अमेरिकेत प्रार्थनेद्वारे करणार कोरोनाबाधितांवर उपचार !

  • भारतीय वंशाचे डॉ. धनंजय लाकिरेड्डी यांच्या प्रेअर थेरेपीला आरंभ 
  • सर्व धर्मियांच्या प्रार्थनेचा समावेश 
  • वैद्यकीय औषधोपचारही चालूच रहाणार

भारत हा विश्‍वाचा आध्यात्मिक गुरु असूनही भारतात असा प्रयोग करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही; कारण भारताने विनाशकारी निधर्मीवाद अंगीकारला आहे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. येथे आतापर्यंत तब्बल ११ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर ६३ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही याची साथ अटोक्यात आणण्यात अमेरिकेला अपयश येत आहे. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून प्रार्थना केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का ?, याविषयी संशोधन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय वंशाचे डॉ. धनंजय लाकिरेड्डी यांनी यासाठी १ मेपासून प्रेअर थेरेपी चालू केली आहे. प्रार्थनेद्वारे कोरोनाबाधितांवर उपचार करतांना वैद्यकीय औषधोपचारही चालूच रहाणार आहेत.

१. आरंभी प्रार्थना अभ्यासाचा प्रयोग ५०० रुग्णांवर करण्यात येणार आहे. या ५०० रुग्णांची २ गटांत विभागणी करण्यात येणार आहे. या रुग्णांना या प्रयोगाची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात येणार नाही. या रुग्णांसाठी त्यांच्या धर्मानुसार प्रार्थना करण्यात येणार आहे. रुग्णांमध्ये ख्रिस्ती, मुसलमान, हिंदु, बौद्ध आदी धर्मीय रुग्णांचा समावेश आहे.

२. डॉ. धनंजय यांनी या प्रेअर थेरेपीच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक वैद्यकीय पथकांचा गट सिद्ध केला आहे. हा गट रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे. त्यामध्ये रुग्ण किती दिवस व्हेंटिलेटरवर आहेत ?, त्यांच्या शरिरातील किती आणि कोणत्या अवयवांनी काम करणे बंद केले ? किती दिवसांनी त्यांना अतीदक्षता विभगातून बाहेर काढण्यात आले ?, किती जणांचा मृत्यू झाला ? आदी अनेक प्रकारच्या माहितीची नोंद ठेवण्यात येणार आहे. डॉ. लाकिरेड्डी यांच्या प्रयोगाविषयी त्यांच्या सहकार्‍यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

 

आमचा दैवी शक्तीवरही विश्‍वास ! – डॉ. धनंजय लाकिरेड्डी

डॉ. धनंजय लाकिरेड्डी म्हणाले, आम्ही विज्ञानावरही विश्‍वास ठेवतो. त्याशिवाय दैवी अलौकिक शक्तीवरही विश्‍वास ठेवतो. त्यामुळे दैवी शक्तीचा रुग्णांवर काही परिणाम होतो का ?, याचा अभ्यास आम्ही करणार आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Leave a Comment