१. तर्पण
अ. व्युत्पत्ती आणि अर्थ
‘तृप्’ म्हणजे संतुष्ट करणे. ‘तृप्’ या धातूपासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे. देव, ऋषी, पितर यांना जलांजली (उदक) देऊन तृप्त करणे, म्हणजे तर्पण होय.
आ. उद्देश
ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो.
इ. प्रकार
ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे), अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात आणि ती त्या त्या प्रसंगी करायची असतात.
ई. तर्पण करण्याची पद्धत
१. ‘तर्पण नदीवर करावे’, असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे.
२. देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन अन् पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते.
३. ‘देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने आणि पितरांचे अपसव्याने करावे’, असे शास्त्र आहे.
४. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मूळावरून पितरांचे तर्पण करावे.
५. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मूळांतून ऋषींना आणि तर्जनी अन् अंगठा यांचा मध्यभाग यांतून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे).
६. देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन आणि पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे.
२. पितृतर्पण
अ. व्याख्या
पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे. महालय श्राद्ध याला अपवाद आहे.
आ. का करावे ?
पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते.
इ. महत्त्व
तर्पण केल्याने पितर केवळ संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश आणि अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचविण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्त करतात.
ई. कधी करावे ?
देव, ऋषी आणि पितर यांना उद्देशून नित्य (प्रत्येक दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी प्रतिदिन श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे.
उ. तीलतर्पण

पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळांचे काळे आणि पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे.
१. ‘तीलमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात.
२. जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते.
३. दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात.
४. नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.’
ऊ. तीलतर्पणाचे महत्त्व
१. ‘पितरांना तीळ प्रिय आहेत.
२. तिळांचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करत नाहीत.
३. श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे, निमंत्रित ब्राह्मणांना तीळमिश्रित जल द्यावे आणि तिळांचे दान द्यावे.’
– जैमिनीयगृह्यसूत्र (उत्तरभाग, खंड १), बौधायनधर्मसूत्र (प्रश्न २, अध्याय ८, सूत्र ८) आणि बौधायनगृह्यसूत्र
नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)
विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्यांना होणारे लाभ
पितृपक्ष (महालय पक्ष)
very useful and nice information thanks with the help of your gateway …Santhan dharm motivate and known about our duties …