सनातन संस्थेचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

पू. संदीप आळशी
पू. संदीप आळशी

 

 

१. पू. संदीप आळशी यांचा साधनापथावरील प्रवास

कुंभाराने मातीच्या गोळ्याला आकार दिल्याने त्याचे मडके सिद्ध होते. लोक मडक्याचे कौतुक करतात; पण कौतुकास खरे पात्र कोण ठरतो, तर कुंभार ! माझ्या साधनापथावरील प्रवासाचेही तसेच आहे. प.पू. डॉक्टरांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (अनुभूती देऊन) जे शिकवले आणि कृपेचा वर्षाव केला, त्यामुळेच माझ्या साधनेतील प्रवास संतपदापर्यंत घडला. कुंभाररूपातील प.पू. डॉक्टरांनीच या ‘मडक्याला’ (मला) घडवले; म्हणून याचे सर्व श्रेय प.पू. डॉक्टरांनाच आहे. म्हणूनच या लेखातही प.पू. डॉक्टरांची शिकवण किंवा महानता यांचाच अनुभव जागोजागी येईल. साधकांनीही ‘संदीपच्या ठिकाणी मी स्वतः आहे’, असा भाव ठेवून हा लेख वाचला, तर त्यांना प.पू. डॉक्टरांची शिकवण अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करता येईल.

 

१ अ. साधनेत येण्यापूर्वी केलेली देवाची उपासना

१. प्रतिदिन देवघरासमोर उभे राहून देवाला नमस्कार करत असे.

२. परीक्षा तोंडावर येत असे, तेव्हा वेगवेगळ्या देवळांमध्ये देवाच्या दर्शनाला जात असे.

३. माझे ज्येष्ठ बंधू श्री. संतोष आळशी त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या अध्यात्माच्या अभ्यासवर्गाला जात असत. प.पू. डॉक्टरांनी त्यांना वास्तूशुद्धीसाठी उपाय म्हणून घरात तुपाचे निरांजन फिरवायला सांगितले होते. मी ती कृती श्रद्धेने करत असे.

 

१ आ. साधनेला आरंभ

१९९२ चे वर्ष. बारावीच्या परीक्षेनंतर सुट्टी पडली होती. सुट्टीत आम्ही मित्रमंडळी प्रतिदिन क्रिकेट खेळायचो. एकदा काही दिवस क्रिकेट खेळण्यासाठी कोणीच नव्हते. माझ्या बंधूंनी मला ‘शीव सेवाकेंद्रात सेवेसाठी ये’, असे सांगितले. तेव्हा शीव सेवाकेंद्रात प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या मुंबई येथे होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवाची तयारी जोराने चालू होती. कुठेतरी वेळ घालवायचा म्हणून मी शीव सेवाकेंद्रात गेलो.

 

शीव सेवाकेंद्रात मोठ्या मोठ्या पदाची नोकरी असलेले साधक कचरा काढण्याची, लादी पुसण्याची कामे करतांना दिसले. ते पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. मलाही कोणीतरी लादी पुसण्याचे काम सांगितले. त्या वेळी माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही. सत्यवानदादा (आताचे पू. सत्यवानदादा), दिनेशदादा (श्री. दिनेश शिंदे), विष्णुदादा (श्री. विष्णु कदम) यांसारख्या साधकांनी मला दिलेले प्रेम आणि मला तेथील साध्या साध्या सेवांमधून मिळणारा एक प्रकारचा आनंद यांमुळे मी हळूहळू तेथे रमू लागलो. नंतर नंतर मी प्रतिदिन शीव सेवाकेंद्रात जाऊ लागलो. एक दिवस प.पू. डॉक्टरांनी मला कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले. अशा तर्‍हेने माझ्या साधनेला आरंभ झाला.

 

१ इ. प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा बसण्यास कारणीभूत झालेली घटना

बारावीच्या परीक्षेच्या आधी ‘मी बारावीनंतर कोणते क्षेत्र (करीयर) निवडणे माझ्यासाठी लाभदायक ठरेल’, हे प.पू. डॉक्टरांना विचारण्यासाठी माझे बंधू मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते. त्या काळी प.पू. डॉक्टर व्यावहारिक प्रश्नांची उत्तरेही देत असत. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी मला माझा निकालच सांगितला. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो नसल्यामुळे मला थोडे वाईट वाटले. परंतु मी या मतावर ठाम होतो, ‘प.पू. डॉक्टरांनी निकाल काहीही सांगितला असला, तरी मला निश्चित चांगलेच गुण मिळतील.’ पुढे प्रत्यक्ष जेव्हा निकाल लागला, तेव्हा तो तंतोतंत प.पू. डॉक्टरांनी सांगितला होता, तसाच होता. या गोष्टीमुळे माझी प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा बसली.

 

१ ई. प.पू. भक्तराज महाराज यांच्या (बाबांच्या) संदर्भातील काही अनुभव आणि अनुभूती

१. १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या मध्यप्रदेशातील मोरटक्का येथील आश्रमात होणार्‍या भंडार्‍याला जाण्याचा योग आला. भंडार्‍याच्या वेळी बाबांचे मार्गदर्शन चालू होते. त्या वेळी मला धूप जाळतात तेव्हा जसा सुगंध येतो, तसा सुगंध आला. मी बाबा बसलेल्या ठिकाणी आसपास फिरून ‘धूप, उदबत्ती इत्यादी लावलेली नाही ना’, हे पाहून आलो. तसे तेथे काहीही नव्हते. माझ्या पुढे बसलेल्या पू. सत्यवानदादांनाही मी याविषयी विचारले. त्यांनाही सुगंध येत होता. तेव्हा मला कळले की, ही आध्यात्मिक अनुभूती आहे. ही माझी साधनेतील पहिली आध्यात्मिक अनुभूती होती.

 

२. बाबा मुंबईला आले की, शीव आश्रमात बर्‍याचदा येत असत. त्यामुळे आम्हा साधकांना अनायासे त्यांचे दर्शन होत असे. एकदा बाबा शीव आश्रमात न उतरता दादरला त्यांचे एक भक्त श्री. कामत यांच्याकडे उतरले. प.पू. डॉक्टरांनी आम्हा साधकांना बाबांच्या दर्शनासाठी तेथे पाठवले. तेव्हा पत्ता सोबत असूनही आम्हाला जवळजवळ २ घंटे (तास) श्री. कामत यांचे घरच सापडले नाही. शेवटी सापडले. ‘गुरूंचे दर्शन होणे, ही सहज गोष्ट नाही. त्यासाठीही मोठे भाग्य लागते’, हेच जणू त्या प्रसंगातून बाबांनी आम्हाला शिकवले. शीव आश्रमात प.पू. डॉक्टरांमुळे आम्हाला बाबांचे दर्शन सहजगत्या होत असल्याने आम्हाला त्याचे मोल वाटत नव्हते. या प्रसंगानंतर गुरूंप्रती कृतज्ञता वाढायला साहाय्य झाले.

 

३. एकदा बाबा शीव आश्रमात भक्तमंडळींसह आले होते. मी भक्तांना चहा आणि फराळ देण्याची सेवा करत होतो. बाबा अचानक भक्तांना म्हणाले, ‘‘नुसती सेवा उपयोगाची नाही, तर नामही पाहिजे.’’ माझा नामजप त्या वेळी चालू नव्हता. या प्रसंगावरून बाबांची सर्वज्ञता कळली. यानंतर नामजप वाढवण्याविषयी माझे प्रयत्न वाढले.

 

४. एकदा आम्ही बाबांच्या भंडार्‍याला इंदूरला गेलो होतो. त्या वेळी भजनाच्या कार्यक्रमासाठी बाबा आले. बाबांनी प्रथम त्यांच्या गुरूंच्या छायाचित्राच्या ठिकाणी डोके ठेवून नमस्कार केला आणि मगच ते भजन म्हणण्यासाठी व्यासपिठावर गेले. बाबा ईश्वराशी एकरूप झालेले असतांनाही त्यांचा गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव किती उच्च होता, हे यातून शिकायला मिळाले.

 

१ उ. शीव सेवाकेंद्रात केलेल्या विविध सेवा

१. प.पू. डॉक्टर अध्यात्मप्रसारासाठी प्रवचने घेत असत. संस्थेचे प्रसारकार्यही वाढत होते. प्रसारासाठी कापडी फलक तयार करण्याची सेवा शीव सेवाकेंद्रात चालायची. त्या सेवेत मी साहाय्य करायचो.

 

२. स्वयंपाकघरातील भांडी पुसून कपाटात ठेवणे, बाहेरून सामान आणणे, पाहुण्यांना चहा-फराळ देणे इत्यादी मिळतील त्या सेवा करायचो.

 

३. १९९५ मध्ये ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ या ग्रंथाची निर्मिती चालू झाली. प.पू. डॉक्टर ग्रंथासाठी लेखन करायचे. काही साधक संगणकावर ते टंकलेखन करायचे. टंकलेखन योग्यरित्या झाले आहे कि नाही, हे पडताळण्याची सेवा मी तसेच अन्य काही साधक करायचो. अशा तर्‍हेने माझा ग्रंथांच्या सेवेचा शुभारंभ झाला.

 

१ उ १. प.पू. डॉक्टरांकडून ग्रंथांच्या मुद्रितशोधनाचे पहिले धडे
१ उ १ अ. सर्व सेवा स्वतः शिकवणे

ग्रंथांच्या मुद्रितशोधनाची सेवा करतांना व्याकरणाचे नियम कसे वापरावेत, व्याकरणाच्या खुणा कशा कराव्यात, विषयसूची करतांना दृष्टीकोन कसा ठेवावा इत्यादी सर्व लहानसहान सेवा प.पू. डॉक्टरांनी स्वतः जातीने शिकवल्या.

 

१ उ १ आ. साध्या साध्या प्रश्नांची न कंटाळता उत्तरे देणे

आरंभीच्या काळात सेवा नवीन असल्यामुळे मला खूप शंका असायच्या. ‘अमुक शब्दाच्या ठिकाणी अमुक शब्द वापरायचा का’, यासारख्या अगदी क्षुल्लक शंकाही असायच्या. असे असतांनाही माझ्या सर्व शंकांची उत्तरे ते न कंटाळता देत असत. कधी कधी सलग २०-२५ मिनिटे, इतका वेळही हे शंकानिरसन चाले.

 

१ उ १ इ. साधकाला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्याच्या साध्या साध्या गोष्टींचेही कौतुक करणे

एक प्रसंग आजही आठवतो. प.पू. डॉक्टरांच्या लिखाणामधील ‘निराकरण’ या शब्दाच्या ठिकाणी मी ‘निवारण’ हा शब्द सुचवला. याविषयी त्यांनी माझे कौतुक केले. ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या ग्रंथासाठी २-३ सूत्रे त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहिली. त्या वेळीही त्यांनी अनेक जणांकडे माझे कौतुक केले. त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनामुळे आणि प्रेमामुळेच मला ग्रंथांच्या सेवेत रस वाटू लागला आणि अधिकाधिक सेवा करण्याची उमेद निर्माण झाली.

 

१ उ १ ई. साधकांच्या सेवांचे नियोजन करण्यास शिकवणे

प.पू. डॉक्टरांनी पुढे पुढे ग्रंथांच्या सेवेसाठी येणार्‍या साधकांच्या सेवांचे नियोजन कसे करायचे, सेवेतील प्राधान्य कसे ठरवायचे आदी शिकवून त्याचे उत्तरदायित्वही हळूहळू दिले. सेवेसाठी येणार्‍या साधकांचा १ मिनिट वेळही वाया जाऊ न देणे, असा त्यांचा कटाक्ष असे.

 

१ उ २. शीव सेवाकेंद्रातील साधना

प.पू. डॉक्टरांनी केवळ ग्रंथसेवाच नव्हे, तर प्रत्येकच गोष्ट परिपूर्ण करण्यास शिकवली.

 

१ उ २ अ. ग्रंथसेवा

१. ग्रंथांचे मुद्रितशोधन करतांना “,”आणि”.”या चिन्हांच्याही चुका राहू नयेत, दोन शब्दांच्या मध्ये अतिरिक्त जागा (स्पेस) सुटू नये इत्यादींविषयी ते जागरूक असत.

२. एखाद्या शब्दाचे र्‍हस्व-दीर्घ कळत नसेल, तर ते स्वतः उठून शब्दकोशात तो शब्द पहायचे.

३. लिखाणात समास व्यवस्थित सोडला आहे ना, प्रत्येक परिच्छेदातील शब्द एका ओळीत आहेत ना यांसारखे संरचनेतील बारकावे कसे पहायचे, हे त्यांनीच आम्हाला शिकवले. प.पू. डॉक्टरांनी या गोष्टी न थकता आम्हाला वारंवार शिकवल्यामुळेच त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आहेत.

 

१ उ २ आ. इतर सेवा

याची वानगीदाखल काही उदाहरणे –

 

१. पलंगावर चादर अंथरल्यावर चादरीवर एकही सुरकुती रहाता कामा नये.

२. शीतकपाटात पाण्याची बाटली भरून ठेवतांना ती काठोकाठ भरून न ठेवता थोडी जागा रिकामी राहील, अशी भरून ठेवावी.

३. ‘स्टेपलरची पीन’ मारतांना वाकडी-तिकडी न मारता कागदाला समांतर अशी सरळ रेषेत मारावी.

४. एखादा लिफाफा / पाकीट उघडतांना नुसत्या हाताने न फाडता कातरीने व्यवस्थित कापून ते उघडावे.

५. केर काढतांना नेहमी आतून दरवाज्याच्या दिशेने काढत काढत यावे. यांसारख्या कितीतरी कृतींतून ‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती साधनाच होते’, हा कर्मसिद्धांतच प.पू. डॉक्टरांनी आम्हाला शिकवला.

 

१ उ २ इ. अतिथी देवो भव ।

१. आपल्याकडे आलेल्या अतिथीचे स्वागत आणि त्याचा योग्यरीत्या पाहुणचार करणे, हे आपले कर्तव्यच आहे, हे प.पू. डॉक्टरांनी आमच्या मनावर बिंबवले. ते आश्रमात आलेल्या पाहुण्यांना स्वतः चहा-फराळ देणे, त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था झाली आहे कि नाही, हे पहाणे इत्यादी करत असत.

 

२. एकदा आश्रमात आलेल्या एका साधकांचा चहा-फराळ झाल्यानंतर ते भांडी ठेवण्यासाठी जात असतांना त्यांच्या हातातून मी ती धुण्यासाठी घेत होतो. त्या वेळी त्या साधकांनी ‘नको, नको’ असे म्हणून स्वतःच ती भांडी धुतली. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी मला ‘आपण आग्रहपूर्वक त्यांच्या हातातून ती घ्यायला हवी होती’, असे सांगून मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली.

 

१ उ २ ई. सर्व प्रकारच्या सेवांचे शिक्षण

१. प.पू. भक्तराज महाराज (बाबा) केव्हा केव्हा आश्रमात येत असत. एकदा बाबा आश्रमात आले असतांना त्यांच्या कपड्यांना इस्त्री करायची होती. प.पू. डॉक्टरांनी त्या सेवेविषयी एका साधकाला सांगितल्यावर तो साधक म्हणाला, ‘‘मला इस्त्री करणे जमत नाही.’’ त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी ‘प्रत्येकाने प्रत्येकच सेवा शिकून घेणे, ही साधनाच आहे’, असा दृष्टीकोन दिला.

 

२. ‘गुरुपौर्णिमा स्मरणिका’ सिद्ध (तयार) करायची होती आणि मनुष्यबळ अल्प होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी ग्रंथांच्या मुद्रितशोधनाची सेवा करणार्‍या साधकांनाही संरचनेची सेवा शिकून घेऊन ती करण्यास सांगितले.

 

३. आश्रमासाठी सामान आणणे, पाहुण्यांना रेल्वेस्थानकावर सोडणे इत्यादी सेवा करता येण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना वाहन शिकण्यास सांगितले.

 

४. अध्यात्मप्रसारासाठी कापडी फलक कसे रंगवायचे, कापडी फलकांसाठी लाकडी चौकटी कशा बनवायच्या इत्यादीही शिकून घेण्यास सांगितले.

 

१ उ २ उ. ‘आश्रम’ घराप्रमाणे वाटायला हवा !

१. एकदा मी काही सेवेसाठी आश्रमातून थोड्या वेळासाठी बाहेर गेलो होतो. लगेचच परत येणार होतो; म्हणून मी कोणाला बाहेर जात असल्याविषयी सांगितले नव्हते. मी आश्रमात परतल्यानंतर प.पू. डॉक्टरांनी माझ्या या चुकीची मला जाणीव करून दिली, ‘‘घरी असतांना आपण सांगूनच बाहेर जातो ना ! आश्रम हेही आपले घरच आहे.’’

 

२. आश्रमात असतांना दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी कधी गुळ-धण्याचा प्रसाद मिळाला नाही किंवा होळीच्या दिवशी कधी पुरणपोळी खायला मिळाली नाही, असे कधीच झाले नाही. जवळजवळ प्रत्येक सण घरी जसे साजरे करतो, तसेच आश्रमात साजरे करायला मिळत असत.

 

१ उ २ ऊ. प्रेमभावाची शिकवण

१. मी महाविद्यालयात असतांना शीव आश्रमात जाऊन-येऊन सेवा करायचो. केव्हा केव्हा शीव आश्रमातच रहायचो. परीक्षेच्या काळात जेव्हा मी एका खोलीत बसून अभ्यास करायचो, तेव्हा माझा अभ्यासातील वेळ वाया जाऊ नये; म्हणून प.पू. डॉक्टर स्वतः माझ्यासाठी अल्पाहार आणि चहा घेऊन यायचे !

 

२. एकदा मला ताप आला होता. दोन दिवस मी आंघोळही केली नव्हती. मी झोपलो होतो, त्या खोलीची स्वच्छता करायची होती. त्या वेळी प.पू. डॉक्टर तेथे आले आणि मला म्हणाले, ‘‘तुला ताप आहे ना; मग तू माझ्या ‘पलंगा’वर झोप.’’

 

३. पुढे नोकरीला असतांना काही वेळा दुपारची पाळी असायची. रात्री साडेबारा वाजता आल्यानंतर जेवायचो. बर्‍याचदा मी आल्याचे कळल्यावर प.पू. डॉक्टर स्वतः उठून माझ्यासाठी जेवण गरम करत ठेवायचे !

 

४. काही वेळा तातडीने बाहेर जावे लागल्यास आणि काही खाल्लेले नसल्यास प.पू. डॉक्टर आठवणीने जाता जाता तोंडात टाकण्यासाठी एखादा लाडू किंवा कचोरी देत असत !

 

प.पू. डॉक्टरांनी भरभरून प्रेम दिले. त्यांच्या अशा प्रेमळपणाचा अनुभव अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांतून अनुभवता आला. ‘दुसर्‍यांवर निरपेक्ष प्रेम कसे करावे’, हे प.पू. डॉक्टरांनी कृतीतून शिकवले. प.पू. डॉक्टरांनी दिलेले प्रेम यांमुळेच खरेतर मी साधनेत टिकून राहू शकलो !

