मराठीवरील आक्रमणे (भाग २)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.

मराठीचे मारेकरी !
मराठीचे मारेकरी !

 

मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्‍या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया. यातून बोध घेऊन मातृभाषा मराठीला वाचवण्यासाठीची कृतीच्या स्तरावरील आपली तळमळ जागृक होवो हीच श्रीगुरुचरणी प्रार्थना !

 

मराठीला जिवंत ठेवा !

प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले
प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले

 

व्यवहार ते सर्व, करा मातृभाषेत !

व्यवहार ते सर्व, करा मातृभाषेत ।

‘मातृभाषा उर्दू, तरी अभ्यासिती ।

कुराणभाषा फारसी, अन् अरबी ती ।।

 

धर्मद्रोही हिंदू, नष्ट करीती सत्वर ।

धर्मभाषा संस्कृत, अन् मातृभाषा ।।

 

मातृभाषेचे मूळ, देवभाषा संस्कृत ।

तिच्याविण नाही, मातृभाषा सुसंस्कृत ।।

 

मातृभाषेविण, नाही राष्ट्राभिमान ।

धर्माभिमान नाही, मातृभाषेविण ।।

 

राष्ट्र आणि धर्म, यांचा नसता अभिमान ।

न राहती राष्ट्र, आणि धर्म ।।

 

न रहाता राष्ट्र, आणि धर्म ।

जीवित असणे, असे मृतवत ।।

 

टाळण्या मरण, शिका मातृभाषेत ।

व्यवहार ते सर्व, करा मातृभाषेत ।।

 

प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले (१७.३.२००५)

 

मराठी भाषेत इंग्रजी शब्द मिसळून तिचे अत्यंत विकृत रूप म्हणजे ‘मराठीचे भ्रष्टीकरण’

आपण आपल्या तोंडी बसलेले इंग्रजी शब्द घोकीत स्वस्थ बसल्यास केवळ आपल्याकडेच स्वाभिमानशून्यता येईल असे नाही; तर आपण आपल्या संसर्गाने भावी पिढीस दूषित करून निर्भेळ मराठी बोलण्याचे श्रेय तिजकडून हिरावून घेऊ. इंग्रजी शब्द मराठी संभाषणात जितक्या सौकर्याने शिरले, तितकेच अवघड काम त्यांना त्यांतून हुसकून लावणे होणार आहे; पण ते अवघड कामही एक आवश्यक कर्तव्य म्हणून आपण पार पाडले पाहिजे.’ – स्वा. सावरकर

 

स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने यांचे झालेले इंग्रजीकरण म्हणजे स्वयंपाकघर बाटणे !

‘आमच्या घरांमध्ये इंग्रजी शब्दांची वाळवी लागलेली आहे. ‘स्वयंपाकघर’ असे मी म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘कीचन’ मात्र कळते. पूर्वी आमच्या स्वयंपाकघरात प्रत्येक उपकरणाला मराठी नाव असे; पण आज सगळी उपकरणे इंग्रजी नावांनी ओळखली जातात. मोदकपात्र, रवी, विळी, सुरी, खोवणे, उलथणे, पळी, डाव, चमचा, उकडणे, भाजणे, परतणे, वाफाळणे, शिजवणे, सोलणे, चिरणे, कापणे, कुटणे, मिसळणे इत्यादी सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने मूळ मराठीतच असूनही त्या प्रत्येकास आज फ्राय, मिक्स इत्यादी इंग्रजी शब्द वापरले जातात. त्याची ना कुणाला खंत ना लाज ! स्वयंपाकघर बाटले की, सर्व संपले !’ – ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे.

 

लिहिण्यात इंग्रजीचा अतिरेकी वापर

१. दुकानांच्या आणि नावांच्या पाट्यांवर इंग्रजी शब्द आणि नावेही आद्याक्षरांत घालण्याची मूर्ख खोड

‘ज्या गावांत वा नगरांत इंग्रजी लोक वस्तू घेण्यास येण्याचा वा भेटीस येण्याचा मुळीच संभव नसतो, तेथेही दुकानांवर वा घरादिकांवर वस्तूंची वा गृहस्थादिकांची नावे इंग्रजीत लिहून पाट्या लावलेल्या असतात ! हेअर कटिंग सलून, क्लॉथमर्चंट, टेलर्स, बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, टी.व्ही. ढेकणे प्लीडर, अशा पाट्या खेड्यापाड्यांतही लागलेल्या आढळतात. पाट्या अशा इंग्रजी शब्दांत लावणे ही एक टूमच झाली आहे. आता हा केवळ छचोरपणा नव्हे काय ! पाट्या गिर्‍हाईके वाढावी म्हणून लावतात. गिर्‍हाईकांत सहस्रामागे एकासही त्या शब्दांचा नीट अर्थ कळणार नाही, अशा स्थळीही त्या पाट्या लावून गिर्‍हाईके वाढतील काय ? त्यापेक्षा मराठी ‘पाटी रंगविणार’, ‘शिंपी’, ‘केस कापणारा’, विधिज्ञ, आत-बाहेर (इन-आऊट) असे सोपे शब्द लिहून जर पाट्या लावल्या, तर त्या अधिक गिर्‍हाईक आकर्षित करणार नाहीत का ! परंतु अशा इंग्रजी अगडबंब शब्दांच्या पाट्या हा ‘दुकानाचा एक अलंकार आहे किंवा एक रूढीजन्य संस्कार आहे’, असे या गांवढळ दुकानदारांस वाटत असावे ! प्रशाळेतील (हायस्कूलातील) मुलेही ‘अरे एम्.जी.’ अशा इंग्रजी आद्याक्षरांत एकमेकांस हाका मारतांना ऐकू येतात आणि त्यास शिक्षक वा पालक कोणीही हसत नाहीत वा दाबत नाहीत; पण एखाद्या स्वाभिमानी विद्यार्थ्यांने वर्गात अनावश्यक इंग्रजी वा उर्दू शब्द बोलण्याचे टाळले, तर त्यास अतिरेकी म्हणून शिक्षकसुद्धा हसतांना वा एक प्रकारच्या कंटाळ्याने त्याकडे बघतांना आढळून येतात ! आद्याक्षरांतच हाक मारणे वा लिहिणे, तसेच ‘स.म. काळे’, ‘वि.ग. जोशी’, असे प्रयोग नाही का करता येणार ? परंतु शेळपट परधार्जिणेपणा हाच ज्या तेजोहीन पिढीत उदारपणा म्हणून पूजिला जातो आणि योग्य स्वाभिमानही अनुदारपणासारखा भासतो, त्या पिढीत आपली नावे आपल्याच आद्याक्षरांत लिहू वा संबोधू इतकादेखील बाणेदारपणा कुठून सापडणार ! कोण्या इंग्लिशाने कधी आपले ‘जॉन स्टुअर्ट मिल’, हे नाव ‘जॉ.स्टु. मिल’, असे लिहिलेले आढळते का ?’ – स्वा. सावरकर

 स्वा. सावरकर
स्वा. सावरकर

 

मराठी भाषिकांची सहिष्णुतेचा बुरखा घालणारी दुर्बलता

मराठीवरील हिंदीच्या आक्रमणाचे उत्तर भाषेत नव्हे, तर भाषिकांमध्ये शोधायला हवे. ‘तोंडपाटीलकी म्हणजे कर्तव्यपूर्ती’ आणि ‘दुर्बलतेवर सहिष्णुतेचा बुरखा घालणे म्हणजे सर्वसमावेशकता’, असे मानणार्‍या मराठी भाषिकांमुळेच मराठी भाषेसमोर अन्य भाषांच्या रूपाने संकट उभे आहे. मराठी भाषिकांचे हे दौर्बल्य म्हणजे काय हे घरात मराठी, तर रस्त्यावर आल्यानंतर हिंदी बोलणार्‍या मुंबईतील मराठी भाषिकांवरून सहज लक्षात येईल. सामान्यांना भाषिक अभिमानापेक्षा व्यवहाराची चिंता जास्त असते; म्हणून असे घडत असावे.’

 

मराठी संस्कृती शेवटचा श्वास घेत नाही ना ?

‘ललितादेवी या संस्कृतच्या शिक्षिका असून त्या गुरुदेवांच्या अनुग्रहित आहेत. त्यांच्या ६ वीच्या वर्गात शिकणार्‍या `कुमार’ या मुलाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेला प्रसंग आहे. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी शाळेतल्या बाईंनी विद्यार्थ्यांना कृष्णाष्टमीचा प्रसंग सांगितला. घरी आल्यावर आईने त्याला विचारले, “कुमार, शाळेत काय शिकलास ?’’ तो म्हणाला “बाईंनी कृष्णाची गोष्ट सांगितली.’’ आई म्हणाली, “मला सांग.’’ मुलगा सांगतो, “कृष्णजन्माच्या वेळी हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडत असतो. यमुनेला महापूर येतो. यमुना ओलांडून पलीकडच्या तिरावर असलेल्या गोकुळात वसुदेवाला जायचे असते. मग देव इंजिनिअरला सांगतो, `पक्का पूल बांध.’ इंजिनिअर त्वरित पक्का पूल बांधतो. वसुदेव टोपलीतून कृष्णाला त्या पुलावरून पलीकडे घेऊन जातो. कंसाला कळते. तो ताबडतोब आर्मी पाठवतो. देव बाँबर्सना सांगतात, “पूल पाडा.’’देवांचे बाँबर्स बंबार्डमेंट करतात आणि पूल पडतो. कंसाची आर्मी अलीकडच्या तीरावर अडकून पडते. कृष्ण सुरक्षित गोकुळात पोहोचतो.’’

 

आई मुलाला दरडावते, “बाईंनी अशी गोष्ट सांगितली ? खोटे बोलतोस ?’’ मुलगा म्हणतो, “बाईंनी तशी गोष्ट सांगितली नाही, हे खरे; पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृष्ण गोकुळात कसा येतो, हे जर मी तुला सांगितले, तर तुझा त्यावर मुळीच विश्वास बसणार नाही.’’

 

इंग्रजीचा पहा, कसा वचक आहे ! मराठीवर इंग्रजी आणि इंग्रजी जीवनरहाटी यांचा कसा प्रभाव आहे, पाहिलेत ना ? मराठी संस्कृती शेवटचा श्वास घेत नाही ना ?’

 

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – “मराठीवरील आक्रमणे (भाग १)“.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा’

Leave a Comment