पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

हिंदु धर्मातील ज्ञान सर्वत्र पोचवण्याचे सनातनचे कार्य अतिशय चांगले ! – श्री. सुनील कांबळे

आमदार सुनील कांबळे यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. सागर निंबाळकर

रामनाथी (फोंडा, गोवा) – भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते. सनातन आश्रमातील साधक श्री. सागर निंबाळकर यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्मविषयक कार्य, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे कार्य आदींविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली.

सनातनच्या आश्रमात चालणारे कार्य पाहून आमदार श्री. सुनील कांबळे म्हणाले, ‘‘आश्रमात चालू असलेले कार्य उत्तम आहे. आश्रमात हिंदु धर्मातील ज्ञान सर्वत्र पोचवण्याचे सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. आश्रमातील साधकांचा सेवाभाव पुष्कळ चांगला आहे. प्रसारसाहित्य करतांना समाजाला सात्त्विकतेकडे नेण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, तो स्तुत्य आहे.’’

या वेळी ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी आमदार श्री. कांबळे यांना भेटवस्तू आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यासह डॉ. श्रीपाद ढेकणे यांनाही भेटवस्तू आणि ‘धर्मशिक्षण फलक’ ग्रंथ भेट देऊन त्यांचाही सत्कार केला.

या वेळी डॉ. श्रीपाद ढेकणे यांनीही ‘आश्रम पाहून अत्यंत प्रसन्नतेची अनुभूती आली, तसेच आश्रमातून हिंदुत्वाविषयी बर्‍याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आम्हाला आनंद मिळाला’, असा अभिप्राय दिला. अशाच प्रकारचा अभिप्राय उपस्थित अन्य कार्यकर्त्यांनीही दिला.

Leave a Comment