आच्छादन : ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’तंत्रातील एक प्रमुख स्तंभ

आच्छादन, वाफसा, जीवामृत आणि बीजमृत ही ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’तंत्राची मूलतत्त्वे आहेत. या लेखात ‘आच्छादन म्हणजे काय ?’, तसेच त्याचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊया.

संकलक : सौ. राघवी कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२८.१२.२०२१)

 

१. आच्छादन म्हणजे काय ?

‘जमिनीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन’ होय. जमिनीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते. आच्छादनामुळे ‘सूक्ष्म पर्यावरणाची’ निर्मिती सहज होते. ‘सूक्ष्म पर्यावरण’ म्हणजे ‘जमिनीतील सूक्ष्म जीवाणू आणि गांडूळ यांच्या कार्यासाठी आवश्यक वातावरण.’ यामुळे माती सुपीक आणि भुसभुशीत होते, तसेच मातीत सर्व प्रकारच्या जीवाणूंची संख्या वाढण्यास साहाय्य होते. (झाडाला सर्व प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी जिवाणूंची आवश्यकता असते. ‘हे जीवाणू कसे कार्य करतात ?’, हे आपण जिवामृत : सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रातील ‘अमृत’ ! मध्ये पाहिलेच आहे.)

 

२. आच्छादनाचे प्रकार

घरच्या घरी लागवडीसाठी उपयुक्त आच्छादनाचे २ प्रकार आहेत – काष्ठ आच्छादन आणि सजीव आच्छादन

२ अ. काष्ठ आच्छादन

‘झाडाच्या अथवा रोपाच्या आजूबाजूचा जमिनीचा पृष्ठभाग सुकलेला पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, धान्याची टरफले, उसाची चिपाडे, स्वयंपाकघरातील ओला कचरा आदींच्या साहाय्याने झाकणे’ याला ‘काष्ठ आच्छादन’ म्हणतात. या सर्वच गोष्टी आपल्याला घरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून सहज आणि विनामूल्य उपलब्ध होतात. काष्ठ आच्छादन साडेचार इंच जाडीचे करू शकतो; मात्र स्वयंपाकघरातील ओला कचरा पसरतांना एका वेळी एका ठिकाणी एक इंचापेक्षा अधिक जाड पसरू नये.
आच्छादनावर आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा १० पट पाण्यात पातळ केलेले जीवामृत शिंपडले की, त्याची विघटनाची प्रक्रिया जलद होते आणि त्याचे ह्युमसमध्ये (काळ्या भुसभुशीत आणि सुपीक मातीत) रूपांतर होते. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा काष्ठ आच्छादन करावे लागते.

२ आ. सजीव आच्छादन

‘मुख्य पिकाच्या आजूबाजूला त्या पिकापेक्षा अल्प उंचीच्या दुसर्‍या पिकाची लागवड करणे’, म्हणजे ‘सजीव आच्छादन’. उदा. एका कुंडीमध्ये मध्यभागी टॉमेटोचे एक रोप लावले असतांना बाजूला शिल्लक जागेमध्ये मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या अथवा मुळा, गाजर, बीट, कांदा, लसूण अशा कंदवर्गीय भाज्या घेणे.

अशा प्रकारे आंतरपिकांनी अल्प जागेत अधिक उत्पन्न घेता येते आणि जमीनही आच्छादित राहते. खरबूज, कलिंगड, भोपळा, कोहळा, रताळे असे काही वेल जमिनीवर पसरतात. त्यांमुळेही जमिनीचे आच्छादन आपोआपच होते.

३. काष्ठ आच्छादनासाठी आवश्यक पालापाचोळा पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढा साठवून ठेवा !

काष्ठ आच्छादनाचे सतत विघटन होत असल्याने ते काही दिवसांच्या अंतराने पुनःपुन्हा करावे लागते. केवळ पालापाचोळा वापरून लागवड करायची असेल, तर तो अधिक प्रमाणात लागतो. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस असल्याने पालापाचोळा गोळा करून आणणे कठीण जाते. त्यामुळे नोव्हेंबर ते मे या कालावधीत अधिकाधिक पालापाचोळा साठवून ठेवू शकतो.

 

४. आच्छादनाचे लाभ

अ. आच्छादनामुळे जमिनीचे कडक ऊन, अती थंडी, सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या थेंबांपासून रक्षण होते.

