उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन

उद्योजकांसाठीच्या विशेष बैठकीमध्ये १५३ उद्योजकांचा सहभाग

सोलापूर – सध्या दळणवळण बंदीमुळे कामगार स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे अनेक व्यापार्‍यांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घडी बसवण्याविषयी ताण निर्माण झाला आहे. या कालावधीत अनेक कामगारांनी स्थलांतर केले. असे प्रामाणिक कामगार पुन्हा आपल्याला मिळतील का ? नवीन कामगारांना काम शिकवण्यास पुष्कळ दिवस लागतील ? पुन्हा माझा उद्योग उभा कसा राहील ?, असे अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. या ताणाचा परिणाम होऊन भीती वाढते, निद्रानाश होतो, चिडचिड, राग यांचे प्रमाण वाढते. या सर्व विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी आत्मबळाची आवश्यकता असते आणि हे आत्मबळ साधनेने निर्माण होते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील १५३ उद्योजक सहभागी झाले होेते. बैठकीचा उद्देश सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की, ताण न्यून होण्यासाठी मनाला स्वयंसूचना द्या ! सनातन संस्थेचे अनेक साधक व्यावसायिक आहेत; पण साधना केल्याने आणि स्वयंसूचना दिल्यामुळे ते तणावमुक्त जीवन जगत आहेत. नामसाधना हा कलीयुगातील साधनेचा सुलभ मार्ग आहे. नामजपामुळे मन स्थिर होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment