गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

कोल्हापूर येथे झालेल्या ‘आनंदी जीवनासाठी साधना’ प्रवचनाला ५०० जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे

कोल्हापूर –  अन्य कोणत्याही मार्गाने साधना करण्यापेक्षा गुरुकृपायोगासुसार साधना केल्यास शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते. या मार्गानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना अशी दोन अंगे आहेत. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृतीसाठी प्रयत्न, तर धर्मप्रसार करणे हे समष्टी साधनेत येते. याच्या जोडीला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ५ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर खरे मंगल कार्यालय येथे आयोजित प्रवचनात बोलत होत्या.

या वेळी आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी सुख आणि आनंद यांतील फरक, मनुष्यजन्माची कारणे यांसह अन्य विषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनासाठी सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, जिज्ञासू, डॉक्टर, पुरोहित, व्यावसायिक, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ असे ५०० जण उपस्थित होते.

मार्गदर्शनाला उपस्थित सनातन संस्थेचे १. पू. सदाशिव परब आणि जिज्ञासू

श्री. विलास वेसणेकर यांनी केलेल्या शंखनादानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या दोघांचाही सत्कार सौ. दीपा अशोक भट (सनातन संस्थेच्या संत सौ. शैलजा परांजपे यांची भाची) यांनी केला. अत्यंत अल्प कालावधीत आयोजन केले असूनही प्रवचनास उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांची विशेष उपस्थिती होती.

निवडक प्रतिक्रिया

१. अधिवक्त्या (सौ.) प्रियांका संकपाळ – कार्यक्रम शिस्तबद्ध होता. गर्दी असूनही बैठकव्यवस्था चांगली होती. अन्य वक्ते ‘ते काय करतात’, याविषयी सांगतात; मात्र तुमच्या वक्त्यांनी साधनेची आवश्यकता विशद केली. मार्गदर्शन ऐकून आपली संस्कृती आणि परंपरा आपण संस्कारांतून जपून ठेवली आहे, हे लक्षात आले. साधना विस्कळीत जीवनाला सुरेल करते, भरकटलेल्या मनाला स्थिर करते. साधनेतून सुखी जीवनाचा मार्ग सोनेरी होतो. आपण संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करूया ! (सौ. प्रियांका यांनी सनातन संस्थेचा आश्रम पाहण्याची, तसेच त्यांच्या यजमानांनी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली.)

२. श्री. धनाजी टीपुगडे – वक्त्यांनी चांगले मार्गदर्शन केले.

३. सौ. दीपा तेलंग – मार्गदर्शन एका लयीत झाले. त्यामागे दैवी शक्ती कार्यरत असल्याने ‘ते ऐकत राहावे’, वाटत होते. साधनेचा विषय अंतर्मनात रूजला.

४. सौ. कीर्ती मंगेशकर – येथे मंदिराप्रमाणे सात्त्विकता जाणवत होती. सद्गुरु स्वातीताईंमध्ये दैवी शक्ती असल्याचे जाणवत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment