विदर्भस्तरीय २ दिवसांचे साधनावृद्धी शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !

व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे, तर स्वभावदोष
आणि अहं हे साधनेतील अडथळे ! – धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

डावीकडून श्री. सुनील घनवट,  पू. अशोक पात्रीकर आणि शिबिरात मार्गदर्शन करतांता श्री. चेतन राजहंस

अमरावती – ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना ही साधनेची दोन अंगे आहेत. ती एकमेकांवर अवलंबून आहेत. व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे. जर व्यष्टी साधना अल्प असेल, तर त्याचा साधनेवर परिणाम होतो. स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील मोठे अडथळे आहेत, ते घालवण्यासाठी अंतर्मनाला स्वयंसूचनेद्वारे अयोग्य गोष्टीची जाणीव करून योग्य दृष्टिकोन देणे आवश्यक आहे. व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे संतुलन राखण्यासाठी ध्येय घेऊन प्रयत्न करा, असे अनमोल मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. १३ आणि १४ फेब्रुवारी या दिवशी पार पडलेल्या विदर्भस्तरीय साधकांसाठी घेण्यात आलेल्या साधनावृद्धी शिबिरात ते बोलत होते.

 

मनमोकळेपणा हा सर्व गुणांचा राजा आहे !
– चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मनमोकळेपणे बोलल्याने ताण अल्प होतो, समस्यांवर उपाय मिळून त्या सुटतात, आत्मविश्वास वाढतो, पूर्वग्रहदूषितपणा निघून जातो, अहंचा लय होतो, साधनेचे योग्य दृष्टिकोन मिळतात, सुस्पष्टता येते, शिकण्याची वृत्ती आणि कार्याची फलनिष्पत्ती वाढते. त्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी मनमोकळेपणे बोलणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ‘मनमोकळेपणा’ हा सर्व गुणांचा राजा आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. या वेळी त्यांनी मनमोकळेपणे न बोलण्याची कारणे, परिणाम आणि त्यावरील उपाय तसेच व्यक्तीमत्त्वविकास, गुणकौशल्ये वाढवणे इत्यादींविषयी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

 

कार्याची सुस्पष्टता असते, त्या वेळी
आत्मविश्वास असल्याने फलनिष्पत्ती वाढते !
– सुनील घनवट महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सेवाकार्य करतांना सुस्पष्टता नसल्यास मनामध्ये द्वंद्व निर्माण होऊन त्याचा परिणाम कार्यावर होतो, जर कार्याची सुस्पष्टता असेल, तर आत्मविश्वास असल्याने फलनिष्पत्ती वाढते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचा उद्देश, ध्येयधोरणे, जिल्हास्तरीय कार्यपद्धती, अडचणीवरील उपाययोजना आणि ‘समूह निर्णयप्रक्रिया’ इत्यादी सूत्रांविषयी मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन सौ. गौरी जोशी आणि सौ. भक्ती चौधरी यांनी केले. शिबिराचा प्रारंभ शंखनादाने, तर समारोप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कृतज्ञतागीताच्या दृश्यपटाने करण्यात आला.

 

हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी खारीचा नव्हे, तर सिंहाचा
वाटा उचला ! – सद्गुरु (सुश्री (कु.))स्वाती खाडे, सनातन संस्था

सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये

राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ असे १८ प्रकारचे जिहाद देशामध्ये चालू आहेत. त्यामुळे हिंदु संस्कृती टिकण्यासाठी भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे. त्यासाठी खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचला, असे आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वातीताई खाडे यांनी ऑनलाईन माध्यमातून केले.

या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘हिंदु राष्ट्राचे शिवधनुष्य सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उचलले आहे. शिस्तप्रिय साधकच हिंदु राष्ट्र पाहू शकतो. हिंदु राष्ट्राच्या कार्याकरिता व्यष्टी आणि समष्टी साधना होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार आहे; कारण संघर्ष हा सत्यालाच करावा लागतो. हिंदु राष्ट्राची पहाट पहायची असेल, तर संघर्ष करावाच लागणार आहे.’’

Leave a Comment