कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात हिंदु धर्मानुसार आचरण करणे जगाला बंधनकारक होणार असणे आणि यातूनच हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे सर्वश्रेष्ठत्व आणि अलौकिकत्व सिद्ध होणार असणे

‘सध्या कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे. या विषाणूने सर्वांना हादरवून सोडले आहे. ‘अशा प्रकारच्या आपत्तीजनक घटनांमधून ईश्‍वराला काय शिकवायचे आहे ? हिंदु धर्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व कोणते ? साधना करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा का करायला हवी ?’ याविषयी काही सूत्रे पुढे दिली आहेत.

 

१. कोरोना विषाणूंच्या संकटाला तोंड देण्यासाठी ईश्‍वरालाच शरण जाणे आवश्यक असणे

‘कोरोना विषाणूंच्या या भयंकर संकटाला तोंड देण्यासाठी ईश्‍वरालाच शरण जाणे आवश्यक आहे’, अशी स्थिती सध्या मनुष्यावर ओढवली आहे. या संकटाच्या माध्यमातून मनुष्य त्याचे भोग भोगत आहे. भोग भोगण्याच्या या प्रक्रियेत मानव सर्वशक्तीमान ईश्‍वराला शरण गेल्यास कृपाळू, दयाळू आणि प्रीतीमय ईश्‍वर त्याला भोग भोगण्याची शक्ती देतो अन् त्याचे भोग सुसह्य करतो.

 

२. या आपत्तीच्या माध्यमातून भगवंताने केलेली कृपा !

अ. सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालये, आगगाडी, बस आणि बसस्थानके, महामार्ग इत्यादी ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.

आ. सार्वजनिक ठिकाणी येण्या-जाण्यावर बंदी असल्यामुळे प्रत्येक जण बराच वेळ कुटुंबियांच्या समवेतच रहाणार आहे. त्यामुळे त्यांची एकमेकांशी जवळीक वाढणार आहे.

इ. जागतिक महासत्ता असलेल्या राष्ट्रांचा या आपत्तीमुळे अहंकार न्यून होण्यास आरंभ झाला. ‘बुद्धी आणि संपत्ती यांच्या जोरावर मी काहीही करू शकतो’, या मानवाच्या अहंकाराला देवाने एक प्रकारे मोठाच तडा दिला आहे.

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

 

३. कोरोनाच्या आपत्तीमुळे काळाच्या कसोटीवर सिद्ध
झालेले हिंदु धर्माचरणाचे महत्त्व, श्रेष्ठत्व आणि अलौकिकत्व !

३ अ. शाकाहार करणे

अनेकांनी मांसाहारी भोजन बंद करून शाकाहारी भोजनाला आरंभ केला आहे. त्यामुळे त्यांचा तमोगुणी आहार बंद होऊन सत्त्वगुणी आहार करण्यास आरंभ झाला आहे.

३ आ. घरचे सात्त्विक अन्न खाणे

सार्वजनिक उपाहारगृहे आणि मद्यालये बंद ठेवल्यामुळे लोकांचे बाहेरील तामसिक खाणे-पिणे बंद झाले. परिणामस्वरूप मनुष्य घरातील सात्त्विक अन्न ग्रहण करत असल्यामुळे त्याची सात्त्विकता वाढेल.

३ इ. ध्यानधारणा आणि योग करणे

अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जगातील अनेक नामवंत विद्यापिठांनी हिंदु धर्माने सांगितल्यानुसार ‘ध्यानधारणा आणि योगासने करा’, असे सांगितले आहे.

३ ई. एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करणे

एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करणे, मिठी मारणे, चुंबन घेणे यांसारखे अपप्रकार बंद करून मनुष्य आपोआपच हिंदु धर्मानुसार ‘नमस्कार’ करू लागला आहे. यामुळे कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून रक्षण तर होतेच आणि अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या लोकांपासूनही रक्षण होते अन् योग्य धर्माचरण केल्याचा त्याला लाभही होतोे.