आ. आच्छादन केल्याने ऊन आणि वारा यांचा मातीशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे मातीतील ओलावा दीर्घकाळ टिकतो आणि पाणी अल्प प्रमाणात लागते.

इ. आच्छादनामुळे गांडूळांच्या संख्येत वाढ होण्यास साहाय्य होते. आच्छादन नसेल, तर गांडूळ पक्ष्यांनी खाल्ले जाण्याच्या भीतीने दिवसा काम न करता केवळ रात्रीच काम करतात. आच्छादन केल्याने गांडुळांना सूर्यप्रकाश असल्याचे समजत नाही आणि ते दिवसरात्र काम करतात. त्यांच्या हालचालीमुळे जमीन सच्छिद्र आणि भुसभुशीत राहते आणि निराळी मशागत करण्याची आवश्यकता राहत नाही.

ई. मातीतील तणांच्या बियांना आच्छादनामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यांचे अंकूर पिवळे होऊन मरून जातात अन् आपोआप तणनियंत्रण होते.

उ. आच्छादनातील सर्व नैसर्गिक घटकांचे विघटन होऊन ‘ह्यूमस’ (सुपीक माती) तयार होण्याची प्रक्रिया सतत होत राहते. यामुळे झाडांना भरपूर जीवनद्रव्ये उपलब्ध होऊन ती सशक्त आणि बलवान होतात.

ऊ. सजीव आच्छादन करतांना मुख्य पीक एकदल असेल, तर आंतरपीक द्विदल आणि मुख्य पीक द्विदल असेल, तर आंतरपीक एकदल असे नियोजन केल्यास द्विदल पिकांच्या मूळांतून जमिनीत नत्राचा पुरवठा होत राहतो. (सर्व प्रकारची धान्ये ही एकदल, तर डाळी ही द्विदल प्रकारात येतात.)

ए. आच्छादनामुळे जमिनीत आपोआप आवश्यक तेवढाच ओलावा राहतो आणि ‘वाफसा’ स्थिती तयार होते. (जमिनीत दोन मातीकणांच्या मधल्या पोकळीत पाण्याचे अस्तित्व न राहता ५०% वाफ आणि ५०% हवा यांचे संमिश्रण असणे याला ‘वाफसा’ म्हणतात.) ‘वाफसा’ असेल, तरच झाडांची मुळे त्यांची प्राणवायू आणि पाणी यांची आवश्यकता पूर्ण करू शकतात.

ऐ. आच्छादनामुळे ‘ह्यूमस’चे कण हवेबरोबर उडून जात नाहीत, तसेच तीव्र उन्हाने करपूनही जात नाहीत. त्यामुळे मातीची सजीवता टिकून राहते.

ओ. दुष्काळी परिस्थितीमध्ये आच्छादन हवेतून ओलावा शोषून घेते. त्यामुळे झाडे कमी पाणी मिळूनही हिरवीगार राहतात.

५. कचऱ्याची समस्या सोडवण्यास हातभार लावणाऱ्या आच्छादन तंत्राचा वापर करा !

वरील सर्व सूत्रांवरून हेच लक्षात येते की, ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’मध्ये आच्छादनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आच्छादनासाठी वापरण्यात येणारे नैसर्गिक घटक (सुकलेला पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, धान्याची टरफले, उसाची चिपाडे, स्वयंपाकघरातील ओला कचरा इत्यादी) हे सामान्य व्यक्तीसाठी ‘कचरा’ या श्रेणीत मोडतात; परंतु हेच घटक नैसर्गिक शेती करतांना मोठे वरदान असल्याचे वरील सर्व विवेचनातून स्पष्ट होते. सध्या सर्वच मोठ्या शहरांमध्ये आणि गावागावांतही ‘घन कचरा व्यवस्थापन’ ही सरकारी यंत्रणेसमोरील मोठी समस्या आहे. आच्छादनासाठी विनामूल्य मिळणारे हे सर्व नैसर्गिक घटक उपयोगांत आणून आपण एकप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी आपल्या परिने हातभारच लावतो आणि त्याच्या मोबदल्यात निसर्ग आपल्याला विषमुक्त आणि सकस भाजीपाला अन् फळे भरभरून देतो.

(सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रावर आधारित लेखांवरून संकलित लेख)

Leave a Comment