रशिया-युक्रेनच्या युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? – प्रा. रेणुका धर बजाज, देहली विद्यापीठ

‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

प्रा. रेणुका धर बजाज

मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे; मात्र कोणत्याही सरकारने या विषयावर समिती स्थापन करून सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. या विषयावर कुठेच प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चा होतांना दिसत नाही. रशिया-युक्रेन युद्धात लोकांवर झालेल्या अत्याचारांविषयी जागृती करणारी प्रसिद्धीमाध्यमे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? असा प्रश्न देहली विद्यापिठातील प्राध्यापिका आणि राजकीय विश्लेषक रेणुका धर बजाज यांनी उपस्थित केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ मार्च २०२२ या दिवशी ‘द कश्मीर फाइल्स : काश्मीरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य !’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

विशेष संवादामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील एक अभिनेते श्री. प्रकाश बेलवाडी, ‘जम्मू इक्कजुट्ट’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा, सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी सहभाग घेतला. संवादाचे थेट प्रक्षेपण ११ सहस्र जणांनी पाहिले.

 

आतातरी हिंदूंनी जागृत होऊन काश्मिरी हिंदूंना न्याय
मिळवून दिला पाहिजे ! – अभिनेते श्री. प्रकाश बेलवाडी

श्री. प्रकाश बेलवाडी

भारतातील एका राज्यात ३२ वर्षांपूर्वी हिंदूंबरोबर काय झाले ? हे भारतियांना अद्यापही माहिती नाही, हे धक्कादायक आहे. खरे तर भारतातील हिंदूंनी काश्मिरी हिंदूंसाठी काहीही केलेले नाही. आतातरी हिंदूंनी जागृत होऊन काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून दिला पाहिजे.

 

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार, हे सुनियोजित षड्यंत्र ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था

सौ. क्षिप्रा जुवेकर

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार हा एका दिवसात अचानकपणे झालेला नाही. हे षड्यंत्र फार आधीपासून चालू होते. त्यासाठी पैसा पुरवण्यात आला. हिंदूंच्या याद्या करून त्या सर्वत्र वाटण्यात आल्या. ‘हमे कश्मीर चाहिए, हिंदू नही !’, अशी प्रसिद्धीपत्रके काढण्यात आली. याकडे तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

 

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारणे, हे दुप्पट नरसंहार
करण्यासारखेच ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, अध्यक्ष, ‘जम्मू इक्कजुट्ट’ संघटना

अंकुर शर्मा, अध्यक्ष, ‘इक्कजुट जम्मू’ संघटना

वर्ष १९४७ पासून भारतात हिंदूंचा नरसंहार चालू असून तो सर्वपक्षीय सरकारे, प्रसिद्धीमाध्यमे, प्रशासन यांनी स्पष्टपणे नाकारला आहे. काश्मीरमधील नरसंहाराची ‘विशेष पथक’ स्थापन करून चौकशी करण्याची काश्मिरी हिंदूंची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावली. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, हेच नाकारले जात असेल, तर त्यांना न्याय कसा मिळणार ? हा नरसंहार नाकारणे, हे दुप्पट नरसंहार करण्यासारखेच आहे.

काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत हिंदु जनजागृती समिती
लढा चालूच ठेवेल ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा

गेल्या १० वर्षांत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने देशभरात ५०० चित्रप्रदर्शने लावून, तसेच अनेक सभा घेऊन १० लाख हिंदूंना जागृत केले आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत समिती देत असलेला लढा चालूच ठेवेल.

Leave a Comment