 

१ उ २ ए. प.पू. डॉक्टरांची साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ
१ उ २ ए १. साधकांच्या फलनिष्पत्तीचा विचार

आश्रमातील आम्हा प्रत्येक साधकाची सेवेतील फलनिष्पत्ती किती आहे, हे प.पू. डॉक्टर मध्ये मध्ये सांगत असत. फलनिष्पत्ती चांगली असेल, तर साधकांची लवकरप्रगती होते. यासाठी ज्यांची फलनिष्पत्ती अल्प असे त्यांना आणखी प्रयत्न कसे करायला हवेत, याचे दिशादर्शनही ते करत असत. यामुळे सेवेतील फलनिष्पत्ती अधिकाधिक वाढवण्यासाठी माझे प्रयत्न होऊ लागले.

 

१ उ २ ए २. साधकांना दुसर्‍यांकडून शिकण्यास सांगणे

आश्रमात बाहेरून येणार्‍या साधकांमध्ये कोणते गुण जाणवतात, साधकांच्या तोंडावळ्याकडे (चेहर्‍याकडे) पाहून काय जाणवते इत्यादींचा अभ्यास प.पू. डॉक्टर आम्हाला करण्यास सांगत. त्याद्वारे साधकांचे गुण अवलोकन करून ते आपण आपल्यात आत्मसात करायला हवेत, हे शिकवण्याचा त्यांचा उद्देश असायचा. याची उदाहरणे – श्री. वटकरकाका यांच्याकडून ‘सेवांचे नियोजन कसे करावे’, हे शिकण्यास सांगितले. सौ. सुमाताई (सौ. सुमा पुथलत) यांच्याकडून ‘भाव कसा वाढवावा’ हे शिकण्यास सांगितले.

 

१ उ २ ऐ. सूक्ष्मातील अभ्यास होण्यासाठी प्रयोग

‘अध्यात्म’ हे खरेतर सूक्ष्मातील शास्त्र आहे. आम्हा साधकांचा सूक्ष्मातील अभ्यास होण्यासाठी प.पू. डॉक्टर

मध्ये मध्ये आमच्याकडून सूक्ष्मातील प्रयोगही करवून घेत.

 

१ उ २ ओ. घराची ओढ हळूहळू घटण्यास आरंभ

आरंभीच्या काळात शीव सेवाकेंद्रात सेवेसाठी जायचो, तेव्हा काही वेळ सेवा केल्यानंतर पुन्हा घरी परत यायचो. पुढे पुढे अधूनमधून राहू लागलो. नंतर जास्त दिवस राहू लागलो. असे करता करता आपोआप घराची ओढ हळूहळू घटू लागली.

 

१ ऊ. प.पू. डॉक्टरांनी ग्रंथ-विभागातील सेवेचे भविष्य
आधीपासूनच ओळखणे, यातच त्यांचे द्रष्टेपण सिद्ध होते !

१ ऊ १. खिस्ताब्द १९९५

अ. खिस्ताब्द १९९५ मध्ये शीव आश्रमात ग्रंथ-निर्मितीच्या सेवेला आरंभ झाला. तेव्हापासून प.पू. डॉक्टर मला अधिकाधिक ग्रंथांचीच सेवा करण्यास सांगायचे. मी ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत होतो. इतर साधक वेगवेगळ्या सेवा शिकत होते आणि करतही होते. संगणकावर संरचनेची सेवा करायला मला आवडायचे. एकदा मी ती सेवा करत असलेले पाहून प.पू. डॉक्टरांनी मला माझी चूक दाखवून सांगितले, ‘‘तू ग्रंथांचे व्याकरण पडताळण्याचीच सेवा करायची.’’

 

आ. खिस्ताब्द १९९५ मध्ये बाबांचा अमृतमहोत्सव इंदूर येथे साजरा होणार होता. त्यासाठी प्रवेशद्वारावर डफलीच्या स्वरूपातील कमान उभारायची होती. त्या डफलीला विद्युत झगमगाट (रोषणाई) करण्याची सेवा एक साधक करत होते. या क्षेत्रात माझे शिक्षण चालू असल्याने मला ती सेवा करण्याची पुष्कळ इच्छा होती; म्हणून मी याविषयी प.पू. डॉक्टरांना विचारले. तेव्हाही ते म्हणाले, ‘‘मी स्वतः डॉक्टर असलो, तरी अध्यात्मात माझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे ? तू ग्रंथांचीच सेवा केली पाहिजेस.’’

 

हळूहळू माझ्या अन्य सेवा न्यून होत जाऊन केवळ ग्रंथांचीच सेवा शिल्लक राहिली. प.पू. डॉक्टरांना या सेवेच्या माध्यमातूनच माझी प्रगती करवून घ्यायची होती, याचा उलगडा मला आता झाला.

 

१ ऊ २. खिस्ताब्द १९९९

‘खिस्ताब्द १९९९ साली पू. संदीप आळशी यांनी ‘सनातनची पत्रकारिता’ या ग्रंथासाठी मनोगत सिद्ध केले होते. हे त्यांनी लिहिलेले पहिलेच मनोगत होते. ते प.पू. डॉक्टरांना आवडले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सत्संगात एकदा उद्गार काढले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांच्या गुरूंनी ‘तू कितोबोंके उपर किताबे लिखेगा’, असा आशीर्वाद दिला होता. तो आशीर्वाद प.पू. बाबांनी मला दिला. आता सहस्रो ग्रंथांचे लिखाण करायचे आहे. संदीपने माझी ही चिंता दूर केली. तोच आशीर्वाद आता मी संदीपकडे सुपूर्द करतो. या पुढच्या ग्रंथांचे लिखाण तोच करेल.’’

 

– सौ. अवनी आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

१ ए. गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सेवा आणि साधना

१ ए १. ग्रंथांशी संबंधित सेवा
१ ए १ अ. ग्रंथ-विभागाचे दायित्व घेणे
१ ए १ अ १. ग्रंथांच्या लिखाणाचे दायित्व

वर्ष १९९९ पर्यंत प.पू. डॉक्टरच ग्रंथांसाठीचे सर्व लिखाण करायचे. मी केवळ ते लिखाण पडताळण्याची सेवा प्रामुख्याने करायचो. हळूहळू प.पू. डॉक्टरांनी ग्रंथांसाठीचे लिखाण मलाच सिद्ध करायला शिकवले. मी करत असलेले लिखाण ते पडताळून त्यातील अगदी छोट्या छोट्या चुकाही दाखवत असत. त्यामुळे या सेवेतील बारकावे शिकता आले.

 

१ ए १ अ २. विभागाचे दायित्व

विभागाचे दायित्व घेतांना कार्याचे दायित्व आणि साधकांच्या फलनिष्पत्तीचे दायित्व, असे दुहेरी दायित्व घ्यावे लागे.

 

अ. कार्य नीट व्हावे यासाठी सेवांची प्राधान्यता ठरवणे, साधकांच्या सेवांचे नियोजन करणे, साधकांकडून सेवा करवून घेणे इत्यादी करावे लागे.

 

आ. साधकांची सेवेतील फलनिष्पत्ती वाढण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य वृद्धींगत करण्यावर भर देणे, त्यांना दायित्व घेऊन सेवा करण्यास शिकवणे, ध्येय ठेवून समयमर्यादेत सेवा पूर्ण करण्याची सवय लावणे, ‘सेवा परिपूर्ण व्हायला हवी’, हा संस्कार त्यांच्यावर रुजवणे, सेवांतील चुकांची जाणीव करून देऊन त्या पुन्हा होऊ नयेत यासाठीच्या उपाययोजना शिकवणे इत्यादी करायला लागे.

 

१ ए १ आ. सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे

प.पू. डॉक्टरांच्या नावे ग्रंथ प्रसिद्ध होतात. ‘ग्रंथात चुका राहिल्या, तर गुरूंच्या नावाला बट्टा लागेल’, हा विचार सतत मनात रहातो; म्हणून सेवेत चुका न होण्यासाठी सेवा एकाग्रतेने आणि परिपूर्ण होते.

 

१ ए १ इ. सेवेतील तळमळ वाढण्यासाठी प्रयत्न करणे

प.पू. डॉक्टर मध्ये मध्ये मला म्हणायचे, ‘‘पुढे ग्रंथांचे सर्व तुम्हालाच पहावे लागणार आहे.’’ प.पू. डॉक्टरांनी विश्वासाने हे दायित्व आपल्यावर सोपवले आहे, याची जाणीव सतत असते. म्हणून ‘त्यांना अपेक्षित असे गुरुकार्य व्हायला हवे’, या विचाराने सेवा तळमळीने होते. एखाद्या सेवेत चूक झाली, तर ‘त्या चुकीमुळे माझ्या साधनेचे नुकसान झाले’, यापेक्षा ‘प.पू. डॉक्टरांच्या विश्वासास मी पात्र ठरलो नाही’, याची जास्त खंत वाटते.

 

१ ए १ ई. प.पू. डॉक्टरांनी ग्रंथ अधिकाधिक सात्त्विक करण्याचा संस्कार करणे

१. अध्यात्माविषयीचे लिखाण मुळातच सात्त्विक असते. ग्रंथाचे संकलन आणि व्याकरण अचूक असले की, लिखाणातील सात्त्विकता घटत नाही; म्हणून प.पू. डॉक्टरांनी या दोन्ही गोष्टी परिपूर्ण करण्यास शिकवले.

 

२. ग्रंथ सात्त्विक होण्याच्या दृष्टीने आपला विचार कसा व्हायला हवा, हे ते सूक्ष्मातून प्रयोग करायला लावूनही शिकवत असतात.

 

अ. एकदा एक शब्द व्याकरणदृष्ट्या कसा लिहायचा, हे कळत नव्हते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी तो शब्द दोन प्रकारे लिहून त्यांच्याकडे सूक्ष्मातून पहाण्यास सांगितले. तेव्हा ज्या शब्दाकडे पाहिल्यावर जास्त चांगले वाटते, तो शब्द सात्त्विक आहे, हे कळले.

 

आ. ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्र सिद्ध (तयार) करतांना वेगवगळे रंग वापरले जातात. फिकट निळा, पिवळा, गुलाबी यांसारखे रंग सात्त्विक आहेत. हे रंग न वापरता सिद्ध केलेले चित्र आणि हे रंग वापरून सिद्ध केलेले चित्र यांच्याकडे सूक्ष्मातून पाहून काय वाटते, असे प्रयोग त्यांनी अनेकदा करवून घेतले आहेत.

 

थोडक्यात शब्द काय किंवा चित्र, त्यातील रंगसंगती काय, स्थुलातून चांगले दिसत असले, तरी त्यातून सात्त्विकता अधिक प्रक्षेपित होत आहे ना, हे प्रयोगाद्वारे ओळखण्याचा अभ्यास त्यांनी करवून घेतला. या योगे ग्रंथ अधिकाधिक सात्त्विक करण्याचा संस्कारच त्यांनी आमच्यावर केला.

 

१ ए १ उ. गुरूंच्या अव्यक्त संकल्पाने सर्व कार्य होते, याची आलेली अनुभूती

एकदा प.पू. डॉक्टरांनी मला ‘क्षत्रिय’ आणि ‘क्षात्रवीर साधक’ यांमधील भेदाची सूत्रे लिहिण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्यानंतर पुढच्याच मिनिटाला ८-१० सूत्रे आपोआप भराभर सुचली आणि ती सर्व बिनचूक होती. त्यामुळे याची अनुभूती आली की, ‘प.पू. डॉक्टरांच्या केवळ इच्छेनुसारच, अर्थात व्यक्त किंवा अव्यक्त संकल्पानुसारच सर्व कार्य होत आहे’. तसेच ‘यापुढे आपल्याकडून सर्व कार्य तेच करवून घेणार आहेत’, अशी श्रद्धाही निर्माण झाली. त्यामुळे ‘एखादी सेवा आपल्याला जमेल का’, ही चिंताही मिटली.

 

१ ए २. कला-विभागाचे दायित्व घेणे

हळूहळू प.पू. डॉक्टरांनी कला-विभागाकडे लक्ष देण्यास सांगितले. यामुळे ग्रंथांची सेवा प्रलंबित रहायची; म्हणून आरंभी मी थोड्या अनिच्छेनेच कला-विभागाकडे लक्ष देत होतो. परंतु पुढे असे लक्षात आले की, कला-विभागात बनणार्‍या प्रसारसाहित्यामुळे आपण अल्प कालावधीत सहस्रो लोकांमध्ये अध्यात्मप्रसार करू शकतो. ग्रंथांची मुखपृष्ठे चांगली झाली, तर ग्रंथांची विक्री अधिक होऊन त्या माध्यमातून शीघ्रगतीने प्रसार होतो. प.पू. डॉक्टर जे सांगतात ते किती योग्य असते, याची पुन्हा एकदा प्रचीती आली.

 

यानंतर हळूहळू कला-विभागातील साधकसंख्या वाढवणे, साधक कलेच्या क्षेत्रात प्रशिक्षित होण्यासाठी प्रयत्न करणे, विविध कार्यपद्धती घालणे, स्वतः संरचना आणि रंगसंगती यांचा अभ्यास करणे आदी गोष्टी केल्या.

 

१ ए ३. ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’, हा दृष्टीकोन आचरणात आणणे

पूर्वी स्वच्छतेच्या सेवेच्या बाबतीत मी खूप आळशी होतो, तसेच या सेवेला मी दुय्यम महत्त्व देत असे. स्वच्छतेच्या संदर्भातील प्राथमिक धडे मी माझी पत्नी सौ. अवनी हिच्याकडून घेतले. सुरुवातीला मी सौ. अवनीला बरे वाटावे आणि तिचा ताण कमी व्हावा म्हणून स्वच्छतेची सेवा करत असे. एकदा प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील खोल्यांमध्ये योग्य तर्‍हेने स्वच्छतेची सेवा होत आहे कि नाही, हे पहाण्याचे दायित्व काही साधकांना दिले. तेव्हा स्वच्छतेच्या सेवेचे महत्त्व मला खर्‍या अर्थाने कळले अन् त्या दृष्टीने मी मनापासून प्रयत्न करू लागलो. आता कितीही सेवांचा ताण असला, तरी साधना म्हणून मी या सेवेकडे पहातो. हळूहळू प्रत्येक गोष्टच नीटनेटकेपणाने करायचा प्रयत्न व्हायला लागला.

 

‘आपल्याकडून प्रत्येक गोष्टच ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’, अशी व्हायला हवी आणि अशी जर ती झाली, तर त्यातून साधना होते’, असा दृष्टीकोन प.पू. डॉक्टरांनी दिला होता. तो त्यांच्या कृपेनेच प्रत्यक्षात आचरणातही येऊ लागला. केवळ स्वच्छतेच्या सेवेच्या संदर्भातच नाही, तर कपड्यांच्या घड्या नीट घालून कपडे कपाटात व्यवस्थित ठेवणे, कामासाठी घेतलेली वस्तू काम झाल्यावर लगेच परत जागेवर ठेवणे अशा सर्वच गोष्टींमध्ये हा दृष्टीकोन आचरणात येऊ लागला.

 

१ ए ४. व्यापकत्व निर्माण होणे

ग्रंथांच्या संकलनाची सेवा करत असतांना मध्येच संस्थेसाठी प्रसारसाहित्य तयार करण्याची सेवा अचानक यायची. त्या वेळी ग्रंथसेवेत खंड पडायचा; म्हणून मन अस्वस्थ व्हायचे. या संदर्भात मी काही विचारलेले नसतांनाही २-३ वेळा प.पू. डॉक्टरांनी ‘पाहिले ना, आपल्या हातात काही नसते !’, असे सांगितले. त्यानंतर मी ठरवले, ‘ईश्वरेच्छा मानून जे समोर येईल ते करत जायचे. ‘दिसेल ते कर्तव्य’, या बाबांच्या वचनानुसार जगायचे.’ त्यानंतर सेवेमध्ये अधिक आनंद मिळू लागला आणि व्यापकत्व निर्माण व्हायला सुरुवात झाली, उदा. गुजराती, बंगाली यांसारख्या भाषांत ग्रंथांचे भाषांतर करणार्‍या साधकांना ‘तुम्हाला वेळ अल्प मिळत असल्याने तुमच्या ग्रंथांची संरचना आम्हीच करून देऊ’, असे त्यांना माझ्याकडून आपोआप सांगितले गेले.

 

१ ए ५. प्रेमभाव वाढवणे

एकदा घरी जाऊन आश्रमात परत आल्यानंतर प.पू. डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी ‘विभागातील साधकांसाठी काही खाऊ आणला नाही का ?’, असे विचारले. ही चूक लक्षात येऊन पुढे ‘साधकांप्रती प्रेमभाव वाढवायला हवा’, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

 

अ. घरून आश्रमात येतांना केवळ ग्रंथ विभागासाठी नव्हे, तर अन्य साधकांनाही आणि विभागांतील साधकांनाही खाऊ आणण्यास आरंभ केला.

आ. आपल्याला मिळालेला प्रसाद साधकांना देण्यास आरंभ केला.

इ. दूरच्या साधकांना खाऊ पाठवणे, माझी पत्नी आजारी असतांना तिची सर्वतोपरी काळजी घेणे यांसारखे प्रयत्नही केले.

 

१ ए ६. प.पू. डॉक्टरांनी साधकांना प्रोत्साहन देण्यास शिकवणे

एखाद्या साधकाने केलेली कलाकृती प.पू. डॉक्टरांना दाखवल्यावर चांगली झालेली ती कलाकृती पाहून प.पू. डॉक्टर माझ्याकडे पाहून म्हणायचे, ‘‘एवढी छान कलाकृती केली आहे. यासाठी साधकाला खाऊ दिला कि नाही ?’’ खाऊ देण्याच्या माध्यमातून साधकाला प्रोत्साहन देण्यास प.पू. डॉक्टरांनीच शिकवले.

 

१ ए ७. भाववृद्धीसाठी प्रयत्न
१ ए ७ अ. शरणागत भावाने प्रार्थना

१. प्रार्थना मनापासून केली, तरच तिच्याद्वारे भाव निर्माण होतो. प्रार्थना मनापासून होण्यासाठी मी असा प्रयत्न करतो –

श्रीकृष्णाचे चरण डोळ्यांसमोर आणून काही वेळ त्यांवर मन एकाग्र करून मग प्रार्थना करतो. प्रथम वाईट शक्तींचा त्रास नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करतो. त्यानंतर ‘जी काही सेवा लाभली आहे, ती प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी होण्यासाठी बुद्धी अन् शक्ती लाभू दे’, अशी प्रार्थना करतो.

 

२. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर ‘फक्त गुरुकृपेमुळेच ही प्रगती होऊ शकली’, हे प्रकर्षाने लक्षात आले. गुरूंचा भक्त होण्यातच जीवनाची सार्थकता आहे, असे वाटून तेव्हापासून गुरुचरणी भक्ती वाढण्यासाठी अधिक प्रार्थना होऊ लागली.

