून घेण्यासमवेतच श्रद्धेने आणि भाव ठेवून समजून घेण्यासाठी प्रयत्न करूया. मनुष्यजन्माची कारणे प्रारब्धभोग संपवणे, तसेच मोक्षप्राप्तीसाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्तता करून घेणे ही आहेत. दुःखाची कारणे ही शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक असू शकतात. आपल्या जीवनातील ८० टक्के समस्यांचे कारण आध्यात्मिक असते. बुद्धीअगम्य किंवा आध्यात्मिक कारणामुळे होणार्‍या दुःखाच्या निवारणासाठी साधना करणे आवश्यक आहे.  कलियुगात नामजप ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. कुलदेवतेच्या नामजपाने व्यक्तीमध्ये ब्रह्मांडातील तत्त्वांची ३० टक्केपर्यंत वाढ होऊ शकते; म्हणून प्रारंभी सर्वांनी कुलदेवतेची उपासना म्हणजे नामजप करणे आवश्यक आहे, तसेच पितृदोष आणि पितृऋण यांतून मुक्त होण्यासाठी दत्त उपासना म्हणजे प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला पाहिजे.

माजगाव, सावंतवाडी येथील कार्यक्रमास लाभलेली उपस्थिती

जिज्ञासूंचे अभिप्राय

१. सौ. नम्रता रमाकांत देवलकर, सरपंच, तरंदळे, कणकवली –

मार्गदर्शन अप्रतिम होते. आमचे जीवन आनंदी होण्यासाठी जे आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले, त्यानुसार आम्ही नक्कीच प्रयत्न करू. असे मार्गदर्शन वारंवार मिळून आमच्या मनावर चांगले संस्कार  होवोत, हीच प्रार्थना !

२. कु. जयश्री मेस्त्री, मुणगे, तालुका देवगड –

सनातन संस्थेचा सत्संग सुंदर झाला. तो दिवस आमच्यासाठी भाग्याचा होता; कारण साक्षात सद्गुरु स्वाती खाडये यांचे आम्हांला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्या सत्संगामध्ये सगळे इतके मग्न होऊन गेले होते की, कधी वेळ निघून गेली, हेदेखील कळले नाही. सत्संगातील विषय इतका अप्रतिम आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला समजेल, अशा सहज सोप्या भाषेत मांडला गेला. विषय अजून अजून ऐकत रहावेसे वाटत होते. मला या सत्संगातून पुष्कळ काही शिकायला मिळाले. असा सत्संग मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. त्यांनी सांगितलेले नामजपाविषयीचे अनुभव ऐकल्यानंतर नामजपात पुष्कळ काही आहे की, जे विचार करण्यापलीकडे आहे, याची जाणीव झाली. आम्ही ३० ते ४० कि.मी. अंतरावरून हा सत्संग ऐकण्यासाठी आलो होतो; पण त्यामध्ये कशाचीही अडचण भासली नाही. गुरुवर्यांना माझा सदैव नमस्कार !

३. स.वि. माधव, कुडाळ –

सद्गुरु ताईंनी केलेल्या मार्गदर्शनातून मला पुष्कळ काही शिकायला मिळाले. सत्संग भावपूर्ण होता. मनात बरेच प्रश्‍न होते, त्याची उत्तरे सत्संगातून मिळाली. आपल्या जीवनातील आध्यात्मिक त्रासांचे निवारण भगवंताची कृपा संपादन करून कसे करता येते ? ते समजले. कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व कळले.

४.  सौ. नेहा प्रशांत हडकर, देवगड

४ अ. माझे यजमान सत्संगाला येण्यासाठी सिद्ध झाले आणि पूर्णवेळ त्यांनी सत्संग ऐकला. सत्संगात सांगितलेले त्यांना पटले. कामावर (हॉटेलवर) जाण्याची वेळ झालेली असूनही ते थांबले होते, हे विशेष आहे. सद्गुरु ताईंचा सत्संग ऐकतांना मन निर्विचार होते.
४ आ. सद्गुरु स्वातीताईंना पाहून श्री दुर्गादेवीचीही आठवण येत होती. सद्गुरु ताई बोलत असतांना अंगावर शहारे येत होते. भाव जागृत होत होता.
४ इ. दोन जिज्ञासूंनी भ्रमणभाष करून सांगितले की, पुष्कळ छान सत्संग झाला. आणखी लोक यायला हवे होते. त्यांनासुद्धा शिकायला मिळाले असते.
४ ई. एक जिज्ञासू महिला विलंब झाल्याने सत्संग संपल्यावर घरी जातांना घाबरल्या होत्या की, घरी आता रागावतील; परंतु घरी गेल्यावर सासर्‍यांनी विचारले की, काय सांगितले सत्संगात ? त्या वेळी तिने सत्संगातील सर्व सूत्रे सांगितली. तेव्हा सासरे बोलले, ‘‘बरे झाले गेलीस ते. सनातनचे कार्य पुष्कळ छान आहे.’’
४ उ. एका जिज्ञासूने सांगितले की, असे वर्ग महिन्यातून एकदा तरी व्हायला पाहिजेत.

गुरुदेवांच्या कृपेने हे सर्व अनुभवायला मिळाले, याबद्दल मी गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे !

५. सौ. अनघा चोपडेकर, तुळशीनगर, देवगड –

मला अनेक अडचणींवर मात करून सत्संगाला येता आले.  मनाचा अभ्यास झाला. सत्संगात विषय ऐकतांना भावाश्रू अनावर झाले.

६. श्री. सुभाष गावकर, कणकवली –

साधनेचे महत्त्व लक्षात आले. साधनेमुळे सर्व अडचणींवर मात करता येते, आनंद मिळवता येतो हे लक्षात आले. चांगल्या प्रकारचे व्याख्यान ऐकायला मिळाले. इथून पुढे काही कार्यक्रम असले, तर मला सांगत जा.  मी आवर्जून उपस्थित राहीन.

७. श्री. रामचंद्र वर्देकर, हरकूळ –

प्रवचन ऐकून पुष्कळ आनंद वाटला. साधनेसंदर्भात चांगले प्रयत्न करावेत, असे वाटले. इथून पुढे नामजप करण्यासाठी प्रयत्न करीन.

८. श्री. शेखर सावंत, भिरवंडे –

साधनेविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले. आलो नसतो, तर संधी गेली असती. मार्गदर्शन ऐकून चांगले वाटले.

९. श्री. रमेश लहारे,  कणकवली –

बर्‍याच गोष्टी माहिती नव्हत्या, ते व्याख्यानाच्या माध्यमातून समजल्या.

Leave a Comment