धार्मिक उत्सव

अनुक्रमणिका

१. व्याख्या

२. उद्देश

३. इतिहास

४. उत्सवांमुळे हिंदूंच्या ऐक्यासाठी लाभ होणे

५. उत्सवांचे महत्त्व

६. त्याग

७. सार्वजनिक उत्सवांत संस्कृतीहीन कार्यक्रम नकोत, तर क्षात्रवृत्ती वाढवणारे खेळ दाखवणे

८. भजनस्पर्धा ठेवण्यापेक्षा तिचे आयोजक आणि स्पर्धक यांनी खरी उपासना केली, तरच त्यांचे अन् समाजाचे भले होऊ शकणे

९. उत्सवकाळात आदर्श मिरवणूक कशी काढावी ?


उत्सव म्हणजे आनंद निश्चित ! कामाच्या व्यापातून थकलेल्या जिवांना काही काळ तरी सामाजिक सुख मिळावे, यासाठी हिंदु धर्मात उत्सवांची आखणी केलेली आहे. उत्सवांचे जीवनातील महत्त्व, तसेच उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत, याविषयीचे विवेचन या लेखातून करण्यात आले आहे.

श्री गणेश चतुर्थी

श्री गणेश चतुर्थी

१. व्याख्या

‘नियताल्हादजनकव्यापार निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार, म्हणजे उद्योग, तोच उत्सव होय.’ (शब्दकल्पद्रुम). ज्या एखाद्या धार्मिक समारंभात तो करणार्‍या आणि त्यात भाग घेणार्‍या लोकांना आनंद अन् मनःप्रसाद यांचा अनुभव घडतो, त्याला ‘उत्सव’ म्हणतात.’ उत्सव पहाणार्‍यांनाही आनंद वाटणे यात अपेक्षित आहे.

२. उद्देश

अ. दैनंदिन जीवनाच्या व्यापातून शरिराला विश्रांती आणि मनाला सुख, विशेषतः सामाजिक सुख मिळवून देणे.

आ. निसर्ग आणि ललीतकला यांचे सुख अनुभवणे.

इ. श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित इत्यादी भेदभाव विसरून समाजपुरुषाशी एकरूप होणे

‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, अशी धर्माची शिकवण असल्याने `एकत्रितपणे साधना करणे’, ही गोष्ट अल्प प्रमाणात होते. असे असले, तरी व्यक्तीच्या मर्यादा ओलांडून समाजपुरुषाशी थोडेफार तरी एकरूप व्हायला शिकावे, या उद्देशाने धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. श्रीमंत-गरीब, जात-पात, सुशिक्षित-अशिक्षित इत्यादी भेदभाव विसरून सर्व जण उत्सवांत सहभागी होतात. अशा उत्सवांत क्रियाशील असलेल्यांना, भंडार्‍यात (धार्मिक उत्सवातील अन्नदानात) क्रियाशील असणार्‍यांना आध्यात्मिक लाभासह पुढील लाभ होतात. ‘भंडार्‍याला प्रथमच येणार्‍याला बाह्यतः काय दिसते, तर काही जण स्वयंपाक करत आहेत, काही जण जेवण वाढत आहेत, काही जण भांडी साफ करत आहेत, तर काही जण गप्पा मारत आहेत इत्यादी. मोठ्या कॅंपिंगला गेल्यावर स्काऊट, गाईड किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करतात, तसे सर्व वाटते. ‘भंडार्‍यात काही अध्यात्म आहे’, असे वाटत नाही. मात्र भंडारा करण्यामागचे पुढील उद्देश लक्षात आले की, ‘दिसते तसे नसते’ हे त्यांच्या लक्षात येते.

१. अन्नदान

ज्ञानदान जरी सर्वांत श्रेष्ठ असले, तरी ते सूक्ष्मातील असल्याने त्याचे महत्त्व बहुतेकांना कळत नाही. याउलट ‘दिलेले अन्न’ हे स्थूलचक्षूंनी दिसत असल्याने त्याचे महत्त्व बर्‍याच जणांना जाणवते.

अन्नदान

अन्नदान

२. सेवा

भंडार्‍याची सिद्धता करणे, जेवण वाढणे, भांडी घासणे इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या सेवा करण्याची संधी साधकांना मिळते. स्वतः जेवण्यापेक्षा दुसर्‍यांना जेवण वाढणे, त्यांना तृप्त झालेले पाहून तृप्ती वाटणे, हा अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो.

३. त्याग

भंडार्‍यातील सेवेमुळे तनाचा त्याग होतो, तर भंडार्‍यासाठी अन्नधान्य आणण्यासाठी जे पैसे अर्पण केले जातात किंवा वस्तू दिल्या जातात, त्यामुळे धनाचा त्याग होतो. `भंडार्‍याचे कार्य व्यवस्थितपणे पार पडावे’, हा एकच विचार तेव्हा सेवेकर्‍याच्या मनात असल्याने मनाचाही त्याग होतो.

४. दुसर्‍यांविषयी प्रेम वाटणे

आपल्यासमवेत भंडार्‍याच्या कार्यात झटणार्‍या साधकांविषयी बंधूभाव वाटायला लागतो. `नाना नाती दावियली ती । त्या सर्वावरी तव (गुरु) सम प्रीती ।।’, असे व्हायला लागते.

५. अहं न्यून होणे

‘वैयक्तिक जीवनात आपण कोणीही असलो, तरी इथे सेवेकरी आहोत’, या विचारामुळे अहं न्यून होण्यास साहाय्य होते.

६. सत्संग

‘संतांचा वा साधकांचा भंडारा असला, तर सत्संगही घडतो.’

३. इतिहास

‘मध्ययुगात उत्सव सामान्यतः पितृपूजा, वीरपूजा, नांगरणी, पेरणी, कापणी इत्यादी कृषीकर्मे, ऋतूपरिवर्तन, गणदेवता इत्यादींशी संबंधित असत. तसेच काही उत्सव राजा आणि राज्यशासन यांच्याद्वारेही साजरे केले जात असत.’

४. उत्सवांमुळे हिंदूंच्या ऐक्यासाठी लाभ होणे

‘सामाजिक ऐक्यासाठी आणि एकरूपतेसाठी हिंदु संस्कृतीने तीर्थयात्रा, कुंभमेळे, सिंहस्थ, कन्यागतादींसारखे विराट सामूहिक कार्यक्रम दिले. त्याचप्रमाणे पंथीय उपासकांना या उपक्रमांतून एकत्र आणण्याची पर्वणी आणि स्थाने या संस्कृतीने दिली.’

५. उत्सवांचे महत्त्व

‘त्या त्या दिवशी त्या त्या देवता अधिक कार्यरत असतात. त्याचा लाभ होतो.’ – प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

६. त्याग

‘ग्रामदेवतेचा उत्सव इत्यादीला वर्गणी द्यावी, त्यामुळे त्याग घडतो.’ – प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

७. सार्वजनिक उत्सवांत संस्कृतीहीन कार्यक्रम नकोत,
तर क्षात्रवृत्ती वाढवणारे लाठी-काठी यांसारखे खेळ दाखवा !

‘सध्या सर्वच सार्वजनिक उत्सवांत संस्कृतीहीन कार्यक्रम ठेवण्याचे उधाण आले आहे. गणेशोत्सवात चमचा तोंडात घेऊन पळण्याची स्पर्धा, नवरात्रोत्सवात सिनेगीतांवर नाचण्याच्या स्पर्धा, हे सर्व बंद करण्याची आवश्यकता आहे. सध्या आवश्यकता आहे, क्षात्रवृत्ती दाखवण्याची. त्यामुळे नवरात्रात स्पर्धाच ठेवायची असेल, तर देवीने ज्याप्रमाणे युद्ध केले, त्याचा आदर्श ठेवून लाठी-काठी, हनुमान जयंती असल्यास कुस्ती स्पर्धा अन् गणेशोत्सवानिमित्त स्तोत्र पाठांतर स्पर्धा ठेवणे आवश्यक आहे.’ – ह.भ.प. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार (दैनिक सनातन प्रभात, १८.५.२००७)

८. भजनस्पर्धा ठेवण्यापेक्षा तिचे आयोजक आणि स्पर्धक
यांनी खरी उपासना केली, तरच त्यांचे अन् समाजाचे भले होऊ शकणे

‘एका संस्थेच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी १ जानेवारी या दिवशी एकदिवसीय सलग भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशी स्पर्धा शारीरिक किंवा मानसिक क्षमतेची स्पर्धा असते, भजनाची स्पर्धा नसते. २४ घंटे मांडी घालून एका जागी बसता येणे आणि न झोपणे असे स्वरूप झाले. याचा भजनाशी दूरान्वयेही संबंध येत नाही.

