सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या
‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला ८ सहस्र जिज्ञासूंची उपस्थिती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर – गेल्या वर्षापासून चालू झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. राष्ट्रासमोर कोरोना संकटासह ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘महिलांवरील अत्याचार’, ‘भ्रष्टाचार’ अशी अन्य संकटेही आहेत. अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी धर्माचरण करणे आणि साधना करणे हेच पर्याय आहेत. देवाचा भक्त बनण्यासाठी साधना करणे आवश्यक असते. जसे पोट भरण्यासाठी पैसे कमवावे लागतात, त्याप्रमाणे देवाचा भक्त बनण्यासाठी साधना करणे आवश्यक असते. साधना केल्याने मनोबल वाढून कोणत्याही संकटांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते. कलियुगात ‘नामस्मरण’ ही महत्त्वपूर्ण साधना आहे. काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग आणि ‘धर्मसत्संग’ यांमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या व्याख्यानाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. व्याख्यानाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी स्पष्ट केला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले. या व्याख्यानाला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गोवा राज्यातील ८ सहस्रांहून अधिक राष्ट्रप्रेमी जिज्ञासू या व्याख्यानात सहभागी झाले होते.

 

न्याय, बंधुत्व आणि समानता यांच्या प्रत्यक्ष
कार्यवाहीसाठी हिंदु राष्ट्रच हवे !  – मनोज खाडये, गुजरात राज्य,
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

स्वातंत्र्यानंतर जगात ‘सर्वांत मोठी लोकशाही’ असे आपण म्हणवून घेतो; पण स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही या देशातील काही राज्यांत नक्षलवाद्यांचे होणारे काही भाग, ३ सहस्र ५०० हून अधिक विदेशी आस्थापनांद्वारे भारताची होणारी लूट, गोधनाची संख्या केवळ १ कोटीवर येणे यांसह अनेक गोष्टी पहाता ‘सर्वांत मोठी अपयशी लोकशाही’, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. देशाच्या अर्थसंकल्पात ५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केवळ अल्पसंख्यांकासाठी केली जाते. काशी विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमातून रामायण-महाभारत यांचा अभ्यासक्रम वगळला जातो, तर अलीगड मुस्लीम विद्यापिठात फाळणीला कारणीभूत महंमद अली जीनांचे चित्र लावण्यात येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात अल्पसंख्यांकांना वारेमाप झुकते देऊन हिंदूंचे कायम दमन करण्यात आले. राज्यघटनेतील न्याय, बंधुत्व आणि समानता यांना हरताळ फासण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.

‘ऑनलाईन’ व्याख्यानाच्या प्रसारामध्ये धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

‘ऑनलाईन’ व्याख्यानाच्या प्रसारामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘धर्मशिक्षण वर्ग’, ‘धर्मसत्संग’ आणि ‘साधना सत्संग’ यांमध्ये सहभागी होणार्‍या धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. धर्मप्रेमींनी प्रसार करतांना आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, ओळखीच्या व्यक्ती यांच्यापर्यंत व्याख्यानाचे निमंत्रण पोचवले. यामध्ये त्यांनी फलक प्रसिद्धी, भ्रमणभाषद्वारे संपर्क आणि सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार करून व्याख्यानाचा विषय पोचवणे अशा विविध माध्यमातून व्यापक प्रसार केला. धर्मप्रेमींनी तळमळीने आणि भावपूर्ण प्रसार सेवेत सहभाग घेतल्याने ‘या सेवेतून पुष्कळ आनंद अनुभवता आला’, असे त्यांनी सांगितले. यातील काही धर्मप्रेमींचे प्रयत्न येथे थोडक्यात मांडत आहोत.

१. सोलापूर येथील श्री. अंबादास पोला यांनी १६० जणांना भ्रमणभाष करून निमंत्रण दिले. ते कार्यालयीन कामातून राहिलेल्या वेळेत संपर्क सेवा करत होते. सेवा करतांना त्यांना पुष्कळ आनंद मिळाला, असे त्यांनी सांगितले.

२. सोलापूर येथील डॉ. सुप्रिया आगलावे यांनी ७५ धर्मप्रेमींना निमंत्रण दिले. स्वतःचे क्लिनिक सांभाळून घरातील कामे करून ही सेवा केली.

३. मुंबई येथील धर्मप्रेमी सौ. हेमा शेवाळे यांनी विविध २५० हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना संपर्क केले, तसेच त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि अन्य ओळखीचे अशा १०० जणांना निमंत्रण दिले.

४. रघुनाथपुर (जिल्हा सातारा) येथील सनातन संस्थेचे साधक श्री. प्रणव क्षीरसागर यांनी एकूण १८ धर्मप्रेमींची ‘ऑनलाईन’ बैठक घेतली. या बैठकीतील सर्वांनी मिळून ३१ सहस्र २४२ जणांना कार्यक्रमाची ‘पोस्ट’ पाठवली.

५. दौंड (जिल्हा पुणे) येथील डॉ. नीलेश लोणकर यांनी प्रसारासाठी कृतीशील धर्मप्रेमींची ‘ऑनलाईन’ बैठक घेतली. तसेच डॉ. लोणकर यांनी ४० जणांना भ्रमणभाषद्वारे निमंत्रण दिले. या ४० जणांनी ‘यापुढे आम्ही नियमित कार्यक्रम पाहू. हा कार्यक्रम पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला’, असे अभिप्राय कळवले.

६. पुणे येथे व्याख्यानाच्या प्रसारासाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीला अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. या सर्वांनी ‘प्रभावी प्रसार कसा करावा’, हे शिकून घेतले आणि त्याप्रमाणे ३०० जणांना संपर्क केले.

७. गोवा येथील काही धर्मप्रेमींनी सामाजिक माध्यमाद्वारे प्रसार केला. तसेच त्यांनी त्यांचे नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांना भ्रमणभाष करून निमंत्रण देणे, नामसत्संगात निमंत्रण देणे, फलक प्रसिद्धी अशा विविध माध्यमांचा वापर केला.

‘ऑनलाईन’ व्याख्यानाला ८ सहस्र जिज्ञासूंची अभूतपूर्व उपस्थिती
हे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यावरील विश्वासाची पोचपावती !

कोरोना महामारीच्या काळात सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांना समाजात जाऊन धर्मप्रचार अन् कार्य करण्यास मर्यादा आल्या आहेत. यांवर मात करत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या ऑनलाईन व्याख्यानास जिज्ञासूंनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. व्याख्यान प्रारंभ होण्याच्या पूर्वीच २ सहस्र जिज्ञासू जोडले होते, तर व्याख्यान संपेपर्यंत ही संख्या ८ सहस्रांपर्यंत पोचली. यावरून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या ईश्वरी कार्यावर अन् त्यांच्याकडून करण्यात येणार्‍या मार्गदर्शनावर जिज्ञासूंचा विश्वास आहे, याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल !

विशेष

» व्याख्यानानंतर तात्काळ ६५० हून अधिक जणांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यात कृतीशील सहभागी होण्यासाठी अभिप्राय कळवले. तसेच व्याख्यानाच्या शेवटी श्री. मनोज खाडये यांनी जिज्ञासूंना अभिप्राय कळवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर २ दिवसांत ८५० हून अधिक जिज्ञासूंनी अभिप्राय कळवले.

» सिंधुदुर्ग येथील साधकांनी एका आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करून व्याख्यानाची आठवण करून दिली. व्याख्यान ऐकून झाल्यावर ते म्हणाले, ‘‘साधकांनी मला दूरभाष केला, ते बरे झाले अन्यथा एका चांगल्या व्याख्यानास मी मुकलो असतो. प्रत्येक मासामध्ये तुम्ही असे व्याख्यान घ्या.’’

» लातूर येथील श्री. वैभव रोकडे यांनी त्यांच्या ८ मित्रांसमवेत व्याख्यान ऐकले. व्याख्यानात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी कपाळावर टिळा लावण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्या सर्वांनी दुसर्‍या दिवशीपासूनच टिळा लावण्यास प्रारंभ केला.

» कुडाळ येथील श्री केबल नेटवर्क यांनी ‘ऑनलाईन‘ व्याख्यानाचे विनामूल्य प्रसारण केले. या माध्यमातून ८०० हून अधिक कुटुंबांपर्यंत विषय पोचला.

व्याख्यानातील विषय अभ्यासपूर्ण मांडल्याविषयी शेकडो जिज्ञासूंचे अभिप्राय !

व्याख्यान झाल्यानंतर शेकडो जिज्ञासूंनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यकर्त्यांकडे भ्रमणभाषद्वारे ‘व्याख्यानातील विषय अभ्यासपूर्ण असल्यामुळे तो पुष्कळ आवडला. व्याख्यानामुळे हिंदु धर्मावरील संकटांविषयी योग्य माहिती मिळाली, तसेच धर्माचरणाचे महत्त्व समजले. यापुढे आम्हीही हिंदु धर्मासाठी कार्य करू’, असे अनेक अभिप्राय उत्स्फूर्तपणे दिले.

व्याख्यानाचा तळमळीने प्रसार करणारे नांगनूर (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमी अमोल चेंडके !

नांगनूर (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री. अमोल चेंडके यांनी स्वतःच्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे व्याख्यानाच्या प्रसाराचा ध्यास घेतला. या व्याख्यानाचा विषय सर्वांपर्यंत पोचावा, यासाठी त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने भेटणार्‍या सर्वांना निमंत्रण दिले, तसेच ते त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना व्याख्यानाची ‘पोस्ट’ पाठवून व्याख्यान ऐकण्याची आठवण करून देत होते. व्याख्यानाला १ दिवस शेष असतांना त्यांनी त्या सर्वांना पुन्हा स्मरण करून दिल्याने अनेकांनी ‘बरे झाले आठवण केली, आम्ही विसरलो होतो’, असा अभिप्राय दिला. याचसमवेत त्यांनी जिज्ञासूंना व्याख्यानाच्या जोडणीमध्ये येणार्‍या अडचणीही आपुलकीने सोडवल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment