आपत्काळ आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना, यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी

कलियुगांतर्गत कलियुग संपणार असून आता कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे. अधर्माची परिसीमा गाठणार्‍या मनुष्याने स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वत:च आखून ठेवला आहे. अधर्माचा नाश होण्यासाठी कोणते तरी महाभारत घडतेच. परिवर्तन होण्यापूर्वी संधीकाळ येतो आणि या संधीकाळात ईश्वर अवतार घेऊन पाप अन् अधर्म यांचा नाश करतो. आगामी भीषण काळ आणि अधर्माचा नाश झाल्यावर होणारी सनातन धर्माची पुनर्स्थापना यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी येथे देत आहोत.

 

१. ओडिशातील संत अच्युतानंद यांनी
सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेविषयी भविष्यवाणी लिहून ठेवणे

‘ओडिशामध्ये ४०० वर्षांपूर्वी संत अच्युतानंद यांनी भविष्य मालिकांची रचना केली आहे. त्यांना भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त सुदामा यांचा अवतार समजण्यात येते. संत अच्युतानंद यांनी त्यांच्या भविष्य मालिकेत कलियुग समाप्त होण्याची भविष्यवाणी करून ठेवली आहे. यात त्यांनी ईश्वर प्रकट होण्यापूर्वी भारताच्या शेवटच्या पंतप्रधानांविषयी सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या पंतप्रधानांचे गुण सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळणारे आहेत. अर्थात् लोकशाहीप्रधान भारताचे मोदी हे शेवटचे पंतप्रधान असतील. त्यानंतर ईश्वराच्या प्रकटीकरणाला प्रारंभ होईल. संपूर्ण जगात सनातन धर्माची पुनर्स्थापना होईल. आपण अत्यंत भाग्यवान आहोत की, या काळात आपला जन्म झाला आहे. आपल्याला त्या साक्षात् सत्पुरुषाचे (ईश्वराचे) दर्शनही होऊ शकेल.

 

२. पद्मपुराणामध्ये अधर्माचा नाश करून
धर्माची स्थापना करणार्‍या सत्पुरुषाविषयी भविष्यवाणी असणे

पद्मपुराणामधील ६ व्या खंडात ७१ व्या प्रकरणामध्ये श्लोक क्रमांक २७९ ते २८२ मध्ये सांगण्यात आले की, एक सत्पुरुष असतील, जे अधर्माचा नाश करतील. पृथ्वीवर झालेली वाईट स्थिती सुधारतील आणि धर्माची स्थापना करतील. ते संपूर्ण जगातील एकमात्र शासक असतील, ज्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसेल, म्हणजे ते सर्वांहून श्रेष्ठ असतील. ते संपूर्ण जगात धर्माचा विजयी झेंडा फडकावतील.

 

३. फ्रेंच भविष्यवेत्ते नॉस्ट्रेडॅमस यांनी
४०० वर्षांपूर्वी आगामी भीषण काळाविषयी भविष्यवाणी करून ठेवणे

फ्रेंच भविष्यवेत्ते मायकल द नॉस्ट्रेडॅमस यांच्या भविष्यवाणीवर जगभरातील लोक  विश्वास ठेवतात; कारण त्यांची भविष्यवाणी नेहमी सत्य ठरत आली आहे. त्यांनी ‘वर्ष २०२० हे अत्यंत हिंसक वर्ष असणार आहे. जगातील मोठमोठ्या देशांमध्ये गृहयुद्धाची परिस्थिती असेल. वर्ष २०२० मध्येच शतकातील सर्वांत मोठे आर्थिक संकट येईल. याच काळात लोक अतिशय जागृत होतील आणि ते अध्यात्माकडे वळतील’, अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. नॉस्ट्रेडॅमस यांच्या भविष्यवाण्या त्यांच्या ‘सेन्चुरीज’ नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाणीमध्ये पुढे असेही म्हटले आहे, ‘या जगाचा तारणहार जन्माला येईल. तो ज्या देशात जन्माला येईल, त्या देशाचे नाव एका समुद्राच्या नावाशी संबंधित असेल.’ आपल्याला माहितीच आहे की, संपूर्ण जगात केवळ भारत असा देश आहे, ज्याचे नाव प्राचीन काळापासून हिंद महासागराशी संबंधित आहे. नॉस्ट्रेडॅमस पुढे म्हणतात, ‘जेव्हा जेव्हा मी त्या तारणहाराला पहातो, तेव्हा माझे शिर त्याच्या चरणांकडे झुकते. तो जगाला असे ज्ञान देईल, जे जगाला याआधी कधीच मिळालेले नसेल. स्वत:ला ज्ञानी आणि विद्वान समजणारे सर्व जण त्याच्यासमोर नतमस्तक होतील.’

(साभार : ‘हिंदी सागर’ यू ट्यूब वाहिनी)

 

मथुरा येथील संत तुलसीदास
यांनी भविष्यवाणी करून भीषण आपत्काळाविषयी
लोकांना जागृत करणे आणि एक शुभ्रवस्त्र धारण करणारी
व्यक्तीच या युग परिवर्तनाचे निमित्त होणार असल्याचे सांगणे

‘मथुरा येथील संत तुलसीदास यांनी वर्ष १९७१ पासून पुढील अनेक वर्षे त्यांच्या ‘शाकाहारी’ या नियतकालिकामधून येणार्‍या काळाविषयी भविष्यवाणी लिहून लोकांना जागृत केले. त्यांनी लिहिले आहे, ‘सत्ययुग एका दिवसात येत नाही. युग परिवर्तनाचा एक फार मोठा संक्रमणकाळ असतो. जेव्हा एक युग संपून दुसरे युग येते, तेव्हा या दोन युगांमध्ये संघर्ष होतो आणि विनाश होतो. युग परिवर्तनाच्या वेळी सगळीकडे हाहा:कार माजेल. लोक किड्यामुंग्यांसारखे मरतील. सगळीकडे मृतदेहांचा खच पडलेला असेल आणि त्यांना उचलणारे कोणी नसतील. खाण्यासाठी अन्नाचा कण मिळणार नाही. भाऊ-भाऊ आपापसांत वैरी होतील. कुटुंबे आपापसांत भांडतील. जातीजातींमध्ये भांडणे होतील. समाजात भीषण लढाई होईल. अनेक लहान-मोठे देश जगाच्या नकाशावरून नष्ट होतील. आतापर्यंत आपण पूर, दुष्काळ, भूकमारी, महामारी आणि अराजक पाहिले आहे; मात्र त्याहूनही भयावह स्थिती पुढे येणार आहे. असे आजार येतील की, आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) त्यांची नावेही ठाऊक नसतील. देश-विदेशांतील राजवटी पालटतील. लहानलहान राष्ट्रांचे भारतात विलिनीकरण होईल. देशात नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल. जागतिक युद्ध होईल. विषाणू बॉम्बचा प्रयोग करण्यात येईल.

तुम्हाला काय वाटते, सत्ययुग असेच शांतपणे येईल ? या भयावह घटनांनंतर जे मूठभर लोक वाचतील, ते सत्ययुगाचा नवीन सूर्य उगवतांना पहातील. एक शुभ्रवस्त्र धारण केलेली व्यक्ती या युग परिवर्तनाचे निमित्त बनेल. तुम्ही लवकरात लवकर त्या आध्यात्मिक शक्तीशी जुळवून घेतले, तरच तुमचे रक्षण होईल.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment