ॐ चा नामजप आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !

Article also available in :

अनुक्रमणिका

वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !

sanshodhan

काही दिवसांपूर्वी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या अमेरिकेतील संस्थेने उपग्रहाद्वारे सूर्याच्या नादाचे केलेले ध्वनीमुद्रण यू-ट्यूब या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ध्वनीमुद्रण ऐकल्यावर सूर्याचा नाद आणि ॐकार यांत आश्‍चर्यकारक साधर्म्य असल्याचे लक्षात आले. या पार्श्‍वभूमीवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व सांगणारे संकेतस्थळावरील पुढील लिखाण वाचकांसाठी देत आहोत.

om_1

१. वैज्ञानिक आणि व्यवहार्य कारणांमुळे ॐचा जप करणे लाभदायी !

ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्‍विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्‍वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही, तर हिंदु संस्कृतीतील इतर पारंपरिक धार्मिक कृतींमागे असतात, तशी मनुष्याला दीर्घकालीन लाभ देणारी काही शास्त्रीय आणि व्यवहार्य कारणेही आहेत. (ही कारणे ध्वनी, कंपने आणि अनुनाद (रेझनन्स) यांच्याशी संबंधित शास्त्रावर आधारित आहेत.)

 

ॐचा नामजप ऐकण्यासाठी येथे उपलब्ध आहे.

ॐ चा तारक नामजप

 

ॐ चा मारक नामजप

२. मंत्रातील अक्षरांचा शरिराच्या विविध अवयवांवर होणारा परिणाम

मूलतः मंत्र हे ध्वनीच्या (कंपनांच्या) साहाय्याने परिणाम साधणार्‍या अक्षरांपासून बनलेले असतात. विविध अक्षरांच्या उच्चारांतून विविध कंपने निर्माण होतात आणि त्यांचा शरिरातील विविध अवयवांवर परिणाम होतो. प्रत्येक अक्षराच्या ध्वनीचा शरिरातील विशिष्ट अवयवांशी संबंध असून तो ध्वनी त्या अवयवाच्या ठिकाणी प्रतिध्वनित (रेझनेट) होतो. अ, उ, म ही तीन अक्षरे एकत्र केल्यावर ॐ हा मंत्र बनतो. त्या त्या अक्षरांच्या उच्चारामुळे होणारे परिणाम पुढे दिले आहेत.

२ अ. अचे उच्चारण

अ अ अ… असा उच्चार केल्यास उरोभाग (छाती) आणि उदर (पोट) यांच्याशी संबंधित मज्जासंस्थेमध्ये संवेदना जाणवून त्या ठिकाणी तो प्रतिध्वनित होतो.

२ आ. उचे उच्चारण

उ उ उ… हा उच्चार घसा आणि उरोभाग (छाती) या भागांत संवेदना निर्माण करून तेथे प्रतिध्वनित होतो.

२ इ. मचे उच्चारण

म म म … हा उच्चार नाकपुड्या आणि कवटी या ठिकाणी प्रतिध्वनित होतो. त्यामुळे ॐ च्या सलग उच्चाराने शरिरातील पोट, पाठीचा कणा, घसा, नाक आणि मेंदू हे भाग कार्यरत होतात. ऊर्जा पोटाकडून वरच्या दिशेला मेंदूपर्यंत प्रवाहित होते.

 

३. जिज्ञासेमुळे वैज्ञानिकांनी ॐ या
मंत्रजपामुळे होणारे लाभ प्रयोगांद्वारे पडताळणे

योगी सांगतात, ॐ च्या जपामुळे मनाची एकाग्रता वाढणेे, मन स्थिर आणि शांत होणे, मानसिक ताण घटणे आदी अनुभव येतात. या संदर्भात अधिक जाणून घेण्याची, तसेच आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने त्यांची निश्‍चिती करण्याची जिज्ञासा वैज्ञानिकांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी काही प्रयोग केले आणि त्यातून योगी सांगत असलेल्या अनुभवांना पुष्टी मिळाली. (या संदर्भातील काही उदाहरणे पुढील सूत्रांमध्ये दिली आहेत.)

३ अ. ॐ च्या नियमित जपामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारे सकारात्मक परिणाम

३ अ १. शारीरिक लाभ

अ. रक्तदाब न्यून होणे : ॐ च्या नियमित जपाने रक्तदाब न्यून होऊ शकतो, हे वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. या संदर्भात पुढील नोंद आढळते, ध्यानधारणा आणि ॐ चा मंत्रजप करून श्रीमती क्लॉडिया झेफ यांनी उच्च रक्तदाबाच्या आजारावर मात केली. आश्‍चर्य म्हणजे आता त्यांची औषधे बंद झाली असून त्यांच्या हृदयात निर्माण झालेला दोष आपोआप ठीक झाला. (संदर्भ : chants_bp News Report: http://www.dailymail.co.uk/health/article-1258234/Chants-fine-thing-It-sound-daft-doctors-believe-med

 

४. ॐ च्या जपामुळे त्रास होऊ नये, यासाठी
योग्य अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन जाणून घ्या !

१. निर्गुण (ब्रह्म) तत्त्वापासून सगुणाची (मायेची) निर्मिती होण्यासाठी प्रचंड शक्ती लागते. तशा प्रकारची शक्ती ओंकाराच्या (ॐ च्या) जपामुळे निर्माण होत असल्याने अनधिकार्‍याने ओंकाराचा नामजप केल्यास त्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. एखाद्या विवक्षित कारणासाठी, उदा. वाईट शक्तीचे निवारण करण्यासाठी नामजपाला ॐ लावणे आवश्यक असेल, तर नामजपाच्या वेळी ॐ चा उच्चार जास्त दीर्घ करू नये.

ॐ च्या जपामुळे स्त्रियांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हे सूत्र पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. ॐ कारामुळे निर्माण होणार्‍या स्पंदनांनी शरिरात पुष्कळ शक्ती (उष्णता) निर्माण होते. पुरुषांची जननेंद्रिये शरिराबाहेर असतात. त्यामुळे निर्माण होणार्‍या उष्णतेचा त्यांच्या जननेंद्रियांवर परिणाम होत नाही. स्त्रियांची जननेंद्रिये ओटीपोटात असल्यामुळे या उष्णतेचा त्यांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. त्यांना मासिक पाळी जास्त येणे, न येणे, पाळीच्या वेळी वेदना होणे, गर्भधारणा न होणे, अशा प्रकारच्या विविध व्याधी होऊ शकतात; म्हणून स्त्रियांनी नामजप करतांना गुरूंनी सांगितलेले नसल्यास नामजपाला ॐ लावू नये, उदा. ॐ नमः शिवाय । असे न म्हणता केवळ नमः शिवाय । असे म्हणावे. एरव्ही श्री लावावा. ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्रियांनी नामजपाला ॐ लावण्यात अडचण नाही.

२. ॐ मध्ये पुष्कळ शक्ती असते. यासाठी एखाद्याला विशिष्ट कारणासाठी, उदा. वाईट शक्तींच्या निवारणासाठी अन्य एखाद्या देवतेचा नामजप करणे आवश्यक असल्यास त्या देवतेच्या नामजपापूर्वी ॐ लावतात, उदा. श्री गणपतये नमः । न म्हणता ॐ गँ गणपतये नमः । असा नामजप करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन)

 

५. जिज्ञासूंनो, विश्वाची रहस्ये जाणण्याची क्षमता विज्ञानात
नव्हे, तर सूक्ष्माचे ज्ञान करून देणा-या अध्यात्मातच आहे !

जर तुम्हाला विश्‍वाची रहस्ये जाणून घ्यायची असतील, तर तुम्हाला शक्ती (एनर्जी), वारंवारता (फ्रिक्वेन्सी) आणि स्पंदने (व्हायब्रेशन्स) या संज्ञांच्या दृष्टीकोनातून विचार करावा लागेल.
– निकोला टेस्ला (अमेरिकेत होऊन गेलेले एक सुप्रसिद्ध वैज्ञानिक)
(संदर्भ : http://guruprasad.net/posts/why-indians-chant-om-mantra-scientific-reason/)

शक्ती (एनर्जी), वारंवारता (फ्रिक्वेन्सी) आणि स्पंदने (व्हायब्रेशन्स) हे सूक्ष्मातील घटक आहेत. स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते हा अध्यात्मातील एक मूलभूत सिद्धांत आहे. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता साधनेनेच विकसित होते. ऋषी-मुनींमध्ये ती क्षमता असल्यानेच ते विश्‍वाची सूक्ष्म रहस्ये अचूकपणे कोणत्याही बाह्य उपकरणांविना जाणू शकले ! – संकलक

 

६. ॐचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारा प्रयोग !

प्रयोग १ : पुढील ओळींचा ॐ विरहित उच्चार केल्यावर काय जाणवते ?

प्रयोग २ : पुढील ओळींचा ॐ सहित उच्चार केल्यावर काय जाणवले ?

ॐ शान्तिप्रियः प्रसन्नात्मा प्रशान्तः प्रशमप्रियः।
ॐ उदारकर्मा सुनयः सुवर्चा वर्चसोज्ज्वलः ॥ – सूर्यसहस्रनामस्तोत्र

७. मानवाचे शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांवर
सकारात्मक परिणाम करणारा अन् पूर्णत्वाची अनुभूती देणारा ॐ

Priyanka_Lotlikar_aug2014_col_CMYK
कु. प्रियांका लोटलीकर

प्रयोग १ चे उत्तर : या मंत्राचा ॐविरहित उच्चार केल्यावर मंत्रामध्ये काहीतरी अपूर्णता जाणवते.

प्रयोग २ चे उत्तर : ॐसहित उच्चार केल्यावर मंत्रामध्ये शक्ती कार्यरत असल्याचे जाणवते आणि मनाला आनंद मिळून पूर्णत्वाची अनुभूती येते.

नादब्रह्मस्वरूप, अनादि आणि अनंत परमेश्‍वराचे सगुण-साकार रूप असलेला ॐकार ! अशा या परमेश्‍वराच्या सगुण-साकार रूपाच्या संदर्भात ज्ञानेश्‍वर माऊली म्हणतात,

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥२०॥
– ज्ञानेश्‍वरी, अध्याय १

अर्थ :
अकार म्हणजे सर्व स्थूल नामरूपे, ही गणपतीचे दोन्ही चरण होत. उकार म्हणजे सर्व सूक्ष्म नामरूपे, हे गणेशाचे पोटाचे ठिकाण होत आणि मकार म्हणजे नामरूपांची अव्यक्तदशा, ही गणेशाच्या विशाल मंडलाकार मस्तकाचे ठिकाण होय. ॥१९॥

अकार, उकार आणि मकार या तिन्ही मात्रा ज्या ॐकरात एकरूप आहेत, त्या ॐकारात सर्व वैदिक शब्दब्रह्म साठवलेले आहे. तो ॐकारच सर्व जगाचे आदिबीज, म्हणजे कारण असल्यामुळे श्रीगुरुकृपेने जाणून मी त्याला नमस्कार केला. ॥२०॥

८. ॐ या अक्षराला आदिबीज असे संबोधण्याचे कारण

अनेक ऋषीमुनींनी निर्गुण-निराकार असलेला ब्रह्मांडातील नाद ध्यानधारणेतून ग्रहण केला आणि त्याला सगुण-साकार रूप दिले. या ॐकारातून अक्षरब्रह्माची निर्मिती झाली आणि त्यातून संस्कृत भाषा निर्माण झाली. प्रत्येक आकाराला विशिष्ट अशी स्पंदने असतात, त्याचप्रमाणे ॐ या अक्षराला त्याची स्पंदने आहेत. एखाद्या अक्षराचा ज्या वेळी आपण तोंडाने उच्चार करतो, त्या वेळी त्यातून निघणार्‍या ध्वनीलहरींतून ठराविक स्पंदने बाहेर पडतात. ॐ हे एकमेव असे अक्षर आहे की, ज्या अक्षराच्या उच्चारातून शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती यांची आवश्यकतेनुसार अनुभूती येते. म्हणूनच ॐ या अक्षराला आदिबीज असे संबोधण्यात आले आहे.

९. विज्ञानाच्या साहाय्याने सिद्ध झालेले ॐचे माहात्म्य

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. आर्.एन्. शुक्ल यांनी त्यांच्या विश्‍वचैतन्याचे विज्ञान या ग्रंथामध्ये लिहिले आहे, आकार आणि ऊर्जा यांच्या संबंधाचा शोध करतांना वर्ष १८७० मध्ये बोवीस नावाच्या शास्त्रज्ञाने बोवीस पेंड्यूलम नावाचे उपकरण वापरून अनेक शोध लावले. त्यावरून बोवीस हे परिमाण प्रचलित झाले. बोवीस आणि मिलीव्होल्ट ही आजच्या परिभाषेतील परिमाणे आहेत. व्होल्टेज मोजण्याचे परिमाण हे मिलीव्होल्ट असून एक सहस्र बोवीस म्हणजे एक मिलीव्होल्ट होय. ॐ हा आकार काढल्यावर या आकारात शास्त्रज्ञांच्या मते इतर चिन्हांच्या कित्येक पटींनी अधिक म्हणजे दहा लक्ष बोवीस इतकी ऊर्जा आणि चैतन्य आहे.

ॐकार हा सर्वव्यापक आणि स्वस्वरूप असल्यामुळे परिपूर्ण असतो, तसेच तो पूर्णत्व प्राप्त करून देणारा आहे. अशा शब्दब्रह्माची अनुभूती देणार्‍या ॐकाराच्या संदर्भात देशात आणि विदेशात अनेक ठिकाणी संशोधन करण्यात आले आहे. अलीकडेच अमेरिकेतील नासा या संशोधक संघटनेमध्ये ॐकाराच्या नादाच्या संदर्भातही संशोधन करण्यात आले. त्यात नादस्वरूप ॐकाराचा मानवाचे शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांवर सकारात्मक परिणाम होतो, असे सिद्ध झाले.

१०. ध्यानधारणेतून ग्रहण केलेल्या ॐकाराची अमूल्य देणगी
विश्‍वाला देणार्‍या ऋषिमुनींच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

आजचे युग म्हणजे यंत्रयुग किंवा वैज्ञानिक युग आहे. प्रत्येक गोेष्ट वैज्ञानिक उपकरणाद्वारे सप्रमाण सिद्ध केली, तरच त्याची संपूर्ण जगात दखल घेतली जाते. पूर्वीच्या काळी कोणतीही वैज्ञानिक उपकरणे नसतांनाही आपल्या ऋषिमुनींनी निर्गुण-निराकार असलेला ब्रह्मांडातील नाद ध्यानधारणेतून ग्रहण केला आणि त्याला सगुण-साकार रूप दिले. यासह त्यांनी अनेक शोधही लावले, जे सध्याच्या आधुनिक प्रगत विज्ञानाला लावणे शक्य झाले नाही. त्यामुळे असे हे सर्वव्यापी समष्टी कार्य करणार्‍या ऋषींमुळे आम्हाला ॐकाराचे सगुण रूप लाभले आहेत, हे आमचे थोर भाग्य आहे. अशा या ऋषींच्या चरणी आमचे त्रिवार वंदन !

– कु. प्रियांका लोटलीकर (४.७.२०१६)

ॐची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये
अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal
Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि
अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

प्रत्येक आकाराला विशिष्ट स्पंदने असतात, त्याचप्रमाणे ॐ या अक्षराला त्याची स्पंदने आहेत. ज्या वेळी एखाद्या अक्षराचा आपण तोंडाने उच्चार करतो, त्या वेळी त्यातून निघणार्‍या ध्वनीलहरींतून ठराविक स्पंदने बाहेर पडतात.

येथे मंत्राचा ॐविरहित उच्चार केल्यावर आणि ॐसहित उच्चार केल्यावर व्यक्तीवर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. येथे देण्यात आलेल्या वैज्ञानिक चाचणीतून ॐचे महत्त्व लक्षात येऊन तिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

 

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

 

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीमध्ये योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या ॐ आनंदं हिमालयं विष्णुं गरुडध्वजं ॐ । ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहं ॐ ॥ या मंत्राचे यू.टी.एस्. उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. एकाच व्यक्तीने या मंत्राचा ॐविरहित उच्चार करणे आणि ॐसहित उच्चार करणे, या दोन्ही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

३. यू.टी.एस्. (Universal Thermal Scanner) उपकरण

३ अ. उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील माजी परमाणु वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशुवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करू शकतो, असे ते सांगतात.

३ आ. उपकरणाद्वारे करायच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील दोन प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

३ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ आ ३. घटकाची प्रभावळ : ही मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात त्याची लाळ किंवा छायाचित्र आणि वनस्पतींच्या संदर्भात त्यांची पाने.

 

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली काळजी

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. त्या व्यक्तीच्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

 

५. यू.टी.एस्. (Universal Thermal
Scanner) उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

0m_table

 

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा कमी अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

५ अ. निरीक्षणांचे विवेचन

५ अ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे : सर्वसाधारण वास्तू किंवा व्यक्ती यांच्या चाचणीमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण वरील चाचणीत दोन्ही वेळी मंत्राचे उच्चारण केल्यावर नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. संतांच्या संकल्पशक्तीमुळे या मंत्रातील प्रत्येक शब्दामध्येच सात्त्विक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे मंत्राचे ॐविरहित उच्चारण केले, तरी नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

५ अ २. ॐविरहित आणि ॐसहित मंत्राचे उच्चारण या दोन्ही चाचण्यांच्या वेळी सकारात्मक ऊर्जा आढळणे : सर्वच व्यक्ती, वस्तू अथवा वास्तू यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येतेच, असे नाही; परंतु ॐविरहित आणि ॐसहित मंत्राचे उच्चारण या दोन्ही चाचण्यांच्या वेळी स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या आणि त्या वेळी प्रभावळ साधारण अर्धा मीटरने वाढली, म्हणजेच त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आढळली.

५ अ ३. मंत्राच्या ॐविरहित उच्चाराच्या तुलनेत आणि ॐसहित उच्चार करण्यातून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होणे : या ठिकाणी व्यक्तीची चाचणी घेतल्यावर स्कॅनरच्या भुजा केवळ ३० अंशाच्या कोनात उघडल्या अन् त्याची प्रभावळ आली नाही. त्याच व्यक्तीने ॐविरहित मंत्राचे उच्चारण केल्यावर प्रभावळ ३.८९ मीटरहूनही अधिक आहे, तर ॐसहित मंत्राचे उच्चारण केल्यावर प्रभावळ ४.०८ मीटर म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे.
अनेक ऋषिमुनींनी निर्गुण-निराकार असलेला ब्रह्मांडातील नाद ध्यानधारणेतून ग्रहण केला आणि त्याला सगुण-साकार रूप दिले. या ॐकारातून अक्षरब्रह्माची निर्मिती झाली आणि त्यातून संस्कृत भाषा निर्माण झाली. प्रत्येक आकाराला विशिष्ट अशी स्पंदने असतात. त्याचप्रमाणे ॐ या अक्षराला त्याची स्पंदने आहेत. वरील चाचणीवरून ॐ लावून मंत्र म्हटल्यामुळे प्रभावळीतून सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ झाल्याचे दिसते. यावरून ॐचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते.

– आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१५.७.२०१६)