देवतेच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपाचे महत्त्व


भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ, कलियुगात नामजप हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे. देवतेचा भावपूर्ण नामजप केल्याने त्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळू शकतो. यासाठी काही मार्गदर्शन सुत्रे देत आहोत.

 

१. तारक आणि मारक नामजप

देवतेचा नामजप करणे, ही कलियुगातील सर्वांत सोपी साधना आहे. देवतेची ‘तारक’ आणि ‘मारक’ अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप आणि असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे देवतेचे मारक रूप. यावरून लक्षात येते की, देवतेच्या तारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे ‘तारक’ नामजप आणि देवतेच्या मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे ‘मारक’ नामजप होय.

 

२. देवतेच्या ‘तारक’ नामजपाचे महत्त्व

देवतेचा तारक नामजप केल्याने चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती येते, तसेच देवतेप्रती सात्त्विक भावही निर्माण होतो. वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी देवतेच्या तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

 

३. देवतेच्या ‘मारक’ नामजपाचे महत्त्व

मारक नामजप केल्याने देवतेकडून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य ग्रहण होते, तसेच सूक्ष्मातील वाईट शक्तींना दूर करण्यासाठी देवतेच्या मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

 

४. स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा ‘तारक’ किंवा ‘मारक’ नामजप करणे महत्त्वाचे असणे

स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा तारक किंवा मारक नामजप केल्यास व्यक्तीला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होतो. त्यामुळे त्या त्या देवतेचे तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि ‘ज्या नामजपामध्ये मन अधिक रमते’, तो नामजप करावा. एखादी व्यक्ती नियमित नामजप किंवा साधना करत नसेल, त्यानेही तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि जो नामजप आवडेल तो करावा.

मनुष्‍याच्‍या प्रकृतीप्रमाणे त्‍याची जप म्‍हणण्‍याची गती असते. हे नामजप मध्‍यम गतीचे आहेत. ज्‍यांना जलद गतीने म्‍हणायचा आहे, त्‍यांनी याच पद्धतीने जलद गतीत म्‍हणावा; पण जप म्‍हणण्‍याची पद्धत मात्र पालटू नये. ‘व्‍यक्‍ती तितक्‍या प्रकृती तितके साधनामार्ग !’ असा साधनेचा सिद्धांत असल्‍याने ज्‍या पद्धतीने नामजप केल्‍यावर तुमचा भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्‍या पद्धतीने नामजप म्‍हणावा.

 

५. काळानुसार देवतांच्या तारक आणि मारक नामजपाचे महत्त्व

कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कोणत्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यांतून देवतांचे नामजप सिद्ध (तयार) झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे नामजप केल्यास त्यांतून काळानुसार आवश्यक असे तारक अथवा मारक तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल.

समाजातील नामजप करणार्‍या ९० टक्के व्यक्तींचा कल भावपूर्ण नामजप करण्याकडेच असतो. असे असले, तरी अन्य १० टक्के व्यक्ती, ज्यांना मारक भावातील नामजप उपयुक्त आहे, ते या नामजपापासून वंचित राहू नयेत, यासाठीही ते ध्वनीमुद्रित केले आहेत.

या नामजपांविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

3 thoughts on “देवतेच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपाचे महत्त्व”

 1. नामजप करतेवेळी घरात विटाळ(मासिक पाळीच्या) स्त्री ने ऐकले तरी चालेल का? किंवा नामजप / पुजा चालू असताना घरातील मासिक पाळीच्या त्रिने बोललेले चालते का? कि तिने त्यावेळी बोलूनये शास्त्र काय सांगते.
  स्त्रियांनी नामजप करावा का?
  मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती.

  Reply
  • नमस्कार,

   नामजपाला स्थळ-काळाचे कुठलेच बंधन नाही. ती स्त्री पण जप ऐकू शकते व स्वतःदेखील करू शकते.

   Reply

Leave a Comment