भजन हा शब्द भज ± न असा बनलेला आहे. ‘भज’ म्हणजे नामस्मरण आणि ‘न’ हे सातत्य दर्शवते. भजन म्हणजे सातत्याने भजणे, उपासना करणे. ती २४ घंटे नाही, तर आयुष्यभर करावयाची असते. आता भजनाची स्पर्धाच ठेवायची असली, तर ती उपासनेची स्पर्धा होते. तिचे निकष असले पाहिजेत गायकाचे आणि श्रोत्यांचे सात्त्विक भाव किती प्रमाणात जागृत झाले आहेत. अर्थात ते कळायला अध्यात्मातील उन्नतच परीक्षक म्हणून हवेत ! अशा स्पर्धेपेक्षा तिचे आयोजक आणि स्पर्धक यांनी खरी उपासना केली, तरच त्यांचे अन् समाजाचे भले होईल.’ (दैनिक ‘सनातन प्रभात’, ३१.१२.१९९९ वरून)

९. उत्सवकाळात आदर्श मिरवणूक कशी काढावी ?

1366468487_adarsh_miravanuk_450

आदर्श मिरवणूक

मिरवणूक म्हणजे उत्सवमूर्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले प्रेम; परंतु मिरवणुकीच्या नावाखाली जर अपप्रकार होत असतील, तर तो उत्सवमूर्तीचा अवमानच झाला. मग अशी मिरवणूक उत्सवमूर्तीला तरी आवडेल का ? नाही ना ! यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष द्या.

अ. मिरवणूक काढण्यासाठी पैसे वा साहित्य बळाने गोळा करू नका, तर स्वेच्छेने दिलेली वर्गणी स्वीकारा !

आ. मिरवणुकीचा आरंभ पवित्र स्थानापासून किंवा ऐतिहासिक स्थळापासून करा !

मिरवणुकीचा आरंभ पवित्र स्थानापासून करणे

मिरवणुकीचा आरंभ पवित्र स्थानापासून करणे

इ. प्रारंभी स्थानदेवता आणि आपली उपास्यदेवता यांना भावपूर्ण प्रार्थना करा !

ई. मिरवणुकीत पुरुषांनी धोतर-सदरा वा सदरा-पायजमा, तर स्त्रियांनी नऊवारी वा सहावारी साडी नेसावी.

उ. दोन, तीन किंवा चारच्या रांगेत मिरवणूक काढा ! रांगेत स्त्रिया आणि लहान मुले यांना मध्ये ठेवा !

ऊ. मार्गाच्या एका कडेने मिरवणूक न्या, म्हणजे वाहतुकीला अडथळा होणार नाही.

ए. मिरवणुकीत प्रथमोपचाराची, तसेच पाणी किंवा अन्य पेय देण्याची व्यवस्था करा !

ऐ. उत्सवमूर्तीचे सुविचार / शिकवण सांगणारे फलक हाती धरा !

ओ. धार्मिक मिरवणुकीत भजने म्हणा वा नामजप करा ! राष्ट्रपुरुषांच्या मिरवणुकीत वीरश्रीयुक्त घोषणा द्या !

औ. लेझीम पथक, दांडपट्टा, लाठीकाठी यांसारख्या वीरश्रीयुक्त कलांचे प्रदर्शन ठेवा !

अं. मिरवणुकीत मद्यपान, हिडीस नाच वा महिलांची छेडछाड होऊ देऊ नका !

क. गुलालाची मुक्त उधळण करू नका !

ख. प्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर व्यय (खर्च) न करता ते पैसे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यांसाठी वापरा !

ग. बँडबाजा किंवा बँजो यांसारखी वाद्ये वाजवू नका ! मिरवणूक वेळेत आरंभ करून वेळेतच संपवा !

मिरवणूक आदर्शरित्या काढून धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्यच आहे !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment