रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

Article also available in :

अनुक्रमणिका

 

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग २)

१६.१२.२०२१ या दिवशी आणंद, गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. आतापर्यंत आपण ‘आचार्य देवव्रत रासायनिक आणि सेंद्रिय या शेतीपद्धतींकडून नैसर्गिक शेतीकडे कसे वळले, रासायनिक शेतीमुळे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली १०० एकर भूमी कशी नापीक झाली, तसेच जिवामृताच्या वापरामुळे नापीक भूमीतही भरपूर उत्पन्न कसे आले’, हे पाहिले. यापुढील भाग या लेखात पाहू !

 

१७. भूमीची सुपीकता ही तिच्यातील शेतीसाठी
उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यावर आधारित असणे

भूमीमध्ये फॉस्फरस, यशद (झिंक), पोटॅश, तांबे यांसारखे अनेक खनिज घटक असतात; परंतु हे घटक स्वतःहून वनस्पतीला अन्न म्हणून उपलब्ध होत नाहीत. गांडूळ, तसेच भूमीतील सूक्ष्म जीवाणू त्या घटकांपासून अन्न निर्माण करतात आणि वनस्पतींच्या मुळांना देतात. याचाच अर्थ शेतीत जितके सूक्ष्म जीवाणू असतील, तितका सेंद्रिय कर्ब वाढते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जेवढे वाढते, तेवढे भूमीचे आरोग्य चांगले राहते. भूमीचे आरोग्य जितके चांगले, तितके उत्पन्न वाढते. असे हे सरळ सूत्र आहे.

 

१८. सेंद्रिय शेतीतील विदेशी गांडूळ आणि
नैसर्गिक शेतीतील भारतीय गांडूळ यांतील फरक

यूरिया, डीएपी यांसारख्या रासायनिक खतांच्या वापरामुळे गांडूळ घाबरतात आणि ते भूमीत १५ फूट खाली जाऊन लपतात. जेव्हा मातीत घनजीवामृत मिसळले जाते पसरते, तेव्हा त्याचा गंध भूमीत पसरतो. त्यामुळे हे गांडूळ पुन्हा वर येतात आणि त्यांचे कार्य चालू करतात. भारतीय गांडूळ शेण, काष्ठ (काडी-कचरा) , तसेच मातीही खातात; मात्र सेंद्रिय शेतीत जे विदेशी गांडूळ वापरले जातात, ते माती खात नाहीत. केवळ शेण आणि काष्ठ खातात. हे विदेशी गांडूळ १६ अंश सेल्सिअसपेक्षा अल्प आणि २८ अंश सेल्सिअसच्या वरच्या तापमानांत जिवंत राहू शकत नाहीत. भारतीय गांडूळ मात्र हिमाच्छादित टेकड्यांपासून वाळवंटांपर्यंत एकसारखेच काम करतात. ही सर्व देवाची व्यवस्था आहे !

 

१९. भारतीय गांडुळांपासून शेतीला होणारे लाभ

१९ अ. गांडुळांच्या कार्यामुळे भूमीतील झाडांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांमध्ये वाढ होणे

गांडूळ भूमीत एक छिद्र करून थेट दहा फुटांपर्यंत आत जातात आणि दुसर्‍या छिद्रातून वर येतात. जातांना ते छिद्र आपल्या घामाने (शरीरातून निघणार्‍या विशिष्ट द्रव पदार्थाने) लिंपत जातात. त्यामुळे छिद्र लवकर बंद होत नाही. या छिद्रातून भूमीला प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. गांडूळ भूमीतील खनिजे खातात आणि विष्ठेच्या रूपात वनस्पतीच्या मुळांना देतात. गांडुळांच्या विष्ठेत सामान्य मातीपेक्षा ५ पट अधिक नत्र (नायट्रोजन), ९ पट अधिक स्फुरद (फॉस्फरस) आणि ११ पट अधिक पालाश (पोटॅश) असते. (नत्र, स्फुरद आणि पालाश ही झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली भूमीतील मूलभूत द्रव्ये आहेत. – संकलक)

१९ आ. गांडुळांच्या कार्यामुळे भूपृष्ठाखालील पाण्याच्या पातळीत वाढ होणे

जेव्हा शेतात नैसर्गिक शेती होते, तेव्हा त्या शेतात एकरी लक्षावधी गांडूळ असतात. ‘हे गांडूळ रात्रंदिवस कार्यरत राहतील, तर ते शेतकर्‍यासाठी फुकटात किती खत तयार करत असतील’, याची कल्पना करा ! गंमत म्हणजे हे गांडूळ भूमीमध्ये एवढी छिद्रे निर्माण करतात की, ती मोजलीही जाऊ शकत नाहीत. पाऊस पडला की, पावसाचे पाणी या छिद्रांतून थेट भूमीच्या पोटात जाते आणि नैसर्गिकपणे जल संधारण होते. जल संधारणासाठी आपण कोट्यवधी रुपये व्यय करत असतो; पण गांडूळ हे कार्य फुकटात करतात. ही नैसर्गिक शेती सर्वच ठिकाणी केली, तर पावसाचे पाणी भूमीत चांगल्या रितीने साठवले जाईल आणि भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी आपोआप वाढेल. असे हे एक आश्‍चर्य आहे !

१९ इ. देशी आणि विदेशी गांडूळ यांमधील फरक

‘केवळ भारतीय देशी गांडूळच शेतकर्‍याचा खरा मित्र आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जाणारे गांडूळ खत (Vermicompost) बनविण्यासाठी विदेशी गांडूळ भारतात आणले गेले. ‘सेंद्रिय शेती’त ‘इसेनिया फेटिडा (Eisenia Foetida)’ हे विदेशी गांडूळ वापरले जातात. हे विदेशी गांडूळ १६ अंश सेल्सिअसपेक्षा अल्प आणि २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानांत जिवंत राहू शकत नाहीत. हे गांडूळ केवळ अर्धवट कुजलेले काष्ठ पदार्थ (पालापाचोळा, शेण इत्यादी) खातात. माती खात नाहीत. भारतीय गांडूळे मात्र हिमाच्छादित टेकड्यांपासून वाळवंटांपर्यंत एकसारखेच काम करतात. आता संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, विदेशी गांडुळांच्या विष्ठेत ‘आर्सेनिक’, पारा, शिसे यांसारख्या विषारी धातूंचे अंश असतात आणि शेतात ‘व्हर्मीकंपोस्ट’ (विदेशी गांडुळांची विष्ठा असलेले खत) वापरल्याने ते विषारी अंश वनस्पतींतून मानवी शरिरात जाऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीद्वारे ‘व्हर्मीकंपोस्ट’ घालून पिकवलेले धान्य ‘विषमुक्त’ असू शकत नाही.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२१.८.२०२२)

 

२०. नैसर्गिक शेतीतील आच्छादन तंत्र आणि त्याचे लाभ

२० अ. आच्छादनामुळे पाण्याची बचत होणे

नैसर्गिक शेतीचा आणखी एक महत्त्वाचा भाग, म्हणजे ‘आच्छादन’. शेतात जे काही गवत असेल, ते जाळू नका. (त्याचे आच्छादन करा, म्हणजे ते कापून शेतात पसरा.) आज आपण (गवत जाळून) प्रदूषण पसरवत आहोत. मी एक पेंढासुद्धा (गवताचा गुच्छसुद्धा) जाळत नाही. मी तर माझ्या शेतात इतरांकडूनही गवत आणून त्याचे आच्छादन करवतो. दोन रोपांच्या मध्ये रिकामी जागा सोडू नका. त्यात गवत पसरा. (याला आच्छादन म्हणतात.) हे गवताचे आच्छादन वातावरणातील पाण्याचा अंश खेचून घेते आणि भूमीचा ओलावा टिकवून ठेवते. यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये ५० टक्के पाण्याचा वापर न्यून होतो.

२० आ. जागतिक तापमानवाढीच्या (ग्लोबल वार्मिंगच्या) समस्येवर आच्छादन हा एक उपाय असणे

जेव्हा पृथ्वीचे तापमान ३५ अंश सेल्सिअस असते, तेव्हा मातीतील सेंद्रिय कर्ब मोकळा होऊन हवेत पसरतो आणि तो जागतिक तापमान वाढीला (ग्लोबल वार्मिंगला) कारण ठरतो. जर भूमी गवताने झाकलेली असेल, तर तो सेंद्रिय कर्ब भूमीतच राहतो आणि त्यामुळे भूमीची सुपीकता वाढते.

२० इ. आच्छादनामुळे शेतातील देशी गांडुळांच्या कार्यात वाढ होणे

गांडूळ दिवसा काम करत नाहीत; कारण दिवसा ते भूपृष्ठावर आले, तर पक्षी त्यांना उचलून नेतात. गांडुळांना स्वतःच्या मृत्यूची भीती असते; म्हणून ते दिवसा भूमीच्या आत लपून राहतात. जेव्हा आपण आच्छादन करतो (गवताने भूमी झाकून टाकतो), तेव्हा गांडुळांना अंधार मिळतो आणि पक्ष्यांनाही ते दिसू शकत नाहीत. त्यामुळे गांडूळ रात्रंदिवस काम करतात. दिवसाही काम, रात्रीही काम ! देवाने हा विना मोबदला काम करणारा मजूर शेतकर्‍यासाठी पाठवला आहे.

२० ई. शेतातील सूक्ष्मजीवाणूंद्वारे आच्छादनाचे खतामध्ये रूपांतर होणे

शेतात जे सूक्ष्म जीवाणू असतात, त्यांचे आच्छादन हे एक अन्न आहे. जीवाणू ते खाऊन त्याचे खतात रूपांतर करतात आणि जमीन सुपीक बनवतात.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ४)

Leave a Comment