सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान !

पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करतांना सद्गुरु स्वाती खाडये

रत्नागिरी – व्यष्टी आणि समष्टी साधना परिपूर्ण करणार्‍या, तसेच सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) या सनातनच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिली. शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात १० ऑगस्ट २०२५ या दिवशी एका कार्यक्रमात साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी ही आनंदवार्ता दिली. यामुळे अनेक साधकांचा भाव जागृत झाला, तसेच अपेक्षित असे घडल्यामुळे साधक आनंदडोहात न्हाऊन निघाले.  या वेळी धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेला संदेश साधकांना वाचून दाखवला. या सोहळ्याला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी करंबेळकर कुटुंबीय आणि सनातनचे साधक उपस्थित होते. या कार्यक्रमात पू. (सौ.) करंबेळकर यांचा मुलगा श्री. अमोल आणि सून सौ. सुखदा हे दोघेही ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

या सोहळ्याच्या प्रारंभी सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. अंजली करंबेळकर यांची मुलाखत घेतली. त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून पू. (सौ.) करंबेळकर यांचा साधनाप्रवास उलगडला.

‘आज्ञापालन, सेवेची तीव्र तळमळ, भाव आणि ईश्वराशी अनुसंधान’ या गुणांसह ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या १३३ व्या संतपदावर विराजमान झालेल्या सौ. अंजली करंबेळकर !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. आनंदी आणि उत्साही स्वभावाच्या सौ. करंबेळकर यांच्यामध्ये अध्यात्म अन् धर्मप्रसार करण्याची तीव्र तळमळ आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एखादी सूचना प्रसिद्ध झाली की, तिचे आज्ञापालन करण्याचा त्या तळमळीने आणि भावपूर्ण प्रयत्न करतात. ‘प्रसाराचा ध्यास कसा असावा ?’, याचे सौ. करंबेळकर या मूर्तीमंत उदाहरण आहेत. प्रवास असो, लग्न-मुंजीसारखे काही कार्यक्रम असोत, रुग्णालय असो किंवा ठिकठिकाणी केली जाणारी प्रसारसेवा असो, प्रसार करण्याचे त्यांचे कौशल्य आणि तळमळ अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांचा भाव आणि सकारात्मक वृत्ती यांमुळे समोरील व्यक्तीही सकारात्मक प्रतिसाद देऊ लागते. भावपूर्ण व्यष्टी आणि समष्टी साधनेमुळे प्रसारात त्यांना ‘देवच आपला सांगाती आहे’, अशी सतत अनुभूती येते. मोठे ध्येय ठेवून आणि देवाचे साहाय्य घेऊन सेवा करतांना ‘देवच आपले धर्मप्रसाराचे ध्येय पूर्ण करत आहे’, याचा त्या नित्य अनुभव घेतात.

‘आज्ञापालन, सतत सत्चाच ध्यास, भाव आणि घराघरांत अध्यात्म पोचवण्याची तळमळ’ असलेल्या सौ. करंबेळकर यांनी वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूचा फेरा ओलांडला. त्यांची शीघ्रतेने उन्नती होत असून आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या १३३ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांचे यजमान श्री. हनुमंत करंबेळकर (वय ७४ वर्षे) यांचीही साधना चांगल्या प्रकारे चालू असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे.

पू. (सौ.) अंजली हनुमंत करंबेळकर यांची पुढील आध्यात्मिक वाटचालही जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.८.२०२५)

पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांचा साधनाप्रवास

पू. (सौ.) अंजली करंबेळकर

१. संतांचा सहवास

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर हे पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांचे मूळ गाव होय. मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘‘लहानपणी मी आईसमवेत कीर्तनाला जात असे. मला विविध संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला आहे. मी श्री गजानन महाराज आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या पोथ्यांचे नियमित वाचन करत असे. त्या माध्यमातून मला विविध अनुभूतीही आल्या. मला प.पू. गगनगिरी महाराजांचे एकदा प्रत्यक्ष दर्शन आणि मार्गदर्शनही लाभले. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे दर्शनाला गेले, तेव्हा स्वामींनी मला एक ग्रंथ भेट दिला होता. त्या वेळी स्वामींच्या मठातील अनेकांनी सांगितले, ‘स्वामी सहसा कुणाला ग्रंथ देत नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात.’

२. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना

कालांतराने विवाहानंतर आमच्या घरी सनातन संस्थेचे साधक येऊ लागले आणि त्यांनी सांगितलेली साधना म्हणजे प्रारंभी ‘कुलदेवता’ आणि ‘श्री दत्त’ या देवतांचे नामस्मरण चालू केले. त्यातूनही मला अनुभूती येत होत्या. त्यामुळे मी सनातनच्या सत्संगात जाऊ लागले. पुढे सत्संग घेण्याची सेवा मिळाली. त्यानंतर मला सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकासाठी विज्ञापन घेणे आदी सर्वच सेवा करण्याची संधी मिळाली.

३. सनातनचे १ लाख ग्रंथ वितरित करण्याचे घेतलेले उच्चतम ध्येय !

सेवा करत असतांनाच मला नेहमी प.पू. गुरुमाऊलींच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून उपलब्ध असलेली ज्ञानगंगा सर्वांपर्यंत पोचायला पाहिजे, याची तीव्र तळमळ वाटू लागली. जणू ध्यास लागावा, तसे झाले. विविध सेवा करतांना आतापर्यंत सनातनच्या ८० सहस्र ग्रंथांचे वितरण गुरुमाऊलींनी माझ्या माध्यमातून करून घेतले. ‘१ लाख ग्रंथ वितरण करायचे, हे ध्येय मी ठरवले आहे आणि तेही ध्येय गुरुकृपेने पूर्ण होईल’, अशी माझी श्रद्धा आहे.

४. सद्गुरूंचे मिळालेले अमूल्य मार्गदर्शन !

परिस्थिती स्वीकारून गुरूंचे आज्ञापालन करून व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना आपला सर्व प्रकारचा त्याग होतो अन् त्यागातूनच आनंद मिळतो. माझ्या साधनाप्रवासात मला प.पू. गुरुमाऊली, तसेच सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच यजमान श्री. हनुमंत करंबेळकर यांचीही मोलाची साथ लाभली. सर्व कुटुंबीय आणि साधक यांचेही सहकार्य लाभले.’’

साधनेचे विशेष प्रयत्न करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या पू. (सौ.) अंजली करंबेळकर ! – धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये

प्रत्येक सेवेतून आनंद घेणार्‍या पू. (सौ.) करंबेळकरकाकू यांनी मोठ्या आजारपणातही समाजापर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. सनातनची ग्रंथसंपदा गुरुदेवांची ज्ञानगंगा आहे, ती संजीवनी आहे आणि ती समाजापर्यंत लवकरात लवकर पोचायला हवी, या तळमळीपोटी नियोजनबद्ध अन् वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. समष्टी सेवा करतांनाच वेळेचे योग्य नियोजन करून व्यष्टी साधनाही त्या नियमित करतात. त्यांच्याकडून सर्व साधकांना अनेक सूत्रे शिकायला मिळत आहेत.

प्रत्येक सेवा गुरुचरणांपर्यंत पोचली पाहिजे, असा भाव असणार्‍या पू. (सौ.) करंबेळकर ! – धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

पू. (सौ.) करंबेळकरकाकू नेहमी आनंदी आणि उत्साही असतात. सतत विचारून विचारून कृती करतात. त्या देव सांगतो, तसे करतात. आजारी असो किंवा कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, परिस्थिती स्वीकारून स्थिर राहून सेवा करत असतात. ‘माझ्या गुरूंचे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचवता येईल’, याची तळमळ त्यांच्यामध्ये नेहमी असते. त्या ‘प्रत्येक सेवा गुरुचरणांपर्यंत पोचली पाहिजे’, अशा भावाने नेहमी सेवारत असतात. ‘साधनेत आणखी कुठे अल्प पडत आहोत’, असेही त्या विचारून घेतात. ग्रंथ वितरणाची सेवा करत असतांना स्वतः ग्रंथांचा अभ्यास करून परिणामकारक सेवा करतात. विविध सेवांच्या माध्यमातून त्यांनी अनेक जिज्ञासू आणि हितचिंतक यांना जोडून ठेवले आहे, तसेच त्यांनी सर्व कुटुंबीय अन् नातेवाईक यांना साधनेत आणले आहे. त्या त्यांच्याकडूनही त्याग करून घेतात. त्यांच्याकडून आपणही सर्वांनी शिकून साधनेचे प्रयत्न वाढवूया.

अखंड कृतज्ञताभाव हा पू. आईचा (टीप) स्थायीभाव असे ।

अधिवक्त्या सौ. अपर्णा कुलकर्णी

(टीप – पू. (सौ.) अंजली हनुमंत करंबेळकर यांचा)

रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातनच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त त्यांची मुलगी अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेली काव्यरूपी कृतज्ञता पुढे दिली आहे.

निष्ठा ठेवून गुरुदेवांवर ।
प्रारब्धभोग आनंदाने भोगते ।।
जरी आपल्याशी बोलतांना दिसली ।
तरी अंतरातून अनुसंधानात असते ।। १ ।।

प्रत्येक कृतीतून इतरांचा विचार करते ।
इतरांना तळमळीने साधना सांगते ।।
कितीही असली आजारी ।
तरी गुरूंचा ध्यास धरते ।। २ ।।

कुटुंबातील प्रत्येकाचा विचार करत ।
साधनेला प्रोत्साहन देते ।।
परिपूर्ण सेवा करण्या धडपड तिची असते ।
तहान-भूक विसरून सेवेचा ध्यास धरते ।। ३ ।।

ध्यानी-मनी-स्वप्नी तिच्या ।
गुरुदेवच असती ।।
प्रत्येक साधकात गुरुरूप पहाते ।
सहसाधकांप्रती ती सतत कृतज्ञ असते ।। ४ ।।

अखंड कृतज्ञताभाव तिचा स्थायीभाव असे ।
अजून मी काय करू गुरुराया, सतत आळवते ।।
अशी ही माझी पू. आई  ।
आजच्या शुभदिनी गुरुचरणी स्थिरावली असे ।। ५ ।।

पू. आई आणि गुरुमाऊली यांच्या चरणी कृतज्ञता ! ‘पू. आईमधील गुण मला आत्मसात् करता येऊ दे आणि तिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता येऊ दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना !’

– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी (पू. (सौ.) अंजली हनुमंत करंबेळकर यांची मुलगी), दापोली, जिल्हा रत्नागिरी. (१०.८.२०२५)

१. नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत !

१ अ. श्री. हनुमंत करंबेळकर (पू. (सौ.) करंबेळकर यांचे यजमान, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), रत्नागिरी

कोणतेही बीज चांगले असले, तरी त्याला पोषक वातावरण लाभले, तरच त्याचा वृक्ष बनू शकतो. तसेच पू. (सौ.) करंबेळकर यांच्या संदर्भात आहे. त्यांच्यामध्ये तळमळ आणि भाव आहे. त्यांना सद्गुरु स्वातीताई खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळत गेले. त्यामुळे त्यांची तळमळ अधिक वाढली. त्या ज्यांना ग्रंथ वितरण करतात त्यांच्या नोंदी त्या नियमितपणे करून ठेवतात. त्यामुळे त्यांना पुढील वर्षीही कोणते ग्रंथ द्यायचे ? ते आधीच ठरवता येते. त्यांच्यामधील आसक्तीही न्यून झाली आहे. ‘हेचि भक्ती थोर आवडते देवा, संकल्पावी मात्रा संचिताची’ या उक्तीचा त्यांच्या माध्यमातून प्रत्यय येतो. प.पू. गुरुदेवांनी सेवारूपी भक्तीची अनेक द्वारे साधकांसाठी गुरुचरणापर्यंत जाण्यासाठी खुली करून ठेवलेली आहेत. नियतकालिके, सत्संग, बालसंस्कारवर्ग, ग्रंथप्रदर्शने अशा कोणत्याही मार्गाने जीव ओतून सेवा केल्यास गुरुचरणांपर्यंत आपण पोचू शकतो, हे करंबेळकरकाकूंच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी दाखवून दिले आहे.

१ आ. श्री. दिगंबर कुलकर्णी (पू. (सौ.) करंबेळकर यांचे जावई)

माझे आणि अपर्णाचे (सौ. करंबेळकर यांची मुलगी हिचे) जेव्हा लग्न झाले, तेव्हा सनातन संस्थेवर समाजातून आरोप केले जात होते. तेव्हा मी अपर्णाला सांगितले होते की, तू सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू ठेव आणि मी सध्या साधना करत असलेल्या संप्रदायानुसार साधना चालू ठेवतो.

या सोहळ्याच्या निमित्ताने मला अनुभूती आली. या सोहळ्याला येता येणार नाही, असे मी आधीच अपर्णाला सांगितले होते; कारण मला दुपारी ४ ते सायंकाळी ६ प.पू. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करायची असते; पण ९ ऑगस्ट या दिवशी मला असे अनुभवायला आले की, मला आतूनच एक आवाज आला, ‘तू जा, तुला उद्याच्या कार्यक्रमाला जायलाच हवे.’ ते प.पू. गोंदवलेकर महाराज होते. मी म्हणालो की, जातो; पण उद्याची माझी आरती, उपासना इत्यादी कसे होईल ? तेव्हा ते म्हणाले की, तुला तिथेही तेच अनुभवायला मिळणार आहे आणि खरंच मला आजच्या या सोहळ्यात एक वेगळ्या स्तरावरचा आनंद मिळाला. म्हणजे मी असा आनंद पूर्वी अनुभवला नव्हता. पू. सासूबाई यांच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्य असते. त्यामुळे त्यांना समाजातील व्यक्तींकडून सकारात्मकच प्रतिसाद मिळतो. त्यांची सेवा नि:स्वार्थ असते.

१ इ. श्री. अमोल हनुमंत करंबेळकर, (पू. (सौ.) करंबेळकर यांचा मुलगा), पुणे

आईचा मोठा गुण म्हणजे तिची देव आणि परमपूज्य यांच्यावर असलेली दृढ श्रद्धा ! परिस्थिती कुठलीही असो, ती नेहमीच म्हणते की, जे काही झाले आणि जे काही होणार, ते देवाच्या कृपेमुळेच होणार आहे. तिच्यातील प्रेमभावामुळेच ती नेहमीच दुसर्‍याचा विचार आधी करते. कोणत्याही परिस्थितीत सेवा कशी होईल, याकडेच तिचा अधिक कल असतो. जेव्हा मी आणि पत्नी सौ. सुखदा आईसमवेत भ्रमणभाषवर बोलत असतो, तेव्हा आम्हाला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात. ‘कलियुगामध्ये प.पू. (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्यासारखे गुरु लाभले आणि संत माऊलीच्या पोटी जन्म घेता आला’, यासाठी देवाच्या अन् परमपूज्यांच्या चरणी कृतज्ञता !

२. साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

२ अ. श्री. महेंद्र चाळके, लोटे, रत्नागिरी (सनातन संस्था, जिल्हासेवक, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५३ वर्षे)

पू. करंबेळकरकाकू यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. त्या देवाला विचारून कृती करायच्या, ध्येय ठरवायच्या आणि ते ध्येय साध्यही व्हायचे. जिल्ह्याचे आकाशकंदिल, जाहिराती किंवा ग्रंथ वितरणाचे ध्येय ठेवतांना पू. काकू देवाला विचारून घ्यायला सांगायच्या आणि त्याप्रमाणे निश्चित करायच्या. त्यामागे त्यांची देवाला प्रार्थना असायची.

२ आ. श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी

पू. करंबेळकरकाकूंचे पुष्कळ गुण अनुभवायला मिळाले. त्यांच्या घरी गेल्यावर त्या ‘तुम्ही काय खाणार ?’, असे विचारत न बसता काहींना काही खाऊ घेऊन येतात आणि कुणाला काय आवडते, तेही त्यांना ठाऊक असते. पुष्कळ प्रेमभाव अनुभवला आहे.

२ इ. सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी

पू. काकूंचा प्रेमभाव इतका आहे की, समोरचा साधक त्यांनी सांगितलेल्या सेवेसाठी सकारात्मक होतो. हे अनुभवायला मिळाले. प्रसारात ग्रंथ वितरण कसे करायचे ? हेपण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

२ ई. सौ. मीनाक्षी वझे, रत्नागिरी

पू. काकू नियमित प्रथमोपचार वर्गाला यायच्या. एकदा मी वर्ग घ्यायला जातांना पाऊस पुष्कळ पडायला लागला होता; पण मी निघतांना प्रार्थना करायला विसरले. वर्गाच्या ठिकाणी पोचल्यावर त्या मला म्हणाल्या की, मी सकाळपासूनच वरुणदेवतेला प्रार्थना करत आहे. त्यामुळे पाऊस पडायचा न्यून झाला होता, हे मलाही अनुभवायला मिळाले.

२ उ. सौ. सुरेखा शेलार, रत्नागिरी

पू. करंबेळकर काकूंसमवेत सेवेला मी नियमित जायचे. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळायचा. पू. काकू ज्या जिज्ञासूला ग्रंथाविषयी माहिती सांगायच्या, त्या जिज्ञासूला सकारात्मक करूनच सोडायच्या. कधी कुणी नकार दिला, असे व्हायचे नाही. मग ती जाहिराती घेण्याची सेवा असो किंवा नियतकालिक वर्गणीदार करण्याची सेवा असो !

२ ऊ. भास्कर खडपे, धोपेश्वर ता. राजापूर (रत्नागिरी)

पू. (सौ.) करंबेळकर यांचे मूळ गाव तेच माझेही गाव असल्याने त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे संतरत्न लाभल्यामुळे विशेष आनंद झाला आहे. पू. (सौ.) करंबेळकर यांना सर्वच सेवा स्वतःच्या वाटतात. त्यांचे आचरण नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी असते. प्रसारात सेवा करतांना येणार्‍या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी मी जेव्हा पू. करंबेळकरकाकूंना संपर्क करतो, तेव्हा त्या तत्परतेने आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या दृष्टीने साहाय्य करतात. त्यामुळे त्या माझ्या गुरुसेवेसाठी एक आधार ठरल्या आहेत.

३. पूर्वसूचना

७ ऑगस्ट या दिवशी रत्नागिरी येथे धर्मप्रचारक सद्गुरु स्वातीताई खाडये आणि धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा जिल्हा दौरा असल्याचे साधिका सौ. लांजेकर यांनी सांगितल्यानंतर ‘सौ. करंबेळकरकाकू संत झाल्या असाव्यात’, असा विचार उत्स्फूर्तपणे आला. – श्री. भास्कर खडपे, धोपेश्वर, ता. राजापूर

 

Leave a Comment