 

३. आधी केवळ स्वतःपुरतीच प्रार्थना होत असे. पुढे पुढे साधकांसाठी आणि नंतर हिंदु धर्माभिमान्यांसाठीही प्रार्थना होऊ लागली.

 

४. सध्या प्रतिदिन प.पू. डॉक्टरांवर ओढवलेले मृत्यूचे संकट, तसेच प.पू. डॉक्टरांवर आणि सनातनच्या साधकांवर ओढवलेले अटकेचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना होतात. तसेच समष्टीसाठी आवश्यक अन्य प्रार्थनाही होतात.

 

१ ए ७ आ. साधकांमध्ये प.पू. डॉक्टरांचे तत्त्व पहाण्याचा प्रयत्न

चराचरात ईश्वर आहे, याची अनुभूती येण्यासाठी साधकांमध्ये प.पू. डॉक्टरांचे तत्त्व पहाण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आपोआप साधकांविषयी मनात आदर, प्रेम आणि भाव निर्माण व्हायला साहाय्य झाले.

 

१ ऐ. आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप

५-६ वर्षांपासून मला मध्ये मध्ये बारीक ताप येत असे. (आता याचे प्रमाण थोडे घटले आहे.) तसेच अन्य शारीरिक व्याधीही वरचेवर होतच असत. याविषयी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘साधकांना वाईट शक्तींचा त्रास शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीन स्तरांवर होत असतो. तुला शारीरिक स्वरूपाचाच त्रास पुढेही होत राहील.’’ मला शारीरिक स्वरूपाचे त्रास अजूनही होतच आहेत.

 

१ ओ. काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. गुरुकार्य आपोआप होते, हीच साधनेतील महत्त्वाची अनुभूती आहे, असे मला वाटते. एखादी सेवा चालू केली की, त्या सेवेसंबंधाने विचार प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आपोआप सुचतात. बर्‍याचदा सकाळी झोपेतून उठलो की, ध्यानीमनी नसतांनाही आपोआप विचार सुचू लागतात.

 

२. २००८ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या कृपेने हातांच्या बोटांना अचानक सुगंध येऊ लागला. याची जाणीव प.पू. डॉक्टरांनीच करून दिली. जवळजवळ १ महिना हा सुगंध कमी-अधिक प्रमाणात येत असे.

 

१ औ. प.पू. डॉक्टरांनी सगुणाकडून निर्गुणाकडे नेणे

१ औ १. श्रद्धेचा ओघ बाबांकडून श्रीकृष्णाकडे वळवणे

अ. साधनेत आल्यानंतर २-३ वर्षे बाबांच्या दर्शनाची आणि सेवेची संधी लाभली. बाबांच्या संदर्भातच पहिली आध्यात्मिक अनुभूती आली. साहजिकच आरंभीपासून बाबांच्या चरणांप्रती श्रद्धा अधिक होती.

 

आ. पुढे हळूहळू प.पू. डॉक्टरांच्या चरणांप्रती श्रद्धा दृढ झाली. पुढील घटनासुद्धा याला कारणीभूत ठरली. बाबा शीव आश्रमात येत असत, त्या वेळी चंदन किंवा गुलाब यांचा सुगंध नेहमी येत असे. बाबांच्या निर्वाणानंतर १-२ वर्षांनंतरचा प्रसंग आहे. एकदा शीव आश्रमात प.पू. डॉक्टर सेवा करत होते. मी आणि अन्य एक साधक (श्री. गणेश नाईक) त्याच खोलीत सेवा करत होतो. आम्हा दोघांनाही बाबांच्या सहवासात नेहमी येणारा गुलाबाचा सुगंध १-२ मिनिटे भरभरून आला. गुरुतत्त्व एकच आहे, याची प्रचीतीच जणू देवाने दिली.

 

इ. पुढे प.पू. डॉक्टरांनी साधकांना सांगितले, ‘आता हळूहळू श्रीकृष्णाकडे जा.’ लहानपणापासून मला श्रीकृष्णापेक्षा श्रीविष्णु आवडायचा. प.पू. डॉक्टरांनी श्रीकृष्णाप्रती भक्ती वाढवण्यास सांगितल्यावर सर्वप्रथम माझ्या डोळ्यांसमोर श्रीविष्णूचेच रूप यायचे आणि त्यालाच प्रार्थना व्हायची. पुढे बाळकृष्णाचे रूप येऊ लागले. एकदा दुपारी मी विश्रांती घेत असतांना मला कोणीतरी हलवून उठवल्याचे स्पष्टपणे जाणवले. मी मागे वळून पाहिले, तर मला एकदम दिनदर्शिकेवर बाळकृष्णाचे चित्र दिसले. यामुळे बाळकृष्णावर श्रद्धा दृढ झाली. पुढे आपोआप श्रीकृष्णाचे रूप डोळ्यासमोर येऊ लागले. प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर जशी अनुभूती येते, तशीच अनुभूती श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर येऊ लागली. त्यामुळे श्रीकृष्णाप्रती श्रद्धा दृढ झाली.

 

ई. आता प.पू. डॉक्टरांचे चरण आणि श्रीकृष्णाचे चरण यांत भेद जाणवत नाही. प.पू. डॉक्टरांनीच माझ्या श्रद्धेचा ओघ हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडे वळवला.

 

१ औ २. स्थुलातील सेवेपेक्षा सूक्ष्मातील सेवेकडे नेणे

एकदा मी घरी जायला निघालो होतो. नेहमीप्रमाणे ‘घरी जाण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांना भेटायला जाऊन सेवेच्या संदर्भात सविस्तर चर्चा करावी’, असे या वेळी वाटत नव्हते. ‘प.पू. डॉक्टरांना स्थुलातून भेटायला हवे’, असे वाटतच नव्हते. शेवटी अगदी निघण्याच्या क्षणी ‘केवळ निघतो’, असे सांगण्यासाठी भेटायला गेलो. त्या वेळी त्यांनी घरी दादा-वहिनी यांच्यावर आध्यात्मिक उपाय करण्याची सेवा सांगितली. आध्यात्मिक उपाय ही एकप्रकारे सूक्ष्मातील सेवा आहे. प.पू. डॉक्टरांनी ग्रंथ आदी स्थुलातील सेवेपेक्षा सूक्ष्मातील सेवा सांगितल्याने ते एकप्रकारे मला ‘स्थुलातील सेवेपेक्षा सूक्ष्मातील सेवेकडे नेत आहेत, म्हणजेच एकप्रकारे स्वतःच्या देहात अडकवत नाहीत’, असे मला जाणवले.

 

१ अं. ६० टक्के पातळीनंतर आणि संत बनल्यानंतर अनुभवलेली मनाची स्थिती

१ अं १. ६० टक्के पातळीनंतर

अ. पूर्वी एखादा प्रतिकूल प्रसंग घडला की, त्याचा परिणाम म्हणून बराच काळ मनात त्याविषयीचे विचार येत रहात असत. आता विचार येतात; पण अगदी अल्प काळ टिकतात.

आ. पूर्वी ‘केवळ गुरुकार्य वाढावे’, एवढाच विचार मनात असायचा. आता गुरुकार्याबरोबरच साधकांची प्रगती व्हावी, हाही विचार मनात असतो.

इ. पूर्वी एखादी थोडी कठीण सेवा आली की, ‘आपल्याला ही जमेल ना’, असा मनावर ताण असायचा. आता एखादी थोडी कठीण सेवा आली की, ‘देवच सर्व करणार आहे’, ही खात्री असल्याने मनावर ताण येत नाही.

 

१ अं २. संत बनल्यानंतर

अ. आनंदात पूर्वीपेक्षा वाढ झाली.

आ. सेवेशी संबंधित विविध गोष्टी सुचण्यामध्ये पूर्वीपेक्षा वाढ झाली. ‘देवच आपल्यासाठी सर्व करत आहे’, याचीच ही अनुभूती आहे.

 

१ क. दोन शब्द साधकांसाठी…

शीव सेवाकेंद्रात असल्यापासून प.पू. डॉक्टरांनी आम्हाला कोणतीही कृती परिपूर्ण करण्याचे बाळकडू पाजले. त्यामुळे परिपूर्ण कृती करण्याचा संस्कार होऊन साधना करतांना सेवा परिपूर्ण होऊ लागली. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते, हेही तेवढेच खरे आहे. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात प्रगती होते.

 

परिपूर्ण सेवा केल्याने आपण एकदम अव्यक्त भावाच्या टप्प्याला जाऊ शकतो. आपल्यात व्यक्त भाव जरी असला, तरी अव्यक्त भाव निर्माण झाल्याविना ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून साधकांनी भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

 

– श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (आश्विन शुद्ध १२, कलियुग वर्ष ५११३ (७ नोव्हेंबर २०११)

 

 

२. आध्यात्मिक पातळीविषयीची विचारप्रक्रिया
आणि राष्ट्र-धर्म या विषयांवरील लिखाण सुचण्याची प्रक्रिय

२ अ. आध्यात्मिक पातळीविषयीची विचारप्रक्रिया

मी ग्रंथ-विभागात सेवा करतो. ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर पुढे पुढे मनाची विचारप्रक्रिया कशी पालटत गेली, याचे जाणवलेले टप्पे येथे दिले आहे.

 

२ अ १. टप्पा १ – कार्येच्छा (स्वेच्छा)

६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर ‘आपण लवकर संत बनावे; कारण संत बनल्यानंतरच प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे ग्रंथकार्य अधिक चांगले आणि सात्त्विक होईल’, असे वाटायचे.

 

या टप्प्यात स्वेच्छा होती, पातळीच्या संदर्भात विचार अधिक होता आणि आनंद नव्हता.

 

२ अ २. टप्पा २ – कर्तव्येच्छा (परेच्छा)

या टप्प्यात वाटायचे, ‘प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे ग्रंथकार्य चांगले आणि सात्त्विक होणे, हे विधीलिखित आहे अन् ते प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे होणारच आहे. त्यासाठी आपण इच्छा धरणे योग्य नाही. यापेक्षा प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा कर्तव्यभावाने करत रहाणे, हेच आपले जीवन-विचार असायला हवेत.’

 

या टप्प्यात एकप्रकारे परेच्छा होती, पातळीच्या संदर्भात विचार अल्प होते आणि आनंद अल्प होता.

 

२ अ ३. टप्पा ३ – धर्मेच्छा (ईश्वरेच्छा)

या टप्प्यात वाटायचे, ‘प.पू. डॉक्टरांना सर्वत्र हिंदुराष्ट्र (ईश्वरी राज्य) आणायचे आहे. हे महान ध्येय आहे. स्वतःच्या आध्यात्मिक पातळीच्या संदर्भात मनात विचार येणे क्षुद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संत, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी स्वातंत्र्यासाठी निरपेक्षपणे फार मोठे कार्य केले. या कार्याला तोड नाही. आज प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आपल्याला ‘साधना’ म्हणून राष्ट्र-धर्म कार्य करण्याची अनमोल संधी लाभली आहे. प.पू. डॉक्टरांच्या ‘हिंदुराष्ट्र स्थापण्याच्या कार्यात’ निरपेक्ष भावाने सतत कार्यरत रहाणे, हेच आपले जीवन-विचार असायला हवेत.’

 

या टप्प्यात एकप्रकारे ईश्वरेच्छा होती, पातळीच्या संदर्भात विचार जवळजवळ नव्हतेच आणि आनंद अधिक होता.

 

२ आ. राष्ट्र-धर्म या विषयांवरील लिखाण सुचण्याची प्रक्रिया

६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर प्रारंभी काही काळ साधनाविषयक लिखाणच सुचायचे. गेल्या वर्षभरापासून मध्ये मध्ये राष्ट्र-धर्म यांविषयीच लिखाण प्रामुख्याने सुचत आहे.

 

अ. ज्या विषयावर विचार उत्फूर्तपणे सुचतात, त्याच विषयावर लिखाण करतो; अन्यथा नाही.

आ. बर्‍याचदा स्नान, भोजन इत्यादी करतांना विचार सुचतात.

इ. अशा वेळी लगेच टंकलेखन करणे शक्य नसते. तसेच बर्‍याचदा सेवेच्या व्यस्ततेमुळेही ते लगेच टंकलेखन करणे शक्य नसते. त्यामुळे ते विचार कागदावर संक्षिप्तात लिहून ठेवतो.

ई. जसजसा वेळ मिळेल, तसतसा एकेक विचार सविस्तर टंकलेखन करतो.

उ. एके दिवशी सलग बसून सर्व विचार एकमेकांना जोडतो आणि लेख सिद्ध होतो.

ऊ. कधी टंकलेखन करण्याची ऊर्मी इतकी जास्त असते की, टंकलेखन झाल्यानंतरच मन शांत होते.

 

प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वरील विचारप्रक्रिया लिहिली. त्यांनी राष्ट्र-धर्म कार्य निरपेक्ष भावाने करवून घ्यावे, ही त्यांच्या चरणी प्रार्थना !

 

– श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (भाद्रपद कृ. ७, कलियुग वर्ष ५११३ (२० सप्टेंबर २०११)

 

 

३. संतपद प्राप्त झाले नाही; प.पू. डॉक्टरांनी संतपद दिले !

एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ‘सनातनमध्ये आलेला साधक संत होऊनच बाहेर पडेल !’ संतांची वचने संत आणि अवतारच सत्य करू शकतात ! प.पू. डॉक्टरांनी दिवाळीच्या शुभदिनी सनातनला, नव्हे समष्टीला पाच संतांची भेट दिली. या निमित्ताने प.पू. डॉक्टरांच्या चरणी ही अल्पशी कृतज्ञता…

 

३ अ. बाबांचा ‘आशीर्वाद’ आणि प.पू. डॉक्टरांची ‘कृपा’

साधनेत आल्यानंतर सौभाग्याने २-३ वर्षे प.पू. भक्तराज महाराजांचे (बाबांचे) दर्शन घडले. एकदा आम्ही त्यांच्या दर्शनासाठी इंदूरला गेलो होतो. तेथील महोत्सव आटोपल्यानंतर आम्ही काही साधक सहज फिरायला म्हणून बाहेर पडलो होतो. वाटेत बाबांची गाडी जातांना दिसली. आम्हाला पाहून बाबांनी गाडी थांबवली आणि आम्हाला दर्शन घेऊ दिले. त्या वेळी बाबांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. बाबांचा तो ‘आशीर्वाद’ आणि त्यानंतर प.पू. डॉक्टरांची आतापर्यंत झालेली ‘कृपा’, अशा ‘कृपाशीर्वादा’मुळेच साधनेत संतपदापर्यंतचा प्रवास घडला.

 

३ आ. शीव आश्रमातील प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रेम

साधनेत आल्यानंतर देवाच्या कृपेने ४-५ वर्षे शीव आश्रमात रहाण्याची संधी लाभली. या काळात प.पू. डॉक्टरांनी पुष्कळ शिकवले. केर कसा काढायचा, धुतलेली भांडी पुसून कपाटात कशी ठेवायची इथपासून ग्रंथाचे व्याकरण कसे पडताळायचे, संकलन कसे करायचे यांपर्यंत सर्व बारीकसारीक सेवा स्वतः जातीने शिकवल्या. ‘प्रत्येक कृती परिपूर्ण करणे म्हणजेच साधना’, हा संस्कार त्यांनीच आमच्यावर रुजवला.

 

प.पू. डॉक्टरांनी भरभरून प्रेम दिले. एकदा मला ताप आला होता. दोन दिवस मी आंघोळही केली नव्हती. मी झोपलो होतो, त्या खोलीची स्वच्छता करायची होती. त्या वेळी प.पू. डॉक्टर तेथे आले आणि मला म्हणाले, ‘‘तुला ताप आहे ना; मग तू माझ्या पलंगावर झोप.’’ त्यांच्या अशा प्रेमळपणाचा अनुभव अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांतून अनुभवता आला.

 

प.पू. डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेले प्रेम यांमुळेच खरे तर मी साधनेत टिकून राहू शकलो !

 

३ इ. प.पू. डॉक्टर, आम्हाला ‘नाममात्र’च ठेवा !

प.पू. डॉक्टर त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले, ‘सनातनचे साधक संत तर बनत होते; पण गती अल्प होती. यासाठी मी ईश्वराला प्रार्थना केली आणि या दिवाळीला ५ साधक संत बनले.’ प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व यातून सिद्ध होत नाही का ? साधक संतपदी पोहोचण्याचे श्रेय साधकांना नाही; प.पू. डॉक्टरांचा संकल्प आणि कृपा यांमुळे ते साध्य झाले. साधक केवळ ‘नाममात्र’च ठरतात. यासाठी शेवटी प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना हीच करतो, ‘आमच्या संतपदापर्यंतच्या वाटचालीत आम्ही केवळ ‘नाममात्र’च आहोत. आम्हाला सदैव ‘नाममात्र’च ठेवा !’

 

– श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (आश्विन शुद्ध २, कलियुग वर्ष ५११३ (२७ ऑक्टोबर २०११)

 

 

४. ‘संत बनलो’, हे कळल्यावर अनुभवास आलेल्या निवडक प्रतिक्रिया

४ अ. साधक नसलेले

४ अ १. आई

माझी पत्नी सौ. अवनी यांच्याशी बोलतांना आई म्हणाली, ‘‘आता संदीप कोणते कपडे घालणार ?’’ महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे आमचे घर आहे. गणेशपुरी हे तीर्थक्षेत्रच आहे. आतापर्यंत आईला ‘संत म्हणजे भगव्या किंवा पांढर्‍या कपड्यांत असलेले, माळधारी किंवा जटाधारी’, असेच पहाण्याची सवय आहे. त्यामुळे तिच्या मनात वरील विचार आला.

 

अध्यात्मात बाह्यवेशापेक्षा (भगवे कपडे, हातात जपमाळ आदी) अंतर्वेश (ईश्वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणातून ईश्वराशी सतत अनुसंधान आदी) महत्त्वाचा असतो, हे सध्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे बहुतेकांना ज्ञात नसते. किंबहुना भगवे कपडे, हातात जपमाळ आदी वेशभूषा असलेले संत असतीलच असेही नाही, हेही बहुतेकांना ज्ञात नसते !

 

४ अ २. वडील

वडील बोलतांना शेवटी मला म्हणाले, ‘‘मग आता येणार नाही का तू ?’’ सर्वसाधारणतः समाजातील लोकांचा समज ‘संत म्हणजे सर्वांपासून विरक्त, अल्प बोलणे, मोजक्या शिष्यांसहच रहाणे’, असा असतो. सनातन ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ शिकवते; म्हणून साधक संत जरी बनला, तरी तो पूर्वीसारखाच, म्हणजे ‘साधक’ म्हणूनच रहातो. त्याचे वागणे-बोलणे पूर्वीसारखेच, म्हणजे साधकासारखेच रहाते.

 

४ आ. साधक असलेले

४ आ १. पत्नी

सौ. अवनी हिच्या डोळ्यांतून भावाश्रू तरळून तिला आनंद झाला. नंतर ‘आपण पतीच्या आध्यात्मिक पातळीचा लाभ करून घेतला नाही’, या विचाराने तिला वाईटही वाटले. पुढील प्रकारे समजावल्यावर तिची खंत दूर झाली.

 

अ. सौ. अवनी हिला आध्यात्मिक त्रास आहे. ‘तिचा त्रास पूर्वीपेक्षा पुष्कळ अल्प झाला आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे. त्रास घटणे, हे आध्यात्मिक प्रगतीचेच लक्षण आहे. त्रास गेल्यानंतर प्रगती वेगाने होते.

आ. पूर्वीपेक्षा तिच्यातील दोष अल्प झाले आहेत, तसेच सेवेची तळमळ आणि व्यापकता वाढली आहे. कला-विभागातील साधकही असे सांगतात. हे प्रगतीचेच लक्षण आहे.

इ. ‘पतीचे अर्धे पुण्य पत्नीला मिळते’, या तत्त्वानुसार सौ. अवनी हिला आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला आहेच.

 

४ आ २. भाऊ

श्री. संतोष आळशी यांनाही आनंद झाला. कृतज्ञताभाव व्यक्त करतांना ‘आता आमचीही प्रगती लवकर करून घ्या’, असे ते म्हणाले. श्री. संतोष आळशी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही लहान भावाकडे ‘उन्नत’ या भावाने पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन पाहून त्यांच्या मनाचा मोठेपणा शिकायला मिळाला.

 

४ आ ३. सासू

सौ. वैशाली राजहंस यांना इतका आनंद झाला की, तो व्यक्त करण्याच्याही पलीकडे आहे, असे वाटत होते ! दुसर्‍यांच्या आनंदात किती तन्मयतेने समरस होता आले पाहिजे, हे शिकायला मिळाले.

 

४ इ. कृतज्ञता

श्री गुरुमाउलीच्या कृपेनेच आतापर्यंतची वाटचाल झाली, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी काही जणांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याविना रहावत नाही; म्हणून करतो –

 

४ इ १. श्री. संतोष आळशी (भाऊ)

यांनीच मला साधनेत आणले. यांनी मला सर्व प्रकारे साहाय्य केले. आरंभी आम्ही साधक बाबांच्या दर्शनासाठी इंदूर, कांदळी, गोवा अशा दूर दूरच्या ठिकाणी जात असू. त्या वेळी प्रवासखर्च आदींची सोय माझ्या बंधूंनी केली नसती, तर मी बाबांच्या दर्शनाला आणि सेवेला जाऊच शकलो नसतो. आरंभी माझ्या साधनेला आमच्या घरच्यांचा विरोध होता. त्या कठीण काळातही संतोषदादांनी माझी बाजू भक्कमपणे सांभाळली; म्हणून मी पुढे साधना करू शकलो.

 

४ इ २. शीव आश्रमातील साधक

आरंभीच्या काळात शीव आश्रमात रहातांना मला साधना, सेवा आदी सर्वच नवीन होते. आश्रमातील सत्यवानदादा (आताचे पू. सत्यवानदादा), दिनेशदादा (श्री. दिनेश शिंदे), विष्णुदादा (श्री. विष्णु कदम), प्रकाशदादा (श्री. प्रकाश शिंदे), तसेच अन्य साधक यांनीही मला प्रेमाने सांभाळले आणि वेळोवेळी साधना शिकवली; म्हणूनच मी साधना नीट करू शकलो. पू. सत्यवानदादा आणि दिनेशदादा यांनी तर मला लहान भावाप्रमाणे सांभाळले.

 

४ इ ३. सौ. अवनी आळशी (पत्नी)

हिने माझ्या कठीण काळात मला साधनेचे चांगले दृष्टीकोन दिले; म्हणून मी पुन्हा उत्साहाने साधना करू शकलो.

 

४ इ ४. आई-वडील

माझ्या साधनेला आरंभी असणारा आई-वडिलांचा विरोध पुढे पुढे मावळला आणि त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे साधना करू दिली. मी त्यांचाही ऋणी आहे.

 

४ इ ५. ग्रंथ-विभाग, कला-विभाग, स्वयंपाक-विभाग, तसेच अन्य विभाग यांतील साधक

यांनी सर्वांनीच मला प्रेमाने सांभाळून घेतले. सर्वांप्रती कृतज्ञ आहे.

 

– श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (आश्विन शुद्ध ७, कलियुग वर्ष ५११३ (२ नोव्हेंबर २०११)

 

 

५. कुटुंबीय आणि साधक यांनी कथन केलेली पू. संदीप आळशी यांची गुणवैशिष्ट्ये

५ अ. सौ. अवनी आळशी (पत्नी)

‘श्रीगुरुकृपेने मला या जन्मात पू. संदीप यांच्यासारखे पती लाभले. त्यांची पत्नी म्हणून मला त्यांचा २४ घंटे सत्संग लाभला. या काळात मी अनुभवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे. त्यांच्या आध्यात्मिक स्तराचा लाभ करून घेण्यात मी बहुतांशी न्यून पडले, याविषयी श्रीगुरूंनी मला क्षमा करावी आणि यापुढे त्यांच्या आध्यात्मिक सहवासाचा अधिकाधिक लाभ करून घेण्याची बुद्धी द्यावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना !

 

५ अ १. संतांची वैशिष्ट्ये आरंभीपासूनच असणे
५ अ १ अ. अंतर्मुख वृत्ती आणि सेवाभाव

श्री. संदीप आळशी यांना मी पहिल्यांदा, म्हणजे खिस्ताब्द १९९९ या वर्षी भेटले तेव्हापासूनच ‘ते इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत’, असे मला जाणवायचे. आम्ही पणजीतील दोनापावला येथील आश्रमात असतांना सर्व साधक-साधिका वयाने लहान होतो. त्या वेळी गप्पा-गोष्टी, गमती-जमती चालायच्या; मात्र श्री. संदीप यांना मी कधीही वायफळ गप्पा मारतांना किंवा वेळ वाया घालवतांना पाहिले नाही. आपण आणि आपली सेवा यातच ते गुंग असायचे. इतरांच्या बोलण्याने सेवेतील एकाग्रता उणावत असल्याने ते नेहमी एकांताची जागा शोधून ग्रंथांच्या मुद्रितशोधनाची सेवा करायचे. बोलतांना नेहमी नम्रपणे बोलायचे.

 

५ अ १ आ. पू. संदीप यांना माहेरच्या मंडळींनी ‘देवमाणूस’ संबोधणे

आमच्या लग्नाच्या वेळी माझ्या माहेरचे सर्व नातेवाईक श्री. संदीप यांना बघून खूप प्रभावित झाले होते. माझे मामा मला नेहमी म्हणतात, ‘‘तू भाग्यवान आहेस, तुला देवमाणूस मिळाला आहे.’’ खरेतर त्यांना साधनेविषयी, त्यांच्या पातळीविषयी तेव्हा आणि आताही काही ठाऊक नाही. माझ्या मामांना ते केवळ ३ वेळा आणि खूपच अल्प कालावधीसाठी भेटले आहेत.

 

५ अ १ इ. कुटुंबातील मंडळींशी मायेसंबंधी न बोलता साधनेविषयीच बोलणे

माझ्या सासरीही यांच्या काकू, बहिणी, भावंडे नेहमी म्हणतात, ‘‘हे लहानपणापासूनच शांत आहेत.’’ आमच्या नातेवाइकांमध्येही यांच्याविषयी सर्वांचेच मत चांगले आहे. सर्वांवर ते भरभरून प्रेम करतात. जेवढा वेळ त्यांना देतात, त्यात ‘त्यांचे भले व्हावे’, यासाठी त्यांना साधनेचे महत्त्व समजावून सांगतात.

 

घरचे बर्‍याचदा त्यांना सांगतात, ‘‘आई-वडिलांकडे रहा, मुंबईत घर घ्या.’’ तेव्हा ते ऐकून घेऊन नंतर तो विषयच ते साधनेकडे वळवतात.

 

५ अ १ ई. कुटुंबियांनी त्यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेणे

पू. संदीप यांचे ज्येष्ठ बंधू श्री. संतोषदादा (हे गुजरात राज्यात ‘पूर्ण वेळ धर्मप्रसारक’ म्हणून सेवा करतात.) आणि त्यांची पत्नी सौ. अपर्णावहिनी हे दोघे साधनेतील अडचणींसाठी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पू. संदीप यांचे मार्गदर्शन नियमित घेतात. त्यांच्या काकू त्यांना साधनेविषयी विचारतात.

 

५ अ २. प्रत्येक क्षणाला साधना करणे

पू. संदीप आळशी यांची साधना अखंड चालू असते.

 

५ अ २ अ. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती भावपूर्ण अन् हळूवारपणे करणे

त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक कृती करतांना ते भावपूर्ण प्रार्थना करतात. प्रत्येक कृती मग ती दात घासणे असो कि खोलीतील जळमटे काढणे असो, ते अगदी हळूवारपणे अन् परिपूर्णच करतात. जणु ते देवाची पूजाच करत आहेत. त्यांच्या या कृती पाहूनही भावजागृती होते. रात्री झोपतांना भावपूर्ण प्रार्थना करूनच ते झोपतात. तेव्हा त्यांचा तोंडवळा खूप प्रसन्न असतो.

 

५ अ २ आ. प्रवासातील साधनेचे पूर्वनियोजन करणे

गोव्याहून मुंबईला घरी जाण्यापूर्वी १०-१५ दिवस ते दैनिक वाचन न करता तो वेळ ते सेवेसाठी देतात. जातांना आगगाडीत वाचनासाठी वेळ मिळतो, तेव्हा दैनिकाचे सर्व अंक वाचून काढतात. एखाद्या सेवेविषयी चिंतन करायचे असल्यास ते कधी करायचे, याचेही नियोजन करतात. बसमध्ये बसायला जागा मिळत नाही, तर वाचता येत नाही; पण उभ्या उभ्या चिंतन करता येते, म्हणून तेव्हा ते चिंतन करतात.

 

५ अ २ इ. भोजनाच्या वेळी करावयाच्या कृतींचे नियोजन असणे

पू. संदीप आळशी कधीही भोजनकक्षात बसत नाहीत. ते स्वयंपाकघरात खाली मांडी घालून बसतात. भोजनकक्षात जेवतांना बर्‍याचदा सहसाधक एकमेकांशी अनावश्यक विषयांवर बोलत असल्याने तेथे वेळ वाया जातो. स्वयंपाकघरात जेवायला बसल्याने सेवेशी संबंधित नव्या-जुन्या साधकांशी सेवेतील अडचणींविषयी बोलता येते. कधी कोणी नसेल, तर एकांतात नामजप करत जेवता येते, असा त्यांचा भाव असतो.

 

५ अ २ ई. विरंगुळ्याच्या गोष्टीचा उपयोग साधनेसाठीच करणे

पू. संदीप आळशी यांना पूर्वी चित्रपट बघणे, वाचन करणे इत्यादी आवडायचे; परंतु गेल्या ४-५ वर्षांपासून ते केवळ साधना, राष्ट्र अन् धर्म यांविषयकच वाचन करतात किंवा घरी गेल्यावर त्याविषयीचे चित्रपट अन् कार्यक्रम बघतात. त्या गोष्टींतून ते सेवेच्या अनुषंगाने शिकतात, उदा. भाषा, मांडणी, चित्रीकरण कसे केले आहे, यातून कोणते गुण शिकायचे आहेत इत्यादी. शिकायला मिळालेल्या सूत्रांविषयीच्या टीपा काढून त्या ग्रंथासाठी ते लिहून ठेवतात. अशा प्रकारे या विरंगुळ्याच्या गोष्टीही ते साधना म्हणूनच करतात.

 

५ अ २ उ. नीटनेटकेपणा

हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच असते. पलंगावरील पलंगपोसला ते एकही सुरकुती ठेवत नाहीत, त्यांच्या संगणकाच्या पटलावरील सर्व साहित्य, कपडे नीटनेटकेपणाने ठेवलेले असते.

 

५ अ ३. आपल्यातील त्रुटी दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे

ते सतत इतरांचे निरीक्षण करून त्यांचे चांगले गुण स्वतःत आणण्याचा प्रयत्न करतात. एकदा दोन विभागांतील साधकांनी ‘आम्हाला संदीपदादांची भीती वाटते’, असे प.पू. डॉक्टरांना सांगितले होते. तेव्हा त्यांनी स्वतःत काय उणे आहे, याचे चिंतन केले. ‘आपल्या बोलण्यात प्रेमभाव हवा, आपण इतरांना समजून घ्यायला हवे’, हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच प्रेमभावासाठी प्रयत्न चालू केले.

 

५ अ ४. त्रास असणार्‍या साधकांना समजून घेणे

मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, त्यांना त्रासाविषयी काही ठाऊक नसल्याने त्यांना मला समजून घेता यायचे नाही. मी लवकर उठावे, अन्य साधकांप्रमाणे माझी सेवा व्हावी, असे त्यांना वाटायचे. मला थकवा आल्यामुळे मी झोपले असल्यास ते माझी विचारपूसही करायचे नाहीत. माझा त्रास वाढल्यावर मी प.पू. डॉक्टरांना उपाय विचारायला जायचे, तेव्हा ते मला पू. संदीप यांना विचारायला सांगायचे, माझी मानसिक स्थिती ठीक नसल्यास त्यांच्याशी बोलायला सांगायचे; मात्र एकदा ‘ते मला समजून घेत नाहीत’, असे मी प.पू. डॉक्टरांना सांगितले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्यांची चूक म्हणून त्यांना सांगायला सांगितले. त्यानंतर मला समजून घेण्याचा त्यांचा भाग वाढला. आता ते आश्रमातील त्रास असणार्‍या अन्य साधकांशीही पुष्कळ आपुलकीने वागतात.

 

५ अ ५. जे शिकायला मिळाले, ते आचरणात आणणे

ग्रंथ करतांना जे शिकायला मिळते, त्यानुसार ते लगेच आचरण करायला लागतात. ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथाचे संकलन करत असतांना त्यांनी त्यातील सूत्रांप्रमाणे भावजागृतीच्या प्रयत्नांना त्वरित आरंभ केला. अद्यापीही ते चिकाटीने प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे धार्मिक कृती, आचारधर्म या ग्रंथांतील शिकवण दैनंदिन जीवन आचरण्याचा प्रयत्न करतात.

 

५ अ ६. अलीकडच्या काळात पू. संदीप यांच्यात जाणवलेले पालट

अ. साधनेच्या आरंभी चुका करणार्‍यांचा राग येऊन त्यांना दुखावेल, असे त्यांच्याकडून बोलले जायचे. गेल्या २ वर्षांत त्यांनी प्रयत्नपूर्वक या दोषावर मात केली आहे.

 

आ. पू. संदीप यांच्याकडे प्रतिदिन वापरण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी केवळ दोनच विजारी (पँट्स) आहेत. गेल्या वर्षी ‘आपण तुम्हाला नव्या विजारी घेऊया’’, असे मी म्हटल्यावर ते म्हणाले, मी आता विजारीऐवजी पांढरे पायजमेच घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी या वर्षी दोन पांढरे पायजमेच विकत घेतले.’

 

५ आ. श्री. संतोष आळशी (पू. संदीप आळशी यांचे थोरले बंधू), वापी, गुजरात.

आपल्या लहान भावाकडे ‘अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती’ या दृष्टीने पहाणे कठीण असते. विशेषतः जेव्हा मोठ्या भावाने लहान भावाला अध्यात्मात आणलेले असते, तेव्हा तर ते जास्त कठीण होते; कारण तेव्हा सुरुवातीला मोठा भाऊच लहान भावाला अध्यात्म शिकवत असतो. असे असतांना श्री. संतोष आळशी यांनी लहान भाऊ पू. संदीपदादा यांच्या संदर्भात जे मनमोकळेपणाने लिहिले आहे, ते कौतुकास्पद आहे. अहं कमी असलेलाच असे लिहू शकतो.’ – डॉ. आठवले

 

५ आ १. बालपण
५ आ १ अ. समंजसपणा

‘मी आणि पू. संदीपदादा आमच्यामध्ये ७ वर्षांचे अंतर आहे. बालपणापासून त्यांचा स्वभाव समंजस आहे. मी लहानपणी त्यांना फिरायला आणि खेळायला घेऊन जायचो; परंतु त्यांनी कधीही हट्ट केला नाही. मी खेळायला जातांना ते माझ्या मागे येत असत. त्यांनी रस्त्यात कधीही गोंधळ केला नाही.

 

५ आ १ आ. दहीहंडी आणि गणपति बघायचा हट्ट धरणे

लहानपणी ते माझ्याजवळ दहीहंडी कशी फोडतात, गणपतिदर्शन आणि होळी पहाणे यांचा हट्ट धरायचे. तेव्हा मी त्यांना सर्व ठिकाणी घेऊन जात असे. मी त्यांना जवळजवळ ते १० वीत असेपर्यंत अशा ठिकाणी घेऊन जात असे.

 

५ आ १ इ. लहानपणी एका विवाहात हरवणे

लहानपणी आम्ही कल्याण येथे माझ्या आत्याच्या विवाहाला गेलो होतो. तेव्हा पू. संदीपदादा हरवले. मी त्यांना पुष्कळ शोधले, तरी ते सापडले नाहीत. त्या वेळी घरातील माझ्यावर ओरडायला लागले. नंतर ते एका नातेवाईकांच्या घरात शांतपणे बसलेले मला दिसले. एरव्ही हरवलेली मुले रडतात, तसे ते रडत नव्हते.

 

५ आ २. शालेय जीवन

शालेय जीवनामध्ये त्यांचा खण, पुस्तके इत्यादी अत्यंत सुव्यवस्थित असे. आरंभीला त्यांना शाळेत नेणे आणि घरी आणणे, असे करावे लागायचे. तेव्हाही ते शांतपणे जायचे आणि यायचे. त्यांनी शाळेत जातांना कधीही खाऊसाठी पैसे मागितले नाहीत. त्या काळात ते मला त्यांच्यासह क्रिकेट, पत्ते आणि कॅरम खेळायला सांगायचे. मी सात वर्षांनी मोठा असल्याने जास्त वेळा मीच जिंकायचो; परंतु त्यांनी कधीही त्रागा केला नाही. ते सहज ‘हार’ स्वीकारत. आमच्यात भांडण झाल्यास मी मोठा असल्यामुळे त्यांना कधीतरी मारायचो; परंतु त्यांनी मला कधी उलट मारले नाही. ते नेहमी नम्र आणि समंजस असायचे.

 

५ आ ३. महाविद्यालयीन जीवन

ते महाविद्यालयीन जीवनात असतांना मी माझे महाविद्यालयीन शिक्षण आणि चाकरी यांमध्ये व्यस्त होतो; परंतु त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. स्वतःची कामे आणि अभ्यास ते स्वतःच पूर्ण करत असत. त्या वेळी त्यांनी कधीही नवीन कपडे, जीन्स, टी-शर्ट आणि खर्चायला पैसे हवेत, असे हट्ट केले नाहीत.

 

५ आ ४. पुष्कळ रुग्णाईत असतांना स्वतःहून रुग्णालयात भरती होणे आणि त्या वेळीही भावाचा विचार करणे

मुंबईला घरी पू. संदीपदादा, आई आणि मी रहात असू. (आईला मुंबई शहराची फारशी माहिती नव्हती.) एकदा १९९२-९३ या वर्षी गोरेगावला मंदिरात प्रवचन ठरवले होते. तेव्हा मी गोदरेज आस्थापनामध्ये कामाला होतो. मला दुपारी ३ वाजता आस्थापनात पू. संदीपदादांचा दूरभाष आला की, ते तापामुळे पुष्कळ रुग्णाईत आहेत आणि बोरीवलीला रुग्णालयात दाखल होत आहेत. मी त्यांना म्हणालो, ‘‘४ वाजता मला कामावरून थेट मंदिरात जावे लागणार आहे; कारण प्रवचन आधीच ठरले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू मंदिरात जा. माझी काळजी करू नकोस.’’ तेव्हा मी आस्थापनातून थेट मंदिरात गेलो. त्यानंतर मी प.पू. डॉक्टरांना माझी अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी दुसर्‍या साधकाला तातडीने तिथे पाठवले. साधारण सायं. ७.३० – ८ वाजता मी मंदिरातून निघून पू. संदीपदादांना भेटायला रात्री ९ वा. रुग्णालयात गेलो. तेव्हा त्यांनी त्या स्थितीतही मला विचारले, ‘‘प्रवचन कसे झाले ?’’ तेव्हा त्यांनी रुग्णाईत असतांनाही माझा विचार केला. त्यांची ती स्थिती पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू आले.

 

नंतर प.पू. डॉक्टरांनी माझे कौतुक केले की, भाऊ रुग्णाईत असतांना मी प्रवचनाला गेलो; परंतु खरे पहाता पू. संदीपदादांच्या अनुमतीने मी गेलो होतो. त्यात खरे कौतुक पू. संदीपदादांचेच होते. हे मी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी पू. संदीपदादांचेही कौतुक केले.

 

५ आ ५. प.पू. डॉक्टरांच्या सांगण्यावरून एका संतांकडे जाऊ लागणे

मी १९९२ या वर्षी प.पू. डॉक्टरांकडे शीव येथील आश्रमात जाऊ लागलो; परंतु शीव आश्रम घरापासून लांब होता. तसेच मी आस्थापनातूनच आश्रमात जात असल्याने पू. संदीपदादा आश्रमात येत नव्हते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी मालाड येथील स्थानिक संत श्री मलंगशहाबाबा यांच्याकडे कधी कधी जाण्यास सांगितले होते. त्यामुळे मी संदीपदादांना ‘‘ते घरापासून जवळ आहेत, तर त्यांच्याकडे कधी कधी जात जा’’, असे सांगितले. तेव्हा पू. संदीपदादांनी अध्यात्माची आवड असल्याने आणि श्री मलंगशहाबाबा संत आहेत; म्हणून त्यांच्याकडे नियमित जाण्यास आरंभ केला.

 

५ आ ६. १९९२ च्या गुरुपौर्णिमेपासून सेवेला आरंभ होणे

१९९२ या वर्षी मुंबई येथे गुरुपौर्णिमेला मी प्रथमच त्यांना सेवेला घेऊन गेलो. त्या दिवसापासून त्यांचा सेवेला आरंभ झाला. पू. संदीपदादा शीव सेवाकेंद्रात जायला लागल्यापासून थोड्याच दिवसांत ते नियमितपणे सेवा करू लागले.

 

५ आ ७. गुजराती ग्रंथांच्या मुद्रितशोधनाची सेवा करणे

शीव सेवाकेंद्रात मराठी ग्रंथांची सेवा चालू केल्यावर त्यांनी लगेचच गुजराती भाषा शिकायला आरंभ केला. त्यानंतर त्यांनी गुजराती ग्रंथांच्या सेवेत साहाय्य करण्यास आरंभ केला. त्यासाठी गुजराती दैनिकांचे वाचन, गुजराती शब्द आणि व्याकरण यांचा अभ्यास इत्यादी आम्ही सर्वांनी चालू केला. त्या काळात आम्ही गुजरात येथे स्थलांतरित झालो. तेथे ‘गुरुकृपायोग’ या गुजराती ग्रंथाची अंतिम पडताळणी करण्यासाठी ते दमणला २ – ३ दिवसांसाठी आले होते. त्या वेळी त्यांची सतत साहाय्य करण्याची वृत्ती असायची. पू. संदीपदादांची साधना जशी वाढायला लागली, तसा मला त्यांचा आधार वाटू लागला.

 

५ आ ८. वैयक्तिक कामे अल्प वेळेत करणे

त्यांच्या विवाहाच्या आधी ते मुंबईला चुलत-बहिणीच्या विवाहाला आले होते. तेव्हा त्यांनी लगेच विवाह-पत्रिका, विवाहासाठी लागणार्‍या कपड्यांची खरेदी इत्यादी सर्व एक दिवसात उरकून घेतले आणि सेवेसाठी ते गोव्याला परत गेले.

 

५ आ ९. वयाने लहान असूनही आधारस्तंभ वाटणे

अ. आमची प्रगती व्हावी, अशी आमच्यापेक्षा त्यांचीच जास्त तळमळ आहे.

आ. ते मला पेलवतील एवढेच आध्यात्मिक उपाय सांगतात. त्यांचे बोलणे ऐकतांना माझी निराशा दूर होते. त्यामुळे मनावरचा ताण दूर होऊन मला उत्साह येतो.

इ. चार वर्षांपूर्वी मला अपघात झाला होता. त्या वेळीही त्यांनी मला उपाय सांगितले.

ई. पू. दादांनी प्रतिदिन दूरभाष करून आधार देऊन निराशेतून बाहेर काढणे आणि साधना करवून घेणे

 

तीन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील पहिल्या हिंदु धर्मजागृती सभेत माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या होत्या. त्या वेळेस माझ्या मनावर पुष्कळ ताण आला होता. तेव्हा त्यांनी मला आधार दिला. धर्मसभा झाल्यानंतर चुका आणि स्वभावदोष यांमुळे मला वाराणसी येथील शिबिरासाठी न येण्याची शिक्षा दिली होती. तेव्हा मी जास्तच निराशेत गेलो होतो. त्या वेळी गुजरात येथील प्रसाराची सेवा सोडून देऊन अन्य सेवा करण्याचे विचार माझ्या मनात येत होते. त्या वेळी पू. दादांनी जवळजवळ प्रतिदिन दूरभाष करून आधार देऊन मला निराशेतून बाहेर काढले आणि साधना करवून घेतली.

 

५ आ १०. आदर्श मुलगा

ते प्रत्येक रविवारी घरी आई-वडिलांना न चुकता दूरभाष करतात.

 

५ आ ११. ईश्वरी गुणांमुळे नातेवाईकांना आकर्षून घेणारे पू. संदीपदादा

आई-वडील आणि चार बहिणी यांच्या संदर्भातील व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो, तरीसुद्धा आई-वडील, चार बहिणी यांच्या मनात पू. संदीपदादा यांच्याविषयी आदर आहे. ते त्यांना जास्त विरोधात्मक बोलत नाहीत; मात्र मला ते व्यावहारिक स्तरावर हाताळतात. याचा अर्थ ‘शेवटी ईश्वरी गुणांमुळेच आपण सर्वांची मने जिंकू शकतो’, हे लक्षात आले.

 

प.पू. डॉक्टर, भगवान श्रीकृष्ण मला पू. संदीपदादांसारखा भाऊ दिल्याविषयी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. त्यांच्या संतत्वाचा जास्तीतजास्त लाभ मला करून घेता येऊ दे, ही आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

 

(कार्तिक पोर्णिमा, कलियुग वर्ष ५११३ (१०.११.२०११))

 

५ इ. सौ. सुप्रिया संतोष आळशी (पू. संदीप आळशी यांच्या मोठ्या वहिनी), वापी, गुजरात.

५ इ १. पू. संदीपदादा संत व्हायच्या आधी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

अ. ‘पू. संदीपदादा प्रथमपासून सर्वगुणसंपन्नच आहेत.

आ. ते नेहमी शांत दिसतात. त्यांना रागवतांना मी कधीच पाहिले नाही.

इ. ते सतत आनंदी असून ‘त्यांचे मन साधनेत आणि नामजपात रमलेले आहे’, असे जाणवायचे.

ई. त्यांच्यात अधिकच समजूतदारपणा आहे.

 

५ इ २. प्रेमभावाच्या संदर्भातील काही प्रसंग

अ. एकदा माझी मुलगी शाळेच्या सहलीला गेली होती. तिथे ती रुग्णाईत झाली. तेव्हा आम्ही पू. दादांना विचारले असता त्यांनी तिच्या छायाचित्राची दृष्ट काढण्याचा उपाय सांगितला आणि ती बरी झाली.

 

आ. गेल्या वर्षी मला वाईट शक्तींच्या त्रासामुळे मी काहीच हालचाल करू शकत नव्हते. तेव्हा श्वास घ्यायलाही कठीण झाले; म्हणून मला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्या वेळी पू. संदीपदादांनी लगेच प.पू. डॉक्टरांना विचारून उपाय सांगितले आणि मी बरी होईपर्यंत पाठपुरावा केला.

 

इ. ते वापी येथे आल्यावरही अगदी सहज वागतात. त्यांनी मी आणि अक्षया आमच्यावर उपाय केले. उपायांना इतर साधकांनाही बोलवले होते; पण कोणीच आले नाही, तरी ते अतिशय शांत होते.

 

ई. वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून साधनेतील अडचणी सोडवणे

वापी येथे आले असता ते आणि त्यांच्या पत्नीचे बाहेर खरेदीला जायचे ठरले होते. त्यांना दुसर्‍या दिवशी जायचे असल्यामुळे वेळ थोडा होता आणि माझ्या साधनेच्या संदर्भातील अडचणींविषयी बोलायचे राहिले होते. त्या वेळी त्यांनी बाहेर जायचे टाळून मला वेळ दिला आणि माझ्या मनातील अनेक प्रश्न दूर केले.

 

उ. प्रतिवर्षी ते गणेशपुरीला येतात, तेव्हा आवर्जून आम्हा दोघांना साधनेविषयी बोलण्यासाठी वेळ देतात. आमच्या अडचणी समजून घेतात. तसेच सहज करता येतील असे सोपे उपायही सांगतात.

 

ऊ. या वेळी ते गणेशपुरीला आले होते, तेव्हा त्यांनी आमच्यावर उपाय केले.

 

ए. साधनेसाठी प्रोत्साहन देणे

आमची प्रगती व्हावी, अशी आमच्यापेक्षा त्यांचीच जास्त तळमळ आहे; पण त्यांच्या बोलण्यात कधीही ‘असे केलेच पाहिजे’, असे नसते. न जमल्यामुळे ते रागवले, असेही कधीच झाले नाही. ते साधनेसाठी अतिशय प्रोत्साहन देतात आणि त्रास होत असेल, तर सतत धीरसुद्धा देतात.

 

ऐ. या वेळी आम्ही आमच्या मुलीला काय शारीरिक त्रास होतो, तोही सांगितला होता. तेव्हा त्यांनी आदरणीय डॉ. अप्पाकाकांना दूरभाष करून विचारायला सांगितले. दूरभाष क्रमांकही दिला. आम्ही घरी आल्यावर आमच्याकडून दूरभाष करायचे राहून गेले; पण दादांनी आम्हाला दूरभाष करून आमचा पाठपुरावा केला.

 

ओ. ते आम्हालाही आई-वडिलांना प्रत्येक आठवड्याला दूरभाष करण्यास सांगतात; पण आम्ही घरी दूरभाष करण्यात न्यून पडतो.

 

५ इ ३. पू. संदीपदादांचे अन्य काही गुण

अ. ते नेहमी परेच्छेने वागतात.

 

आ. त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांना दूरभाष करायला भीती वाटत नाही किंवा ताणही येत नाही. ते आमची स्थिती समजून घेतील, आमच्याकडून झालेल्या चुकांसाठी आम्हाला क्षमा करतील, अशी मनात निश्चिती असते.

 

इ. त्यांना कधीही दूरभाष केला, तर ते तत्परतेने आणि प्रेमाने बोलतात. तसेच वेळही देतात. ‘मी अधिक सेवेत आहे. मला वेळ नाही. नंतर बोलू’, असे ते कधीच म्हणत नाहीत. ते कधीच घाई-गडबडीत आणि ताणात असलेले दिसत नाहीत.

 

ई. त्यांच्या मोठ्या भावाची चूक झाली असेल, तर ते त्यांना स्पष्टपणे आणि अतिशय प्रेमाने सांगतात. एकदा गणेशपुरीला गेलो असतांना माझे पती घरच्यांसमोर मला रागवले. तेव्हा पू. दादांनी नंतर ही चूक माझ्या यजमानांना सांगितली.

 

उ. ते प्रार्थना अगदी तल्लीनतेने करतात. त्यांना प्रार्थना करतांना पाहून आमचा भाव जागृत होतो.

 

५ इ ४. पू. संदीपदादा संत झल्यानंतरचे काही प्रसंग
५ इ ४ अ. संत झाल्याच्या दिवशी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

ते संत झाल्याची वार्ता कळल्यावर मी संध्याकाळी त्यांना दूरभाष केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला दूरभाष करणारच होतो; पण तुम्ही दुपारी आराम करत असाल, असा विचार करून केला नाही.’’ तेव्हा ते अतिशय सहजतेने आणि बराच वेळ बोलले. ‘‘मला मधे मधे दूरभाष करत जा’’, असे त्यांनी सांगितले. ‘आपल्या सर्वांच्या साहाय्याने, सहकार्याने मी येथपर्यंत पोहोचलो’, असे म्हणून त्यांनी आम्हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा माझा भाव जागृत झाला. वाटले, ‘धन्य ते प.पू. डॉक्टरांचे शिष्य !’

प.पू. डॉक्टर, आम्हाला पू. संदीपदादांसारखे संत दिल्याविषयी आपल्या चरणकमली कोटी कोटी कृतज्ञता !’

(कार्तिक पौर्णिमा, कलियुग ५११३ (१०.११.२०११))

 

५ ई. श्री. चेतन राजहंस (पू. संदीपदादा यांचा मेहुणा)

‘पू. संदीपदादा यांच्या कुटुंबातील एक सदस्य (मेहुणा) आणि ग्रंथ अन् प्रसारसाहित्य (कला) विभागात सेवा करणारा साधक या नात्याने मला त्यांचा मोठा सहवास लाभला. त्यांच्या आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक अशा सहवासामुळे माझ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेला एक दिशा मिळाली. या काळात त्यांच्याकडून मला झालेला लाभ आणि शिकायला मिळालेली वेचक सूत्रे येथे देत आहे.

 

५ ई १. मला आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे
५ ई १ अ. माझ्यातील साधकत्वाचा विकास होण्यासाठी प्रयत्न करून घेणे

शिक्षण पूर्ण झाल्यावर आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलो, त्या वेळी माझ्यात साधकत्वाचा भाग अत्यल्प होता. त्या वेळी त्यांनी विविध प्रसंगात, कधी ताईच्या माध्यमातून, तर कधी स्वतःहून आपुलकीने त्याविषयी जाणीव करून दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे माझ्याकडून चांगला साधक होण्यासाठी प्रयत्न चालू झाले.

 

५ ई १ आ. साधनेविषयी गांभीर्य वाढवणे

आश्रमात रहाणारे मी, ताई (सौ. अवनी आळशी), माझी मधली बहीण, (सौ. नंदिनी चितळे), तिचे यजमान (श्री. नीलेश चितळे) आणि पू. संदीपदादा असे सर्व जण कधी कधी त्यांच्या खोलीत काही कौटुंबिक कारणास्तव एकत्र यायचो. त्या वेळी मायेतील काही गप्पागोष्टी आमच्यात व्हायच्या; पण त्या सर्व गप्पागोष्टींचा शेवट पू. संदीपदादा आमच्या साधनेविषयक प्रयत्नांविषयी जाणून घेऊनच करत. अशा प्रकारे आमची बहिर्मुख झालेली वृत्ती ते अंतर्मुख करत. अजूनही पू. संदीपदादांच्या खोलीतून बाहेर पडतांना साधनेविषयी गांभीर्य वाढवणारा विषय ते सहजपणे सांगतात.

 

५ ई १ इ. कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

आई आणि बाबा रामनाथी आश्रमात आल्यावर ते आम्हा सर्व कुटुंबियांचा एक दिवस आड रात्री सत्संग घेत. त्या वेळी ते ‘साधनेत आम्ही कुठे न्यून पडत आहोत’, याविषयी तळमळीने उपाय सांगत. आमचा स्वतःहून आढावा घेत. त्यांच्या या सत्संगांमुळे आम्हा सर्व कुटुंबियांना साधनेत मोठ्या प्रमाणात साहाय्य झाले.

 

त्यांना ईश्वरप्राप्तीचा जसा ध्यास लागला आहे, तसा आमची (कुटुंबियांची) प्रगती व्हावी, असाही ध्यास त्यांना लागला आहे, असे त्यांचा सत्संग ऐकतांना एकदा आतून वाटले.

 

५ ई २. पू. संदीपदादा यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !
५ ई २ अ. प्रत्येक कृती पद्धतशीरपणे करणे
५ ई २ अ १. एखादी सेवा संपली की, त्या सेवेत स्वतःच्या झालेल्या चुकांचा कागद ते लगेच फळ्यावर लावतात.

 

५ ई २ अ २. लहान-सहान कृती पद्धतशीर करणे

वर्षातून दोन वेळा ते घरी जातात. घरी जाण्या-येण्याचा दिनांक ते आधीच सुनिश्चित करतात. त्यानुसार दोन मासापूर्वीच ते प्रवासासाठी आरक्षण करतात. वेळेवर घरी जाण्याचे ठरवणे, त्यासाठी वेळेवर आरक्षणासाठी धावपळ करणे इत्यादी गोष्टी त्यांच्यासंदर्भात कधीही घडत नाहीत.

 

५ ई २ आ. प्रेमभाव

१. प.पू. डॉक्टरांकडून त्यांना मिळालेल्या खाऊतील थोडा भाग ते आम्हाला खोलीत गेल्यानंतर आवर्जून देतात.

२. प्रत्येक वेळी घरून येतांना काही ना काही लहानशी भेटवस्तू आमच्यासाठी घेऊन येतात.

३. मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, कोकणी आणि मालवणी या भाषा त्यांना बर्‍यापैकी बोलता येतात. साधकांशी जवळीक साधण्यासाठी त्या भाषेतील साधकांशी त्या त्या भाषेतून संवाद साधतात. त्यांच्या अडचणी त्यांच्या भाषेत समजून घेऊन त्यांच्या भाषेतच मार्गदर्शन करतात. त्यामुळे साधकांना ते जवळचे वाटतात.

 

५ ई २ इ. प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि कौशल्यपूर्ण करणे

ग्रंथांचे संकलन असो कि प्रसारसाहित्याचे संपादन, ते ती सेवा कुशलतेनेकरतात. एकदा कला विभागात सौ. जान्हवी शिंदे एका ग्रंथाचे मुखपृष्ठ संगणकावर बनवत असतांना मी तिला म्हटले, ‘‘तू केल्यानंतर देव (प.पू. डॉक्टर) ५ मिनिटांत अंतिम करत असेल ना !’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘त्या देवाकडे जाण्यापूर्वी ती संकल्पना अन् त्यावरील लिखाण यांविषयी लहान देवाकडे (संदीपदादांकडे) जावे लागते, तेथे गेल्यावर या दोन्ही गोष्टी त्याच्याकडून इतक्या व्यवस्थितपणे वेळ देऊन अन् भावपूर्णपणे पाहिल्या जातात की, नंतर मोठ्या देवाला त्याचा अधिक वेळ द्यावा लागत नाही.’’ तिच्या उत्तरातून पू. संदीपदादा यांनी केवळ लिखाणातीलच नव्हे, तर कलेतीलही नैपुण्य संपादन केले आहे, हे लक्षात आले.

 

५ ई ३. ग्रंथ आणि प्रसारसाहित्य (कला) विभागाचा पू. संदीपदादा हे घेत असलेला कार्याचा आढावा म्हणजे एक प्रकारचा सत्संगच असतो. त्यात साधनेचा दृष्टीकोन तर मिळतोच; पण आध्यात्मिक उपाय होऊन मन अन् बुद्धी यांवरील आवरणही नष्ट होते.

श्री गुरुकृपेमुळे पू. संदीपदादांचा अमूल्य सहवासरूपी सत्संग मला मिळाला आहे. या सहवासाचा उचित लाभ घेण्याची बुद्धी मला द्यावी, हीच श्रीगुरुचरणी प्रार्थना !’

 

५ उ. सौ. नंदिनी चितळे (पू. संदीपदादा यांची मेव्हणी)

५ उ १. प्रत्येक सेवेचा अतिशय बारकाईने विचार करणे

‘पू. दादांसह कला-विभागात एक पत्रक करण्याची संधी मिळाली. त्यात दादा त्यातील प्रत्येक पैलूचा, उदा. मथळा कसा असावा, त्यात चित्र कुठले असावे, विषयाचे प्रस्तुतीकरण कसे असावे, अशा अनेक सूत्रांचा अतिशय बारकाईने विचार करीत. हातात घेतलेली सेवा १०० टक्के परिपूर्ण आणि मनासारखी होईपर्यंत ते त्यात पालट करत रहातात. त्या वेळी त्यांची सेवेला अधिक वेळ देण्याचीही सिद्धता असते. सेवा पूर्ण होऊन ही त्यांच्या काही सुधारणा लक्षात आल्यास ते त्वरित कळवतात.

 

५ उ २. शिकण्याची वृत्ती

‘ते हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी विभागातील साधकांशी नियोजन, सेवेतील अडचणी इत्यादींविषयी त्या त्या साधकांच्या भाषेत बोलतात. एखाद्या वेळी त्या विभागातील साधक जरी मराठीत बोलू लागला, तरी पू. दादा मात्र मराठीत न बोलता त्या साधकाच्या मातृभाषेतच बोलतात, जेणेकरून त्यांचा त्या भाषेत बोलण्याचा सराव राहील.’

 

५ उ ३. साधक आणि कुटुंबीय यांच्याशी सारखेच वागणे

पू. संदीपदादांचे वागणे अतिशय सहज असल्याचे जाणवते. त्यांची आध्यात्मिक पातळी अधिक आहे आणि त्यांच्यात मुळातच साधकत्व आहे; पण ज्या वेळी ते आम्हा कुटुंबियांसह असतात अथवा विभागातील साधकांसह असतात, त्या वेळी त्यांचे अस्तित्व वेगळे आहे, असे जाणवत नाही. दोन्ही प्रसंगांत ते सर्वसामान्यांसारखेच असतात.

 

५ उ ४. इतरांना साधनेत साहाय्य करून आधार देणे

मी जेव्हा माझ्या अडचणी पू. संदीपदादांना सांगायला जात असे. त्या वेळी अनेकदा ते तातडीच्या सेवांमधे व्यस्त असायचे; म्हणून ते माझ्याशी बोलू शकत नसत; परंतु त्यांची ती सेवा संपली की, ते मला संपर्क करून ‘मला कधी वेळ आहे’, ते विचारून घेत.

 

त्यांच्याशी बोलतांना ते अडचण पूर्ण समजून घेत आणि अडचण सुटेपर्यंत साहाय्य करीत. त्यानंतर पुन्हा भेट झाल्यावर काढलेल्या उपाययोजनेत काही अडचण नाही ना किंवा आणखी काही शंका नाही ना, चांगले चालले आहे ना, असे विचारून घेत. त्यांना अडचण सांगितली आणि माझी अडचण सुटली नाही, असे कधी झालेच नाही. मला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.

 

५ उ ५. इतरांचा विचार करणे

एकदा काही कारणाने त्यांनी त्यांच्या खोलीतून विभागात दूरभाष केला. त्या वेळी त्यांना हवी असलेली माहिती काढून मी पुन्हा दूरभाष करून सांगते, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सौ. अवनी झोपली आहे; म्हणून तू दूरभाष करू नकोस. तिची झोप मोडेल. मीच थोड्या वेळाने पुन्हा करतो.’’

 

५ उ ६. प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

पूर्वी पू. संदीपदादांमध्ये प्रेमभाव होता; पण ते विरक्त वाटायचे. या वर्षभरात त्यांनी कृतीतून प्रेम व्यक्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे वाटते.

 

५ ऊ. श्री. मनोज नारायण कुवेलकर

५ ऊ १.शीव सेवाकेंद्रात रहायलाजाणे

‘मी शीव सेवाकेंद्रात रहायला गेलो, त्या वेळी पू. संदीपदादांशी ओळख झाली. तेव्हा सेवाकेंद्रात ग्रंथ-निर्मिती, कापडी फलक रंगवणे अशा बर्‍याच सेवा असायच्या.

 

५ ऊ २. ग्रंथांच्या मुद्रितशोधनाच्या सेवेसह इतरही सेवा करणे

पू. संदीपदादा महाविद्यालयात जाऊन सेवाकेंद्रात रहायला यायचे. ते ग्रंथांच्या मुद्रितशोधनाची सेवा करायचे. त्या व्यतिरिक्त इतर सेवाही करायचे. प.पू. डॉक्टरांच्या सभांच्या वेळी कापडी फलक रंगवणे आणि लावणे, तसेच मिळेल ती सेवा करायचे; परंतु प.पू. डॉक्टर त्यांना बाकीच्या सेवा जास्त करू देत नसत; कारण बरेच ग्रंथ सिद्ध करायचे होते.

 

५ ऊ ३. जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती

पू. दादांमध्ये जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती पुष्कळ होती. त्या वेळी त्यांच्यासमवेत आणखी दोघे साधक होते. ते तिघे मुद्रितशोधनाची सेवा करायचे. त्या वेळी एखादे वाक्य व्यवस्थित वाटत नसेल, तर ते सहसाधकाला विचारायचे. त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर ते प.पू. डॉक्टरांना विचारायचे. त्यांच्यात विचारण्याची वृत्तीही अधिक होती. आरंभी त्यांना मुद्रितशोधनाला जरा वेळ लागायचा; पण त्यांची सेवा परिपूर्ण असायची.

 

कधी कधी ते सुधारणा करण्यासाठी एखाद्या साधकाजवळ बसायचे आणि टंकलेखनातील छोट्या छोट्या चुका सांगायचे. त्यामुळे त्या वेळी शीव सेवाकेंद्रात सेवा करणार्‍या साधकांच्या टंकलेखनाच्या चुका आता अल्प होत आहेत.

 

५ ऊ ४. प.पू. भक्तराज महाराजांच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी ३ – ४ ग्रंथ बनवण्यासाठी पू. संदीपदादांनी दिवस-रात्र सेवा करणे

खिस्ताब्द १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराजांचा (प.पू. बाबांचा) अमृतमहोत्सव (पंचाहत्तरी) होता. त्या वेळी प.पू. बाबांचे ३ – ४ मासांत ३ – ४ ग्रंथ बनवायचे होते. वेळ अल्प असल्याने पू. संदीपदादा रात्रभर जागून मुद्रितशोधनाची सेवा करायचे. तसेच चाकरी करतांना आस्थापनामध्येही वेळ मिळेल, तसे मुद्रितशोधनाची सेवा करायचे. त्या वेळी ते रात्री जागून पुन्हा सकाळी उठून चाकरीला जायचे आणि तिथून आले की, सेवाकेंद्रात सेवा करायचे; पण त्यांच्या तोंडवळ्यावर कधी थकवा जाणवत नसे. ते सतत आनंदी असायचे. त्यांचा सतत विचार असायचा, ‘उद्या जे साधक सेवा करायला येतील त्यांना कोणत्या सेवा देऊ शकतो.’ त्यांचा सेवेचा अमूल्य वेळ वाया जाणार नाही, असे ते बघायचे.

 

५ ऊ ५. लहान वयातही दूरदर्शन न बघता सतत सेवा करणे

शीव सेवाकेंद्रात रहाणारे साधक कधी कधी दूरदर्शन बघायचे; पण पू. दादा कधीच किंवा सुटीच्या दिवशीही बघत नसत. ते सतत सेवा करत रहायचे.

 

५ ऊ ६. घरी जातांनाही सेवा घेऊन जाणे आणि ती पूर्ण करून आणणे

आपण घरी गेल्यावर आराम करतो; पण पू. दादा घरी जातांना सेवा घेऊन जायचे. तसेच ती पूर्ण करून आणायचे. मी एकदा गणेश चतुर्थीला त्यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी नातेवाईक आले, तरी ते त्यांच्याशी थोडेच आणि साधनेसंदर्भात बोलायचे. तसेच आपली सेवा करायचे. आराम अल्प करायचे.

 

५ ऊ ७. प.पू. डॉक्टरांनी पू. संदीपदादांना दिलेला आशीर्वाद

एकदा प.पू. डॉक्टरांनी एका सभेत पू. संदीपदादांचे अतिशय कौतुक करत सांगितले होते, ‘‘यापुढे आगामी ग्रंथ पू. संदीपदादा पूर्ण संकलित करतील.’’ तसे आता घडत आहे.

 

५ ए. श्री. संजय मुळ्ये – पू. संदीप आळशी म्हणजे ‘सनातनचा हिरा’ !

‘फेब्रुवारी २००८ मध्ये मी रामनाथी आश्रमात सेवेसाठी आलो. तेव्हापासून प्रामुख्याने ग्रंथ विभागात, क्वचित कला विभागात माझी सेवा चालू झाली. या दोन्ही विभागांचे अंतिम दायित्व पू. संदीपदादांवर आहे. त्यांच्याकडून मला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मिळतही आहेत. त्यांची काही गुण-वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

 

५ ए १. शंकांची उत्तरे देण्याचा कंटाळा नसणे

दिवसभर दोन्ही विभागांतील अनेक साधक त्यांना सेवेतील नाना प्रकारच्या शंका विचारतात. कलाविषयक किंवा एखाद्या ग्रंथाच्या संपादनातील किचकट शंकांची उत्तरेही ते न कंटाळता देतात. त्यांची उत्तरे वरवरची नव्हेत, तर अभ्यासपूर्ण असतात.

 

५ ए २. शब्दनशब्द काळजीपूर्वक वाचणे

ग्रंथात नव्याने केलेले चार ओळींचे लिखाणही त्यांना पडताळण्यासाठी सांगितले, तरी श्री. संदीपदादा ते लिखाण काळजीपूर्वक वाचतात. याविषयी ते म्हणतात, ‘‘ग्रंथातील चुका या केवळ मराठीतील ५ / १० सहस्रांच्या आवृत्तीत होत नाहीत, तर त्या अन्य भाषांतील प्रतीवर, संकेतस्थळावर आदी ठिकाणीही होतात अन् मग लाखो लोकांपर्यंत ते चुकीचे ज्ञान पोहोचते.’’

 

५ ए ३. नवीन सेवेची / विषयाची घडी घालून देण्यात अग्रभागी

एखादा नवीन विषय ग्रंथातून मांडायचा असल्यास ते स्वतः त्याचा कसून अभ्यास करतात.

 

अ. जुलै २०११ पासून ‘धर्मद्रोह्यांनी केलेली टीका आणि त्याचे खंडण’ असे नवीन प्रकरण सनातनच्या संबंधित ग्रंथाच्या शेवटी जोडायचे ठरले. त्या वेळी त्यांनी त्या प्रकरणासाठी चांगली प्रस्तावना आणि आकर्षक मांडणी (संरचना) करून दिली.

 

आ. जुलै २०११ पासून मुलांसाठी सनातनची ‘संस्कार मालिका’ ग्रंथरूपाने प्रसिद्ध करणे चालू झाले. त्या वेळीही त्यातील प्रत्येक ग्रंथ आकर्षक व्हावा, यासाठी त्यांनी पुष्कळ चिंतन केले. संस्कार मालिकेतील ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यावर एका साधकाने त्यांना ‘ग्रंथातील भाषा जड वाटते. मुले वाचतांना कंटाळतील’, असे कळवले. त्यावर पू. संदीपदादांनी पुष्कळ खपून, नवीन चित्रे घालून आणि सोप्या भाषेत त्या ग्रंथाचे पुनर्लेखन केले. प्रसिद्ध झालेल्या एखाद्या ग्रंथाची मांडणी नव्याने करणे म्हणजे बांधलेले घर कोसळवून पुन्हा नव्याने बांधकाम करण्यासारखे असते. त्यांनी ती सेवा सहजपणे पूर्ण केली आणि ‘मी मोठी सेवा केली,’ असे दुरान्वयेही दर्शवले नाही.

 

५ ए ४. साधकांच्या चुका सांगतांना भावनाप्रधान न होणे

विभागात सेवा करतांना चुकलेल्या लहान-मोठ्या साधकाला ते योग्य त्या शब्दांत जाणीव करून देतात. भावनेत न अडकता त्याची चूक सांगून ते त्या साधकाच्या साधनेतील अडथळे दूर करतात.

 

५ ए ५. साधकांच्या पुढील प्रगतीचा विचार करणे

प्रत्येक साधकाने नवीननवीन सेवा शिकावी, तसेच एक साधक करत असलेली विशिष्ट सेवाही अजून दुसर्‍या एखाद्या साधकाला करता यावी, यावर त्यांचा कटाक्ष असतो. नुसता कटाक्षच नाही, तर त्याप्रमाणे नियोजन करून देऊन त्याचा पाठपुरावाही ते करतात.

 

श्री सरस्वतीदेवीचा वरदहस्त असणार्‍या पू. संदीपदादांकडे नम्रपणा, व्यापकता, कर्तेपणा न घेता सेवा करणे असे अनेक गुण आहेत. आश्रमात सर्वांत जास्त फलनिष्पत्ती (आऊटपुट) त्यांची आहे. पू. संदीपदादा म्हणजे ‘सनातनचा हिरा’ आहेत. आश्रमात सेवेला आल्यापासून मला त्यांच्या सहवासामुळे / मार्गदर्शनामुळे साधनेच्या प्रवासात प्रचंड साहाय्य झाले आहे आणि होत आहे. याकरीता मी त्यांच्या अन् प.पू. डॉक्टर यांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहे.’

 

५ ऐ. श्री. रोहित साळुंके – पू. संदीप आळशी म्हणजे सनातनच्या संतरूपी मालिकेतील एक अनमोल रत्न !

‘साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मी शीव आश्रम, तसेच ठाणे येथे पू. संदीपदादांना अनेकद भेटल्याने त्यांना चांगला ओळखत होतो. रामनाथी येथे आल्यानंतर पूर्वीची ओळख असल्याने त्यांच्याशी अधिक परिचय होता. त्यामुळे जवळीक होऊन मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकायचो. २००७ साली मी ग्रंथ-विभागात सेवेला आल्यानंतर प.पू. डॉक्टरांशी झालेल्या प्रथम भेटीतच त्यांनी मला सांगितले, ‘‘संदीप परिपूर्ण आणि भावपूर्ण करतात. ते तुला साध्य करायचे आहे.’’ पू. संदीपदादांची मला जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

 

५ ऐ १. प्रत्येक कृती ईश्वरचरणी अर्पण करणे

एखादी कलाकृती बनवणे असो, बैठक असो, ग्रंथाचे लिखाण पडताळायचे असो वा गोळी किंवा खाऊ खायचा असो, प्रत्येक कृती पू. दादा ईश्वरचणी अर्पण करतात.

 

५ ऐ २. कृतज्ञताभावात असणे

अ. जेव्हा पू. दादांची पातळी ६० टक्के झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितले, तेव्हा पू. दादा म्हणाले, ‘‘मी जी ग्रंथांची सेवा करत आहे. त्यांतील चैतन्यामुळे हे होऊ शकले. यात माझे असे काहीच नाही.’’

आ. त्यांच्या अंगाला सुगंध येऊ लागल्यानंतर ते म्हणाले, ‘‘मला मी काय आहे, हे माहिती आहे. प.पू. डॉक्टर आहेत; म्हणूनच हे सर्व होत आहे.’’

 

अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाहीत. सर्व ईश्वरचरणी अर्पण करतात.

 

५ ऐ ३. परिपूर्ण होण्याचा ध्यास

प्रत्येक ग्रंथ वा कलाकृती झाल्यानंतर त्यात प.पू. डॉक्टरांनी सुचवलेले पालट मला का सुचले नाहीत, याचाही ते सखोल अभ्यास करतात. त्यांना याची फार खंत वाटते आणि त्या चुका फलकावर दोष आणि उपाययोजना यांसह लिहितात. यातून त्यांचा परिपूर्ण होण्याचा ध्यासही दिसून येतो.

 

५ ऐ ४. योगः कर्मसु कौशलम् ।

कोणतीही गोष्ट पू. दादांकडे गेली की, ती परिपूर्ण आणि गुरूंना अपेक्षित अशीच होऊन त्यांच्याकडून पुढे जाते. मग तो ग्रंथ असो, एखादी कलाकृती वा पत्रक असो किंवा एखादा विभाग वा साधक असो. संस्कृतमधील ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ या श्लोकानुसार त्यांची प्रत्येक कृती असते.

