मालाड (मुंबई) येथील नाडी प्रशिक्षक आचार्य वैद्य संजय छाजेड यांची सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट

रामनाथी (गोवा) – आयुर्वेदानुसार नाडीपरीक्षण करण्यास शिकवणारे नाडी प्रशिक्षक आचार्य वैद्य संजय छाजेड, मालाड (मुंबई) यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला ४ जानेवारी या दिवशी भेट दिली. या वेळी वैद्य छाजेड यांना सनातन संस्थेचे साधक अधिवक्ता योगेश जलतारे यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र-धर्म कार्याची आणि आध्यात्मिक संशोधनाविषयी माहिती अवगत करून दिली. या वेळी वैद्य छाजेड यांनी संस्थेच्या कार्याविषयी श्रद्धेने जाणून घेतले. आश्रम पाहिल्यानंतर त्यांनी ‘आश्रम पुष्कळ आवडला. मला येथे ८ दिवस येऊन शिकायला आवडेल’, असे आवर्जून सांगितले.

डावीकडून वैद्य संजय छाजेड यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना अधिवक्ता योगेश जलतारे

 

आश्रम पाहतांना वैद्य छाजेड यांनी काढलेले कौतुकोद्गार

१. साधकांनी साधना करतांना होणार्‍या चुका लिहिलेला फलक पाहतांना ते म्हणाले, ‘‘प्रत्येक साधक चूक लिहितो का ? हे पुष्कळ चांगले आहे.’’

२. ‘साधक स्वतःची पदरमोड करून साधना करतात’, असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले की, त्याच्या बदल्यात साधकाला पुष्कळ काही मिळत असते. महर्षि सांगत, ‘साधकाच्या त्यागामुळे त्याला आनंद मिळतच असतो. त्यामुळे त्याने देवाकडे आणखी काही मागण्याची आवश्यकता नाही.’

३. सनातन संस्थेचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांची भेट झाल्यावर त्यांना पू. सौरभदादांचा ‘ऑरा’ (प्रभावळ) सकारात्मक असल्याचे लक्षात आले. याविषयी ते म्हणाले की, चांगल्या व्यक्तीच्या ‘ऑरा’मुळे त्याच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीचाही ‘ऑरा’ सकारात्मक होतो.

 

वैद्य संजय छाजेड यांचा परिचय

वर्ष १९८७ मध्ये वैद्य संजय छाजेड यांनी पुणे विद्यापिठाच्या आयुर्वेदाचार्य परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुवर्णपदक प्राप्त केले. त्यानंतर गुजरात आयुर्वेद विद्यापिठाच्या प्रवेश परीक्षेतही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या विद्यापिठात त्यांनी ‘कायाचिकित्सा’ विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतांना येथेही सुवर्णपदक पटकावले. कालांतराने त्यांनी महर्षि महेश योगी यांच्या आयुर्वेद प्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन युरोपमध्ये पंचकर्म केंद्रे चालू केली. त्यांनी हंगेरी देशात आयुर्वेदाला शासकीय मान्यता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. छाजेड संगीत चिकित्साही करतात. संगीताची चिकित्सा करणारे त्यांचे ५०० हून अधिक विद्यार्थी सिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी २५ सहस्र ‘केसेस’ (प्रकरणे) हाताळल्या आहेत. गर्भावस्थेपासून संगीत उपचार करण्याविषयी त्यांचे संशोधन झाले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment