रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

संत गोदड महाराज यांचे भाकीत


कर्जत (जिल्हा रायगड) – या वर्षी मान्सूनचे आगमन थोडे विलंबाने होईल; परंतु भरपूर पाऊस पडेल. (प्रत्यक्षातही यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे हवामानतज्ञांनी म्हटले आहे ! – संपादक) एप्रिलच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड यांपासून त्रास होईल. रोगराई वाढेल, आखातात आग लागेल. तेलंग देशी (आखाती) आग लागेल. युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप आणि रब्बी पिके मुबलक प्रमाणात पिकतील. आश्‍विन आणि कार्तिक मासात देशात अराजकता माजेल, त्याचा जनतेला त्रास होईल, अशी भविष्यवाणी (संवत्सरी) संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केली. प्रत्येक गुढीपाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज यांच्या मंदिरात संवत्सरीचे वाचन केले जाते. संत गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाणी करून ठेवली आहे. त्याचे वाचन करण्यात येते. या वेळीही पुजारी, ग्रामस्थ आणि पंच कमिटी यांच्या अनुमतीने मोजक्या पुजार्‍यांसमवेत हे वाचन करण्यात आले. ‘हे भाकीत तंतोतंत खरे ठरते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

संत गोदड महाराज यांचा परिचय

संत गोदड महाराज हे पंढरीच्या विठ्ठलाचे भक्त होते. पंढरीचा पांडुरंग त्यांना प्रसन्न झाला होता. संत परंपरेत त्यांचे स्थान मोठे आहे. त्यांची कर्जत येथे समाधी आहे. कर्जतला ‘धाकटी पंढरी’ म्हटले जाते. त्यांनी शेकडो वर्षांचे भविष्य लिहून ठेवले आहे. त्याला ‘संवत्सरी’ म्हणतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment