परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

अनुक्रमणिका

परीस लोखंडाला परीस बनवू शकत नाही; पण गुरु त्यांच्या शिष्याला गुरु बनवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (कु.) दीपाली मतकर

सौ. उल्का जठारकाकूंनी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) मला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी (प.पू. गुरुदेवांनी) ‘आज तुझे दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झालेले छायाचित्र तुझ्या साधनेमुळे पूर्वीपेक्षा छान दिसत आहे’, असा निरोप दिला आहे आणि तुला खाऊ द्यायला सांगितले आहे.’’ तेव्हा मला कळलेच नाही. माझ्या मनात विचार आला, ‘मी तर काहीच केलेले नाही, तरी गुरुदेव किती कृपाळू आहेत. मला खाऊ देत आहेत.’ नंतर वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांनी निरोप दिला, ‘साधनेच्या दृष्टीने तुझे छायाचित्र छान दिसत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संदर्भात तुला लवकर लेख पाठवायला सांगितला आहे.’

‘परम प्रिय, कृपाळू गुरुमाऊली, आपण दिलेल्या निरोपानंतर माझ्या लक्षात आले की, तुमची ही कृपा समजून घेण्यास मी अज्ञानी आहे. मी तुमच्या चरणी शरण आले आहे. ‘माझ्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचा लवलेशही राहू नये. आपल्याला अपेक्षित असे होऊन तुमच्या चरणी अर्पण व्हावे आणि तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे लिखाण माझ्याकडून करवून घ्यावे’, अशी तुमच्या पावन चरणकमली प्रार्थना !’

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘संत होण्यापूर्वी कु. दीपाली मतकर हिने कशी वाटचाल केली’, हे या लेखावरून लक्षात येईल. सनातनमध्ये ११७ संत आहेत. त्यांपैकी एकाही संतांनी आणि मीही ‘आमची वाटचाल कशी झाली?’, यासंदर्भात विशेष काही लिहिले नाही. ते लिखाण कु. दीपाली मतकर हिने या लेखातून पूर्णत्वाला नेले आहे. या लेखामुळे ‘साधना कशी करायची?’, हे साधकांना आणि ‘यासंदर्भातील लिखाण कसे करायचे?’, हे संतांनाही शिकायला मिळेल. या लेखासंदर्भात दीपालीचे कौतुक किती करावे, तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

८ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झालेले पू. (कु.) दीपाली मतकर यांचे छायाचित्र

 

१. छायाचित्र ८ वर्षांपूर्वीचे असूनही
त्या वेळी साधनेचे प्रयत्न चांगले होत असल्यामुळे
भगवंत भेटल्याचा आनंद ते छायाचित्रसुद्धा अनुभवत असल्याचे जाणवणे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ पाहिल्यानंतर त्यात माझे ८ वर्षांपूर्वी काढलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. माझ्या मनात ‘यात कोणता पालट झाला आहे ?’, असा विचार आला. छायाचित्र पाहिल्यावर ‘ते जुने छायाचित्र असले, तरी ते पाहून ‘चित्रातील दीपालीला जणू भगवंतच भेटला आहे आणि तो आनंद ते छायाचित्र अनुभवत आहे’, असे मला जाणवले. छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘छायाचित्राला इतका आनंद होत आहे की, चौकटीतून बाहेर येऊन ते मला ‘भगवंत भेटला गं दीपाली ! मी सर्वत्र त्याचीच आनंददायी कृपा अनुभवत आहे आणि तूसुद्धा तेच अनुभवत आहेस ना !’, असे सांगत असल्याचे जाणवले. ‘गुरुमाऊली, त्यामुळे मला पुष्कळ आनंद होत होता. ‘आता या छायाचित्राच्या माध्यमातून गुरुदेव काय आनंददायी कृपा करत आहेत’, हे पाहून मला कृतज्ञता वाटू लागली.

 

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी
‘अन्य साधिकेचे हे छायाचित्र आहे’, असा भाव
ठेवून लिखाण केल्यास स्वभावदोष आणि अहं यांचे अडथळे येणार नसल्याचे सांगणे

छायाचित्राविषयी गुरुदेवांनी सांगितलेला लेख लिहिण्यास आरंभ करतांना माझ्या मनात विचार आला, ‘हे तर पूर्वीचेच काढलेले छायाचित्र आहे.’ तेव्हा सद्गुरु राजेंद्र शिंदेदादांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही दुसर्‍या साधिकेचे छायाचित्र आहे’, असे पाहून लेख लिहा. मग स्वभावदोष आणि अहं यांचे अडथळे येणार नाहीत.’’ नंतर माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेवांनी सांगितले आहे, तर ‘अन्य साधिकेचे हे छायाचित्र आहे’, असा भाव ठेवून लिखाण करूया.’

 

३. लिखाण करण्यास आरंभ केल्यावर उपाय होऊन शांत आणि स्थिर वाटणे

लिखाण लिहिण्यास आरंभ केल्यावर मला पुष्कळ ढेकरा आणि जांभया येऊन माझ्यावर उपाय होऊ लागले. माझ्या मनाची स्थिती स्थिर होऊ लागली आणि मला शांत वाटू लागले. त्या वेळी ‘माझ्यावर आलेले सर्व त्रासदायक आवरण दूर होत आहे’, असे जाणवून मला हलके वाटू लागले.

 

४. रामनाथी आश्रमातून प्रसारात
आल्यावर झालेली मनाची स्थिती आणि आरंभी झालेले त्रास

४ अ. मनाची चिडचिड होणे

मी आश्रमसेवेतून प्रसारसेवेत आले. तेव्हा मला फार जड जात होते. माझ्या मनाची चिडचिड व्हायची. त्यामुळे मला श्रीकृष्णाशी बोलता यायचे नाही.

४ आ. समष्टी साधना करतांना स्वभावदोष आणि अहं यांचे प्रकटीकरण होणे

रामनाथी आश्रमात असतांना ‘सगळ्यांशी चांगले बोलणे आणि सगळ्यांचे ऐकणे’, असेच केले होते; पण समष्टी सेवेत आल्यावर मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे प्रकटीकरण दिसू लागले. ‘मला वाटते, तसेच व्हायला हवे’, असा विचार माझ्या मनात असायचा आणि तसे झाले नाही, तर साधकांवर चिडचिड करणे आणि त्यांच्याशी प्रतिक्रियात्मक बोलणे वाढले होते. माझ्या या स्थितीचा मला पुष्कळ त्रास व्हायचा; पण प्रसंग घडून गेल्यावर त्यात पालट करता यायचा नाही.

४ इ. स्वभावदोषांमुळे घुसमट होऊन प्रतिमेच्या विचारांमुळे इतरांशी बोलले न जाणे

त्या वेळी माझ्या मनात ‘इतरांनी मला समजून घ्यायला हवे’, असे विचार असायचे. स्वभावदोषांमुळे माझ्या मनाची घुसमट व्हायची. कुणाला काही बोलले, तर ‘त्यांच्या (माझ्या) मनात असे विचार कसे येतात ?’, असा विचार समोरची व्यक्ती माझ्याविषयी करील’, या विचाराचाही मला ताण यायचा. मनमोकळेपणाने बोलले की, मी अशीच आहे, हे सगळ्यांना कळेल, असा विचार मनात यायचा.

४ ई. मनाचा संघर्ष होण्याची कारणे

४ ई १. सेवेविषयी संकुचित विचार असणे

पूर्वी माझ्या मनात ‘मी आणि माझी ठरलेली सेवा’, असा विचार असायचा. सेवा ठरलेल्या वेळेत झाली नाही, तर माझ्या मनाचा संघर्ष व्हायचा, उदा. एखादा सत्संग, शिबिर, अन्य आश्रमांतील सेवा यांत काही पालट झाल्यास मला ते स्वीकारता यायचे नाही आणि माझी चिडचिड व्हायची.

४ ई २. चूक स्वीकारता न येणे

अ. दळणवळण बंदीमध्ये (‘लॉकडाऊन’मध्ये) ‘दिवसभर आश्रमसेवा आणि जिल्ह्यातील सेवा अन् रात्री धान्य चाळणे’, असे सलग झाल्यावर एकदा रात्री १० वाजता एक सत्संग चालू झाल्यावर मला झोप लागली आणि सकाळीच जाग आली. त्या दिवशी व्यष्टी आढाव्यात सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी) मला ही चूक सांगितली. तेव्हा मला ती स्वीकारता येईना. ‘मी वेळ कुठेही वाया न घालवता माझी रात्रंदिवस काही ना काही सेवा चालूच आहे’, असा विचार मनात येऊन माझा संघर्ष होत होता. ‘मी’च्या विचारामुळे भावनाशील होण्याचा भाग वाढायचा.

आ. माझ्याकडून चुका पुष्कळ व्हायच्या; पण मला त्या स्वीकारता यायच्या नाहीत. माझ्या मनात ‘मी सेवा करत होते, तर इतरांनी मला समजून घ्यायला हवे’, असा विचार असायचा. ‘कुणी सेवेला कधीही बोलावले, तर ‘मी आहे, तशी धावत सेवेला जात आहे’, तरी ‘मी वेळेत सेवेला येत नाही. माझी पुष्कळ वेळ वाट पहावी लागते’, असे कुणी सांगितले, तर मला ते स्वीकारता यायचे नाही. तेव्हा ‘असे का होत आहे ?’, हे माझ्या लक्षात यायचे नाही. पावलोपावली चुकाच समोर यायच्या. ‘दीपाली म्हणजे चुकांची मूर्तीच आहे’, असा विचार मनात येऊन मी खचून जायचे. आता मला काही जमत नाही. ‘थकले कृष्णा’, असे म्हणून मी परत आरंभ करायचे. नंतर माझ्या लक्षात आले की, साधकांनी सेवेला बोलावल्यावर ‘मी आहे, तशी जाते’, हा अहंयुक्त विचार मी माझ्यासह घेऊन जात असे. त्यामुळे ‘तू वेळेत येत नाहीस’, असे मला त्यांच्याकडून सांगितले जायचे.

४ ई ३. साधकांच्या चुकांविषयी त्यांच्याशी बोलतांना सहजता न रहाणे, यासाठी स्वतः करण्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्य न रहाणे

सेवाकेंद्रातील साधकांकडून काही चुका झाल्या, तर माझ्याकडून त्या स्वीकारल्या जायच्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना सहजता रहायची नाही. यासाठी सद्गुरु स्वातीताईंनीही प्रयत्न करायला सांगितले. ‘प्रयत्न करूया’, असे ठरवायचे; पण प्रयत्नांमध्ये सातत्य नसायचे. प्रयत्न होत नाहीत; म्हणून परत स्वतःवरच चिडायचे.

४ ई ४. इतरांच्या स्वभावदोषांकडे पाहिले गेल्याने ताण येणे

साधकांकडून काही चुका झाल्या की, काही वेळा त्यांना प्रेमाने सांगितले जायचे; पण काही वेळा माझी पुष्कळ चिडचिड व्हायची. ‘माझ्याकडून ही चूक कशी झाली ? ही चूक होऊ नये, यासाठी काय प्रयत्न करायला हवे होते ?’, असे विचार मनात यायचे. त्यात साधकांचा विचार अल्प असायचा. माझ्याकडून इतरांचे स्वभावदोष पहाण्याचा भाग व्हायचा. त्यामुळे मला ताण येत होता.

 

५. घडणारे काही प्रसंग या जन्मातील असतील
असे नाही, तर ते गेल्या अनेक जन्मांतील असल्याचे लक्षात येणे

नंतर काही प्रसंग घडल्यास माझ्या लक्षात येऊ लागले की, ‘हे या जन्मातील कुठे आहेत ? हे अनेक जन्मांतील प्रसंग आहेत. देव आपल्या कामात कधी काही चुकत नाही. तो स्वीकारेपर्यंत चूक लक्षात आणून देत रहातो. आपण आपल्या सेवेत कधी चुकायला नको.’ त्यानंतर माझ्या प्रयत्नांना बळ मिळायचे.

 

६. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या सत्संगांचा झालेला लाभ

६ अ. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या
समवेत सेवेची संधी मिळाल्यामुळे मीपणा नष्ट होण्यास साहाय्य होणे

दळणवळण बंदीच्या काळात (‘लॉकडाऊन’मध्ये) प्रसारसेवेसाठी बाहेर, केंद्रांत जाणेच बंद झाले. तेव्हा साधकांशी सेवेच्या संदर्भात भ्रमणभाषवरून बोलणे आणि भ्रमणभाष वरूनच सत्संग घेणे आरंभ झाले. आधी जिल्ह्यातील केंद्रांत येण्या-जाण्यासाठी प्रवासाला वेळ लागायचा; पण आता तो वेळही देवाने वाया जाऊ नये’, असेच नियोजन केले. गुरुदेवांच्या कृपेमुळे या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडयेताईंचे वास्तव्य सोलापूर आश्रमात असल्याने त्यांच्या समवेत सेवेची आनंददायी संधी अखंड मिळू लागली. त्यामुळे ‘माझा ‘मी’पणा नष्ट करण्यास भगवंतानेच आरंभ केला आहे’, असे जाणवले. त्यामुळेही ‘स्व’चे अस्तित्व न्यून होऊ लागले.

६ आ. कर्तेपणा सोडून इतरांना सहभागी करून घेऊन सेवा करणे

सद्गुरु स्वातीताईंनीही सेवाकेंद्रातील सेवांचे वर्गीकरण करून दिले. त्यामुळे जिल्ह्यातील सेवांना वेळ देता आला. तेव्हा स्वतः सेवा करून स्वतःचा कर्तेपणा वाढवण्यापेक्षा इतरांना सेवेत सहभागी करून घेतले. त्या वेळी ‘ते सेवा करणार नाहीत’, या विचारात न रहाता मी शरणागत होऊन ‘मी’पणा सोडायचे. त्या वेळी भगवंतच कार्यरत असायचा अन् सेवा व्हायची.

६ इ. देवाला सर्व कळत असल्याने चूक झाली नसतांनाही
ती स्वीकारली गेल्यास स्वतःकडे न्यूनपणा घेतलेला देवाला आवडत असल्याचे सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगणे

यापूर्वी माझ्याकडून काही चूक झाली नसेल, तरी ‘तू चूक केली आहेस’, असे कोणीही सांगितल्यावर मला चूक स्वीकारता यायची नाही. ‘मी प्रयत्न केले आहेत आणि साधकांनीही मी प्रयत्न केल्याचे पाहिले आहे, तर मी उगाच चूक कशाला स्वीकारू ?’, या विचाराने माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. त्यात माझा बराच वेळही जायचा. याविषयी सद्गुरु स्वातीताईंनी सांगितले, ‘‘तू चुका स्वीकारल्यास, तर तुझी काय हानी होणार आहे ? तुझे प्रयत्न देवापर्यंत जात आहेत. देवाला न्यूनपणा घेतलेला आवडतो.’’ सद्गुरु राजेंद्र शिंदेदादांनीही सांगितले, ‘‘तुम्ही चूक न स्वीकारून देवाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी गमावलीत.’’ ‘गुरुमाऊली, ‘प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती मी स्वीकारण्यासाठी भगवंत आला आहे’, हा भाव तुम्हीच माझ्यात निर्माण केलात. त्यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली.

६ ई. चूक नसतांनाही इतरांनी चूक मांडल्यानंतर त्या साधकांची क्षमा मागून ती स्वीकारली जाणे

एकदा एका सत्संगात बोलणार असलेल्या वक्त्यांना त्या सत्संगाची ‘पोस्ट’ मी आदल्या दिवशी आणि त्या दिवशीही पाठवली होती; पण सत्संगाच्या आधी त्यांनी आश्रमातील साधकांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘दीपालीने मला सत्संगाची ‘पोस्ट’ पाठवली नाही.’’ तेव्हा मी पूर्वीची असते, तर माझ्या मनाचा संघर्ष झाला असता; पण तिथे ‘चूक झाली’; म्हणून ते स्वीकारूया. संत आणि सद्गुरु माझे आधीचे कर्जच नष्ट करत आहेत’, असा विचार करून स्वीकारल्यावर त्यात न अडकता त्या साधकांची क्षमा मागून मी सत्संगात सहभागी झाले.

६ उ. प्रत्येक गोष्ट सूक्ष्मातून गुरुदेवांकडे पोचत असल्याचे जाणवणे

दुसर्‍या दिवशी व्यष्टी साधनेचा आढावा होता. त्यात सद्गुरु स्वातीताईंनी अचानक माझे कोणतेही सूत्र नसतांना सांगितले, ‘‘दीपालीने स्वीकारण्याचा भाग चांगला केला.’’ तेव्हा ‘गुरुदेवांकडे सगळे पोचते’, असे मला अनुभवता आले.

 

७. मनाची स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आणि झालेले पालट

७ अ. मनमोकळेपणा आणि सहजता वाढणे

पुढे मी सत्संगामध्ये स्वतःच्या चुका सांगू लागले. सद्गुरु स्वातीताईंनाही स्वतःच्या चुका सांगण्याचा प्रयत्न गुरुकृपेने करू लागले. त्यामुळे गुरुदेवा, तुम्हीच प्रतिदिन माझ्या मनाची स्वच्छता करवून घेतलीत. त्यामुळे मनाची घुसमट अल्प झाली. चुका सांगणे चालू झाल्यावर माझ्यात मनमोकळेपणा आणि सहजता वाढली.

७ आ. पूर्वी केवळ स्वतःच्या सेवा आणि कृष्ण अशी साधना
होणे अन् समष्टी साधना करतांना सर्वत्र कृष्णतत्त्व अन् गुरुतत्त्व पाहिले जाणे

पूर्वी ‘स्वतःच्या सेवा आणि कृष्ण’ असेच माझे विश्व असायचे. सेवा करतांना ‘कृष्णाशी बोलणे आणि त्याला सर्वकाही सांगणे’ असे असायचे; पण ‘आता सर्वत्र कृष्णतत्त्व आणि गुरुतत्त्वच कार्यरत आहे. त्यामुळे सगळ्यांकडे पाहिल्यावर हेच माझे सर्वस्व आहे’, असा माझा भाव असतो. ‘साधक, वाचक, धर्मप्रेमी आणि आश्रमातील प्रत्येक वस्तू यांमध्ये गुरुदेवच आहेत’, हे मला पहाता येऊ लागले आहे. या सार्‍यांवर भरभरून प्रेम करणे, म्हणजेच कृष्णाची भक्ती करणे’, असे प्रयत्न करण्यास आरंभ झाला.

७ इ. ‘स्वतःला घडवायचे आहे’, या विचारातून प्रयत्न झाल्याने सर्व स्वीकारता येऊन आनंद अनुभवता येणे

आता ‘नियोजनात जे ठरवले आहे, त्याप्रमाणे मला करायचे आहे. त्यातील आनंद मला घ्यायचा आहे. त्यातून शिकायचे आहे आणि मला साधनेसाठी घडायचे आहे’, या दृष्टीने प्रयत्न झाल्यामुळे मला आनंदात रहाता येऊ लागले. काही पालट झाल्यास ‘गुरुदेवांनी जसे नियोजन दिले आहे, तसे नियोजन मला करायचे आहे’, असा भाव ठेवला. त्यामळे ती परिस्थिती स्वीकारता येऊन मला आनंद अनुभवता येऊ लागला.

७ ई. श्रीकृष्णाच्या समष्टी रूपाच्या समवेत आनंद मिळू लागणे

नंतर ‘हे अवतीभोवतीचे साधकच कृष्ण आहेत’, असे कधी झाले, ते मला कळलेच नाही. कृष्णाच्या एका रूपाशीच बोलण्यातल्या आनंदापेक्षा या व्यापक समष्टी रूपाच्या समवेत आनंद मिळू लागला.

७ उ. उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने
बोलल्यामुळे त्यांच्यातील गुण पहाता येऊन एकमेकांमधील दरी नष्ट होणे

पुढे उत्तरदायी साधकांशी बोलल्यामुळे साधक आणि माझ्यातील दरी पूर्णतः नष्ट झाली. मनातील दूषितपणा पूर्णतः नाहीसा झाला. त्यांच्यात गुरुरूप पहाता येऊन माझ्या मनात त्यांच्याविषयी अपार कृतज्ञताभाव भरून आला. मला त्यांच्यातील सर्व दैवी गुणांचे दर्शन होऊ लागले. प्रत्येक गोष्ट, मनाची स्थिती आणि अडचणी त्या त्या प्रसंगानंतर मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलता येऊ लागल्या. ‘गुरुदेवा, या प्रसंगांतून तुम्ही पुष्कळ शिकवलेत. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अपुरीच आहे.’

७ ऊ. पूर्वी मनाविरुद्ध प्रसंग घडल्यास रामनाथीला जाण्याचा विचार येणे;
मात्र नंतर सोलापुरात रामनाथी आश्रम सिद्ध करण्याचा सकारात्मक विचार होणे

यापूर्वी काही मनाविरुद्ध प्रसंग घडल्यास किंवा चुका झाल्या की, ‘आपण रामनाथी आश्रमात जाऊया’, असा विचार यायचा. ‘आता इथेच रामनाथी आहे. सोलापूर जिल्ह्यातच रामनाथी आश्रम सिद्ध करायचा आहे’, असा विचार होऊ लागला.

७ ए. सर्व वयांच्या साधकांबद्दल आईच्या ममतेने प्रेम वाटू लागणे

आता वयाने मोठे असलेले साधक आणि वयाने माझ्यापेक्षा लहान असलेले साधक यांच्याविषयी माझ्या मनात पुष्कळ प्रेम दाटून येते. हे ‘सर्व साधक म्हणजे मला गुरुदेवांनी दिलेली लहान बाळेच आहेत’, असे वाटून त्यांच्याविषयी पुष्कळ प्रेम वाटते. कोणाविषयी मनात काहीच राहिले नाही. सगळ्यांकडे पाहिले की, भरभरून प्रेमच वाटते. कोणाकडून काहीतरी राहिले, तर उगाच चिडचिड न होता ‘त्यांना कसे साहाय्य करू ?’, हाच भाग रहातो. गुरुमाऊली ही सारी आनंददायी लीला/कृपा तुम्हीच रचली आहे अन् मला आनंद देत आहात.

 

८. समष्टी स्तरावर झालेले लाभ

८ अ. सेवेत चुका झाल्यास त्यातून वाईट वाटण्याचा भाग अल्प होऊन त्यातून शिकण्याचा प्रयत्न वाढणे

सेवा करतांना काही चुका झाल्या, तर आधी भावनाशील व्हायचे आणि वाईट वाटायचे; पण नंतर ‘यात कसे प्रयत्न करूया ?’, असा विचार होऊ लागला. ‘सर्वकाही गुरुदेवच करवून घेत आहेत’, असा विचार होऊ लागला. त्यानंतर ‘समष्टीला आणखी आनंद कसा देता येईल?’, असे प्रयत्न होऊ लागले.

८ आ. साधक आणि साधिका यांचे व्यष्टी-समष्टी नियोजन करवून
घेतल्यामुळे त्यांचा ताण अल्प होऊन त्यांच्याकडून सेवेसाठी वेळ दिला जाणे

काही साधक ‘वेळच नाही’, असे म्हणायचे. त्यामुळे त्यांची समष्टी सेवा आणि दैनंदिन वैयक्तिक सेवा यांच्या नियोजनाविषयी चिंतन करवून घेऊन त्यांचे नियोजन केले गेले. साधिकांना प्रतिदिनचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन करून दिले गेले. साधिकांना ‘अल्प वेळेत घरातील सेवा पूर्ण होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ते सांगितले गेले. उदा. भाजी शिजत ठेवली, तर तेवढ्या वेळेत खण, शीतकपाट आणि स्वयंपाक खोलीतील अन्य आवरणे, असे केल्यास यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही, हे सांगितले. त्यामुळे  ‘स्वतःचा कितीतरी वेळ व्यष्टी आणि समष्टी साधनेला देता येऊ शकतो’, हा भाग बर्‍याच साधकांच्या लक्षात येऊ लागला आणि साधकांचे नियोजन तणावविरहित होऊ लागले. त्यामुळे मलाही आनंद वाटू लागला. त्या वेळी ‘गुरुदेव, तुम्हीच मला त्यांच्या स्थितीला घेऊन जात होतात’, असे वाटले.

८ इ. अन्य जिल्ह्यांतील दायित्व असणार्‍या
साधकांशी प्रसारसेवेतील त्यांच्या प्रयत्नांविषयी बोलून त्यातून शिकता येणे

प्रसाराच्या सेवेसाठी कसे प्रयत्न करायचे ? यासाठी अन्य जिल्ह्यांतील दायित्व असणारे साधक कसे प्रयत्न करत आहेत ? हे दायित्व असणार्‍या साधकांशी बोलून इथेही तसे करण्यासाठी प्रयत्न चालू केल्याने आनंद मिळू लागला. त्यामुळे साधकांकडून पुष्कळ शिकता आले. त्यामुळेही उत्साह वाढला. तसे केल्यावर भगवंत आणखी पुढील प्रयत्न सुचवायचा. त्यामुळेही पुष्कळ आनंद मिळू लागला.

८ ई. सर्व साधकांमध्ये भगवंताचे रूप पाहून
त्यांच्याप्रती प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होऊन
‘साधकांना आनंद मिळावा’, याचा ध्यास लागणे आणि त्यातून प्रेमभाव वाढणे

‘हे गुरुमाऊली, माझे सर्वस्व साधकरूपी भगवंतच आहे’, असे वाटून आता या साधकरूपी भगवंताप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली आहे. माझ्याकडून त्या समष्टी भगवंताच्या चरणी सूक्ष्मातून नमस्कार केला जायचा. त्यांनाच मला तुमची सेवा कशी करायची, हे शिकवा’, अशी प्रार्थना व्हायची. ‘गुरुमाऊली मला सातत्याने समष्टी रूपातूनच शिकवत आहे’, असा विचार मनात येऊन आनंद घेता येऊ लागला. प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत. ‘काही झाले, तरी साधकांना साहाय्य कसे करता येईल ? प्रसारातील सर्वांना सत्संग कसा मिळेल ? चांगले प्रयत्न करणारे वाचक, हितचिंतक आणि युवासाधक यांना सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न कसे वाढतील ?’, असा विचार होऊ लागला. ‘त्यांना आनंद झाला की, माझा आनंद आपोआप वाढत असे. वेगळे काहीच करावे लागत नाही’, हे मी अनुभवले. आता सगळ्यांविषयी सतत प्रेमच वाटते.

‘गुरुमाऊली, आपल्या कृपेनेच मला हे लिखाण करता आले. ‘काही राहिले असल्यास सांगावे’, हीच आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना ! ‘गुरुमाऊली, हे सगळे तुम्हीच मला अनुभवण्यास दिले’, याबद्दल तुमच्या पावन चरणकमली कोटीशः कृतज्ञता. या दगडाला तुमच्या पावन चरणांचा स्पर्श झाला; म्हणून आनंद झाला’, असेच मला वाटते.

गुरुदेवा, किती आनंददायी कृपा करता तुम्ही ।
सर्वच तुम्ही, सर्वत्रची तुम्ही; म्हणूनच सर्वत्रची जाहला आनंद ।।’

-कु. दीपाली मतकर (आताच्या पू. (कु.) दीपाली मतकर), सोलापूर

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment