हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !

  • साधूसंतांसह लाखो भाविकांनी मंगलमय स्नान केले !

  • हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सोमवती अमावास्येला दुसरे पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले !

गंगा नदीमध्ये स्नान करतांना साधू

हरिद्वार – कुंभमेळ्यामधील मानाच्या विविध आखाड्यांचे साधूसंत यांच्यासह लाखो भाविकांनी गंगेमध्ये सोमवती अमावास्येच्या दिवशीचे दुसरे पवित्र स्नान केले. या प्रसंगी ‘हरकी पौडी’ येथे विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्‍वर यांसह साधू-संत आणि लाखो भाविक यांनी गंगास्नान केले. ११ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत २१ लाखांहून अधिक भाविकांनी गंगास्नाचा लाभ घेतला, अशी माहिती कुंभमेळ्यासाठी नियुक्त असलेले पोलीस महासंचालक संजय गुंज्याल यांनी दिली. नेपाळचे शेवटचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शहा यांनीही पवित्र स्नान केले.
पवित्र स्नानासाठी प्रथम जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर गौतम गिरि महाराज यांनी शेकडो अनुयांसह गंगास्नान केले. त्यानंतर निरंजनी आखाड्यासह अग्नि आणि आवाहन, महानिर्वाणी, अनी, निर्मोही, दिगंबर, श्री पंचायती आखाडा बडा उदासीन, श्री पंचायती आखाडा नया उदासीन, श्री निर्मल आखाडा या आखाड्यांचे साधुसंत यांची त्यांच्या स्थळापासून स्नान घाटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. या सर्व आखाड्यांचे साधूसंत यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पवित्र स्नान केले.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment