गोवा ही परशुरामभूमीच !

शिलालेखातील पुरावे, तसेच भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांचे दाखलेही सांगतात ‘गोवा ही परशुरामभूमीच !’

प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ (गोव्याचा सांस्कृतिक इतिहास : ख्रिस्तपूर्व १०००० ते ख्रिस्तपूर्व १३५२) या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात ‘गोवा ही परशुरामभूमी कशी आहे’, हे सिद्ध केले आहे. तसेच शिलालेखातील पुरावे, अनेक संशोधकांचे भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधन यांचे दाखले दिले आहेत. या ग्रंथातील शेवटच्या ३ पृष्ठांत लिहिलेला सारांश येथे दिला आहे.

गोवा हा दक्षिण कोकणचा एक भाग आहे. गोव्यातील लोकजीवनावर अनेक राजवटींचा प्रभाव आहे. यातील बहुतांश राजवटी या हिंदु धर्मियांच्या होत्या. आदिलशाही आणि पोर्तुगीज या अलीकडच्या राजवटींची अनेक वर्षे या भूभागावर सलग सत्ता असूनही येथील जनतेने मूळ हिंदु संस्कृती टिकवून ठेवली आहे, हे वैशिष्ट्य ! गोव्यातील लोकजीवनातून या संस्कृतीचे प्रकटीकरण होते. गोवा ही परशुरामभूमी आहे, हेही आपण विसरता कामा नये. नास्तिक विचारसरणीचे आणि हिंदुद्वेष्टे यांच्या तक्रारीवरून शिक्षण खात्याने म्हणजेच शासनाने शाळेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात गोव्याचा ‘परशुरामभूमी’ असा केलेला उल्लेख ‘भगवान परशुराम ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा नाही’, म्हणून वर्ष २०१६ मध्ये काढला होता. प्रत्यक्षात गोवा ही भूमी समुद्र मागे हटल्यामुळेच निर्माण झाली आहे, असे इतिहास संशोधकांच्या संशोधनांतीही लक्षात येते.

 

१. परशुरामांच्या अस्तित्वाचा उल्लेख

वैतरणा नदी ते कन्याकुमारी या भारताच्या पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्याच्या भागाला ‘परशुराम क्षेत्र’ असे म्हटले जाते. भगवान परशुरामांविषयीचा उल्लेख स्कंद पुराण, रामायण, महाभारत आदी ग्रंथांमध्ये आढळून येतो. या ग्रंथांमध्ये परशुरामांनी समुद्राला मागे हटवून जमिनीचा काही भाग देण्याची आज्ञा केली, असा उल्लेख आढळतो.

 

२. भगवान परशुराम ही काल्पनिक व्यक्तीरेखा नसून इतिहासातील सत्य !

सातवाहनांच्या शिलालेखात उल्लेख असलेला ‘एक ब्राह्मण’ हा शब्द परशुरामांच्या अस्तित्वावर प्रकाश टाकतो. इसवी सनाच्या सातव्या शतकात ‘सेंद्रक’ घराण्यातील वंतु वल्लभ सेनांदराजा याने पुराणातील देवांना मूर्त स्वरूपात आणण्यावर भर दिला. परशुराम ही केवळ काल्पनिक किंवा गोष्टीतील व्यक्तीरेखा नसून ती एक ऐतिहासिक व्यक्तीरेखा आहे.

 

३. भगवान परशुरामांच्या वेळचा इतिहासातील कालखंड

सर्वसाधारणपणे मलबार किनारा किंवा विशेषतः गोव्याच्या भूमीचा इतिहास जाणून घेण्यासाठी परशुरामांच्या वेळचा इतिहासातील कालखंड जाणून घेणे आवश्यक आहे. जुन्या ग्रंथांनुसार ख्रिस्तपूर्व २४०० या काळाच्या आधी ब्राह्मण आणि हैहायास यांच्यामध्ये संघर्ष झाल्याचा उल्लेख आहे. परशुरामांचा इतिहास हा तेथील मूळ रहिवाशांकडून नवीन स्थायिक झालेल्यांकडे आलेला आहे.

 

४. शास्त्रानुसार मिळालेल्या अवशेषांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्ष !

डॉ. मेंडीस यांनी प्राचीन अवशेषांबद्दल केलेल्या संशोधनाच्या वेळी त्यांना आंबेचो गोर आणि सुर्ल या गावात समुद्रातील शंखांचे अवशेष सापडले, तसेच रिवे या गावात ‘बसाल्ट’ या दगडापासून नैसर्गिकरित्या निर्माण झालेले दोन खांब सापडले. या पुराव्यांवरून गोव्याची भूमी ही अचानकपणे समुद्राचे पाणी हटून निर्माण झाली आहे, असे म्हणता येईल. आल्तिनो, पणजी येथे एका गुहेचे अवशेष सापडले. या गुहेमध्ये ‘रे फिश’ या प्रकारचे मासे असल्याचा पुरावा सापडला आहे. यावरूनही ‘गोव्याची भूमी समुद्र हटून झाली आहे’, या विधानाला पुष्टी मिळते. मालवण आणि मुरगाव बंदर या ठिकाणी सापडलेल्या खडकांवरील प्रवाळांचा अभ्यास केल्यानंतर हे प्रवाळ सिद्ध व्हायला प्रारंभ झाला, तेव्हा समुद्राचे पाणी अगदी अल्प प्रमाणात होते, असे श्री. गवेसणी यांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ यांनी केलेल्या अभ्यासानुसार हे प्रवाळ ख्रिस्तपूर्व ९००० वर्षे या काळात सिद्ध झाले असावेत. हा पुरावा आणि रिवे येथे सापडलेले दगडी खांब यांवरून वातावरणात पालट झाला होता, हे स्पष्ट होते.

डॉ. ओर्टेल आणि डॉ. वाडिया यांनी केलेल्या संशोधनात म्हटले आहे, ‘भूगर्भाच्या तृतीय थराच्या लगतचा वरचा भाग निर्माण झाला, तेव्हा सह्याद्री आणि त्याजवळची गोव्याची भूमी निर्माण झाली असावी.’ रिवे येथे लेखकाला सापडलेले दगडी खांब सिद्ध झाल्याच्या कालखंडाबद्दल भारतीय आणि पाश्चात्त्य संशोधकांची मते जुळतात. पाश्चात्त्य संशोधकांच्या म्हणण्यानुसार भूगर्भाच्या तृतीय थराच्या लगतचा वरचा भाग निर्माण झाला, तेव्हा हवामानात अचानकपणे मोठा पालट झाला होता. त्या काळात वादळ आणि त्यानंतर मोठा पाऊस पडला. ख्रिस्तपूर्व ४००० ते १००० या कालखंडात वातावरणात पालट झाला होता, हे डॉ. संकालिया यांचे म्हणणे योग्य वाटते.

 

५. गोव्याच्या भूमीबद्दलचे निष्कर्ष

वरील सर्व पुरावे आणि खडकावरील प्रवाळ सिद्ध होण्याचा कालखंड लक्षात घेता आपण काही निष्कर्ष काढू शकतो.

१. भूगर्भाच्या तृतीय थराचा वरचा भाग निर्माण झाला, त्या काळात म्हणजेच ख्रिस्तपूर्व १००० वर्षे या काळात पर्जन्यवृष्टी न्यून झाल्याने ‘डेक्कन प्लॅटो’च्या जवळचा अरबी समुद्राचा भाग समुद्राच्या वर आला आणि मलबार किनारा अन् गोव्याची भूमी सिद्ध झाली.

२.  गोव्याच्या भूमीच्या पश्चिमेला समुद्रकिनारा आणि मुरगाव हे बंदर आहे, तर पूर्वेला ६०० मीटर उंचीचे डोंगर आहेत.

३. वातारणात अचानक पालट झाला, त्या वेळी बसाल्ट दगडाचे तुकडे होऊन ते सर्वत्र पसरले. या दगडांचे अवशेष सध्या समुद्रकिनारे, तसेच नदीच्या खाडीच्या जमिनीत १५ मीटर अंतरावर सापडतात.

४. ख्रिस्तपूर्व ९००० वर्षे या कालखंडात पावसामुळे जमिनीचा भाग वाहून जात होता; परंतु त्यानंतर त्याची तीव्रता कमी झाल्यावर ख्रिस्तपूर्व ९००० वर्षे या कालखंडात अचानकपणे वातावरणात पालट झाला. वातावरण एकदम कोरडे झाले. तापमान वाढले आणि मोठी वादळे झाली. यामुळे डोंगरावरील वृक्ष उन्मळून दऱ्यांमध्ये पडले. या वृक्षांवर वादळाने उडालेली धूळ आणि दगड पडले. त्यांच्यापासून बसाल्टचे सापडलेले अवशेष सिद्ध झाले असावेत. डॉ. मेंडीस यांना आंबेचो गोर आणि रिवे या भागांत अशा प्रकारचे अवशेष सापडले आहेत. गवेसनी यांनी केलेल्या संशोधनानुसार नेत्राना बेट, मुरगाव बंदर आणि मालवण या ठिकाणी सिद्ध झालेले प्रवाळ त्याच कालखंडातील आहेत.

५. ख्रिस्तपूर्व ८५०० वर्षे या काळात मान्सूनच्या पावसामुळे जमिनीचा ढिला भाग वाहून गेला. अशा प्रकारे मूळ असलेला पृथ्वीवरील जलभागाचा प्रदेश हळूहळू पालटला आणि वनस्पती अन् प्राणी असलेला प्रदेश सिद्ध झाला.

Leave a Comment