कर्नाटक राज्यातील मंदिरांचा इतिहास

अनुक्रमणिका

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दैवी दौर्‍याचा वृत्तांत !

‘मार्च २०२० पासून संपूर्ण भारतात ‘कोरोना’ महामारीमुळे सगळेच त्रस्त होऊ लागले. १ जून २०२० या दिवशी दळणवळण बंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले. त्यानंतर सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तीर्थक्षेत्रांना जाऊन तेथे सर्व साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी.’’ त्यानुसार ३.६.२०२० या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दैवी प्रवासाला आरंभ झाला. गुरुपौर्णिमा, ५.७.२०२० या दिवसानंतर सप्तर्षींनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना कर्नाटक राज्यातील काही मंदिरांत दर्शनाला जायला सांगितले. सप्तर्षींनी सांगितल्यानुसार हा दैवी प्रवास करतांना घडलेल्या घटना आपण जाणून घेऊया.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेले कटीलू येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिर आणि उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

 

१. श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर,कटीलू, दक्षिण कन्नड, कर्नाटक.

१ अ. श्री दुर्गापरमेश्वरी मंदिराचा इतिहास

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नंदिनी नदीच्या काठी ‘कटीलू’ या नावाचे गाव आहे. नंदिनी नदीच्या मध्यभागी एका खडकावर श्री दुर्गापरमेश्वरी देवीचे मंदिर आहे. सप्तर्षींनी केलेल्या प्रार्थनेनुसार ‘अरुणासुरा’चा वध करण्यासाठी आदिशक्ती जगदंबेने भ्रमराचे (भुंग्याचे) रूप धारण केले. नंदिनी नदीच्या मध्यभागी एका मोठ्या दगडावर देवीने अरुणासुराचा वध केला. तो दगड आजही पहायला मिळतो. त्याला ‘रक्तेश्वरी दगड’, असे म्हटले जाते.

भुंग्याच्या रूपात असलेल्या देवीचे रूप रौद्र होते. सप्तर्षींनी तिला सौम्य रूप धारण करण्याची प्रार्थना केली. त्यावर देवीने ‘दुर्गा परमेश्वरी’ हे तारक रूप धारण केले. एका शिवलिंगाच्या रूपात देवी या ठिकाणी अंतर्धान झाली.

कटीलू येथे श्री दुर्गापरमेश्वरी देवीने अरुणासुराचा वध केलेला रक्तेश्वरी दगड आणि समोर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

२. श्री मंजुनाथेश्वर मंदिर,धर्मस्थळ, दक्षिण कन्नड, कर्नाटक.

२ अ. धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिराचा इतिहास

अनुमाने ८०० वर्षांपूर्वी अण्णप्पा स्वामी नावाच्या एका शिवभक्ताने धर्मस्थळ येथे शिवलिंगाची स्थापना केली. त्याला ‘मंजुनाथेश्वर’ असे नाव पडले. गेल्या ३०० वर्षांपासून धर्मस्थळ येथील जैन पंथीय हेग्गडे परिवार या मंदिराचे धर्मकर्ता आहेत. प्रस्तुत हेग्गडे परिवाराचे प्रमुख श्री. वीरेंद्र हेग्गडे हे धर्मस्थळाचे धर्माधिकारी म्हणून ओळखले जातात. गेल्या १०० वर्षांत कर्नाटक आणि दक्षिण भारतातील अनेक भाविकांना धर्मस्थळ श्री मंजुनाथेश्वराविषयी आलेल्या शेकडो अनुभूतींमुळे हे क्षेत्र आता प्रसिद्ध झाले आहे.

 

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान करतांना धर्मस्थळाचे धर्माधिकारी श्री. वीरेंद्र हेग्गडे

 

३. श्रीकृष्ण मंदिर, श्रीकृष्ण मठ, उडुपी, कर्नाटक.

३ अ. उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिराचा इतिहास

१३ व्या शतकात द्वैत सिद्धांताचे जनक श्री मध्वाचार्य यांना उडुपी येथे गोपीचंदनाच्या मोठ्या साठ्यात श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती सापडली. ‘हे ईश्वरी नियोजन आहे’, असे जाणून मध्वाचार्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एक सुंदर मंदिर स्थापन केले. हेच आताचे उडुपी येथील ‘श्रीकृष्ण मंदिर.’ श्रीकृष्णाची मूर्ती पूर्वाभिमुख होती. १६ व्या शतकात कनकदास नावाचे संत मंदिरात दर्शनासाठी आले. ते धनगर जमातीचे होते. मंदिराच्या पुजार्‍यांना वाटले, ‘ही एक सामान्य व्यक्ती आहे.’ पुजार्‍यांनी कनकदास यांना श्रीकृष्णाच्या मंदिरात जायला अनुमती नाकारली. कनकदासांनी मंदिराच्या मागच्या बाजूला (पश्चिमेला) जाऊन श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याची स्तुती केली. कनकदासाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले.

तेव्हा पूर्वाभिमुख असलेली मूर्ती पश्चिमेला वळली. मंदिराच्या आवारात छोटा भूकंप झाला आणि पश्चिमेकडील भिंतीला भोक पडले. त्यातून कनकदासांना श्रीकृष्णाचे दर्शन घेता आले. आता त्या ठिकाणी एक खिडकी बसवली आहे. ज्याला ‘कनकन किंडी’ म्हणजे ‘कनकाची खिडकी’, असे म्हटले जाते. मंदिराच्या आतल्या भागात गाभार्‍याच्या भोवती एक भिंत आहे. त्यालाही एक खिडकी करण्यात आली आहे, ज्याला ‘नवग्रह किंडी’ म्हणजे ‘नवग्रह खिडकी’, असे म्हणतात.

 

४. श्री सुब्रह्मण्य मंदिर, कुक्के सुब्रह्मण्य, जिल्हा दक्षिण कन्नड, कर्नाटक

४ अ. श्री सुब्रह्मण्य मंदिराचा इतिहास

कुक्के सुब्रह्मण्य (कर्नाटक) येथील श्री सुब्रह्मण्य मंदिर

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुमारधारा नदीच्या काठी ‘कुक्के’ नावाचे गाव आहे. कुक्के गावाच्या दक्षिणेला कुमारपर्वत आहे. हे कुमारधारा नदीचे उगम स्थान आहे. तारकासुराचा वध केल्यानंतर देवांचा सेनापती कार्तिकेय कुमारपर्वतावर आला. याच पर्वतावर इंद्राची कन्या देवसेना हिचा विवाह कार्तिकेयाशी झाला.

 

वासुकीने ज्याठिकाणी कार्तिकेयाची आराधना केली ते बीळ (गुहा)

जनमेजय राजाने चालू केलेल्या सर्पयज्ञापासून रक्षण होण्यासाठी वासुकि कुक्के येथे आला आणि एका बिळात जाऊन बसला. वासुकीला पकडायला गरुड आल्यावर वासुकीने बिळात राहून कार्तिकेयाची आराधना (तपश्चर्या) केली. कार्तिकेयाने वासुकीला अभय दिल्याने गरुडाला काही करता आले नाही. खरेतर कुक्के हे वासुकीचे क्षेत्र आहे, तर कुमारपर्वत हे कार्तिकेयाचे स्थान आहे; पण कार्तिकेयाने वासुकीचे रक्षण केल्यावर कार्तिकेय कुक्के येथे ‘सुब्रह्मण्य’ या रूपात स्थिर झाले. कुक्के सुब्रह्मण्य मंदिराच्या मागच्या बाजूला ‘आदि सुब्रह्मण्य’ नावाचे स्थान आहे. या ठिकाणी एक वारूळ आहे. त्याला मूळ स्थान मानले जाते. या वारुळाची मृत्तिका प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात येते.

 

५. कुक्के सुब्रह्मण्य येथील दैवी प्रवासाच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

५ अ. सप्तर्षींनी कुक्के सुब्रह्मण्य येथे पोचण्यापूर्वी लागणार्‍या
अरण्यात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना डाव्या पायाखाली लिंबू
चिरडण्यास सांगणे आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तसे करणे

कुक्के सुब्रह्मण्य येथे जायला निघाल्यावर सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘सुब्रह्मण्य मंदिराच्या ४ – ५ कि.मी. अलीकडे लागणार्‍या अरण्यप्रदेशातून गाडी जात असतांना गाडी थांबवून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एक उपाय करावा. गाडीतून उतरून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या डाव्या पायाखाली एक लिंबू चिरडावे.’’ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे केले.

५ आ. कुक्के सुब्रह्मण्य येथून परत येतांना प्रवासात मुंगूस दिसणे आणि काही वेळाने साप दिसणे,
तेव्हा ‘सनातन संस्था अन् साधक यांच्यावर आलेले एक संकट टळले आहे’, असे सप्तर्षींनी सांगणे

त्यानंतर सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन यांच्या माध्यमातून कळवले, ‘‘सुब्रह्मण्य येथून परतीच्या प्रवासात साप दिसेल. तो साप गाडीच्या अगदी जवळ येईल. त्या वेळी लक्ष असू दे.’’ परतीच्या प्रवासात सुब्रह्मण्य येथून ४ – ५ कि.मी. दूर आल्यावर आरंभी आम्हाला डावीकडून उजवीकडे जाणारे एक मुंगूस दिसले. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडून डावीकडे जाणारा एक साप दिसला आणि तो साप गाडीच्या अगदी जवळून गेला. याविषयी सप्तर्षींना कळवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘साप दिसण्याच्या आधी मुंगूस दिसले, म्हणजे सनातन संस्था आणि साधक यांच्यावर आलेले एक संकट दूर झाले आहे.’’

 

६. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सुब्रह्मण्य
येथील श्री नरसिंह मठात जाऊन श्री श्री विद्याप्रसन्नतीर्थ स्वामीजी
यांची भेट घेणे आणि त्यांनी प्रसादरूपात मूळ वारुळाची मृत्तिका देणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना वारुळाची मृत्तिका देतांना श्री श्री विद्याप्रसन्नतीर्थ स्वामीजी

सुब्रह्मण्य येथे देवाचे दर्शन झाल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुक्के सुब्रह्मण्य येथील श्री नरसिंह मठात जाऊन पिठाधिपती श्री श्री विद्याप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची भेट घेऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी स्वामींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रसादरूपात मूळ वारुळाची मृत्तिका दिली.

श्री. विनायक शानभाग

 

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मुल्की, कर्नाटक.

Leave a Comment