नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

Article also available in :

अपप्रचार : ‘तुम्ही रासायनिक शेती करत असाल, तर एकाएकी नैसर्गिक शेतीकडे वळू नका. तसे केल्यास तुमचे उत्पन्न घटेल.

खंडण : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत पूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील त्यांच्या गुरुकुलाच्या ९० एकर शेतामध्ये रासायनिक शेती करत असत. शेतीमध्ये हानीकारक रसायनांची फवारणी करतांना रसायनांच्या दुष्प्रभावामुळे एकदा त्यांचा एक कामगार बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या वेळी आचार्य देवव्रत यांनी विषारी शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शेती करून पहायचे ठरवले. प्रयोग म्हणून त्यांनी पहिल्या वर्षी ९० पैकी १० एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती केली. पहिल्याच वर्षी त्यांना रासायनिक शेतीत मिळायचे तेवढेच उत्पन्न मिळाले. उत्पन्नात घट झाली नाही. त्यानंतर त्यांनी पूर्ण ९० एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती केली. त्या वेळी त्यांना रासायनिक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न मिळाले. नैसर्गिक शेती समजून घेऊन योग्य प्रकारे आचरणात आणली, तर उत्पन्नात अजिबात घट होत नाही. अशा प्रकारे आधीपेक्षा उत्पन्नात वाढ झाली. त्यांच्या मातीच्या सुपिकतेतही वाढ झाली. असा दुहेरी लाभ मिळवणार्‍या अनेक शेतकर्‍यांची उदाहरणे भारतभरात आहेत.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)

अधिक माहितीसाठी भेट द्या. मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/84133.html

 

अपप्रचार : ‘नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेले देशी गायीचे शेण आणि गोमूत्र सर्वत्र उपलब्ध होत नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने लागवड करणे सर्वांना शक्य नाही.

खंडण : अनेक मोठ्या शहरांतही गोशाळा असतात. काही गोशाळांमध्ये जीवामृत, घनजीवामृत, गोमय, गोमूत्र यांची विक्रीसुद्धा केली जाते. देशी गायी पाळणारे अनेक जण इतरांना शेण आणि गोमूत्र विनामूल्यही उपलब्ध करून देतात.

नैसर्गिक शेतीसाठी १५ दिवसांतून एकदा जीवामृत बनवावे लागते. १०० चौरस फूट क्षेत्रासाठी केवळ ५० ग्रॅम शेण आणि ५० मि.ली. गोमूत्र आवश्यक असते. गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्यामुळे ते एकदाच अधिक प्रमाणात आणून ठेवता येऊ शकते. शेण ताजे आवश्यक असले, तरी ७ दिवसांपर्यंतचे शेण ताजे समजले जाते. यातील काहीच उपलब्ध झाले नाही, तर जिवामृताच्या ठिकाणी घनजीवामृत वापरता येते. एकदा बनवलेले घनजीवामृत उन्हात वाळवून वर्षभर साठवून ठेवता येते.

आपल्या आजूबाजूच्या परिसरातील छतशेती करणारे किंवा दूध विक्रेते यांच्याकडे चौकशी केल्यास ‘आपल्या परिसरात देशी गायी कुठे आहेत ?’ हे सहज समजू शकते. लागवड करणारे ४ – ५ जण एकत्रितपणे जीवामृत बनवून ते आपसांत वाटून घेऊ शकतात. त्यामुळे ‘देशी गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध होत नाही’, असा आधीच अपसमज करून न घेता ते उपलब्ध करून घेण्यासाठी कृतीशील होऊया !’

अपप्रचार : ‘मातीत खते घातल्याविना उत्पन्न येणार नाही.

खंडण : जंगलात कोण खत द्यायला जाते; परंतु तेथेही झाडांना भरपूर फुले आणि फळे येतच असतात. झाडाची वाढ ही निसर्गात सहज होणारी प्रक्रिया आहे. झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व खनिजे मातीत असतात; परंतु झाडांना ती थेट मातीतून घेता येत नाहीत. मातीतील जीवाणू झाडांना आवश्यक ती पोषक तत्त्वे मुळांशी उपलब्ध करून देतात. वनस्पतीच्या वाढीसाठी कुठेही मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. मातीमध्ये जेवढे जास्त जीवाणू तेवढी झाडांची मातीतील पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या ‘जीवामृता’चा प्रसार केला. ‘जीवामृत’ हे अशा जिवाणूंचे उत्तम विरजण (कल्चर) आहे. जिवामृताच्या नियमित उपयोगाने मातीच्या सुपिकतेत वाढ होत राहते. आजकाल नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी कोणतेही रासायनिक खत न वापरता केवळ जिवामृताचा वापर करून विक्रमी पीक घेत आहेत. हे पाहिल्यावर ‘खते घातल्याविना पीक येत नाही’, असे कृषी विद्यापिठे वर्षानुवर्षे का सांगत आली आहेत, हे लक्षात येत नाही. कृषी विद्यापिठांचा हा (अप)प्रचार, म्हणजे ‘खत-सम्राटां’च्या जागतिक अर्थकारणाचा एक भाग तर नसेल ना ?’ अशी कोणी शंका घेतल्यास आश्चर्य वाटू नये.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (६.८.२०२२)

 

Leave a Comment