राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर येथील ‘ज्ञानम् महोत्सव’ बंद पाडला

‘कलम ३७०’, ‘एन्.आर्.सी.’, ‘हिंदु आणि हिंदुस्थान’ या विषयांवर परिसंवाद ठेवल्याचे कारण दिले !

इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप ! राष्ट्रहित आणि हिंदुहित यांच्याशी निगडित विषय काँग्रेसला रूचत नाहीत, हेच यातून स्पष्ट होते !

जयपूर (राजस्थान) – राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील परिसंवादासाठी प्रसिद्ध असलेल्या जयपूर येथील ‘ज्ञानम् महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाची सत्रे पूर्ण झाल्यानंतर सरकारने महोत्सव बंद करण्याचा आदेश रात्री आयोजकांना दिला. या संदर्भात ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि महोत्सवाचे आयोजक श्री. दीपक गोस्वामी यांनी म्हटले, ‘‘ज्ञानम् महोत्सव हा राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील चर्चासत्रांसाठी प्रसिद्ध आहे. या महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रीय सुरक्षेच्या अंतर्गत ‘कलम ३७०’, ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.)’ आणि ‘हिंदु आणि हिंदुस्थान’ या विषयावर चर्चा करण्यात येणार होती. या चर्चासत्रांमध्ये देशातील माजी सैन्यदलप्रमुख, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्यासारखे विचारवंत, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आदी सहभागी होणार होते. सरकारने ‘हे विषय विवादास्पद आहेत’, असे कारण सांगून या महोत्सवाची अनुमती रहित करत असल्याचा आदेश रात्री परिपत्रक काढून आम्हाला दिला. देशहित आणि अध्यात्म या विषयांवर चर्चा करणेही या देशात गुन्हा आहे का ?’’

 

घटनात्मक विषयांना वादग्रस्त ठरवणे
घटनाविरोधी कृती ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

या संदर्भात माध्यमांसमोर भूमिका मांडतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘देशाच्या संसदेत ‘कलम ३७०’, ‘एन्.आर्.सी.’ इत्यादी विषयांवर सर्व राजकीय पक्ष चर्चा करतात. कलम ३७० चे विधेयक देशाची संसद पारित करते आणि देशाचे राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतात. याचा अर्थ कलम ३७० हा विषय राज्यघटनात्मक आहे. एन्.आर्.सी. आसाममध्ये लागू करण्याचा आदेश भारताचे सर्वोच्च न्यायालय देते. याचा अर्थ हा विषय वैधानिक आहे. असे असतांना राज्य सरकारने ज्ञानम् महोत्सवाच्या जनसंसदेत अशा विषयांना विवादास्पद ठरवून तो रहित करणे, हेच खरे तर घटनाविरोधी आहे.’’

 

ज्ञानम् महोत्सवाची लोकप्रियता !

ज्ञानम् महोत्सव रहित करत असल्याचा आदेश १५ डिसेंबरला रात्री ८ वाजता मिळाल्यानंतर आयोजकांनी सर्व वक्ते आणि नोंदणीकृत श्रोते यांना याविषयी कळवले होते. तथापि दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून ज्ञानम् महोत्सवातील वक्ते, श्रोते आणि हितचिंंतक हे आयोजकांचे सांत्वन करण्यासाठी सभागृहस्थळी पोचले. दुपारी ३ वाजेपर्यंत साधारणतः ६० ते ७० जणांनी त्यांच्या भावना आयोजकांना प्रत्यक्ष भेटून कळवल्या. यातून ‘ज्ञानम् महोत्सवा’ची लोकप्रियता लक्षात येईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment