धर्मग्रंथांसंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

खंडण करण्यामागील उद्देश

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. काही लोकांना ती टीका खरी वाटते, तर अनेकांना ‘ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण करणे शक्य होत नाही. काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात.

 

असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण या ग्रंथात दिले आहे.

 

 

 

१. धर्मग्रंथांची व्युत्पत्ती, तसेच निर्मिती काळाविषयी केलेला अपप्रचार आणि त्यावरील खंडण

१ अ. म्हणे, धर्मग्रंथ हे कलियुगात लिहिले गेले !

अयोग्य विचार
१. काही धर्मग्रंथांच्या रचनाकाळाच्या संदर्भातील एक मत

अ. वैदिक संहिता, ब्राह्मणग्रंथ अन् काही उपनिषदे (खि.पू. ४००० ते खि.पू. १०००)

आ. काही उपनिषदे, निरुक्त (खि.पू. ८०० ते खि.पू. ५००)

इ. प्रमुख श्रौतसूत्रे आणि काही गृह्यसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ४००)

ई. धर्मसूत्रे, गृह्यसूत्रे, पाणिनीची व्याकरणसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ३००)

उ. जैमिनीचे पूर्वमीमांसासूत्र (खि.पू. ५०० ते खि.पू. २००)

ऊ. कौटिल्याचे अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य (खि.पू. ३०० ते खि.पू. १००)

ए. मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति (खि.पू. २०० ते इ.स. ३००)

ऐ. नारदस्मृति, काही पुराणे (इ.स. १०० ते इ.स. ४००)

ओ. इतर स्मृती आणि काही पुराणे (इ.स. ६०० ते इ.स. ९००)

 

२. स्मृतींच्या रचनाकाळाच्या संदर्भातील दुसरे मत

अ. गौतम, आपस्तंब, बौधायन धर्मसूत्रे आणि मनुस्मृति (सनपूर्व ६०० ते इ.स. १००)

आ. याज्ञवल्क्य, पराशर, नारद इत्यादींच्या स्मृती (इ.स. १०० ते इ.स. २००)

इ. इतर स्मृती (इ.स. २०० ते इ.स. ८००)

ई. स्मृतीवरच्या टीका आणि निबंध या स्वरूपाची ग्रंथरचना (इ.स. ८०० ते इ.स. १८००)

 

टीप – कंसातील वर्षे ही संबंधित ग्रंथांच्या रचनेचा कालखंड दर्शवतात.

 

ऐतिहासिक दृष्टीने सर्व स्मृतिकार हे कलियुगातीलच आहेत; पण निबंधकारांनी त्या सर्वांना कलियुगाच्या पूर्वीचे ठरवले आहे.

 
खंडण

१. वेदोऽखिलो धर्ममूलम् । – मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ८

 

अर्थ : वेदातून सनातन धर्म प्रगटला. (सर्व वेद हे धर्माचे मूळ आहे.)

 

२. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै । – श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ६, वाक्य १८

 

अर्थ : परमात्मा सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाला विविध सामर्थ्याने युक्त असा उत्पन्न करतो आणि प्रसिद्ध आत्मा त्या हिरण्यगर्भाला ऋग्वेदादी महत् शास्त्रे देतो.

 

 

`जो ब्रह्मदेवाला उत्पन्न करून वेद प्रदान करतो, त्याला मी शरण जातो. म्हणजे वेदांचे अस्तित्व सृष्टीच्या आरंभी होते. भगवत्पाद शंकर सांगतात, सर्व सृष्टी वेदापासून झाली. सृष्टीच्या आद्यतत्त्वात वेद आहेत. प्राचीन शास्त्रातील कल्पकाळ परिगणन पाहिले, तर सृष्टी उत्पन्न होऊन ४२,०३,३५,९९,९९४ वर्षे झाली आहेत. ‘संपूर्ण वेदराशी (कारण वेद पर्वताप्रमाणे असून अनंत आहेत.) सृष्टीच्या प्रारंभी अस्तित्वात आला’, हा आमचा सिद्धांत आहे. व्यासांनी द्वापराच्या अंती वेदांची कांडे केली, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे विभाग केले आहेत. द्वापरयुगाचा अंत म्हणजे आजच्या कलियुगाचा प्रारंभ अदमासे ५०५० वर्षांपूर्वी झाला. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे विभाग ५,००० वर्षांपूर्वी झाले आहेत.’

 

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (१)

 

३. चार युगानंतर वेद नाहीसे होणे आणि सप्तर्षींनी पुन्हा खाली येऊन वेद लिहिणे : ‘प्रत्येक चार युगांनंतर, म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग या युगांनंतर वेद नाहीसे होतात. त्या वेळी सप्तर्षी खाली येऊन वेद पुन्हा निर्माण करतात.’

 

– वैद्याचार्य (डॉ.) वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई. (वर्ष १९८७)

 

४. `वेद ते पुराणे हे सर्व ग्रंथ युगायुगात परत परत लिहिले गेले असल्याने ते सर्व अनादि आहेत.’

 

– प.पू. डॉ. जयंत आठवले

 

१ आ. म्हणे, याज्ञवल्क्यांनी वेदांनंतर खिलभाग रचला !

टीका

`याज्ञवल्क्यांनी वेदांनंतर खिलभाग रचला.’ – आधुनिक

 

खंडण

खिलभाग वेदांनंतर रचला इत्यादी खोटे असणे आणि याज्ञवल्क्यांना सूर्याच्या आशीर्वादाने खिल अन् उत्तरभाग यांसह वेद प्राप्त होणे : ‘महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट विवरण आहे,

 

प्रतिष्ठास्यति ते वेदः सखिलः सोत्तरो द्विज ।

 

कृत्स्नं शतपथं चैव प्रणेष्यसि द्विजर्षभ ।। – महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ३०६, श्लोक १०

 

अर्थ : हे द्विजश्रेष्ठ याज्ञवल्क्य, खिल आणि उत्तरभाग यांसह वेद तुझ्यात प्रतिष्ठित होतील आणि हे द्विजा ! तू संपूर्ण शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे प्रवचन करशील.

 

 गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

याज्ञवल्क्याच्या तीव्र तपस्येने संतुष्ट होऊन भगवान सूर्यनारायण त्यांना म्हणाले, “तुझ्या शरिरात वाणी होऊन
श्री सरस्वती प्रवेश करील.’’ त्याप्रमाणे त्यांनी वेदवाणी सरस्वतीला याज्ञवल्क्यामध्ये प्रविष्ट व्हायला प्रेरित केले. तेव्हा याज्ञवल्क्याने आपले मुख उघडले. इथे स्पष्ट आहे की, याज्ञवल्क्याने भगवान भास्कराच्या कृपेने खिल भागासह वेद प्राप्त केले. अशा प्रकारे शंभर अध्याय असलेल्या ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथाचे प्रथम प्रवचन याज्ञवल्क्याने केले. महाभारतात हा सर्व प्रसंग आहे. भगवान भास्कराच्या कृपाप्रसादाने याज्ञवल्क्याने शुक्र यजुर्वेदाच्या १५ शाखा प्राप्त करून घेतल्या.’ यामुळे खिलभाग नंतर रचला इत्यादी विधाने खोटी आहेत.’

 

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (२)

 

 

२. वेदांविषयी विकल्प निर्माण करणारे विचार

टीकाकारांनी वेदांविषयी विकल्प निर्माण करणे, म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा नीचस्तर दाखवून देणे !

टीका

‘ऋग्वेद हा मोठा ग्रंथ आहे, तर शुक्ल यजुर्वेद हा लहान (छोटा) ग्रंथ आहे.’ – आधुनिक विद्वान

 

खंडण

‘हे आधुनिक लोक कालक्रमाचे सूत्र (मुद्दा) विलक्षण ताणून धरतात. ते अत्यंत चुकीचे आहे. वेद हा एकच आहे. तो अपौरुषेय आहे. सोयीसाठी त्याचे व्यासांनी भाग केलेले असल्याने त्यात उच्च-नीच हा भाव येऊ शकत नाही; परंतु टीकाकारांनी असे विकल्प निर्माण करणे, म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा नीचस्तर दाखवून देणे होय.’

 

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (३)

 

 

३. म्हणे, ‘भारत’ आणि ‘महाभारत’ वेगवेगळे ग्रंथ आहेत !

टीका

‘आधी ‘भारत’ निर्माण झाला, नंतर ‘महाभारत’ झाले. या दोघांच्या मधल्या काळात रामायण झाले.’ – प्राच्यविद्या पाश्चात्त्य संशोधक आणि आंग्लाळलेले भारतीय विद्वान

 

खंडण

‘व्यासांनी आधी ‘भारत’ निर्माण केले आणि नंतर महाभारत निर्माण केले, हे अयोग्य आहे. द्वैपायन व्यासांनी केवळ महाभारताचीच रचना केली आहे. महाभारताच्या आदीपर्वात स्पष्टपणे सांगितले आहे की, व्यासांनी उपाख्यानांसह १ लक्ष श्लोकांचे महाभारत रचले आणि नंतर उपाख्याने वगळून जी २४ सहस्र श्लोकांची वेगळी संहिता सिद्ध केली तिला विद्वानांनी ‘भारत’ असे म्हटले. (आदिपर्व, अध्याय १, श्लोक १०१ ते १०४)

 

`आदिपर्वाच्या अध्याय १२० मधील श्लोकात भारत आणि महाभारत या शब्दांचे स्पष्टीकरण आले आहे. उपाख्याने वगळून जो कौरव पांडवांचा इतिहास उरतो, तो २४ सहस्र श्लोकांचा आहे आणि उपाख्यानांसहित १ लक्ष श्लोकांची संहिता गृहित धरली जाते. तिला महाभारत म्हणतात’, असे प्राचार्य अनंत दामोदर आठवले म्हणजेच स्वामी वरदानंदभारती यांच्या `महाभारताचे वास्तव दर्शन’ या ग्रंथात सांगितले आहे.

 

यामुळे भारत आणि महाभारत यांमध्ये रामायण झाले, हे म्हणणेही सर्वथा चुकीचे आहे. महाभारतातील वनपर्वात रामोपाख्यान आहे. त्यात रामायणातील अनेक प्रसंग आणि पात्रे आहेत. वाल्मीकि रामायणातील माहितीही आहे; परंतु रामायणात महाभारताचे निर्देश वा पात्रे नाहीत. त्यात महाभारताचा उल्लेखही नाही.’

 

प्राच्यविद्या पाश्चात्त्य संशोधक आणि आंग्लाळलेले भारतीय विद्वान केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सत्य डावलून जे अस्तित्वात नाही, ते आपल्या मनाने अस्तित्वात असल्याचे दाखवून सत्याची चिरफाड करून आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन (वास्तविक मूर्खतेचे प्रदर्शन) करतांना दिसतात.’

 

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (५)

 

 

४. श्रीमद्भगवद्गीतेच्या संदर्भातील अयोग्य विचार

४ अ. म्हणे, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश कुरुक्षेत्रावर केला नाही !

 

टीका

‘श्रीमद्भगवद्गीता ही कुरुक्षेत्राच्या समरांगणावर सांगितली गेली नाही. ती स्वतंत्रपणे सांगितली आहे.’ – महाभारताचे अभ्यासू असलेले आधुनिक प्राध्यापक

 

खंडण

‘स्वतःच्या विधानाच्या पुष्ट्यर्थ या आधुनिक प्राध्यापकांनी गांधी, विनोबा, डॉ. ग.श्री. खैर, डॉ. पेंडसे आणि अशाच काही डॉक्टरेट महापंडितांची मते प्रमाण म्हणून दिली आहेत; परंतु यासाठी अश्वमेधिक पर्वातील श्रीकृष्णार्जुनाचा संवाद हा सत्य दर्शवण्यास पुरेसा आहे.

 

१. महाभारताच्या अश्वमेधिक पर्वात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ‘‘हे महाबाहो, देवकीनंदना, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धप्रसंगी तू मला जी गीता सांगितलीस, ते ज्ञान तू मला पुन्हा सांग.’’ (अश्वमेधिक पर्व अध्याय १६, श्लोक ५ ते ७) श्रीकृष्ण सांगतो, ‘‘हे महाबाहो अर्जुना, पूर्वी युद्धकाळ उपस्थित झाला असतांना मी तुला हाच उपदेश केला होता; म्हणून तू आपले अवधान त्याच्याकडे लाव.’’ (अश्वमेधिक पर्व अध्याय ५१ श्लोक ४९)

 

२. गीता ही रणांगणावरच सांगितली हे स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष गीतेतील काही श्लोक पुढे दिले आहेत.

 

अ. भगवान श्रीकृष्णाने गीतोपदेश करून ‘आता ते आपले आप्तस्वकीय राहिले नसून ते आपले रणांगणात प्रतिस्पर्धी शत्रू म्हणून उभे आहेत. अशी ही अवस्था असतांना त्यांच्याविषयी आत्मीयता दाखवणे, हा मूर्खपणा आहे’, असे अर्जुनाला सांगितले. तसेच जीवनाचे लक्ष्य हे ईश्वरप्राप्ती असून त्यासाठी कोणते निरनिराळे मार्ग आहेत, तेही त्याला सांगितले.

 

आ. १८ व्या अध्यायातील ६१ व्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘तुझ्या शरिरात ईश्वराचे अस्तित्व असतांना त्या ठिकाणी तू स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्यामुळे तुला हा भ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा तू स्वतःचे अस्तित्व मिटवून मला शरण ये.’ यानंतर अर्जुनाचा भ्रम दूर झाला आणि तो पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाला शरण येऊन युद्धाला प्रवृत्त झाला.

 

या संदर्भांवरून भगवंताने युद्धारंभी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतोपदेश केला होता, हे निसंदिग्ध सूर्यप्रकाशासारखे लखलखीत कळून येते. युद्धप्रसंगी गीता सांगितल्याचे अश्वमेधिक पर्वात स्पष्ट दिलेले असतांना स्वतःला विद्वान समजणार्‍यांनी आपल्या तर्कट बुद्धीतून अशी विकृत टीका केली असल्याचे स्पष्ट दिसते.’

 

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, (६)

 

४ आ. ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य असतांना तिला गीतेपेक्षा महान ठरवणारे विद्वान !

टीका

`भगवद्गीतेपेक्षाही ज्ञानेश्वरी मोठी (महान) आहे.’ – एक आधुनिक विद्वान

 

खंडण

‘या लेखकाने वेद, पुराणे आणि गीता यांच्यात अन् ज्ञानेश्वरीत विरोध उभा केला आहे. ज्ञानेश्वर महाराज श्रुतिमाऊली आणि पुराण यांचे महिमान किती आवर्जून सांगतात. व्यासांच्या उपकारांनी त्यांचे हृदय सतत गदगदते. या लेखकाच्या लेखनात कुटिलता असून वेद, पुराणे आणि गीता यांना कनिष्ठ दाखवणारी ही कुचेष्टा आहे. यामुळे ज्ञानेश्वर वा ज्ञानेश्वरीची प्रतिष्ठा वाढणार नाही, तर प्रतिष्ठा घटेल. ज्ञानेश्वर महाराज षडैश्वर्य भगवान श्रीकृष्ण आणि भगवत्गीता यांचे महिमान पानोपानी सांगतात आणि त्यामुळेच समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी गीतेवर भाष्य केले.’ यामुळे `भगवद्गीतेपेक्षाही ज्ञानेश्वरी मोठी (महान) आहे’, हे म्हणणे उचित नाही. ते अज्ञानीपणाचे लक्षण आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (७)

 

 

५. धर्मग्रंथांतील लिखाणाचा स्वतःला हवा तसा अर्थ काढणारे टीकाकार

५ अ. ‘गृहीतः करः ।’ याचा आपल्याला हवा तसा शब्दांचा अर्थ काढणारे आधुनिक विद्वान टीकाकार !

श्लोक : ‘अत्र परमेश्वरेण तुषारशैलभुवो दुर्गाया गृहीतः करः ।’, – हर्षचरितम्

 

टीका

‘वरील श्लोकातील ‘दुर्गाया गृहीतः करः ।’, म्हणजे ‘(राजा हर्षाने) तो भाग जिंकल्यावर तेथील दुर्गेचे पाणि (हात, कर) ग्रहण केले’, म्हणजे ‘दुर्गेशी विवाह केला.’ – आधुनिक विद्वत टीकाकार

 

खंडण

‘वरील श्लोकाचा खरा अर्थ आहे की, राजा हर्षाने नेपाळवर आक्रमण करून तो भाग जिंकला. तिथे हर्षयुग चालू झाले. ‘हर्षचरितम्’मध्ये राजा हर्षाने एखाद्या हिमालय-पुत्रीसह विवाह केल्याचे वर्णन मात्र कुठेच दिसत नाही. बाणभट्ट आपल्या ‘हर्षचरितम्’मध्ये सांगतो, ‘दुर्गाया’, म्हणजे ‘निसर्गरम्य अशा दुर्घट आणि बर्फाच्छादित पर्वतीय प्रदेश असलेल्या भागात जाऊन (भागातून) (नेपाळकडून) हर्षाने ‘गृहीतः करः ।’, म्हणजे करवसुली केली. आधुनिक आंग्लाळलेले विद्वान असे अर्थाचे अनर्थ करून कसे संभ्रम निर्माण करतात, हे यावरून दिसून येते.’

 

संदर्भसूची

(कंसातील आकडे संदर्भक्रमांक आहेत.)

घनगर्जित (टीप)

(१)जानेवारी २०१० (५)ऑक्टोबर २००७

(२)नोव्हेंबर २००८ (६)एप्रिल २००८

(३)१५ मे २००८ (७)डिसेंबर २००९

(४)जानेवारी २००८

साप्ताहिक सनातन चिंतन (टीप)

 

टीप

प्रकाशक : गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाङ्मय प्रकाशन.

प्रकाशनस्थळ : गुरुदेव आश्रम, मु.पो. वडाळामहादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र ४१३ ७३९.

Leave a Comment