 

४. भगवंतानेच हिंदु धर्माचा अभ्यास करण्यासाठी मनुष्याला
बाध्य करणे आणि अत्यल्प काळात जगभरात हिंदु धर्माचा प्रसार करणे

भगवंताने या आपत्तीच्या माध्यमातून जगातील सर्वांना अप्रत्यक्षपणे हिंदु धर्माचरणाच्या कृती शिकवण्यास आरंभ केला आहे. ही भगवंताने मानवावर केलेली मोठी कृपाच आहे. ‘संपूर्ण जगभरात हिंदु धर्माने सांगितलेल्या सर्व चालीरीती किती योग्य आहेत ?’, याचा नव्याने अभ्यास होण्यास आरंभही झाला आहे. हेही नसे थोडके ! कारण आतापर्यंत ‘हे सर्व बुरसटलेले विचार आहेत, टाकाऊ आहेत’, असे सर्व पाश्‍चात्त्य लोक आणि त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी म्हणत होते. या एकाच प्रसंगातून देवाने त्यांना हिंदु धर्मातील या संस्कारांचे आणि परंपरांचे महत्त्व लक्षात आणून दिले. भगवंतानेच अल्प काळात महान हिंदु धर्माचा जगभरात प्रसार केला.

यातूनच पुढे काही जिज्ञासू हिंदु संस्कृतीचा अभ्यास करून ती अंगीकारायला आरंभ करतील. अशा प्रकारे ‘वाईटातूनही काहीतरी चांगलेच निघते’, हे आपल्याला अनुभवता येईल. गीतेतील वचनानुसार ‘जे होते, ते नेहमी आपल्या भल्यासाठीच होते’, याचा सर्वांनाच अनुभव येईल.

 

५. कोरोनाच्या आपत्तीमुळे सध्या सर्व व्यवहार बंद होत चालल्याने
हवालदिल झालेल्या माणसाला बारा बलुतेदार पद्धतीचे महत्त्व लक्षात येईल !

कोरोनाच्या आपत्तीमुळे सध्या सर्व व्यवहार बंद होत चालल्याने माणूस हवालदिल होत चालला आहे. ‘आपले कसे होईल ?’, असे त्याला वाटते. ‘उद्या गाड्या बंद पडल्यावर खायचे पदार्थ कुठून आणायचे ? उदरनिर्वाह कसा करायचा ?’, असे मोठे प्रश्‍न त्याच्यासमोर उभे आहेत. तेव्हा भारतीय संस्कृतीतील बारा बलुतेदार पद्धतीचे महत्त्व लक्षात येईल. (बारा बलुतेदार म्हणजे सुतार, गुरव, नाभिक, परीट, कुंभार, चांभार, तेली, कोळी, लोहार आणि अन्य)

प्रत्येक गाव हे पूर्वी स्वावलंबी होते. गावाच्या सर्व आवश्यकता शक्य तितक्या गावातच भागवल्या जात होत्या. गावाला इतरांवर फारसे अवलंबून रहावे लागत नव्हते; परंतु मानव आता इतका पराकोटीचा परावलंबी झाला आहे की, काही काळ व्यवहार ठप्प झाल्यावर आता त्याला जगणेच कठीण होऊन गेले आहे.

यामुळे ‘पुन्हा एकदा भारतीय पारंपरिक जीवनपद्धतीचा अभ्यास होईल आणि त्याचे महत्त्व जगाला पटेल’, असेच म्हणावे लागत आहे.

 

६. भीषण आपत्काळात शेवटी ईश्‍वराची भक्ती आणि साधना तारून नेऊ शकणे

या भीषण आपत्काळातून बाहेर पडण्यासाठी ‘भगवंताची भक्ती करणे आणि साधना करणे’ याविना दुसरा मार्गच नाही. काळ वेगात चालला आहे. आता वेळ वाया न घालवता जीवनाचे परम कल्याण करण्यासाठी ईश्‍वराने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे कृती करूया, म्हणजेच हिंदु धर्मानुसार आचरण करून देवाला शरण जाऊया आणि साधना करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. यातच माझे, समाजाचे, राष्ट्राचे आणि पर्यायाने विश्‍वाचे कल्याण आहे !’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.३.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Disclaimer : At the outset, Sanatan Sanstha advises all our readers to adhere to all local and national directives to stop the spread of the coronavirus outbreak (COVID-19) in your region. Sanatan Sanstha recommends the continuation of conventional medical treatment as advised by medical authorities in your region. Spiritual remedies given in this article are not a substitute for conventional medical treatment or any preventative measures to arrest the spread of the coronavirus. Readers are advised to take up any spiritual healing remedy at their own discretion.

Leave a Comment