सीताफळाचे औषधी उपयोग

Article also available in :

सीताफळ हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ‘सीताफळाची प्रतिदिन दोन पाने खा !’, असे संदेश वाचले की, मला फार वाईट वाटते. ‘आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची माहिती, आयुर्वेदाचे ज्ञान असणार्‍यांनी सांगावी. कोणीही उठून काहीही सांगू नये’, असे मला वाटते. सीताफळाचे मी अनुभवलेले औषधी उपयोग येथे देत आहे.

 

दूध आणि फळे एकत्र करून किंवा लागोपाठ खाऊ नये

आजकाल लोकांना कुठलेही फळ दूध साखरेसह एकत्र करून प्यायला दिले जाते. अशी पेये क्षणिक बळ देत असली, तरी ती आरोग्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक आहेत. दूध आणि फळे एकत्र करून घेतल्यास आज ना उद्या पोटाचे आणि त्वचेचे विकार (आजार) होणारच आहेत. सीताफळ खाल्ल्यानंतर लगेचच दूध घेतल्यास कफाचा त्रास नक्कीच होतो !

 

१. पाने

१ अ. व्रण (जखम)

एकदा एका व्यक्तीने मला ‘तिच्या वासराला जखम झाली आहे, तर त्यावर काय करता येईल ?’, असे विचारले. ‘सीताफळाची पाने जखम बरी करणारी आहेत. त्यामुळे ती पाने कुटून त्यात थोडी हळद एकत्र करून पाणी न घालता दोन-चार दिवस लावा’, असे मी त्यांना सांगितले. तीन दिवसांनी ती व्यक्ती वासरू घेऊन माझ्याकडे आली. ‘तुमच्या औषधाने जखम पूर्ण बरी झाली’, असे म्हणून तिने माझे आभार मानले.

१ आ. चक्कर येऊन पडणे

ताणतणावाचा परिणाम मस्तकावर होत असतो. काही जण ताणतणाव सहन न झाल्यामुळे चक्कर येऊन पडतात. या वेळी सीताफळाची पाने चुरडून नाकाशी धरावीत. यामुळे माणूस लगेच सावध होतो. ज्या वेळी कांदा मिळत नाही, त्या वेळी हा प्रयोग करावा. आराम मिळतो.

१ इ. गजकर्ण (नायटे)

खेडेगावातील कोणी जर माझ्याकडे नायट्याच्या उपचारासाठी आला, तर मी त्यांना माझ्याकडील औषधी चूर्ण सीताफळाच्या पानांच्या रसातून लावायला सांगतो. त्याने लगेच दोन-चार दिवसांत आराम मिळतो.

१ ई. अंग (गुदद्वार) बाहेर येणे

वैद्य विलास शिंदे

एक सत्तरीतील व्यक्ती माझ्याकडे या कारणासाठी आली होती. त्यांना माझ्याकडील काही औषधे दिली. पथ्य समजावून सांगितले आणि पुढील घरगुती उपाय सांगितला. एक कप पाण्यात सीताफळाची २ – ३ पाने घालून अर्धे आटेपर्यंत त्याचा काढा करावा. काढा करतांना झाकण ठेवू नये. अर्धा कप काढा शिल्लक राहिल्यावर तो थंड झाला की, त्यात अर्धा चमचा मध घालून दिवसातून दोन वेळा घ्यावा. यासह गुदद्वारावर शतधौत घृतही लावण्यास सांगितले. (शतधौत घृत हे औषध आयुर्वेदीय औषधांच्या दुकानात मिळते.) औषधे संपण्यापूर्वीच ती व्यक्ती मला भेटण्यासाठी आली आणि तिने पुष्कळ बरे वाटल्याचे सांगितले.

 

२. पाने आणि बिया

केसांतील उवा आणि लिखा

सीताफळाच्या बिया आणि पाने यांचा उवा आणि लिखा (उवांची अंडी) मारण्यासाठी अधिक वापर होतो. सीताफळाची पाने मिक्सरला बारीक वाटून त्याने केस धुवावेत. बियांचे चूर्ण चणाडाळीच्या पिठासह एकत्र करून त्याने केस धुतल्यास उवा आणि लिखा मरतात. हे दोन्ही उपचार करतांना हे औषध डोळ्यांना लागणार नाही, याची काळजी घ्यावी; कारण हे डोळ्यांत गेले, तर त्याचा पुष्कळ त्रास होतो.

 

३. फळ

३ अ. ताप

शरिराची आग होऊन, म्हणजे पित्ताचा उद्रेक होऊन ताप येत असेल, तर सीताफळ खावे; मात्र हे सकाळी खाणे टाळावे. लहान मुलांना सीताफळ बेतानेच खायला द्यावे.

३ आ. एकसारखी तहान लागणे

सारखी तहान लागत असल्यास सीताफळ खावे.

– वैद्य विलास जगन्नाथ शिंदे, जिजाई आयुर्वेद चिकित्सालय, खालापूर, रायगड (१५.१०.२०१९)

Leave a Comment