राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !

श्रीराम नामदिंडीत सहभागी धर्मप्रेमी

बेळगाव – सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ अंतर्गत राजहंसगड गावात भव्य ‘श्रीराम नामदिंडी’ उत्साही, चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पालखीतील श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन सौ. मंगल आणि श्री. माधव बेळगावकर यांनी विधीवत् केले. त्यानंतर धर्मध्वजाचे पूजन करून गावातील प्रतिष्ठित पंच सर्वश्री शाम थोरवत, गुरुदास लोखंडे, सहदेव लोखंडे, पी.जी. पवार, बाळू गडकरी, विठ्ठल मोरे, सिद्धापा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दिंडीला प्रारंभ करण्यात आला.

गावातील गणपत गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज गल्ली, महादेव गल्ली आणि मारुति गल्ली अशा भागांमध्ये दिंडी जाऊन श्री हनुमान मंदिरासमोर या दिंडीची सांगता करण्यात आली. दिंडीच्या मार्गामध्ये महिलांनी त्यांच्या घरासमोर भव्य रांगोळी, तसेच दिंडीमध्ये पुष्पवर्षाव करून दिंडीचे स्वागत केले.

दिंडीत गावातील वारकरी भजनी मंडळाचा सहभाग !

दिंडीत गावातील ‘सिद्धेश्वर वारकरी भजनी मंडळ’, तसेच ‘श्री सिद्धेश्वर महिला भजनी मंडळ’ आणि ‘जयहरि महिला भजनी मंडळ’ यांचा सहभाग होता. गावातील महिला कलश घेऊन, तसेच लहान मुले हातात ध्वज घेऊन या दिंडीत सहभागी होते. राजहंसगड गावातील धर्मबांधवांसमवेत पंचक्रोशीतील नंदीहळळी, नागेनहटी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी देसुर, सुळगा, अवचारहट्टी या गावातील पुरुष आणि महिला यांचाही सहभाग होता.

विशेष

१. धर्मप्रेमी हितचिंतक यांनी पाणीव्यवस्था, अल्पाहार, चहा, ध्वनीयंत्रणा, तसेच इतर सर्व साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देऊन ते या दिंडीत सहभागी झाले.

२. या दिंडीमध्ये सहभागी झालेले वारकरी, तसेच इतर धर्मबांधव यांच्याकडून ‘अशी भव्य-दिव्य दिंडी अजूनपर्यंत आपल्या गावामध्ये कधीच झाली नाही’, ‘दिंडीतील शिस्तबद्धता, रामनामाचा जयजयकार हे सर्व प्रथमच आम्हाला पहायला मिळाले’, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment