रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ४)

Article also available in :

अनुक्रमणिका

१६.१२.२०२१ या दिवशी आणंद, गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. त्या भाषणावरून बनवलेल्या लेखाच्या या शेवटच्या भागात आचार्य देवव्रत आणि त्यांचे सहकारी यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी केलेले कार्य पाहूया !

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

२१. आचार्य देवव्रत आणि त्यांचे सहकारी यांनी नैसर्गिक शेतीवर केलेले कार्य

२१ अ. हिमाचल प्रदेशातील सफरचंद
उत्पादक शेतकर्‍यांचे संघटन करून त्यांच्याकडून नैसर्गिक शेती करवून घेणे

गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत

‘आदरणीय राष्ट्रपतींनी (राज्यपाल म्हणून) माझ्यावर (आचार्य देवव्रत यांच्यावर) हिमाचल प्रदेशचे उत्तरदायित्व सोपवले तेव्हा मी तिथे शेतीचा अनुभव सोबत घेऊन गेलो. सफरचंदावर १५ – १६ रासायनिक फवारण्या होत आहेत, हे मी हिमाचलमध्ये पाहिले. जे फळ आरोग्यदायी म्हणून खाल्ले जाते, तेच या फवारणीमुळे विष बनत होते. मी लोकांच्या शेतात जात असे. शेतकर्‍यांना एकत्र करत असे. तेव्हापासून हिमाचलमध्ये नैसर्गिक शेतीविषयीची मोहीम चालू झाली. २ वर्षांत शासनाचे सहकार्य घेऊन मी ५० सहस्र शेतकर्‍यांना नैसर्गिक शेती चळवळीशी जोडले. त्या काळात जेव्हा मी याविषयी प्रबोधन केले, तेव्हा डॉ. राजेश्‍वर चंदेल आणि श्री. राकेश कंवर (आय.ए.एस्. अधिकारी) हे दोघेही माझ्या पाठी ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी‘आम्ही या राज्यात ही चळवळ यशस्वीपणे राबवू’, असे आश्वासन दिले. डॉ. राजेश्‍वर चंदेल हे शास्त्रज्ञ आहेत. सध्या ते हिमाचल प्रदेशमधील नौनी येथील कृषी विद्यापिठात शास्त्रज्ञ आहेत. या विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी माझ्यानंतर ही परंपरा थांबू दिली नाही आणि आज हिमाचल प्रदेशात दीड लाखांहून अधिक शेतकरी आणि बागायतदार नैसर्गिक शेती करत आहेत, तसेच त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. पाण्याचा वापर न्यून झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शरिरांवर रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे दुष्परिणाम होत असत, ते आज ही फवारणी करावी लागत नसल्याने आनंदी आहेत.

२१ आ. आंध्रप्रदेशात नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याने
पाण्याची न्यूनता असलेल्या भागांतही वर्षाला ३ – ३ पिके घेता येणे

आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव टी. विजयकुमार यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आंध्र प्रदेशातील ५ लाख शेतकर्‍यांना जोडले. या भागात जिथे पाणी नाही, तिथे ते या नैसर्गिक शेतीतून आता वर्षाकाठी ३ – ३ पिकेही घेता येत आहेत.

२१ इ. कृषी शास्त्रज्ञांकरवी नैसर्गिक शेतीवर संशोधन करवून घेणे

तुम्हाला नैसर्गिक शेतीचे प्रकल्प पाहून आश्‍चर्य वाटेल. ‘हे असे कसे होऊ शकते ?’, असे प्रश्न तुम्हाला पडू शकतील. (या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीच) आम्ही या प्रकल्पांमध्ये विविध शास्त्रज्ञांना, तसेच असंख्य शेतकऱ्यांना जोडले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे शोधनिबंध सिद्ध आहेत.

२१ ई. गुजरातमधील डांग जिल्हा हा
भारतातील पहिला १०० टक्के नैसर्गिक शेती असणारा जिल्हा घोषित होणे

कोरोनाच्या काळातही आम्ही गुजरातमध्ये २ लाख शेतकऱ्यांचे संघटन केले. येथील शेतकऱ्यांकडे २ लाख देशी गायी पोचवल्या असून गुजरात राज्यातील ‘डांग’ हा जिल्हा भारतातील पहिला १०० टक्के नैसर्गिक शेती असणारा जिल्हा म्हणून घोषित करण्याचा बहुमान गुजरात राज्याला मिळाला आहे. यामुळे आज मी पुष्कळ समाधानी आहे.

 

२२. नैसर्गिक शेतीमुळे भारतियांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल !

आजचा दिवस शेतकर्‍यांच्या, तसेच देशातील लोकांच्या जीवनात पालट करणारा ठरेल ! आज जागतिक तापमान वाढीचे (ग्लोबल वार्मिंगचे) मोठे आव्हान आहे. नैसर्गिक शेतीमुळे त्यातून तुमची सुटका होईल. आज पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन फिरावे लागते आहे. त्यापासूनही सुटका होईल. २० वर्षांपूर्वी आपण जसे कुठेही पाणी पिऊ शकत होतो, तसे आता होईल. जी देशी गाय केवळ पूजेसाठी चित्रांमध्ये राहिली होती, तिला आज घरोघरी मानाचे स्थान मिळत आहे. यामुळे लोकांचे आरोग्य सुरक्षित राहील.

 

२३. नैसर्गिक शेतीमध्ये विकतच्या सेंद्रिय खतांची आवश्यकताच नसणे

नैसर्गिक शेतीमध्ये शेतकर्‍याला खर्च काहीच नाही. या नैसर्गिक शेतीत सेंद्रिय खतांचीही आवश्यकता रहात नाही. त्यामुळे खते, त्यांचे कारखाने इत्यादी जो विस्तार चालू आहे, त्याची आवश्यकताच रहाणार नाही. शेतकर्‍याला खतांसाठी बाजारात जाण्याची आवश्यकताच नाही; कारण गाय त्याच्या घरात असते. गूळ शेतात बनवला जाऊ शकतो. शेतात डाळीचे पीक घेतले जाते. माती तर असतेच. हे सोडून नैसर्गिक शेतीला आणखी काहीच लागत नाही.

 

२४. म्हशींच्या किंवा विदेशी वंशाच्या गायींच्या शेणापासून जीवामृत बनवणे शक्य नसणे

नैसर्गिक शेतीची चळवळ प्रामाणिकपणे राबवायला हवी. यात गडबड केली, तर गुण येणार नाही. कोणी म्हणेल, ‘देशी गाईऐवजी म्हशीचे किंवा जर्सीसारख्या विदेशी गायींचे शेण घ्या’; पण असे केले, तर परिणाम मिळणार नाहीत. (शेतीसाठी पूरक जीवाणू असणे) हा गुणधर्म केवळ आणि केवळ देशी गायींच्या शेणामध्ये आहे. इतर कोणत्याही प्राण्याच्या विष्ठेत हा गुणधर्म आढळत नाही. आम्ही रस्त्यावर फिरणार्‍या देशी गायीच्या शेणाची चाचणी करून पाहिली. आम्हाला गोठ्यात बांधलेल्या देशी गायीच्या १ ग्रॅम शेणात ३०० कोटी जीवाणू आढळले, तर रस्त्यावर फिरणार्‍या भाकड गायीच्या १ ग्रॅम शेणात ५०० कोटी जीवाणू सापडले; कारण भाकड गायींची शक्ती दूध बनवण्यासाठी वापरली न जाता जीवाणू बनवण्यासाठी वापरली गेली. ‘नीमास्त्र’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘सूंठास्त्र’ ही नैसर्गिक शेतीमध्ये वापरली जाणारी नैसर्गिक कीटक प्रतिबंधक औषधे आहेत. कोणीही ही औषधे स्वतः बनवू शकतो. याविषयी माझ्या ग्रंथात माहिती दिलेली आहे.

 

२५. अत्यंत अल्प खर्चामध्ये भूमीची सुपीकता प्रचंड वाढवणारी नैसर्गिक शेती

माझ्या स्वतःच्या शेतात आता रोग नाही. माझे उत्पन्न वाढत आहे. या वर्षी माझ्या शेजाऱ्यांनी रासायनिक शेतीद्वारे भाताचे एकरी २८ ते ३० क्विंटल उत्पन्न घेतले आणि मी नैसर्गिक शेती करून एकरी सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न घेतले. माझा खर्च एकरी केवळ १ सहस्र रुपये आला आणि रासायनिक शेतीला १२ ते १४ सहस्र रुपये खर्च आला. हे केवळ एका पिकाच्या संदर्भात नसून सर्वच पिकांच्या संदर्भात असेच आहे. माझ्या भूमीची गुणवत्ता वाढली आहे. कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी माझ्या आणि शेजाऱ्यांच्या शेतीतील मातीचे परीक्षण केले. रासायनिक शेती असणाऱ्या शेजाऱ्यांच्या शेतातील मातीत १ ग्रॅमला ३१ लाख जीवाणू आढळले. या उलट नैसर्गिक शेती असणाऱ्या माझ्या भूमीच्या मातीमध्ये १ ग्रॅमला १६१ कोटी जीवाणू सापडले. आता तुम्हीच सांगा की, कोणती पद्धत जास्त उत्पन्न देईल ? नैसर्गिक शेती कि रासायनिक शेती ?

 

२६. भारतीय शेतकर्‍यांनो, भारतमातेला विषमुक्त
करण्यासाठी नैसर्गिक शेतीरूपी क्रांतीत सहभागी व्हा !

म्हणूनच मी भारतातील शेतकऱ्यांना आवाहन करतो. आदरणीय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तुम्हीही पुढे या. आज ही नैसर्गिक शेती करून शेतकरी स्वावलंबी झाला, तर माझा देश स्वावलंबी होईल. यातून प्रचंड मोठी क्रांती घडेल, याची मला निश्चिती आहे. या मोहिमेला जनआंदोलन बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया ! आपली माता असलेली ही भारताची माती विषमुक्त करूया ! धन्यवाद !

 

नैसर्गिक शेतीवरील आचार्य देवव्रत यांचा ग्रंथ सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध !

आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीचा सर्वांगिण परिचय करून देणारा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिला आहे. हा ग्रंथ पुढील मार्गिकेवर विनामूल्य उपलब्ध आहे.
मार्गिका : https://rajbhavan.gujarat.gov.in/Publication.aspx

Leave a Comment