आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना या विषयावर सनातन संस्थेच्या डॉ. सायली यादव यांचे मार्गदर्शन

 मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि गुजरात येथील डॉक्टरांचा ऑनलाईन परिसंवाद

राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे

मुंबई – समाज आणि राष्ट्र यांची सद्यस्थिती भय, असुरक्षितता, भ्रष्टाचार आदी अनेक आघातांमुळे बिघडली आहे. शरीरात येण्याआधी आजार व्यक्तीच्या मनात येतो, असे होमिओपॅथी उपचारात सांगितले आहे. व्यक्तीचे आरोग्य हे त्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करण्यासह व्यक्तीच्या सामाजिक अन् आध्यात्मिक आरोग्याचाही विचार करायला हवा. म्हणूनच राष्ट्र आणि धर्माच्या स्थितीचा अभ्यास केल्याशिवाय समाजात रहाणार्‍या व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करता येणार नाही. त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यासह राष्ट्र आणि धर्म यांच्या स्थितीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी ऑनलाईन परिसंवादामध्ये सहभागी डॉक्टरांना केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील डॉक्टरांसाठी आयोजित या परिसंवादामध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती अन् डॉक्टरांचे योगदान या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

या परिसंवादामध्ये १०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. शंखनाद, वेदमंत्रपठण आणि प्रार्थना यांनी परिसंवादाला प्रारंभ झाला. पुणे येथील डॉ. ज्योती काळे यांनी परिसंवादाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई येथील डॉ. ममता देसाई यांनी केले. वैद्यकीय उपचारांना अध्यात्माची जोड कशी द्यावी, त्याचा लाभ कसा होतो आदी विविध शंकांचे निरसन या परिसंवादातून करण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी नामस्मरण, मंत्रउपाय, सेवेचे महत्त्व, साधनेने होणारा लाभ या विषयीचे विविध प्रश्‍न उत्स्फूर्तपणे विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.

 

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेविना
पर्याय नाही ! – डॉ. सायली यादव, सनातन संस्था

या वेळी आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करतांना मुंबई येथील डॉ. सायली यादव म्हणाल्या, सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. जागतिक स्तरावरील विचारवंत जगात केव्हाही युद्ध भडकू शकेल, अशी शक्यता व्यक्त करत आहेत. मानवनिर्मित प्रलयासह नैसर्गिक प्रलयांच्याही प्रकोपाला समाजाला सामोरे जावे लागत आहे. संत द्रष्टे असतात. अनेक संतांसह सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सर्वांना साधना करण्याचे आवाहन केले आहे. भगवंताची कृपा असेल, तर या आपत्काळापासून आपले रक्षण होऊ शकेल. यासाठी नामस्मरण ही साधना सांगितली आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनीच साधना करणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी या वेळी प्रथमोपचार, वैद्यकीय उपक्रम, आरोग्य शिबिरे आदी उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्यात सहभागी व्हावे, तसेच आध्यात्मिक बळ प्राप्त होण्यासाठी साधना करावी, असे परिसंवादामध्ये सहभागी डॉक्टरांना आवाहन केले. या दृष्टीने १५ दिवसांतून कॉन्फरन्स कॉलद्वारे एकत्र येण्याच्या केलेल्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment