‘दान’ या संकल्पनेविषयी पू. अनंत आठवले यांना साधिकेने विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे

‘दानाची संकल्पना नेमकी काय आहे ?’, याविषयी मी पू. भाऊकाकांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांना) जिज्ञासेमुळे प्रश्‍न विचारले. त्यातून मला पुष्कळ महत्त्वपूर्ण सूत्रे शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत.

पू. अनंत आठवले

 

१. दान देतांना कर्तेपणा आणि अहंकार असल्यास त्याला कर्मफळ असते !

१ अ. प्रश्‍न : ‘दान आणि ‘एखाद्याला एखादी वस्तू सहज देणे’ यांत काय भेद आहे ? ‘एखाद्याला एखादी वस्तू सहज देणे’, म्हणजे दान समजायचे का ? कुठलेही दान देणारी व्यक्ती दान घेणार्‍या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता एखादी वस्तू सहज देते, तेव्हा ते दान होत नाही का ? तेव्हा दोघांमध्ये देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो का ?

१ आ. उत्तर : ‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला. त्यात दान देण्याचे कर्म केल्याने कर्मफळ आले. ‘सहज देणे’ याविषयी पुढे सूत्र क्र. ३ मध्ये दिले आहे.

 

२. दान देतांना अपेक्षा असल्यास ते राजसी दान होईल आणि सात्त्विक,
राजसी अन् तामसी या तिन्ही प्रकारच्या दानांत कर्तेपणा असल्याने कर्मफळ आहे !

२ अ. प्रश्‍न : दान देणार्‍याच्या मनात काही अपेक्षा आणि कर्तेपणा आला, तर काय होते ?

२ आ. उत्तर : ते राजसी दान असते. भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत (अध्याय १७, श्‍लोक २० ते २२ यांमध्ये) दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत.

२ आ १. सात्त्विक दान : कर्तव्य म्हणून, परतफेडीची अपेक्षा न ठेवता, योग्य समयी आणि स्थानी सत्पात्राला दिलेले दान.

२ आ २. राजसी दान : उपकाराची परतफेड करण्यासाठी किंवा ‘घेणारा पुढे परतफेड करील’, या हेतूने फळाची अपेक्षा ठेवून आपली वस्तू दुसर्‍याला दिली जात असल्याचे दुःख होऊन दिलेले दान

२ आ ३. तामसी दान : अयोग्य जागी आणि समयी कुपात्राला दिलेले, घेणार्‍याचा आदर न राखता अपमान करून दिलेले दान.

प्रश्‍नात अपेक्षा आणि कर्तेपणाचा उल्लेख आहे. अपेक्षा असली, तर ते राजसी दान होईल. कर्तेपणा तिन्ही प्रकारच्या दानांत आहे; म्हणून कर्मफळ आहे.

 

३. वस्तू सहज दिली जाण्यात दानाची भावनाच
नसल्याने कर्म नव्हे, तर केवळ क्रिया घडते; म्हणून कर्मफळ नाही !

३ अ. प्रश्‍न : एखादी वस्तू सहज दिली जाणे, म्हणजे काय ?

३ आ. उत्तर : जेव्हा एखादी वस्तू सहज दिली जाते, तेव्हा त्यामागे कोणाताही उद्देश किंवा अपेक्षा नसते. कुणी भेटायला आला, तर आपण त्याला चहा देतो. हे दान नसते. तो केवळ शिष्टाचार असतो. ती सहज कृती असते. लग्नात किंवा वाढदिवसाला दिलेले उपहार हे दान नसते. ते प्रेमाचे प्रतीक असते. पुढे ते देण्याचा विशेष विचारही मनात रहात नाही. वस्तू सहज दिली जाण्यात दानाची भावनाच नसल्याने केवळ क्रिया घडते. कर्म नाही; म्हणून कर्मफळ नाही.

 

४. ‘दान घेणार्‍याविषयी दान देणार्‍याच्या मनात, तसेच
दान देणार्‍याविषयी दान घेणार्‍याच्या मनात काय भावना
होती ?’, त्यावर ‘देवाण-घेवाण हिशोब निर्माण होणे’ अवलंबून असते !

४ अ. प्रश्‍न : एखाद्याला एखादी वस्तू सहज दिली आणि नंतर मनात ‘मी चहा दिला किंवा अमुक एक गोष्ट दिली’, हा कर्तेपणा आला, तर त्याचा काय परिणाम होतो ? देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो का ?

४ अ १. उत्तर : देणार्‍यासाठी होईल. ‘घेणार्‍याविषयी त्याच्या मनात काय भावना होती ?’, त्यावर अवलंबून राहील.

४ आ. प्रश्‍न : देणार्‍याच्या मनात अपेक्षा किंवा कर्तेपणा आला; पण घेणार्‍याच्या मनात काहीच आले नाही, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो का ?

४ आ १. उत्तर : वरील प्रश्‍नाच्या उत्तराप्रमाणे

 

५. दातेपणाची भावना नसल्यास दान होणार नाही !

५ अ. प्रश्‍न : दान केव्हा होणार नाही ?

५ आ उत्तर : जेव्हा देणार्‍यात दातेपणाची भावना नसेल, तेव्हा दान होणार नाही.

 

६. दान धर्मकार्यासाठी घेतल्यास कर्मफल लागू होत नाही आणि धर्मकार्य केल्याचे पुण्य मिळते !

६ अ. प्रश्‍न : दान घेणार्‍याच्या मनात आले, ‘त्यांनी मला अमुक दान दिले’; पण देणार्‍याच्या मनात काही नसेल, तर कर्मफलन्याय लागू होतो का ?

६ आ. उत्तर : दान स्वतःसाठी घेतले, तर कर्मफलन्याय लागू होतो; पण धर्मकार्यासाठी घेतले, तर तिथे ते घेण्याचे कर्मफल लागू होत नाही; पण धर्मकार्य केल्याचे पुण्य मिळते.

 

७. दानाने आणि गुरुकार्याने हळूहळू चित्तशुद्धी होते !

७ अ. प्रश्‍न : सर्वांत श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्याने, तसेच गुरुकार्याने आध्यात्मिक उन्नती होते का ?

७ आ. उत्तर : आध्यात्मिक उन्नती म्हणजे चित्तशुद्धी होय. दानाने हळूहळू चित्तशुद्धी होत जाईल; पण त्याला वेळ लागेल. गुरुकार्य केल्यामुळेही हळूहळू चित्तशुद्धी होते.

 

८. गुरुकार्याची तीव्र तळमळ असल्यास चित्तशुद्धी जलद होते !

८ अ. प्रश्‍न : येथे त्या साधकाच्या गुरुकार्याच्या तळमळीवर चित्तशुद्धी अवलंबून असेल ना ? म्हणजे  गुरुकार्याची तीव्र तळमळ असेल, तर जलद चित्तशुद्धी होते. असेच ना ?

८ आ. उत्तर : हो.

 

९. यज्ञ, दान आणि तप या तिन्ही कर्मांनी चित्तशुद्धी होते !

भगवान् श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे,

यज्ञो दानं तपश्‍चैव पावनानि मनीषिणाम् । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्‍लोक ५

अर्थ : यज्ञ, दान आणि तप ही तीनही कर्मे बुद्धीमंत मनुष्याला पवित्र करतात.

पवित्र करतात म्हणजे काय, तर चित्तशुद्धी करतात.

– कु. प्रियांका माकणीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१२.२०१९)

 

ममत्व कसे दूर करावे ?

१. स्वतःचे धन चोरीला गेल्यास दुःख होते आणि दुसर्‍याचे
धन चोरीला गेल्यास त्यात ममत्व नसल्याने तेवढे दुःख होत नाही !

१ अ. प्रश्‍न : ‘ममत्वा’विषयी विस्तृत माहिती गीतेमध्ये आहे का ? ‘ममत्वा’तून बाहेर कसे येता येईल ?

१ आ. उत्तर : ‘ममत्व’ यातील ‘मम’ म्हणजे माझे आणि ‘त्व’ म्हणजे तसा भाव. ‘माझे आहे’, हा भाव, म्हणजे ममत्व, उदा. माझा मुलगा, माझे घर, माझी गाडी, माझे पैसे इत्यादी. आपले धन चोरीला गेले, तर आपल्याला दुःख होते. दुसर्‍याचे धन चोरीला गेले, तर तेवढे तीव्र दुःख होते का ? नाही; कारण त्यात ममत्व नसते.

 

२. ‘काहीही माझे नाही’, असे म्हणण्याने ममता जाण्यास
सुलभ होईल’, असे ब्रम्हलीन स्वामी रामसुखदास महाराज यांनी सांगणे

ब्रम्हलीन स्वामी रामसुखदास महाराजांनी उपाय सांगितला आहे, ‘मेरा कुछ नहीं है (माझे काहीही नाही.)’, असे मानण्याने ममता जाईल.’

ममता जाणे सोपे नाही. ते पुष्कळ कठीण आहे. त्यामुळेच पूर्वी लोक संन्यास घेत. घरदार, नातलग सर्व सोडून दूर जात असत. भिक्षासुद्धा केवळ आजच्यापुरती घेत असत. उद्यासाठी संग्रह करत नसत. घरी रहात असलो, तरी ‘नातलग, मित्र, यांचे हित करणे’, हे आपले कर्तव्य समजावे; पण त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. ‘त्यांच्याशी संयोग तात्पुरता आहे’, हे ओळखावे.’

– कु. प्रियांका माकणीकर (२५.१२.२०१९)

Leave a Comment