 

५ ऐ ५. वेळेचा योग्य विनियोग करणे

पू. दादा कधीही वेळेचा अपव्यय करतांना दिसले नाहीत. ते स्वतःच्या तसेच इतरांच्या वेळेच्या विषयी फार काटेकोरपणे वागतात. पू. दादांचा वेळ अनमोल असल्यानेच प.पू. डॉक्टरही पू. दादांचा वेळ वाचावा, यासाठी प्रयत्न करतात. रांगोळी ग्रंथाचे मनोगत प.पू. डॉक्टरांनी स्वतः लिहिले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘संदीप यांच्याकडे बरीच सेवा आहे. त्यांचा वेळ जायला नको; म्हणून मी स्वतःच मनोगत लिहिले.’’

 

५ ऐ ६. पू. दादांची शिकवण

अ. पू. दादांनी मला संकलन कसे करावे, तसेच ग्रंथांचे लिखाण आणि ग्रंथ व्यवस्थापन या सर्व गोष्टी शिकवल्या.

आ. माझ्या साधनेच्या आड येणारे दोष आणि अहंचे पैलू यांची त्यांनी वेळोवेळी जाणीव करून दिली आणि देत आहेत. तसेच ते टाळण्यासाठी काय करायला हवे, याचा आढावा घेऊन ते उपायोजनाही सांगतात.

इ. माझ्या प्रत्येक अडचणींविषयी मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला साहाय्य केले आहे आणि अजूनही करत आहेत.

ई. प्रत्यक्षात पू. संदीपदादांच्या चुका क्वचितच होतात. तरीही ते त्या फलकावर लावातात, यातून त्यांचा अहं किती अल्प असला पाहिजे, हे शिकायला मिळाले.

 

५ ऐ ७. साधकांच्या प्रगतीविषयीच आंतरिक तळमळ असल्याने समस्या मुळाशी जाऊन सोडवणे

पू. दादांची निरीक्षणक्षमता अफाट असून बोलणे अचूक, प्रेमळ आणि नम्रतेचे आहे. त्यांच्या बोलण्यात मार्दव आहे. त्यामुळे साधकांच्या समस्यावर आध्यात्मिक दृष्टीने उपाययोजना लगेचच मिळते आणि साधकही त्यामुळे पूर्णतः समाधानी असतो. प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी, याची त्यांना आंतरिक तळमळ असते. त्यामुळे त्याची समस्या सोडवतांना ते वरवरची उपाययोजना न करता मुळाशी जाऊन ती सोडवतात.

 

५ ऐ ८. पू. दादांशिवाय ग्रंथ यापुढे होऊ शकणार नसल्याचे प.पू. डॉक्टरांनी सूचित करणे

ऑक्टोबर २००८ मध्ये रांगोळी ग्रंथाची सेवा करतांना ती प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी होत नव्हती. तेव्हा त्यांनी त्या ग्रंथाची वाक्ये पू. संदीपदादांना पहायला सांगितली आणि म्हणाले, ‘‘शेवटी संदीपला पहायला लागलेच.’’ जणू यातून त्यांनी संदीपदादांविना कोणताही ग्रंथ यापुढे होऊ शकत नाही, हे सूचित केले.

 

५ ऐ ९. पू. दादांविषयी श्रीगुरूंचा विश्वास

एखादा मजकूर पू. संदीपदादांनी पाहिला असेल, तर ‘‘संदीप यांनी पाहिले आहे, म्हणजे मला पहायला नको’’, असे ते म्हणतात. गुरूंच्या मनात असा विश्वास निर्माण करणे, किंबहुना त्यांच्या या विश्वासास पात्र ठरणे, ही शिष्याच्या जीवनातील फार मोठी गोष्ट आहे.

 

५ ऐ १०. प.पू. डॉक्टरांनी पू. संदीपदादा यांच्याबद्दल विविध वर्षी काढलेले उद्गार

खिस्ताब्द २००८ : आता पुढे संदीप हेच ग्रंथांचे सर्व पहातील.

खिस्ताब्द २००९ : यापुढे प्रत्येक ग्रंथांवर संदीप यांचे नाव द्या.

खिस्ताब्द २०१० : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली होती. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना म्हणाले, ‘‘संदीपच सर्वकाही करतात आणि ग्रंथांवर माझे नाव देतात.’’

खिस्ताब्द २०११ (संत झाल्यानंतर) : आता माझ्या नावानंतर लगेचच पुढे संदीप यांचे नाव घाला. पुढे त्याचेच नाव असणार आहे.

 

श्रीगुरूंनी मला पू. दादांच्या रूपाने मार्गदर्शक, साधनेतील मित्र, मोठा भाऊ दिल्याने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच ‘पू. दादांचा प्रेमभाव, मनाचा निर्मळपणा, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवेचा ध्यास, अन्य गुण जलद गतीने माझ्या, तसेच आम्हा सर्वांच्या अंगी येवोत’, हीच श्रीगुरूंच्या, तसेच पू. दादांच्या चरणी प्रार्थना करतो.

 

५ ओ. कु. मेघा चव्हाण – ‘प.पू. डॉक्टरांचे प्रतीरूप’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या
संदीपदादांना प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य प.पू. डॉक्टरांमुळे प्राप्त झाले, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !

५ ओ १. गुरूंच्या मनात विश्वास निर्माण करणे

‘संदीपदादांचे कोणतेही लिखाण पडताळण्यासाठी आले असेल, तर प.पू. डॉक्टर ते खूप बारकाईने पहात नाहीत; कारण ते योग्य असल्याची त्यांना पूर्ण निश्चिती असते. गुरूंच्या मनात विश्वास कसा निर्माण करायचा, त्यांचे मन कसे जिंकायचे, याचा एक आदर्शच त्यांनी ठेवला आहे.

 

५ ओ २. कौशल्य आत्मसात करणे

एखादी कलाकृती दाखवल्यावर ज्याप्रमाणे प.पू. डॉक्टर त्यातील मजकूर, रचना, चित्र आणि त्याची रंगसंगती या सर्वांविषयीची सुधारणा सांगतात, त्याचप्रमाणे पू. संदीपदादांना कलाकृतीतील तांत्रिक ज्ञान नसूनही ते सर्वच दृष्टीने पालट सुचवतात. त्यांनी सुचवलेले पालट सर्वच दृष्टीने परिपूर्ण असतात.

 

५ ओ ३. त्यांच्यातील नम्रतेमुळे स्वतःही नम्र झाल्यासारखे वाटणे

कला विभागात आल्यापासून पू. संदीपदादांसारखे मागदर्शक आहेत, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटायची. ते बोलत असतांना त्यांच्यातील नम्रतेमुळे आपोआप स्वतःही नम्र झाल्यासारखे वाटते. त्यांचे वागणे-बोलणे सर्व प.पू. डॉक्टरांसारखे वाटते. त्यामुळे त्यांनी सांगितलेली सूत्रे, चुका यांविषयी कृतज्ञता वाटून आपोआप प्रयत्न होत असत.

 

५ ओ ४. चुका सांगतांनाही प्रेमच व्यक्त होणे

कधीकधी ते कठोरपणे चुका सांगत असतात, तरीही त्यांच्यातील प्रेमभाव, बोलण्यातील नम्रता, डोळ्यांतील निर्मळता आणि साधकाच्या प्रगतीविषयीची आंतरिक तळमळ यांमुळे त्यांचे प्रेमच अधिक जाणवते. त्यामुळे सांगितलेल्या चुकीविषयी अधिक खंत वाटून दादांविषयीचा आदर आणि कृतज्ञताभाव वाढतच जातो.

 

५ ओ ५. अहं अल्प असणे

त्यांनी फलकावर चुका लिहिण्याची खरेतर आवश्यकता नाही, असे वाटते; पण त्यांच्यातील अहं अल्प असल्यामुळे, तसेच ते स्वतःला सर्वसामान्यांप्रमाणे समजत असल्यामुळे ते नियमित त्यांच्या चुका फलकावर लावतात. प.पू. डॉक्टरांनी जसे स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवले, तसेच पू. संदीपदादाही आपल्या कृतीतून साधकांना शिकवतात.

 

किती लिहिले, किती कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. पू. दादांचे सर्व गुण आमच्यामध्ये येऊन लवकरात लवकर गुरूंना अपेक्षित अशी प्रगती व्हावी, हीच प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना !’

 

५ औ. इतर साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

५ औ १. सेवेतील एकाग्रता

‘वर्ष २००४ मध्ये पू. संदीपदादा (पू. संदीप आळशी) यांच्यासमवेत ज्या घरात आम्ही रहात होतो, तेथे वाईट शक्तींचा त्रास होता. ‘छतावर कोणीतरी धावत आहे, बाजूच्या बंद घरात कोणीतरी चालत आहे’, अशा प्रकारचे आवाज रात्री ऐकू येत. काही वेळा दिवसाही असे आवाज ऐकू येत असते; परंतु पू. दादा ग्रंथांचे संकलन करण्याची सेवा तेथेही एकाग्रतेने करत. त्या आवाजाचा परिणाम त्यांच्यावर होत नव्हता.’ – श्री. भानु पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५ औ २. कोणतीही सेवा करू शकणे

‘पू. दादा प्रथम ग्रंथांचे नवे-जुने करणे, त्यानंतर त्यांचे शुद्धलेखन पडताळणे, तसेच ग्रंथांचे संकलन करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या प्रारंभीच्या काळात त्यासंदर्भातील सेवा, दैनिकाच्या प्रारंभी त्यातील संपादकीय आणि बातम्या पडताळणे यांसारख्या सेवा केल्या. तसेच त्यांना एकदा लेख लिहिण्याची सेवा करण्यास सांगितल्यावर त्यांनी तीही सेवा चांगल्या प्रकारे केल्यावर प.पू. डॉक्टरांनी कौतुक करून म्हणाले, ‘‘संदीप कोणतीही सेवा करू शकतो ना !’’ हाच भाग कालांतराने त्यांनी कला विभागातील देवतांची चित्रे, ग्रंथांची मुखपृष्ठे, प्रसारसाहित्य इत्यादी बघण्यास प्रारंभ केल्यानंतर पुन्हा अनुभवण्यास आला.’ – श्री. भानु पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५ औ ३. दोष-निर्मूलनासाठी सतत सतर्क असणारे पू. दादा !

‘एकदा ती. अप्पाकाका (प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू) यांच्याशी पू. संदीपदादांसंबंधी बोलणे चालू असतांना ते म्हणाले, ‘‘तो सतत स्वतःच स्वतःची बैठक घेत असल्यामुळे त्याची अन्य कोणाला बैठक घ्यावी लागत नाही.’ याचीच एक चुणूक म्हणजे लवकरच ते संतपदाला पोहोचणार आहेत, हे ठाऊक असूनही ते त्यांच्या सेवेत झालेल्या चुका फलकावर लावत होते. त्यांचा व्याकरणाचा अभ्यास अतिशय चांगला आहे, तरी एखाद्या वेळी त्यांच्या लिखाणात झालेली एखाददुसरी चूक व्याकरणाचा अल्प अभ्यास असणार्‍या साधकाने दाखवली, तरी ते ती चूक फलकावर लिहितात.’ – श्री. भानु पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५ औ ४. वेळेचा पुरेपूर वापर करणे

‘पू. दादांना काही सूत्रे विचारायची असल्यास ते अगोदर विचारतात की, तातडीची आहेत कि आपण जेवतांना बोलू शकतो. सूत्रे तातडीची नसल्यास त्याविषयी पू. दादा जेवतांना बोलतात.’ – कु. रेश्मा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५ औ ५. अंतर्मुखता

‘पू. दादा सतत अंतर्मुख असतात. त्यांच्याकडे काही अडचणीविषयी विचारल्यावर ते त्या क्षणाला योग्य असेच उत्तर देतात.’ – कु. रेश्मा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५ औ ६. अत्यंत प्रेमभावाने बोलणे

‘पू. दादांच्या बोलण्यात एवढा प्रेमभाव आहे की, त्यांच्याशी बोलतच रहावेसे वाटते. ते आपल्या चुका प्रेमाने आणि सहजपणे सांगतात. त्यांच्याशी बोलतांना ‘मी प.पू. डॉक्टरांशीच बोलत आहे’, असे मला बर्‍याच वेळा वाटते.’ – सौ. देवी कपाडिया, रामनाथी आश्रम, गोवा.

 

५ औ ७. जिज्ञासा असणे

‘प.पू. डॉक्टरांना प्रत्येक गोष्टीविषयी जशी जिज्ञासा असते, तशी जिज्ञासा पू. संदीपदादांमध्येही आहे. ते केवळ त्यांची सेवा आणि विभाग असे संकुचित न रहाता आश्रम स्तरावर एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्यास संबंधित साधकांना भेटून ‘त्यात आणखी काय बारकावे आहेत’, हे जाणून घेतात.’ – कु. युवराज्ञी शिंदे

 

५ औ ८. इतरांचा विचार करणे

‘वेळेअभावी त्यांनी आपल्याला सांगितले की, मी नंतर तुमच्याशी बोलतो, तर ते त्यांच्या प्राधान्याच्या सेवा करतांनाही आठवणीने स्वतःहून आपल्याकडे येऊन त्या सूत्रासंबंधी आपल्याशी बोलतात. तसेच मार्गिकेतूनही येता-जाता प्रत्येक साधकाकडे पाहून स्मितहास्य (स्माईल) करतात.’ – कु. युवराज्ञी शिंदे

 

 

६. पू. संदीप आळशी यांच्याशी झालेला वार्तालाप !

‘६.११.२०११ या दिवशी भोजनकक्षात पू. संदीप आळशी यांच्यासमवेत भोजन करतांना त्यांच्याशी झालेल्या वार्तालापातून मला शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहे.

 

६ अ. संत झाल्यावर आनंदात वृद्धी होणे

मी : संदीपदादा, तुम्ही संत झाल्यापासून तुमच्याशी बोलायची फार इच्छा होती. देवाच्या कृपेने आज योग आला. तुम्ही संत झाल्यानंतर आध्यात्मिक स्तरावर काय झाले, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता लागलेली आहे. तुम्हाला माझ्या मनातील प्रश्न विचारले तर चालेल ना ?

पू. संदीपदादा : हो.

मी : संत झाल्यावर तुम्हाला कोणती अनुभूती आली ?

पू. संदीपदादा : आनंदात वृद्धी झाली.

 

६ अ १. ज्ञानात्मक विश्लेषण

जीवात्मा दशेतून शिवदशेत प्रवेश केल्यावर आनंदात वृद्धी होत असल्याने पू. संदीपदादा यांना जाणवणार्‍या आनंदात वृद्धी झाल्याचे ते अनुभवत आहेत.

 

६ आ. नामजप आतून चालू असणे आणि श्रीकृष्णाला समष्टीसाठी प्रार्थना होणे

मी : दिवसभरात तुमच्या मनात कोणते विचार असतात ?

पू. संदीपदादा : सेवेचे विचार असतात. तसेच नामजप आतून चालू असतो.

मी : श्रीकृष्णाचा नामजप चालू असतो का ?

पू. संदीपदादा : नाही; प.पू. डॉक्टर जो सर्व साधकांसाठी सांगतात, तोच नामजप चालू असतो. सध्या श्री अग्निदेवतेचा नामजप चालू आहे.

मी : दिवसभरात नामजप अधिक असतो कि प्रार्थना आणि त्या कोणत्या देवतेला होतात ?

पू. संदीपदादा : नामजपच सतत चालू असतो. प्रार्थना क्वचित होते. श्रीकृष्णाला ज्या प्रार्थना होतात, त्या समष्टीच्या संदर्भातील असतात.

 

६ आ १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ आ १ अ. नाम चित्तात गेल्यावर ते आपोआप चालू होणे आणि त्यामुळे चित्तातील नामाचा संस्कार अधिक दृढ होऊन नामाशी एकरूपता वाढू लागणे

नाम चित्तात गेल्यावर ते आपोआप चालू होते. त्यामुळे चित्तातील नामाचा संस्कार अधिक दृढ होऊन नामाशी एकरूपता वाढू लागते. या टप्प्याला कोणतेही कर्म करतांना नाम आतून आपोआप चालू असल्याची त्या जीवात्म्याला अनुभूती येत असते. पुढे जीवात्मादशेतून शिवदशेत गेल्यावर नामाशी पुष्कळ एकरूपता साध्य झाल्याने नामजप चालू असल्याची जाणीवही हळूहळू न्यून होऊन केवळ नामाचे अंतर्मनात अस्तित्व असल्याचे जाणवू लागते.

 

६ आ १ आ. पू. संदीप आळशी हे भगवंताच्या ‘व्यापकत्व’ या रूपाशी एकरूप होत असल्याने त्यांच्याकडून श्रीकृष्णाला समष्टीसाठी प्रार्थना होत असणे

अहं जसा न्यूनतम होऊ लागतो, तसे भगवंताच्या सूक्ष्मतम किंवा व्यापक अशा दोन्हींपैकी एका रूपाशी एकरूपता वाढू लागते. पू. संदीप आळशी यांचा अहं १० टक्के इतका न्यून असल्यामुळे ते भगवंताच्या ‘व्यापकत्व’ या रूपाशी एकरूप होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ईश्वराच्या ‘व्यापकत्व’ या गुणाचे सगुण रूप असलेल्या श्रीकृष्णाला समष्टीसाठी प्रार्थना होत आहेत.

 

६ इ. नातेवाईक किंवा कुटुंबीय यांच्या संदर्भात मनात विचार नसणे

मी : नातेवाईक किंवा कुटुंबीय यांच्या संदर्भात तुमच्या मनात विचार येतात का ?

पू. संदीपदादा : नाही.

मी : त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटते ?

पू. संदीपदादा : काही विशेष नाही. आम्ही आधी बोलायचो तसेच एकमेकांशी बोलतो. देवाच्या कृपेने ते सुखी असल्याने त्यांच्याविषयी माझ्या मनात विचार येत नाहीत.

 

६ इ १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ इ १ अ. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला आत्मज्ञानाला सुरूवात होत असल्याने जीवात्म्यावर असलेले सात्त्विक मायेचे आवरणही निघून जाऊ लागणे, त्यामुळे मायेच्या संपर्कात असूनही मायेचे विचार मनात प्रवेश करू न शकणे

पातळी वाढत जाते, तसे अध्यात्माचे ज्ञान होऊ लागल्याने मायेतील अज्ञान आणि ‘माया अशाश्वत आहे’, यांची जाणीव मनाला तीव्रतेने होऊ लागते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला आत्मज्ञान म्हणजे ‘मी आणि ब्रह्म एकच आहे. माझ्या ठायी मी नसून तोच एक भगवंत आहे’, याची सतत जाणीव होत असल्याने जीवात्म्यावर असलेले सात्त्विक मायेचे आवरणही निघून जाऊ लागते. त्यामुळे मायेच्या संपर्कात असूनही मायेचे विचार मनात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे संत मायेत राहूनही मायेत न अडकता मायेत असल्याप्रमाणे सहजतेने वागू शकतात.

 

६ ई. प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे ना की, हिंदुराष्ट्र येणार, तर ते १०० टक्के येणारच असणे

मी : दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पहिल्या पानावरील राष्ट्र-धर्म यांच्याशी संबंधित वाईट वार्ता वाचल्यावर तुमच्या मनात कोणते विचार येतात ?

पू. संदीपदादा : ही परिस्थिती पालटली पाहिजे आणि त्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न चालू आहेत.

मी : येणार्‍या आपत्काळाविषयी मनात कोणते विचार येतात ?

पू. संदीपदादा : प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे ना की, हिंदुराष्ट्र येणार, तर ते १०० टक्के येणारच. कितीही संकटे आली, तरी सर्व हिंदूंचे कल्याण होणारच आहे.

 

६ ई १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ ई १ अ. ७० टक्के पातळीला भावाचे रूपांतर दृढ श्रद्धेत होऊन गुरुवचनावर १०० टक्के श्रद्धा असल्याचे हे द्योतक असणे

६० टक्के पातळीला मनोलयाला आरंभ होतो, तर ७० टक्के पातळीला मनोलय पूर्ण झालेला असतो. मनच राहिले नसल्याने संतांच्या मनात संकल्प-विकल्प अर्थात शंका-कुशंका उरतच नाहीत. ७० टक्के पातळीला भावाचे रूपांतर दृढ श्रद्धेत होऊन गुरुवचनावर १०० टक्के श्रद्धा असल्याचे हे द्योतक आहे.

 

प.पू. डॉक्टर हे परात्पर गुरु असल्याने ‘७० टक्के पातळीचे संत’ हेच त्यांचे उत्तम शिष्य आहेत, हेसुद्धा यावरून ज्ञात होते.

 

६ उ. ‘सनातनवर बंदी येणार नाही आणि प.पू. डॉक्टरांना कुणीच अटक करू शकत नाही’, असेच वाटणे

मी : सनातनवरील बंदीविषयी मनात कोणते विचार येतात ?

पू. संदीपदादा : ‘सनातनवर बंदी येणार नाही’, असे विचार मनात असतात.

मी : प.पू. डॉक्टरांना आरक्षक अटक करणार, हे समजल्यावर काय वाटले ?

पू. संदीपदादा : हे शक्यच नाही, असंभव आहे. ‘प.पू. डॉक्टरांना कुणीच अटक करू शकत नाही’, असेच वाटते.

 

६ उ १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ उ १ अ. संतपदाला स्थळाच्या स्तरावर विचार न येता काळाच्या स्तरावरचेच विचार ग्रहण होऊन त्यानुसार आपोआप वागणे-बोलणे होत असल्याचे हे द्योतक असणे

सनातनवर बंदी येणार किंवा नाही आणि प.पू. डॉक्टरांना अटक होणार कि नाही, हे दोन्ही विचार सनातन संस्था अन् प.पू. डॉक्टर यांच्याशी स्थळाच्या स्तराशी निगडित विचार असल्याने त्याला होकारार्थी किंवा नकारार्थी असे दोन्ही पर्याय लागू होतात. काळाच्या स्तरावर केवळ मूळ सत्यच असल्याने त्याला पर्याय नसतात. संतपदाला पोहोचणे म्हणजे स्थळाच्या स्तरावरील कार्य संपून काळाच्या स्तरावर पोहोचून काळाच्या स्तराचे कार्य आरंभ होणे होय. त्यामुळे संतपदाला स्थळाच्या स्तरावर विचार न येता काळाच्या स्तरावरचेच विचार ग्रहण होऊन त्यानुसार आपोआप वागणे-बोलणे होत असल्याचे हे द्योतक आहे.

 

६ ऊ. ‘प.पू. डॉक्टर श्रीकृष्ण आहेत’, असे जाणवणे

मी : दिवसभरात प.पू. डॉक्टरांची आठवण येते का ?

पू. संदीपदादा : प्रत्येक ३ – ४ दिवसांनी त्यांना सेवेनिमित्त भेटणे होत असल्याने त्यांची आठवण येत नाही. आश्रमातून दूर गेल्यावर कधी कधी त्यांची आठवण येते.

मी : प.पू. डॉक्टर तुम्हाला सूक्ष्मातून कसे दिसतात ?

पू. संदीपदादा : आहेत तसेच दिसतात; परंतु ‘ते श्रीकृष्ण आहेत’, असे जाणवते.

 

६ ऊ १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ ऊ १ अ. ‘गुरु आणि देव एकच आहेत’, हे संत अनुभवत असणे

संतांचे त्यांच्या परात्पर गुरूंशी, म्हणजे गुरुतत्त्वाशी (निर्गुण तत्त्वाशी) अखंड अनुसंधान असल्यामुळे आणि त्यांचे अस्तित्व सतत सभोवती जाणवत असल्याने संतांना गुरूंच्या सगुण देहाची आठवण येत नाही. तसेच ‘गुरु आणि देव एकच आहेत’, हे प्राथमिक अवस्थेतील साधकाने ग्रंथात वाचलेले असते, तर संत म्हणजेच परात्पर गुरूंचे उत्तम शिष्य हे अनुभवत असतात.

 

६ ए. प.पू. डॉक्टरांना शरण गेलो आहे, याची केवळ जाणीव असणे

मी : दिवसभरात कोणता भाव असतो ? कृतज्ञताभाव, शरणागतभाव, सेवाभाव….

पू. संदीपदादा : शरणागतभाव

मी : शरणागतभावाचे स्वरूप कसे असते ? म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या चरणांवर सूक्ष्मातून डोके टेकवून नमस्कार करत आहे असा कि निराळा ?

पू. संदीपदादा : माझ्यात व्यक्त भाव नाही. प.पू. डॉक्टरांना शरण गेलो आहे, याची केवळ जाणीव असते.

 

६ ए १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ ए १ अ. ६५ टक्के पातळीनंतर व्यक्त भावाचे प्रमाण अल्प होऊन अव्यक्त भावाचे प्रमाण वाढत असल्याने भावजागृती न होता केवळ विचारांच्या रूपाने भावाची जाणीव होणे

६५ टक्के पातळीनंतर व्यक्त भावाचे प्रमाण अल्प होऊन अव्यक्त भावाचे प्रमाण वाढत असल्याने भावजागृती न होता केवळ विचारांच्या रूपाने भावाची जाणीव होत असते. ७५ टक्के पातळीनंतर अव्यक्त भावाचे प्रमाण वाढून त्याचे रूपांतर भक्तीत होऊ लागते. त्यामुळे पू. संदीप आळशी यांच्या अंतःकरणात असणारा भगवंताप्रतीचा अनन्य शरणागतभाव दृश्य स्वरूपात जागृत न रहाता तो अव्यक्त राहून जाणिवेच्या रूपाने जाणवला. काही मासांनी त्यांची पातळी ७५ टक्क्यांहून अधिक झाल्यावर शरणागतीची जाणीवही अल्प होऊन अव्यक्त शरणागतभावाचे रूपांतर दास्यभक्तीत होण्यास आरंभ होईल.

 

(आताचे त्यांच्या तोंडवळ्याचे छायाचित्र आणि ७५ टक्के पातळी झाल्यानंतरचे तोंडवळ्याचे छायाचित्र काढून ठेवल्यास अव्यक्त शरणागतभावातून दास्यभक्तीत रूपांतर झाल्याचा मुखावरील परिणामांतील भेदाचा अभ्यास करता येईल आणि संग्रही ठेवता येईल, असे वाटले. पू. अनुताई, पू. गाडगीळकाका, पू. बाबा नाईक आणि पू. कुवेलकरआजी यांच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे अव्यक्त- व्यक्त भाव असल्याने त्यांच्या संदर्भातही असे करू शकतो – कु. मधुरा भोसले)

 

६ ऐ. संत झाल्यापासून सर्वकाही आपोआप होत असणे
आणि ग्रंथ अन् कला विभागांतील सेवा करण्यासाठी जास्त विचार किंवा नियोजन करावे लागत नसणे

मी : संत झाल्यापासून काही निराळे अनुभवता येते का ?

पू. संदीपदादा : हो. सर्वकाही आपोआप होत आहे. ग्रंथ आणि कला विभागांतील सेवा करण्यासाठी जास्त विचार किंवा नियोजन करावे लागत नाही. देव सर्वकाही सर्वांच्या माध्यमातून आपोआप करत आहे, असे जाणवून आनंद होतो.

 

६ ऐ १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ ऐ १ अ. संतत्वामध्ये अस्तित्वाच्या स्तरावर कार्य होऊ लागणे आणि कर्मयोगानुसार संत झालेल्यांना ‘सर्वकाही आपोआप होते’, अशी जाणीव होत असणे

संतत्वामध्ये भगवंताच्या सगुण-निर्गुण तत्त्वाशी एकरूपता साध्य झाल्याने अस्तित्वाच्या स्तरावर कार्य होऊ लागते. भक्तीमार्गानुसार संत झाल्यास ‘मी’पणाचा लोप झाल्याने ‘मी करतो’, असे न वाटता ‘भगवंत करतो’, याचीच जाणीव चित्ताला होत असते. कर्मयोगानुसार संत झालेल्यांना ‘सर्वकाही आपोआप होते’, अशी जाणीव होत असते. त्याचीच अनुभूती पू. संदीप यांना येत आहे.

 

६ ओ. ध्यानयोग आणि कर्मयोग यांमुळे परिपूर्ण सेवा करणारे पू. संदीपदादा

सौ. अवनी संदीप आळशी यांनी सांगितले, ‘‘संदीप हे एकाग्रतेने सेवा करून ध्यानयोगानुसार साधना करतात, तर त्यांना सतत सेवा करायला आवडत असल्याने त्यांची कर्मयोगानुसार साधना होते. ध्यानयोग आणि कर्मयोग यांमुळे ते परिपूर्ण सेवा करू शकतात.’’

 

६ ओ १. ज्ञानात्मक विश्लेषण
६ ओ १ अ. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्यामुळे प.पू. डॉक्टरांचे पदोपदी मिळालेले अमूल्य मार्गदर्शन आणि गुरुकृपेचा अखंड ओघ यांमुळे ध्यानयोग अन् कर्मयोग यांचा समन्वय होऊन गुरुकृपेने जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपदापर्यंत पोहोचणे शक्य झाले असणे

ध्यानयोग आणि कर्मयोग यांनुसार साधना करतांना गुरूंच्या मार्गदर्शनानुसार ती साधना समष्टी कार्यासाठी पूरक झाल्याने या दोन्ही मार्गांचा सुवर्ण संगम साधून गुरुकृपेने जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपदापर्यंत पोहोचता आले. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केली नसती, तर या दोन्हींचा समतोल साधणे कठीण गेले असते आणि व्यष्टी साधनेच्या स्तरावरच राहिल्याने संतपद गाठण्यासाठी आणखी १० वर्षे लागली असती.

 

‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्यामुळे प.पू. डॉक्टरांचे पदोपदी मिळालेले अमूल्य मार्गदर्शन आणि गुरुकृपेचा अखंड ओघ यांमुळे ध्यानयोग अन् कर्मयोग यांचा आपसूक समन्वय होऊन त्यांचा समतोल साधला गेला आणि गुरूंच्या संकल्पामुळे तिन्ही योगांचा सुवर्ण संगम साधून समष्टी स्तरावर साधना झाल्याने जलद आध्यात्मिक उन्नती होऊन अल्प काळातच पू. संदीप यांना संतपद गाठता आले.

 

श्री. संदीप ते पू. संदीप या आनंदमय प्रवासात संदीप यांचा ३० टक्के, तर परात्पर गुरु प.पू. डॉ. आठवले यांचा ७० टक्के सहभाग आहे. उत्तम शिष्याला उत्तम गुरु लाभले, तर शिष्याचे सोने होते, हे भगवंताने संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर यांच्या उदाहरणातून उत्तम गुरु-शिष्याचे उदाहरण प्रस्तुत केले होते. आताही भगवंताने प.पू. डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप आळशी या उत्तम गुरु अन् शिष्य यांच्या माध्यमातून उत्तम गुरु-शिष्य परंपरा चालू असल्याचे उदाहरण साधकांसमोर घडवून आणले.’

 

 

– श्रीकृष्ण (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, कार्तिक कृ. तृतीया, कलियुग वर्ष ५११३ (१३.११.२०११, दु. ३.३०))

 

६ औ. कृतज्ञताभाव

ध्यान आणि कर्म या योगांद्वारे कलियुगात साधना करून लहान वयात संतपदाला पोहोचणे, हे कौतुकास्पद आहे. श्री. संदीपदादा यांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार ध्यानयोग आणि कर्मयोग यांमुळे संतपद गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण आपल्यासमोर मांडलेले आहे. ‘गेल्या जन्मीची साधना आणि केवळ प.पू. डॉक्टर अन् भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळेच संतपदापर्यंत पोहोचू शकलो. मी तसे काहीच प्रयत्न केले नाहीत’, असे पू. संदीपदादा यांनी स्वतःकडे श्रेय न घेता ते कृतज्ञतेने भगवंताच्या चरणी अर्पण केले.’

 

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

 

७. पू. संदीपदादांच्या संदर्भातील अनुभूती

७ अ. श्री. संदीपदादा संत होणार आहेत, याविषयी मिळालेल्या पूर्वसूचना

१. ‘मला अनेक वेळा श्री. संदीपदादांसमवेत महाप्रसाद ग्रहण करण्याची संधी मिळाली. दोन दिवसांपासून अशी संधी मिळाली असता ‘आता जेवतांना बोलायला नको, त्यांच्याकडून येणारे चैतन्य ग्रहण करूया’, असा विचार देवाने दिला.

 

२. माझ्यात साधकत्व नसल्याने माझ्या चुकांविषयी बैठक झाली. त्यानंतर श्री. संदीपदादांनी मला प्रयत्न वाढवण्यास सांगितले. त्या वेळी ‘तुमच्या कृपेने सर्व चांगले होईल’, असे म्हणण्याचा विचार माझ्या मनात आला.’

 

– श्री. मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११))

 

७ अ १. श्री. संदीपदादा बोलत असतांना मनातील विचार न्यून होऊन आतून आनंद जाणवणे आणि एकदा चिडचीड होत असतांना त्यांचे १ – २ शब्द ऐकल्यावर चिडचीड अन् प्रतिक्रिया येणे न्यून होणे

‘मागील ३ – ४ दिवसांपासून श्री. संदीपदादांना (श्री. संदीप आळशी यांना) पाहिल्यावर मला अधिक शांत वाटत होते. तसेच ‘त्यांची लवकरच प्रगती होऊन ते संत होणार’, असा विचार २ – ३ वेळा माझ्या मनात आला. एक दिवस जेवतांना ते माझ्याशी बोलत होते. त्या वेळी माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला आतून आनंद जाणवत होता. मी त्यांना पाहिल्यावरच माझे मन एकाग्र होत असे. एके दिवशी माझी पुष्कळ चिडचीड होत होती आणि मनातील प्रतिक्रियांचे प्रमाणही वाढले होते. त्या दिवशी जेवतांना श्री. संदीपदादा अन्य एका साधिकेशी ‘ताण न घेता सेवा कशी करायची’, याविषयी बोलत होते. मला त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकू आले नाही; मात्र त्यांचे केवळ १ – २ शब्द ऐकल्यावर माझी चिडचीड, प्रतिक्रिया येणे अचानक न्यून झाले.’ – श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११))

 

७ आ. इतर अनुभूती

७ आ १. पू. संदीपदादांशी बोलल्यावर मनाची स्थिती कितीही वाईट असली, तरी मनात सकारात्मक पालट होतो आणि मन शांत होते.’ – श्री. नीलेश चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

७ आ २. पू. संदीपदादांतील समष्टी तळमळीमुळे मांत्रिकाला त्रास होणे

‘पू. दादांच्या सान्निध्यात असतांना माझ्यावर आध्यात्मिक उपाय होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. एकदा पू. दादा मी सेवा करत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर लिखाण करीत होते. त्या वेळी माझ्यातील मांत्रिकाला त्रास होऊन त्याचे प्रकटीकरण झाले. त्या वेळी ते ‘समष्टीचा विचार करत आहेत’, असे जाणवले. त्यासंदर्भात पू. दादांना विचारल्यावर त्यांनी तसेच असल्याचे सांगितले. यावरून त्यांची समष्टीविषयीची तळमळ पुष्कळ असल्याचे लक्षात आले.’

 

७ आ ३. भावजागृती होणे

‘त्यांच्याकडे बघतांना माझा भाव जागृत होऊन डोळ्यांतून भावाश्रू येतात आणि देवाप्रती कृतज्ञता वाटते.’ – सौ. देवी कपाडिया, रामनाथी आश्रम, गोवा.

 

७ आ ४. ‘पू. दादा पूर्वीपेक्षा अधिक शांत (अबोल) झाले असले, तरी त्यांच्याशी बोलतांना मात्र पूर्वीपेक्षा अधिक आनंद जाणवतो.’ – सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

७ आ ५. पू. संदीपदादांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक पालट झाल्याचे जाणवणे आणि त्यांच्या सत्संगाने शांत वाटणे

‘पू. संदीपदादा संत होण्याच्या आदल्या दिवशी ते मी आजारी असल्याने येऊन भेटून गेले. त्या वेळी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यात पूर्वीपेक्षा अधिक पालट झाल्याचे जाणवले. त्यांच्या थोड्याच वेळाच्या सत्संगाने मनाला पुष्कळ शांत वाटले.’ – सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

७ आ ६. पू. संदीपदादा ध्यानमंदिरात आल्यावर मन शांत होऊन ईश्वराशी अनुसंधान साधले जाणे आणि ते गेल्यावरही ती स्थिती टिकून असणे

‘कार्तिक पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११३ (१०.११.२०११) या दिवशी सायंकाळी ७ वाजता मी ध्यानमंदिरात आत्मनिवेदन करत होतो. त्या वेळी पुढील अनुभूती आली. १० मिनिटे झाल्यावर पू. संदीपदादा ध्यानमंदिरात आले आणि देवासमोर बसले. त्यानंतर अचानक माझ्या मनातील गोंधळ शांत झाला आणि माझे ईश्वराशी अनुसंधान चांगले साधले जाऊ लागले. पू. संदीपदादा ध्यानमंदिरात असेपर्यंत आणि तेथून गेल्यावरही मनाची शांत स्थिती टिकून राहिली. ही अनुभूती दिली; म्हणून प.पू. डॉक्टर आणि प.पू. डॉक्टरांचे रूप असलेले पू. संदीपदादा यांच्या चरणी कृतज्ञ आहे !’ – श्री. अनित पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी गोवा.

 

७ आ ७. ‘पू. दादांशी बोलतांना मन निर्विचार होते आणि नामजप आपोआप चालू होतो.’ – कु. रेश्मा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

७ आ ८. पू. संदीपदादांचे नाव घेतल्यावर मन निर्विचार आणि शांत होणे

‘एखाद्या व्यक्तीचे जेव्हा आपण नाव घेतो, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीशी संबंधित गुण-दोष आठवतात अथवा त्याच्याशी संबंधित प्रसंग आठवतात; परंतु जेव्हा मी पू. संदीपदादांचे नाव घेते, त्या वेळी माझे मन निर्विचार आणि शांत होते.’ – सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (पू. संदीपदादा यांची मेव्हणी)