शास्त्रज्ञांना सापडले पृथ्वीच्या पोटातून येत असलेले ‘भूत कण’ !

अध्यात्मशास्त्रानुसार सप्तलोक आणि सप्तपाताळ आहेत. सप्तलोक ऊर्ध्व दिशेला, म्हणजे आकाशाच्या दिशेने, तर सप्तपाताळ पृथ्वीच्या खालच्या दिशेला आहेत. सप्तलोकांतून ईश्‍वरी चैतन्याचा प्रवाह येत असतो, तर पृथ्वीच्या खालून नकारात्मक अशा अनिष्ट शक्तींचा प्रवाह येत असतो. शास्त्रज्ञांकडून होत असलेल्या संशोधनातून त्यांना आता या नकारात्मक शक्तींचा प्रवाह लक्षात येत आहे, ही तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक आहे !

नवी देहली – शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पोटात ‘भूत कण’ (घोस्ट पार्टिकल) आढळले आहेत. ‘जिओन्यूट्रिनोज’ म्हणून ओळखले जाणारे हे रहस्यमय कण पृथ्वीवरील पदार्थांशी क्वचित्च संयोग पावतात आणि म्हणूनच त्यांना ओळखणे जवळजवळ अशक्य होते; परंतु जगातील सर्वांत मोठ्या भूमीगत प्रयोगशाळेत काम करणार्‍या वैज्ञानिकांना ५३ आश्‍चर्यकारक घटनांचा शोध लागला. त्यामुळे ‘भूत कणां’विषयी संशोधन करणे शक्य झाले.

१. या घटना ‘बोरेक्सिनो डिटेक्टर’चा वापर करून आढळून आल्या. हा ‘बोरेक्सिनो डिटेक्टर’ भूमीच्या आत १ सहस्र ४०० मीटर खोल बसवला आहे आणि तो सहजासहजी लक्षात येणार नाही, अशा आश्‍चर्यकारक घटनांचे संवेदनशीलपणे मोजमाप करू शकतो. शास्त्रज्ञांना आशा आहे की, हे नवीन शोध भूमीखाली घडणार्‍या अनाकलनीय घटनांवर अधिक प्रकाश टाकू शकतील.

२. ‘भूत कण’ भूगर्भात किरणोत्सर्गी पदार्थ्यांचा र्‍हास (रेडिओअ‍ॅक्टीव्ह डिके) होण्याच्या प्रक्रियेच्या वेळी बनतात. याचा अर्थ असा आहे की, तप्त अशा पृथ्वीच्या गर्भात असे सहजासहजी समजून न येणारे असंख्य कण सिद्ध होतात आणि ते भूपृष्ठावर येत असतात; पण ते दृश्यमान नसल्याने आपण त्यांच्या संदर्भात अनभिज्ञ असतो.

३. बोरेक्सिनो डिटेक्टर भूमीत बसवलेल्या इटलीमधील प्रयोगशाळेचे उद्दिष्ट ‘भूत कणांचा शोध घेणे’, हे आहे. या प्रयोगशाळेतील वैज्ञानिक वर्ष २००७ पासून भूत कणांचा शोध घेत होते आणि त्या संदर्भातील माहिती गोळा करत होते. गेल्या वर्षी संशोधकांना त्यात यश आले आणि त्यांनी भूत कणांचा प्रवाह शोधून त्यांचे मोजमाप निश्‍चित केले.

४. ‘भूत कण’ हे पृथ्वीच्या गर्भात किरणोत्सर्ग करणार्‍या पदार्थांचा र्‍हास होतांनाच्या प्रक्रियेतील प्रत्यक्ष अवशेष आहेत. ते कण पृथ्वीवरील जिवांना चालना मिळण्यासाठी लागणार्‍या अज्ञात ऊर्जेपैकी काही ऊर्जा पुरवतात’, असे ‘बोरेक्सिनो’च्या प्रमुख शास्त्रज्ञांपैकी एक असणार्‍या लिव्हिया लुडोवा म्हणतात.

५. या प्रयोगशाळेत लागणारे नवीन शोध पृथ्वीच्या गाभ्यामध्ये पुष्कळ प्रमाणात उष्णता निर्माण होण्याच्या रहस्यमय प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यास साहाय्यक ठरू शकतील. आपल्या पायाखालची भूमी प्रचंड ज्वालामुखी, चुंबकीय क्षेत्र यांसारख्या अचंबित करणार्‍या घटनांना जन्म देते. अशा घटना सूर्यमालिकेतील अन्य ग्रहांमध्ये पाहायला मिळत नाहीत.

६. या संशोधनातील माहिती ‘पृथ्वीवर ज्वालामुखी, भूकंप अशा घटना कशामुळे घडतात ?’, हे समजून घेण्यास वैज्ञानिकांना साहाय्य करील. या संशोधनातून हे स्पष्ट होते की, पृथ्वीखालील किरणोत्सर्गी पदार्थांमुळे निर्माण होणार्‍या किरणोत्सर्गामुळे पृथ्वीच्या आत असलेल्या उष्णतेपैकी अर्ध्याहून अधिक उष्णता निर्माण होत आहे आणि उर्वरित उष्णता पृथ्वीच्या निर्मितीच्या प्रक्रियेपासूनच उद्भवत आहे. याचा अर्थ पृथ्वीखालील किरणोत्सर्गाची प्रक्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे ज्वालामुखी आणि भूकंप यांना उत्तरदायी आहे.

७. शास्त्रज्ञांना आशा आहे की, भूत कणांविषयी अधिक अचूकतेने जाणून घेतल्याने ते पृथ्वीखालील रहस्यमय प्रक्रियांविषयी अधिक माहिती घेऊ शकतात. चीनमध्ये सध्या ‘जुनो’ नावाच्या एका प्रयोगाची आखणी केली जात आहे. तो बोरेक्सिनोपेक्षा ७० पट मोठा असेल आणि त्यातून पृथ्वीखालील घटना अधिक अचूकतेने समजतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment