जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, तसेच ‘योग आणि संगीतोपचार’ विषयांतील तज्ञ वैद्य बालाजी तांबे यांचे निधन !

आयुर्वेदावर विपुल लेखन आणि संशोधन करणारा मोठा संशोधक हरपला ! – सनातन संस्था

पुणे – जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, तसेच ‘योग आणि संगीतोपचार’ विषयांतील तज्ञ वैद्य बालाजी तांबे (वय ८१ वर्षे) यांचे १० ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुले श्री. सुनील, श्री. संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने तांबे यांना उपचारासाठी येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार चालू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

जगभरात ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रसार केला !

वैद्य बालाजी तांबे हे ‘आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार’ या विषयांतील तज्ञ, तसेच पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या ‘कार्ला’ येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’चे संस्थापक होते. पाच दशके त्यांनी ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रचार अन् प्रसार केला. त्यांनी समाजातील अनेक घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देश यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात त्याचा प्रसार केला, तसेच त्याचे महत्त्व समाजाला पटवून दिले.

 

वैद्य बालाजी तांबे यांच्या आयुर्वेद उपचारांना देश-विदेशांत मागणी !

वैद्य बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. त्यांनी आयुर्वेद आणि अभियांत्रिकी यांमधील पदवी एकाच वर्षी मिळवली. त्यांनी आयुर्वेदाचे औषधीशास्त्र आणि आयुर्वेदाची ‘फिजिओथेरपी’ यांविषयी संशोधन केले होते. त्यांच्या ‘गर्भसंस्कारा’वरील पुस्तकांना पुष्कळ मागणी होती. आतापर्यंत या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. इंग्रजीसह ६ भाषांमध्ये या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देश-विदेशांत त्यांच्या आयुर्वेदाच्या उपचारांना मागणी होती.

 

वैद्य बालाजी तांबे यांनी लिहिलेली पुस्तके…

आत्मरामायण, आयुर्वेद उवाच भाग १ आणि २, आयुर्वेदीय गर्भसंस्कार, आयुर्वेदिक घरगुती औषधे, चक्र सुदर्शन, मंत्र आरोग्याचा, मंत्र जीवनाचा, वातव्याधी, श्री रामविश्वपंचायतन, संतुलन क्रियायोग, स्त्री आरोग्य इत्यादी

 

वैद्य बालाजी तांबे यांच्यासारखे आरोग्यपूजक व्यक्तीमत्त्व
काळाने हिरावून नेले ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

आयुर्वेदाचार्य वैद्य बालाजी तांबे यांच्या निधनाविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि प्रतिदिनच्या जगण्यात आहार-विहार अन् विचार यांच्या संतुलनाविषयी मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तीमत्त्व काळाने हिरावून नेले आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘‘आयुर्वेद आणि योग यांच्या माध्यमांतून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी पालट घडवण्याचा वैद्य बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांच्या दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश आणि विदेश येथेही प्रसार केला. ‘आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे’, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या अन् ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवला. अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड घातल्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात ‘गुरूं’चे स्थान दिले. आयुर्वेदाविषयी डोळस दृष्टीकोन आणि नव्या पिढीत गोडी निर्माण करण्यात वैद्य तांबे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. ’’

 

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेदाची मोठी हानी !

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत आयुर्वेदावर विपुल लेखन आणि संशोधन करून आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार केला. हिंदु धर्मातील ‘गर्भसंस्कार’ या विधीला नवसंजीवनी देण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांनी आयुर्वेदावर केलेले संशोधन आणि लेखन पुढील अनेक पिढ्यांना दिशादर्शन करणारे आहे. विज्ञानाचे शिक्षण घेऊनही आयुष्यभर अतिशय सात्त्विक जीवन जगले. बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेदाची मोठी हानी झाली असून आयुर्वेदाचा एक मोठा संशोधक हरपला आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. बालाजी तांबे यांनी जीवनात जाणलेले आयुर्वेदाचे महत्त्व आपणही जाणून घेऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा निश्चय करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे. सनातन संस्था तांबे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment