अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

पू. राजाराम नरुटे

ईश्वरपूर (जिल्हा सांगली)  – अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संतांचा वाढदिवस सर्वांनाच चैतन्य देऊन जातो. त्यामुळे सोहळ्यासाठी उपस्थित नातेवाईक, साधक आणि समाजातील स्नेही यांच्यासाठी हा सोहळा चैतन्याची अनुभूती देणारा अन् श्री विठ्ठलाच्या भक्तीरसात डुंबवणारा होता. शेवटी करण्यात आलेली साखरेची तुला सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

या प्रसंगी महाराष्ट्र तात्यासाहेब (आबासाहेब) वास्कर फडाचे चोपदार ह.भ.प. बाळकृष्ण दळवी, श्री. यशवंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, नातेवाईक आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

पू. राजाराम नरुटे (आबा) यांचे औक्षण करतांना डावीकडून सौ. कविता संजय मगदूम, सौ. शोभा विठ्ठल थोरात, सौ. अनिता राजेंद्र जाधव, सौ. राणी धनंजय नरुटे आणि सौ. मंगल शंकर काजारे
पू. राजाराम नरुटे (आबा) यांची करण्यात आलेली साखरेची तुला

१. क्षणचित्रे

१.अ. हा सोहळा चैतन्य आणि भाव यांच्या स्तरावर झाल्याची अनुभूती पू. नरुटे (आबा) यांचे नातेवाईक अन् समाजातील उपस्थित स्नेही यांनीही घेतली.

१.आ. सोहळा चालू झाल्यावर वरुणराजाने उपस्थिती दर्शवून त्याने जणू तोही या आनंदात सहभागी असल्याचे दाखवून दिले.

१.इ. सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकाची पू. नरुटे (आबा) आपुलकीने चौकशी करत होते.

१.ई. सोहळ्याच्या प्रसंगी पू. नरुटे (आबा) यांचे लाघवी आणि ईश्वराला समर्पित असे हास्य सभागृहात चैतन्याचे तुषार पसरवत होते.

 

२. विशेष

या वर्षी ईश्वरपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव झाला नाही; मात्र पू. नरुटे (आबा) यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने सर्व साधकांनी गुरुपौर्णिमा महोत्सवच अनुवभला. सोहळ्यासाठी उपस्थित असणार्‍या सर्वांनाच एक आगळा-वेगळा कार्यक्रम अनुभवायला मिळाला. उपस्थितांपैकी अनेकांनी ‘आजपर्यंत आम्ही अनेक वाढदिवस पाहिले; मात्र सनातन संस्थेने आयोजित केलेला हा सोहळा पाहून यातील नियोजन, शिस्तबद्धता आणि प्रत्येक कृतीचे केलेले आध्यात्मीकरण हे अनुभवता आले’, असे सांगितले. सोहळा संपतांना सर्वजण भावानंदातच होते.

 

३. जीवन कृतकृत्य करणारा पाद्यपूजा सोहळा !

प्रारंभी पू. नरुटे (आबा) यांचे सुपुत्र श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी त्यांची पाद्यपूजा केली. पाद्यपूजेच्या प्रसंगी पू. नरुटेआबा यांचे चरण एखाद्या बालकाप्रमाणे सुकोमल भासत होते, तर पाद्यपूजा होत असतांना पू. नरुटे (आबा) हे ‘जणूकाही विठ्ठलाचीच पाद्यपूजा चालू आहे’, या भावात होते. श्री. शंकर नरुटे यांचाही भाव ‘ते एका संतांची पाद्यपूजा करत आहेत’, असा होता आणि जीवन कृतकृत्य करणारा असाच हा सोहळा होता, असे श्री. शंकर नरुटे यांना जाणवले.

 

४. सर्वांना प्रकाशमान करणारे पू. नरुटे यांचे औक्षण !

यानंतर भ्रमणभाषद्वारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पुरोहित पाठशाळेतून पुरोहितांनी श्रीरामरक्षेतील काही श्लोक ऐकवले. त्याप्रसंगी पू. नरुटे (आबा) यांचे गुरुबंधू आणि कलंकी केशव संप्रदायाचे साधक ह.भ.प. तुकाराम जाधव (वय ९३ वर्षे) यांनी पू. नरुटे (आबा) यांच्या प्रत्येक अवयवावर अक्षता वाहिल्या.

यानंतर सौ. कविता संजय मगदूम, सौ. शोभा विठ्ठल थोरात, सौ. अनिता राजेंद्र जाधव, सौ. राणी धनंजय नरुटे आणि सौ. मंगल शंकर काजारे, या ५ सुवासिनींनी पू. नरुटे (आबा) यांचे ९० दिव्यांनी औक्षण केले. या औक्षणाने प्रत्येकाला ‘स्वतः प्रकाशमान झालो’, असे वाटले.

 

५. आनंद द्विगुणीत करणारी पू. नरुटे (आबा)
यांच्या संतसन्मान सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती !

पू. नरुटे (आबा) यांना रामनाथी, गोवा येथील आश्रमात संत म्हणून घोषित करण्यात आले. या अवर्णनीय सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती उपस्थितांना दाखवण्यात आली. या सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रसाळ वाणीतून पू. नरुटे (आबा) यांची घेतलेली मुलाखत आणि त्यातून उलगडलेला त्यांचा जीवनपट पाहून प्रत्येकालाच ‘साधनेत नेमके प्रयत्न कसे करावेत ?’ याची दिशा मिळाली. यातील पू. नरुटे (आबा) यांचे मार्गदर्शन ज्ञानशक्तीने ओथंबलेले होते.

शेवटी समाजातील उपस्थित स्नेही आणि मान्यवर यांनी पू. नरुटे (आबा) यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

 

Leave a Comment